नाते विश्वासाशी विश्वाचं

दोन,तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.... रात्री पासून धुवाधार पाऊस पडत होता, सकाळी पण त्याचे अविरत कोसळणे सुरुच होते. मुंबईची परिस्थिती नेहेमीप्रमाणे तुंबईकडे वाटचाल करू लागली होती. दुपारी थोडावेळ उघडलेल्या पावसाने साधारण चार-पाचच्या दरम्यान परत तांडव सुरु केले. माझ्या मुलीला क्लासहून घरी परतताना कसंबसं एका महिन्याचे पिल्लू पायरीवर थरथरत पावसाकडे बघत बसलेलं दिसलं. ती धावत वर आली आणि तिने मला पिल्लाला वर आणू का असे विचारले. खरंतर फ्लॅटमध्ये प्राणी पाळणे हे मला पसंत नाही; पण ते पिल्लू इतके लहान होते आणि बाहेरच्या पावसाने धारण केलेले रुद्र रूप बघून माझ्याकडून कसे "हो " निघाले ते मला पण कळले नाही. त्याला घरी आणल्यावर मी जवळ घेतलं, ते पिल्लू जवळपास एक-दीड तास माझ्या मांडीत गाढ झोपलं होतं. विश्वास वाटला असेल का त्याला माझ्या स्पर्शात?

मानवी जीवनात "विश्वासाला" फार महत्वाचे स्थान आहे. मानव आणि प्राणी यांच्यामधल्या मूक घट्ट नात्याची अनेक उदाहरणं आहेत. महाराणा प्रताप-चेतक, शिवाजी महाराज- वाघ्या, डॉक्टर पूर्णपात्रे आणि सोनाली सिंहीण. बोलता न येणाऱ्या या मूक जीवांना आपल्या मालकाविषयी असलेला विश्वास आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रेम घट्ट नात्यात गुंफून ठेवते आणि हे समीकरण प्रत्येक नात्याला लागू आहे. विश्वास असेल तर नात्यामध्ये प्रेम, आदर, काळजी या भावनांचा उगम होतो. 

जन्मल्यापासून वेगवेगळ्या नात्यात माणूस बांधला जातो. प्रत्येक नातं हे त्याला एका अदृश्य; पण महत्वाच्या धाग्यानी बांधून ठेवत. हा अदृश्य धागा म्हणजे विश्वास होय. विश्वास नसलेले नातं हे नातं राहात नाही. मग संशय, वैर, बदला, टोकाचा दुस्वास, तिरस्कार, घृणा अशा नकारात्मक भावना जन्म घेतात. माणूस म्हणून दुसऱ्या माणसाकडे न बघता आपल्या मापदंडात त्याला तोलून नकळत माणुसकीला काळिमा लावणारी कृत्य घडतात. गुन्हेगारीचे वाढत जाणारे आकडे हे खरं तर कुठे तरी मानवामधल्या एकमेकाबद्दल कमी होत चालेल्या विश्वासाची कहाणी तर सांगत नाही ना?

खरतर "विश्वासा" वर विश्वास ठेवून आपण जगत असतो. पुढे काय होणार हे माहित नसून आपण दुसऱ्या दिवशीचे प्लॅन आखत असतो. एखाद्या दुकानात आपण नेहेमी खरेदी करतो, तिथल्या मालाविषयी आपल्याला खात्री असते. त्या दुकानदारावर विश्वास असतो. पदोपदी विश्वास कळत नकळत आपल्या बरोबरीने चालत असतो.

काही दिवसापूर्वी मुलीबरोबर "कॅट कॅफे" मधे गेले होते. एक मांजर तिथल्या खेळ्ण्याशी मस्त खेळत होती. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे. मी तिथल्या कर्मचाऱ्याला विचारलं की ती इथे कशी वावरते? तो म्हणाला, प्राण्यांची घाणेंद्रिय उत्तम असतात. वासावरून ते अंदाज घेतात आणि आमच्यावर तिचा विश्वास आहे. काही झालं तरी ही माणसं आपल्याला सांभाळणार, रक्षण करणार हा विश्वास तिला तिच्या व्यंगावर मात करून मनसोक्त खेळायला उद्युक्त करत होता.

श्रद्धा ही विश्वासाची सखी आहे. देवावर विश्वास ठेवणारे श्रद्धाळू लोक, देवाला मानतात आणि तर काही लोक देवाला मानत नाही. इथे विश्वास, चांगला किंवा वाईट ठरत नाही, तर इथे तो मानवाला दिलेल्या बुद्धीच्या वरदानाचा आदर करत आस्तिकता आणि नास्तिकतेमधे असलेली अदृश्य रेषा हळुवार सांभाळताना दिसतो. सुनीता बाई "आहे मनोहर तरी" या त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, "पूर्णपणे नास्तिक असणं सोपं नाही". इथे सगळी जवाबदारी तुमच्यावर असते. मग पेपरला जातांना देवाला केलेला नमस्कार असो किंवा नवीन कार घेतल्यावर केलेली पूजा असो किंवा साजरे होणारे धार्मिक सण/समारंभ असो अशा प्रकारची सर्व कर्मकांडं नाकारून आपल्या तत्त्वावर ठाम राहणे सोपं नाही.

नास्तिक असणं दुसऱ्या कुठे तरी विश्वासाला वा श्रद्धेला जन्म देत असतं. स्वतःच्या कर्मावर, ज्ञानावर, तत्त्वावर असलेला विश्वास जीवन जगायला स्फूर्ती देत असतो. आयुष्यात पदोपदी सावलीसारखा साथ देणारा "विश्वास" सकारात्मकतेला जन्म देत असतो. डॉक्टरवर विश्वास ठेवून आपण त्यांच्या कडून इलाज करून घेतो. मुलांचा व्हॅनमध्ये विश्वासाने धाडतो, हॉटेल मधे जाऊन जेवतो, विमानात बसतांना पायलटवर आपण नकळत विश्वास टाकलेला असतो. दैनंदिन जीवनातल्या कितीतरी गोष्टी आपण अदृश्य स्वरूपात कार्यक्षम असेलेल्या सक्रिय विश्वासाच्या भरवश्यावर सहज करत असतो.

जीवन हे क्षणभंगूर आहे, तेव्हा सकारात्मकतेसारख्या पवित्र भावनेला जन्म देणाऱ्या "विश्वासा”वर श्रद्धा ठेवून आपण हे विश्व आणि मानवी जीवन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करू.

हेमांगी वेलणकर

३ टिप्पण्या:

  1. व्हा !!! विश्वासावर विश्वास !! बहुत बढ़िया !!!
    मस्त लेख हेमांगी . गोड लिहिलयेस !!! 💕😊👏🏻
    - रश्मी कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच हृदयस्पर्शी... हेमांगी मस्त लिखाण 👍🏽

    उत्तर द्याहटवा
  3. छान झालाय लेख हेमा....आपल्या भावनाच विचार आणि कृतींना जन्म देत असतात...त्यामुळे अश्या सकारात्मक भावनांवर लिहित रहा....Keep it up

    उत्तर द्याहटवा