याचे जीवन ऐसे नाव

कधी कधी भरभरून बोलावसं वाटतं मनाला
पण दोन शब्दही ऐकून घ्यायला, वेळ नसतो कुणाला
कधी कधी भरगच्च मैफिलीत मात्र का बरं
दोन शब्दही सुचत नाहीत वेळ मारून न्यायला?

कधी कधी मनातल्या भावना उचंबळून डोळ्यात उभ्या ठाकतात
डोळेही त्यांना मागे सारायला प्रयत्नांची शिकस्त करतात
मागे-पुढे, आजूबाजूला असलेल्या माणसांच्या भरगच्च गर्दीत
का बरं, एखाद्याच नजरेला त्या तरीही टिपता येतात?

कधी एखादा जीव खूपच मनमिळाऊ असतो
आयुष्यभर मित्रमंडळी, नातेवाईकांच्या घोळक्यात असतो
पण अत्युच्च आनंद किंवा तीव्र दुःखाच्या प्रसंगात
का बरं, बालपणीचेच मित्र डोळ्यासमोर तरळतात?

कधी एखाद्या जीवाची, आयुष्यभर दुःखाशी सांगड असते
कष्टांचे डोंगर चढण्यातच, आयुष्य मागे सरत असते
जीवनाच्या उत्तरार्धात, जेव्हा तो बघतो मागे वळून
का बरं, त्याच्या चेहऱ्यावर दिसते कर्तव्यपूर्तीचे समाधान खुलून?

कधी एखाद्या जीवाचे आयुष्य म्हणजे भगवंताची देण असते
नाव, शोहरत, पैसा-अडका, सारे भरभरून असते
जीवनभर यशाची उंच-उंच शिखरे गाठूनही
का बरं, काहीतरी कमी असल्याची सल, वाटते राहून राहून?

जीव तोडून करत असतो माणूस स्वप्नांचा पाठलाग
स्वप्नंही मोठी चलाख, खेळतात पाठशिवणीचा डाव
कितीही साकारली तरी, का बरं, माणसाचं मन भरत नाही?
सगळं काही मिळवलं तरी, क्षितिजाची काही गाठ पडत नाही!

हे असे 'का बरं?', पावलोपावली, क्षणोक्षणी
मग म्हटलं, देवाला याचे उत्तर विचारावे तरी
देव म्हणाला, "वेडे, सोड हा भावनांचा गाव!
या 'का बरं?' चे, 'जीवन' ऐसे नाव!

“आयुष्यभर माणूस म्हणत असतो 'मी' चा पाढा
'मी' कसा श्रेष्ठ आणि 'मी' कसा वेगळा!
आयुष्य जगण्यात तो मग्न, त्याला हे ठाऊकच नसते
आयुष्यातील महत्वाचे निर्णय, आयुष्यच त्याच्यासाठी घेत असते!

“जीवनरूपी सापशिडीतील तो एक मोहरा असतो
गतजन्मीच्या कर्मानुसार चढ-उतार सोसत असतो
म्हणून म्हणतो, प्रत्येक क्षणाचे कर हसतमुखाने स्वागत
सुखी जीवनाचे रहस्य, तुझे तुलाच होईल अवगत!"

--- सोनाली पाटील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा