संपादकीय - ज्योतिर्गमय

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४


दिवाळी हा वर्षातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण. दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छांसह ऋतुगंधचा दिवाळी लघुकथा विशेषांक वाचकांपुढे सादर करताना विशेष आनंद होत आहे. ह्या अंकाने आपली दिवाळी आणखी खुमासदार आणि मनोरंजक होईल अशी आशा!

आपल्या आयुष्यात अनेक आर्थिक, शारीरिक व नैतिक स्थित्यंतरे येतात. कधी दुष्ट प्रवृत्तींशी लढून विजय मिळवावा लागतो, कधी आपलेच स्वरूप निरनिराळ्या कोनांतून पाहून स्वत:ला समजावे लागते, कधी आयुष्यभराची एखादी चूक लक्षात येऊन उशीर होण्यापूर्वी दुरुस्त करावी लागते, तर कधी आपलेच समज बदलत्या काळाच्या कसोटीवर घासून लखलखीत करावे लागतात.

ह्या सगळ्या स्थित्यंतरांचा अविष्कार ह्या अंकातल्या कथांमधून वाचायला मिळेल. त्या शिवाय दिवाळीच्या व शरदऋतुच्या सौंदर्याचे लेख आपल्याला आवडतीलच.

नेहमीच्या सदरांपैकी सिनेसफरमध्ये गोल्डी आनंदच्या “गोल्डन टच”चा सुरेख आढावा घेतला आहे. “कवी शब्दांचे ईश्वर साकारताना” ह्या मालिकेतला पहिला भाग आरती प्रभूंच्या एपिसोडबद्दल असणार आहे. त्याशिवाय खास दिवाळीनिमित्त फराळाच्या रसभरित गोष्टीसुद्धा सामील केल्या आहेत. 

पाडव्याला भारतीय संस्कृतीप्रमाणे नवे आर्थिक वर्ष सुरू होते. सर्वांच्या भरभराटीची, सौख्याची प्रार्थना करून दारिद्र्याचा अंधार दूर व्हावा म्हणून लक्ष्मीचे पूजन केले जाते. काळोखाने व्यापलेले कोने-कोपरे पणत्या लावून उजळून टाकले जातात. ह्या दिवाळीत अशाच प्रकाशसोहळ्यात अंतरबाह्य प्रकाशाने उजळून जळीस्थळीमनीमानसीचा कोपरा न् कोपरा प्रकाशाने भरून जावा म्हणून सदिच्छा करू या.

सस्नेह,
ऋतुगंध समिती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा