फर्स्ट प्रपोजल

ऋतुगंध हेमंत  - वर्ष १२ अंक ५

गोष्ट तशी जुनी, तीस वर्षांपूर्वीची, पण आठवणीत अजूनही ताजी. स्थळ अर्थातच पुणे.

तिची आणि माझी मैत्री तशी खासच, दिवसातून एकदातरी भेटल्याशिवाय आम्हाला चैनच पडायची नाही आणि कधीही भांडण झाल्याशिवाय आमची भेट संपायची नाही. तिच्या स्वभावाची तऱ्हा जरा वेगळीच होती आणि त्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती. एकतर तिला आमच्यासारख्या पेठेतल्या लोकांचा भयंकर राग आणि दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे किमतीच्या लेबलमधून पाहणे.

तिला कितीही वेळा नको सांगितलं तरी ती मुद्दाम दुपारी आमच्या वाड्यात यायची (म्हणजे आमच्या फक्त दोनच छोट्या खोल्या, त्याही सरकारी कृपेमुळे आमच्या झालेल्या) आणि दरवाज्याबाहेरून जोरात मला हाक मारयची. त्याबरोबर वाड्यातली सगळी जुनी खोडं वामकुक्षी घ्यायचं सोडून खवचट नजरेने माझ्याकडे पाहायची आणि मी खालच्या मानेने वाड्याबाहेर येऊन तिच्याशी भांडायला सुरवात करायचो. ती हे सगळं मस्त एन्जॉय करत माझीच अजून खेचायला सुरवात करायची. पेठेतल्या लोकांचा उद्धार करण्यात तिला भयंकर काहीतरी सुख मिळायचं. ‘पेठेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे कारण तुम्ही लोक श्वास घेताना सुद्धा कंजूसी करता’ हा तिने लावलेला शोध काही दिवस मलासुद्धा खरा वाटला होता.

कुठल्याही गोष्टीचा उल्लेख त्याच्या किमतीसकट करण्याची तिला भयंकर हौस. एकदा तिच्या ओढणीवर चिखल उडाला तर म्हणाली माझी दोन हजाराची ओढणी खराब झाली. तिची चप्पल तुटली तर ही म्हणणार माझी हजार रुपयांची सॅंडल तुटली. कुठून जाऊन आली तर म्हणणार शंभर रुपये रिक्षाला घातले. किमतीच्या लेबलशिवाय एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणे म्हणजे त्या गोष्टीचा अपमान आहे अशी माझी एक समजूत झाली होती. मलाही तिची सवय लागली होती पण CA करता करता ती कधी सुटली कळलं नाही.

माझ्या कॉलेजच्या पाच वर्षात तिच्यामुळे मला कोणीही मित्र मिळाला नाही आणि मला कधी तशी गरजही भासली नाही. माझ्यावर तिने जवळजवळ हक्कच प्रस्थापित केला होता. पण ती BCom ला नापास झाली आणि मी CA करायला सुरवात केली. आता मी खऱ्या अर्थाने जग बघायला लागलो. पूर्वी आम्ही भेटायचो तेव्हा ती बोलायची आणि मी ऐकायचो, आता मीही हळू हळू बोलायला लागलो, तिची चेष्टा करायला लागलो. तिचा कमकुवत दुवा म्हणजे तिचं BCom fail होणं आणि माझं चांगल्या मार्कांनी पास होणं. त्यामुळे जर ती माझी कधी जास्तच फिरकी घ्यायला लागली तर मी गप्पांची गाडी हळूच अभ्यासावर वळवायचो आणि पुणेरी पद्धतीने तिला विचारायचो “काय आता तरी पास होण्याचा विचार आहे कि नाही?” मग दोन चार मिनिटं शांततेत जायची, ती दुःखाने गप्प बसायची आणि मी विजयाच्या आनंदात. पण ती जास्त वेळ गप्प बसूच शकत नसे, परत काहीतरी बडबड सुरु. तसा तिचा स्वभाव तिखट पण खुसखुशीत, चितळ्यांच्या बाकरवडीसारखा.

तिचं पैशाचं पाकीट म्हणजे जणू कुबेराचा खजिनाच, जर पाकिटात पाचशेपेक्षा कमी रुपये असतील तर ती कदाचित घरातून बाहेरच पडत नसेल. कॉलेजात असताना तिने मला कधीच खर्च करू दिला नाही. तिचा आणखीन एक गूण (कि अवगुण) म्हणजे कधीही कुठेहि खर्च करताना पाकिटातले सगळे पैसे बाहेर काढणार, बाकीचे लोक जेंव्हा तिच्या हातातील नोटांच्या चवडीकडे बघायचे तेंव्हा कदाचित तिला आतून गुदगुल्या होत असाव्यात. एकदा तिला चुकून म्हणालो कि असं पैश्याच प्रदर्शन बरं नव्हे तर पुढचा अर्धा तास मला आमच्या पेठेबद्दल ऐकावं लागलं होतं. माझी आर्टिकलशिप चालू झाली आणि थोडे पैसे माझ्याही हातात खेळू लागले. मग मीपण ती सोबत असताना तिच्या आधी पैसे पुढे करू लागलो. ती मला अडवत नसे आणि मला पण खूप बरं वाटत असे. मी जरी CA करत असलो तरी हिशोबाला ती माझ्यापेक्षा जास्त पक्की. पुढच्या भेटीत तिच्या वाटणीचे बिलाचे पैसे मला देऊन परत वर मला टोमणा मारायची कि तुझे जास्त पैसे खर्च झाले म्हणून झोप लागली नसेल चार दिवस.

BCom ला परत नापास झाल्यावर तिला लग्नाचे वेध लागले मग आमचे बोलण्याचे विषय बदलले. (आमच्या बोलण्याचे म्हणजे तिच्या, मला बोलण्याची संधी तशी कमीच मिळायची!) मग तिचे पूर्वज तेंव्हा सारसबागेत फेऱ्या मारू लागायचे आणि शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा तिच्या घराण्याचा तेजस्वी का काय तो इतिहास मला परत परत ऐकावा लागायचा. “आमच काही तुमच्यासारखं नाही, अर्ध्या दिवसात उरकाउरकी. चार चार दिवस चालतात लग्न, किती मान करावे लागतात. मी तर ५/५ ग्रॅमच्या दोन आंगठ्या करून घेणार आहे.” तिचं चालू व्हायचं. मग तिच्या श्रीमंतीचं प्रदर्शन. कॉलेजच्या दिवसात वाटणारं त्याचं अप्रूप मला आता वाटेनासं झालं होत. माझे विषय बदलायला लागले होते. तिच्या हे लक्षात यायचं मग गाडी माझ्या CA कडे आणि अभ्यासाकडे वळायची. “काय शेवटी अकाउंटंटच ना.. म्हणजे काय कारकूनगिरीच करणार कुणाकडेतरी. त्यापेक्षा businessman चांगला, स्वतःच्या मनाचा राजा” तिचं टोमणे मारणं सुरु व्हायचं (शेवटी पुणेकरच, पेठेतली असो वा बाहेरची).

तिला नवरा मात्र मुंबईचाच हवा होता. ती म्हणायची “मुंबईसारखी श्रीमंती कुठेच नाही. आणि तिथे पेठेतल्यासारखी कुजकी लोकही नसतात (हा वाक्याचा शेवटचा भाग अर्थात माझ्यासाठी असायचा). मला म्हणायची “तुझ्या लग्नाला बोलवं बरका, माझी काय काय स्वतःची गाडी असेल तेव्हा आणि स्वतःच्या गाडीने मुंबई-पुणे काय फक्त चार तास. मला माझ्या लग्नात आहेर नाही केलास तरी चालेल, पण स्वतःच्या लग्नात तरी चिकटपणा नको करुस रे बाबा.” मला चिमटा काढल्याशिवाय तिचं वाक्य कधीच पुरं होत नसे.

अशीच एक दिवस भेटायला आली, हवेतच होती. म्हणाली उद्या मुंबईला दाखवायचा कार्यक्रम आहे. तुमच्यासारखं नुसतं कांदेपोहे नाही, ५ स्टार हॉटेलमध्ये करणार आहोत. businessmen फॅमिली आहे. अंधेरीला मोठी फॅक्टरी आहे. कमाई चांगलीच असणार. असं काहीबाही बडबडत, मधेच मला टोमणे मारत ती निघून गेली. मी पण परीक्षेच्या गडबडीत सगळं विसरून अभ्यासाला लागलो. माझी पहिलीच परीक्षा असल्यामुळे तसंही माझं तिच्या बोलण्याकडे लक्ष कमीच होतं.

दहा दिवसांनी परीक्षा संपली आणि मग परत आम्ही भेटलो. ह्यावेळी काहीतरी बदलल्यासारखं वाटत होतं. एक कधीही न थांबता खळखळत वाहणारा धबधबा अचानक शांत खोल तळ्यासारखा स्तब्ध वाटत होता. एरवी मला बोलू न देणारी ती, आज मला अजिबात थांबवत नव्हती… माझी परीक्षा, माझा अभ्यास, माझ्या ऑफिसमधल्या गमतीजमती फक्त ऐकत होती. बऱ्याच वेळाने अचानक ती म्हणाली “अरे मुंबई वाटते तितकी महाग नाही काही. दोन खोल्यांचा फ्लॅट दोन हजार रुपये भाड्याने सहज मिळतो. महिन्याच्या किराणा मालाला पाचशे रुपये पुरतात.” आणि भाजीचे इतके, औषधाचे इतके, प्रवासखर्चाला इतके अशी सगळी यादी करून म्हणाली, “सहा-सात हजारात महिन्याचा खर्च भागेल अरे. तू CA होतोयस म्हणजे एवढे तरी मिळवशीलच ना? दोनपाचशे कमी दिलेस तरी भागवीन मी त्याच्यात !” 

आत्ता मला कळतंय की मला कुणी केलेलं ते पहिलं propose मला तेव्हा कळलंच नाही.

तिला समजून न घेतल्याची मनाला लागलेली टोचणी कदाचित कायम आयुष्यभर राहील. तिची आठवण करून देत राहील अगदी शेवटपर्यंत...

- निलेश भागवत

२ टिप्पण्या: