प्रेमाची “शक्ती”

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

हल्ली “प्रेम” फक्त चारोळ्या, भेटकार्डं किंवा बाॅलीवूडची मक्तेदारी न राहता सरळ मानव संसाधनात शिरलंय. मनुष्यबळ विकासामध्ये हल्लीचं चलनी नाणं म्हणजे सकारात्मक मानसशास्त्रात वापरली जाणारी “शक्ती” (strength) हीसंकल्पना. मार्कस बकिंगहॅम “शक्ती” ची व्याख्या “उपजत असलेलं आणि ज्यावर माझं प्रेम अाहे असं कसब” अशी करतो. वरकरणी ढोबळ वाटणारी ही संकल्पना मनुष्यबळ विकासाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या कारणांकरता फारच महत्त्वाचीठरते. 

“उपजत कसब” हा वादाचा मुद्दा आहे. “विकास मनोभूमिकेच्या” दृष्टिकोनातून कुणालाही हवं ते कौशल्य आत्मसात करता येतं, आलं पाहिजे. पण तरीही काही गोष्टी “उपजत” असतात का? लहान मुलांचं सारेगामापा बघताना किंवा DID बघताना ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. एखादं लहान मूल चित्र छान काढतं, एखादं उत्तम पोहतं, एखादं अवघड कोडं पटकन् सोडवतं. परवा अडीच वर्षांचा सर्वंकष देवकी पंडितांचं “ऊन लागले तुला” ऐकताना मला म्हणाला, “आबा, चंद्र पणलागतो का?” त्याला तो प्रश्न पडला पण त्याच्या बरोबरच्या इतर भावंडांना तो पडला नाही हे काय सुचवतं? काही गोष्टी उपजत असाव्यात किंवा काही मेंदूंमधे काही चेतापेशींची जाळी आधीपासूनच जास्त घट्ट विणलेली असावीत. त्या अर्थीएखादं कसब हे उपजत असू शकतं. 

पण हे जरी खरं असलं तरी आपल्याला उपजत येणाऱ्या कौशल्यावर आपलं प्रेम असेलच असं खात्रीनं सांगता येणार नाही. चारचौघांपेक्षा एखादी गोष्ट फार छान करणारे पण ती करणं न आवडणारे लोक माझ्या परिचितांमध्ये आहेत; तुमच्याही असतीलच. अनेक वर्षं गाणं शिकणारी, स्पर्धांमधे बाजी मारणारी एक मुलगी स्वत:च्या पायावर उभं राहिल्याबरोबर गाणं बंद करून भलत्याच विषयाची शिक्षिका झाली. कारण? “गाणं मी आईबाबांच्या आग्रहाखातर करत होते.” आंद्रे अगासीनं देखील “ओपन” मध्ये अशीच कहाणी सांगितलीये. मग एखादं कसब जन्मत: अवगत असूनही जर एखादी व्यक्ती त्यात रमत नसेल तर सकारात्मक मानसशास्त्र त्याला काय म्हणणार? “शक्ती” की “अशक्ती”? अशक्ती!

आता मानव संसाधनाच्या दृष्टिकोनातून ह्या मुद्द्याकडे पाहायचं झालं तर एखाद्याची “शक्ती” जोखताना मी ती व्यक्ती काय काम करू शकते हे पाहतो. म्हणजे त्याच्याशी संबंधित कौशल्य पाहतो. पण त्या व्यक्तीला त्यात रस आहे का, याकडे मी लक्ष देत नाही. कारण माझ्या दृष्टीनं त्या व्यक्तीला रस आहे की नाही यापेक्षा तिला एखादं काम चोख पार पाडता येतं की नाही हे जास्त महत्त्वाचं असतं. खरं म्हणजे एखादं काम बिनचूक करता येणं यालाच मी “शक्ती” म्हणतअसतो. पण एखाद्या व्यक्तीला कामावर घेतलं आणि तिला काय आवडतं यापेक्षा तिला काय चांगलं येतं यावर भर दिला की आपापत: त्या व्यक्तीची कामाशी आणि संस्थेशी असलेली भावनिक गुंतवणूक कमी होणार हे ओघानं आलंच. 

उलट एखादं कसब उपजत असलं आणि त्यावर आपलं प्रेमही असलं की आपण त्यात रमतो. ते कौशल्य आपल्याला इतर कैक लोकांपेक्षा जास्त चांगलं अवगत असतंच. पण आपली त्यात भावनिक गुंतवणूक असल्याकारणानं आपण तेआणखी शिकत राहतो, त्यात नवनव्या संधी शोधत राहतो, समधर्मी लोकांकडून सतत ज्ञान मिळवत राहतो. उपजत येणारी आणि आवडणारी कौशल्यं रोजच्या कामात वापरायला मिळणं यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नसावी. एरवी शिक्षावाटणारं काम त्यामुळे उत्साहवर्धक ठरू शकतं. 

तर शक्ती = चेतापेशींची उपजत जाळी + प्रेम जडलेलं कसब

मनुष्यबळ विकासाच्या दृष्टिकोनातून हे समीकरण फार महत्त्वाचं आहे. याची काही कारणं अशी:


जर लोक रोजच्या कामात “शक्ती” वापरत असतील तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीनं करतील. त्यामुळे कामाची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही सुधारेल. 


आवडतं काम असल्यामुळे ते कामात जास्त रस घेतील आणि नवीन, व्यामिश्र गोष्टी करून दाखवतील. 

त्याचबरोबर ते काम करताना लोक रमतील. त्यांना त्यात आनंद मिळेल. हे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकरता आवश्यक आहे. 

प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट तितक्याच ताकदीनं करता येत नाही. सगळं काही करता येणारा एक दुर्मिळ माणूस शोधण्यापेक्षा एखाद्या संघाकरता आवश्यक अशा वेगवेगळ्या शक्ती येणारे लोक एकत्र आणून संघ परिपूर्णबनवणं शक्य आणि सोपं आहे. त्यानं सांघिक मनोवृत्तीही बळावते. 

यादृष्टीनं संस्थेकरता आवश्यक अशा कौशल्यांवर प्रेम करणारे लोक शोधणं आणि त्यांना त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी वारंवार करता येण्याची संधी निर्माण करणं हे मानव संसाधन संघांचं नवं धोरण आणि त्यांच्यापुढचं आव्हानही आहे. आणिशाळा, शिक्षक आणि पालकांपुढचंही!

-नितीन मोरे

1 टिप्पणी:

  1. प्रेमविषयीचा अगदी वेगळा आणि विचार करायला लावणारा लेख.. शक्तीतील प्रेम!

    उत्तर द्याहटवा