प्रेम – हे बंध रेशमाचे

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

माणूस अगदी जन्माला आल्यापासून प्रेमाच्या ओलाव्याने बांधलेला असतो. आईच्या गर्भात असल्यापासूनच आई आपल्या बाळाची काळजी घेते. मग बाळ जगात आल्यावर तर सगळे घर आनंदून जाते. आणि बाळावर प्रेमाचा वर्षाव करते. आई, बाबांचे मुलांवरचे निस्वार्थ प्रेम, आज्जी, आजोबा, बहीण, भाऊ, इतर नातेवाईक यांची आपुलकी ह्या सगळ्यानी माणसाचे व्यक्तिमत्व बनायला मदत होते. मी एका मोठ्या एकत्र कुटुंबामध्ये वाढले. अगदी लहानपणा पासून घरात खूप माणसे, व सतत येणारे नातेवाईक, पाहुणे ह्यांनी घर अगदी गजबजलेले असायचे. तेव्हा communication skills चे महत्व कळत नव्हते, पण सर्व वयाच्या लोकांशी सहजतेनी गप्पा मारणे, सर्वांना हवे नको बघणे, ह्याचे बाळकडू अगदी नकळतपणे मिळाले. घरातल्या मोकळ्या, प्रेमळ वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर किती सकारात्मक परिणाम होतो, हे आता समजते.

हळूहळू शाळेत गेल्यावर मित्र-मैत्रिणींचे प्रेम, शिक्षकांची प्रेमळ शिकवण, आणि हो, कधी मधी रागावून घेणे आणि शिक्षा सुद्धा. ह्यांनी आयुष्य अजून समृद्ध होत गेले. आमचा बाल मैत्रिणींचा ग्रुप अजूनही टिकून आहे. ज्याला अगदी “Friends for ever” म्हणता येईल. मी आत्ताही पुण्याला गेले कि, आम्ही सगळ्या आवर्जून भेटतो. आणि तासनतास गप्पा मारतो. ४० - ४५ वर्षांची मैत्री असल्याने अर्थातच अनेक विषयांवर गप्पा होतात. आणि कधी कधी जुन्या गोष्टी आठवून आम्ही खूप हसतो. माणूस हा आयुष्यभर वेगवेगळ्या नातेसंबंधांनी व प्रेमानी बांधलेला असतो. तू आयुष्यात काय कमावलेस? असे जर कुणी मला विचारले तर, “मी खूप प्रेम आणि अनेक मित्र-मैत्रिणी कमावले, व सगळी नाती छान जोपासली”. असे माझे उत्तर असेल. कारण नात्यांची श्रीमंती वेगळीच आहे. 

आयुष्यात प्रत्येक स्त्री - मुलगी, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, आई, आज्जी. अशा किती तरी भूमिका निभावते, व तिला प्रत्येक वेळी प्रेमाचा वेगळा रंग अनुभवायला मिळतो. आणि त्यातून आयुष्य आणखी सुंदर होत जाते. असे म्हणतात ना दुधापेक्षा दुधावरची साय अधिक प्रिय असते. ते तंतोतंत खरे आहे. नातवंडांवरच्या प्रेमाची मात्र कशाशीच तुलना करता येणार नाही. त्यांचे ते निरागस, लोभसवाणे रूप आणि आपल्याला प्रेमानी मारलेली घट्ट मिठी सगळ्याचा विसर पडायला भाग पाडते. अशा रितीने माणूस जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगात चिंब भिजून निघत असतो. आणि त्याचा आस्वाद घेत असतो. सर्व नाती उत्तम निभावणे व त्यांचा आनंद घेणे, ह्या सारखी दुसरी मजा आयुष्यात नाही असे मला वाटते. प्रेमावर कितीही लिहिले आहे तरी आहे अपुरे. तरी ह्या चारोळीने हा लेख संपविते, कसा वाटला ते जरूर सांगा.

कुठलेही असो वय, जात, पात व धर्म 
कायमच बोल दुसऱ्याशी चार शब्द प्रेमाचे
कारण हेच तर वैशिष्ट्य आपल्या माणूस होण्याचे
त्यामुळेच जीवन समृद्ध ठेवतील हे बंध रेशमाचे

-मेघना असेरकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा