निरोप

ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
निरोपाच्या अश्रूशी मैत्री माझी दाट आहे 

प्रत्येक वळणावर त्याची माझी गाठ आहे 

शाळेच्या उंबरठयावर पाऊल माझ अडल होतं 

मैत्रिणींच्या वियोगाचा दु:ख त्यात दडलं होतं 

पदवीप्रमाणपत्राचा कोपरा ओलावला होता 

सार्थकतेचा आनंदही जरा हेलावला होता 

सनईच्या सुरामधे एक हुंदका दाटला होता 

चौघड्याच्या उरामधला ठेका का चुकला होता 

मुंडावळीच्या सरीमधून आसवे ठिबकली होती 

सप्तपदीच्या फेर्‍यामधे पावले थबकली होती 

वाटल नव्हत ह्यासुध्दा वळणावर जुना मित्र पुन्हा भेटेल

दारामधून निघतां निघतां मला असा अवचित गाठेल 

इतक्या लहान वाटेवर खोल असा ठसा उठेल 

वर्षाचा अपूर्णांक पूर्णाचाही भाग व्यापेल 

आयुष्याच्या वाटेवरच हे वळण वेगळे होतं 

चढणीवरच्या विश्रांतीच ह्याच स्थान आगळ होतं 

जरी मिलन आणि शेवट ह्यांच नात अटळ आहे

निरोपाच्या अश्रूमधील सत्यसुध्दा निखळ आहे.  


- प्रमोदिनी देशमुख









1 टिप्पणी: