ऋतुराग – भाग पहिला

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणाल कि शास्त्रीय संगीत आणि त्यावर एखादी लेखमालिका ? अहो, आम्हांला ते काय गातात ते नीटस आधी समजत नाहिये आणि तुम्ही ऋतु-रागावर लेखमालिका लिहिताय ? ..विषय समजायला थोडा क्लिष्ट वाटतो ना ? पण भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम हा तसा पाहता सर्वसामान्य जनचित्ताचे रंजन करण्यासाठी झाला. संगीत यात मुळ शब्द गीत म्हणजे गाणे आणि सं म्हणजे चांगले. म्हणजेच चांगले कर्णमधुर गाणे.. हि व्याख्या अजून थोडी पुढे वाढवून, कानाला गोड वाटणारे कोणतेही गायन-वादन-नृत्य म्हणजे संगीत अशी होते.

अति प्राचीन काळी आपले पूर्वज अगदी रानटी अवस्थेत होते. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या किमान गरजा भागवून आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर निरनिराळ्या कलांचा उदय त्याचं काळात होत होता. जगण्यासाठी उत्पन्न झालेली ती कला, त्यामुळे साहजिकच कलेचा मुख्य इप्सित आनंद मिळणे हा होता.. मग तो एखाद्या पशूची हत्या करुन मिळेल, किंवा कोणाला नदीच्या काठी पाण्याचा झुळझुळ आवाज ऐकण्यात मिळेल, किंवा कोणाला निसर्ग-चक्राप्रमाणे बदलत्या घटनांमधून मिळेल. हाच निसर्गातला बदल जर एखाद्या राग-संगीताच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवता आला तर?? मग दिनमानातील बदलानुसार एखादा राग मांडावा आणि त्यावेळी उत्पन्न होणाऱ्या स्वर लहरींतून तो क्षण अनुभवावा हे तत्व मांडल गेलं आणि मग रागांची समयकारणी तयार झाली असावी. त्याचंप्रमाणे अजून थोडा ढोबळ विचार करुन एखाद्या वर्षातल्या ऋतु चक्राला समोर ठेवून ऋतुनुसार त्या काळात आनंद देणाऱ्या स्वर लहरींना केंद्र पकडून एखादा राग त्या अनुषंगाने मांडला गेला.. हेच ते ऋतु राग संगीत.. 

अशी सहा ऋतुमध्ये गायली जाणारी सहा किंवा अधिक रागांची एक मालिका मांडायचा माझा एक प्रयत्न आहे.

सहा ऋतूंची सहा स्वरुपे चक्र तयांचे फिरते,
नव्या नव्या रंगात रंगुनि जीवनरंग बदलते.

सुरुवात करूयात, वसंत ऋतुने.. मागल्या वर्षीच्या शिशिरातली पानगळ झडून गेलेल्या झाडांना, नव-पालवी फुटण्याचा हा ऋतू. मरगळ आलेल्या मनाला नव-चैतन्य देणारा हा ऋतू.. दहा दिशांना बहरून टाकत येतो हा ऋतुंचा राजा! याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात. आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत 'ऋतूनां कुसुमाकरः' असे संबोधले आहे. कवीवर्य जगदेव तर वसंताचे वर्णन करताना थकत नाहीत. 

उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चराचराच्या अस्तीत्वाचे रहस्य प्रत्येक ऋतु आपल्याला उलगडून दाखवत असतो. कल्पना करा, कि तुमच्या घरी बाळ जन्माला येणार, तर किती उत्साह असतो घरात, नातेवाईकांमध्ये.. हाच लहान बाळ एखाद्या पानाचा कोंब, किंवा पालवीच्या रुपात निसर्गाच्या कुशीत वाढायला लागतो.. किंवा एखाद्या प्रेयसीचा प्रियकर मागल्या वर्षीच्या कुठल्याशा ऋतुमध्ये कामानिमित्त बाहेरगावी किंवा लढाईवर गेला आणि ती आपली लाडिक तक्रार गाण्यातून अशी व्यक्त करते... 

“दिवसामागून दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, .....जीवलगा, कधी रे येशील तू!”

आता विचार करा कि, अश्या लडिवाळ वेळी तिच्या मनात त्या शिशिरातला विरह नसतो.. तर तो तिचा प्रियकर ह्या वसंतातच येणारं हा दृढ विश्वास असतो.. मग चटकन मनात येईल ती सुरावट कुठली येईल तर... 

“दो मध्यम कोमल ऋषभ चढ़त न पंचम कीन्ह। 
स-मवादी संवादी ते, यह बसंत कह दीन्ह॥“

अर्थात बसंत राग.. अहो, बसंत ऋतुचं तसा आहे ! बसंत म्हणजे उत्साह, एक नवी उमेद. बसंत राग म्हणजे वैभव! वसंत ऋतूत सगळा निसर्गच अक्षरशः गात असतो. मग ह्या बसंत सोबतिला अजून एक राग येतो.. तो म्हणजे बहार.. आणि एक जोड राग होतो बसंत-बहार... आणि मग बसंत बहारच्या सुरावटीत न्हाऊन जातो.. खरे पाहता, हे दोन्ही राग रात्रीच्या प्रहारातले आहेत. असंच दुसऱ्या एका ग्रंथात वसंत ऋतूमध्ये हिंडोल गावा असं आढळतं. आता तसं पाहता दोन्हीचा राग समय वेगळा आहे. पण वसंत ऋतूमध्ये हे केव्हाही गायला जातात, त्याची मुभा आहे. कारण आपल्या मनाची, निसर्गातल्या तजेलदार वातावरणाची घातली जाणारी सांगड.. मग तो अमुक वेळीचं गायला जावा हि बंधनं आपोआप शिथिल होतात. हे असं प्रत्येक ऋतूतल्या रागांबद्दल आहे. 

ग्वाल्हेरचे राजे मानसिंग तोमर, पं. शारंगदेव (संगीत रत्नाकर), महाराणा कुंभ (संगीत राज), आणि फकीरुल्ला (राग दर्पण) इत्यादी संगीत क्षेत्रातील पूर्वीच्या मान्यवरांनी लिहिलेल्या ग्रंथातून ऋतु आणि त्याचा संगीतावर असलेला प्रभाव ह्यावर सिद्धांत सदर केलेत. त्यानुसार राग आणि रागिणी ह्यांचे वर्गीकरण केलेले आहे. कसं आहे की, त्याकाळच्या भारतातील सर्वच प्रदेशांतून ऋतुनुसार लोक गीत गायन व्हायचं. त्या लोकं गीतांचा आधार मानवी मनातल्या जागृत झालेल्या आनंद, प्रेम, करूणा इत्यादी भाव-भावना प्रकट करणे हाच होता. वास्तवात त्या गीतांचे शब्द, समाजातील घडामोडी, आणि तो काळ एकमेकांशी बांधील असायचे. त्यामुळेच बहुतांशी संगीतज्ञ रागाच्या सुरावटीनुसार निर्माण होणारा भाव हा अमुक एखाद्या ऋतुवेळेशी निगडीत आहे असा सिद्धांत मांडला. आणि तो बऱ्याच प्रमाणात तंतोतंत जुळतो.

प्रत्येक ऋतु आपले वेगळेपणं जपतो तरीही तो एकमेकांत असा गुंफला जातो, की एक ऋतु संपून दुसरा सुरु झाला आहे. हे कळतही नाही. तेव्हा पुढच्या ऋतुमध्ये घेऊन येईन अधिक अजून माहिती.. तोपर्यंत वाचकांना एक अभ्यास म्हणून वसंतात बसंत, बहार, बसंत- बहार आणि हिंडोल मधली गाणी ऐकून पडणारा त्याचा पडणारा प्रभाव अनुभवावा.

- ओंकार गोखले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा