लाच

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४


लाच म्हणजे लाच म्हणजे लाच असते
तुमची आणि आमची
कधी वेगळी आणि कधी सेम असते.

मराठीत 'चहापाण्याची सोय' म्हणून लाच देता येते
इंग्रजीमध्ये 'अ गिफ्ट फॉर यू' म्हणून लाच देता येते,
काही न बोलता टेबलाखालून लाच देता येते
मोठ्या हॉटेलात मोठी पार्टी देऊनही लाच देता येते!

लाच घेण्यासाठी वयाचं बंधन नसतं
तसंच लाच देण्यासाठीही वयाचं बंधन नसतं,
लहान मुलं अभ्यास करायला लाच घेतात
आणि शिक्षक पास करायला लाच घेतात!

माणूस चार बुकं शिकला की
देवाला केलेल्या नवसाला लाच म्हणून हिणवता येतं,
आणि अडाणी साखरसम्राटाला दिलेल्या पदवीला
'गौरव' म्हणून गौरवताही येतं!

सिग्नलला पकडणार्‍या मामाला लाच देता येते
पोलीस स्टेशनमध्ये सहीसाठीपण लाच देता येते,
आपण लाच देतो तो काम लवकर होण्यासाठीचा उपाय असतो
आणि गल्लीचा दादा देतो तो भ्रष्ट अधिकार्‍यांसह केलेला गुन्हा असतो!

लाच म्हणजे लाच म्हणजे लाच असते
तुमची आणि आमची
कधी वेगळी आणि कधी सेम असते!


- शेरलॉक फेणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा