नाही पुण्याची मोजणी

ऋतुगंध हेमंत वर्ष १२ अंक ५

भारतात जर कुठल्या एका प्रांतातल्या अथवा एका भाषिकांमधे कुठल्याही एका बहुचर्चित शहराचे नाव घ्यायचे झाल्यास " पुणे " अग्रस्थानावर असेल यात वाद नाही . एकंदर पुण्याचं सगळंच काही आगळं निराळं . वैशिष्ट्ये तरी किती म्हणून सांगायची ? चितळे बंधू , बाखरवाडी , पुणेरी हिसका , विशिष्ट प्रकारचा आग्रह , काटेकोरपणा , मराठी बाणा, शिस्त , व्यवस्थितपणा , काटकसर , व्यवहारी वागणुक, कोकणस्थ - देशस्थ जुगलबंदी वगैरे वगैरे . आणखी त्यात अशात सोशल मीडिया वर व्हॉट्सऍप वर फिरून फिरून परतणारे पुण्या संबंधी जोक्स व त्यातला कळस म्हणजे "पुणेरी पाट्या " ज्या विलक्षण प्रसिद्ध व लोकप्रिय झाल्या आहेत .

पुणेरी पाट्यां वर लिहिल्या गेलेल्या मजकुरातून पुण्याचा एकंदर अंदाज व स्पष्टवक्तेपणा झळकतो यात शंका नाही . माझे तसे वैयक्तिक रित्या पुण्यात दीर्घ वास्तव्य जरी झाले नसले तरी वरचेवर बरेचदा पुण्यात केलेल्या फेऱ्यां तुन खूप जवळुन पाहण्यात आले आहे तसेच असलेल्या थोड्या फार निरीक्षण बुद्धी द्वारे पाट्यांचे बारकाईने ऑब्सर्व्हेशन करण्याची संधी मिळाली . 

व्हॉट्सऍप वर फिरून फिरून घासून गुळगुळीत झालेल्या पुणेरी पाट्यां बद्दल इथे मी कटाक्षाने संदर्भ टाळायचा प्रयत्न करणार आहे . 
काही पाट्या वाचून मला हसल्यावाचून न राहवल्याचे बरेचदा आठवते . पाट्यां बद्दल ज्ञान इतके मिळाले आहे कि आपणच जाऊन काही पाट्यां चे मजकूर सुचवू/लिहू शकू असे वाटते . काही भन्नाट पाट्या : " तुमच्या पादत्राणांचे राखणदार आम्ही का व्हावे ? इथे ठेवाल तर चोरले गेलेच समजा " त्याचेच दुसरे version म्हणजे " चोरांची परीक्षाच पाहायची असल्यास खुशाल इथे चपला ठेवा " " शेजारी आलेल्या लोकांनी आमच्या पायपुसण्यास चपला घासून जाऊ नये " , चक्क सायकलचे लॉक दोन चपलांतुन गुंफून देवळासमोरच्या खांबाला लावलेलेहि इथे पाहिल्याचे आठवते . 

"आमच्या अंगणात टोकदार खिळे रुतून बसले आहेत . गाडी इथे लावल्यास जबाबदारी तुमची " 

" तुमच्या गाडीच्या टायरांना रोड वर न जाण्या इतके रोड व्हायचे असल्यास , पूर्ण हवा काढण्याची उत्तम सोय आम्ही करू "

"जिना उतरताना तुम्ही फोन वर बोलत आहात हे आम्हाला मोठ्याने कळवायची गरज नाही " 

" आमची बेल हळूच आणि एकदाच दाबली तरी वाजते " इत्यादी इत्यादी ... प्रत्येक पाटीत एक सारकॅस्टिकच काय मी तर म्हणतो एक कॉस्टिक असा टॉक्सिक संदेश व्यक्त झालेला . हे संदेश प्रभावी पणे आपले काम करत असावेत . आजकाल पुणेरी पाट्या म्हणे संगणकावर डिझाइन केल्या जातात . एके ठिकाणी पुणेरी पाटी असे मोठ्या अक्षरात लिहून खाली लहान अक्षरात " येथे करून मिळेल " असे लिहिले होते. कुणा एका खोडकर व्रात्य पोराने खडूने बेमालूमपणे पाटी चे पार्टी केले . तेंव्हा अर्ध्या तासात दहा जण हि " पुणेरी पार्टी "नेमकी आहे तरी काय हे पाहायला डोकावून गेले म्हणे . 

मी एके ठिकाणी " शुद्ध पिण्याच्या पाण्याची जागा " असा बोर्ड पाहिला . तिथला नळ , बेसिन वगैरे जरा अशुद्ध व अमंगळ वाटत होते पण पाटीवर मात्र शुद्ध मराठीत शुद्ध लिहिलेले . तसेच भारतात अन्य ठिकाणी " शुद्ध घी "/ देसी घी असे लिहिले जाते तर पुण्यात " शुद्ध साजूक लोणकढे तूप " लिहिलेले असणार ! आणखी एक गोष्ट म्हणजे पुणे म्हणजे विशेषणेच विशेषणे ! अमृत-तुल्य चहा , हे एक उदाहरण . खमंग थालीपीठ हेही . मस्त मस्तानी ! हा मिल्क शेक चा विशेष प्रकार . कुणी म्हणे लिहिले " आमची मिठाई खाल आणि डायबिटीस विसरून.. जाल " ! चितळे बंधूं कडे " पौष्टिक लाडू " " डिंकाचे लाडू " व अन्य कित्येक स्पेशल मिठायांची यादी जिला आधुनिक मारुतीचे शेपूटच म्हणता येईल . बिझनेसच्या नव नवीन क्रिएटिव्ह कल्पनांचे माहेरघरच पुण्याला म्हणावे लागेल . बाखरवाडी , लक्ष्मी नारायण चिवडा, श्रेयस चे जेवण या सारखे आणि अन्य अनेक ब्रँड इमेज कृतीत आणणे , ते फेमस करून टिकवणे हे केवळ पुणेच जाणे . तुम्ही घरी चहा घेऊनच आला असाल वगैरे काही अतिशयोक्तीयुक्त पाहुणचाराची गंमतशीर उदाहरणे . 

पुण्याला तसे अनेक वारसे व सांस्कृतिक , ऐतिहासिक पार्श्वभूमी ही लाभलेली आहे. पेशवे कालीन शनिवार वाडा , शिवरायांच्या शौर्य व कर्म भूमीत सर केलेल्या गडांची सावली , तुकाराम , ज्ञान माऊलींची संतांची पुण्य -भूमी, साहित्य आणि कलेचे मंदिर , सवाई गंधर्व संगीत महोत्सव वगैरे . मुंबई शहराचे सानिध्य लाभलेले , पुणेकर - मुंबईकर यांच्यातली मिश्किल, थोडी विनोदी, थोडी मार्मिक तुलनायुक्त स्पर्धा हे सारेच पुण्याला एक खास स्थान देऊन जाते . दुपारी १ ते ४ ची दीर्घ वामकुक्षी , तरुणींचे तोंडावर रंगीत फडके ,ओढण्या बांधून दुचाकी वाहन चालवणे हे सारे म्हणजे पुण्यातच . बाजारात भेटल्यावर ह्या मुली एकमेकींना ओळखतात कशा हे मला समजत नाही .हे बुरखे म्हणजे सुद्धा देशातलया कचरा , धूळ व प्रदूषणावर हाणलेला एक टोमणाच ! इथले मानवी स्वरूपाचे जीपीएस सुद्धा खासच . एकाला पत्ता विचारला , म्हणाला जा की सरळ सरळ ... बुचकळ्यात पडून मी पुन्हा विचारले किती दूर सरळ जायचे ? तेंव्हा म्हणाला सरळ जा ... वाटेत एक पूल पडेल .. पुलाच्या वरून नाही खालून जा नंतर राईट मारा .... शेवटी मी पुल न पडू देता स्वतःच पत्ता शोधून काढला होता . 

बऱ्याच वर्षां पूर्वीचे आठवते , एका मोठ्या सायकल स्टँड जवळ एका खांबाला खिळा ठोकून एक पाटी लटकवलेली दिसली . लिहिलं होतं "१ रुपयात सायकल चकचकीत पुसून" आणि तिथेच एक अतिशय तेलकट मळकट फडकं ही टांगलं होतं.

तेंव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते , पाटी खाली एक बाण रंगवलेला . त्या दिशेने पाहताच एक पोऱ्या बाकड्या वर बसलेला , खिशात दुसरं मळकट फडकं अडकवून . आणखी एके ठिकाणी लिहिलेलं" आजीच्या हातची स्वादिस्ट चटणी ताजी करून मिळेल" . पुण्यात काय मिळेल आणि काय नाही याची यादी करणे सोपे नाही हे खरेच . एका जागी "चौकशी" असा मोठा बोर्ड . खाली लिहिलेले " थोडक्यात विचारा . आगाऊ प्रश्नाचे पैसे पडतील " . पाळीव कुत्र्यां बद्दलच्या पाट्यांचा तर कहरच . देशात इतर ठिकाणी " Beware of Dogs" म्हणजेच " कुत्र्यापासुन सावधान " अशा अर्थाची सभ्य नोटीस . पण पुण्यात " आमचा कुत्रा दिवसभर मोकळाच असतो , आगंतुकांनी घरात शिरण्या आधी नोंद घ्यावी " असे धमकी वजा लिखाण .साबण विक्रेत्यांचं आणि पुणेकराचं हाडवैर का आहे माहित नाही . " साबण विक्रेते अथवा वर्गणी मागणारे असाल तर आधी आमच्या कुत्र्याशी गाठ आहे " असे लिहिलेले .कधी कधी तर प्रत्यक्षात खरा कुत्रा नसेलही , पण पाटी लावले कि काम झाले . एका दुकानात कॅशिअर काऊंटर वर वाचलं होतं " १५ वर्षां पासून नगद व्यवहार करूनच आम्ही धंद्यात टिकून आहोत ". तसेच . " सदाशिव शिंपी वरच्या माळ्यावर राहतात ! आम्ही शिवत नाही " असा बोर्ड आणि वरच्या दिशेने मोठ्ठा बाण ! हे केवळ पुण्यातच दिसणार . 

पुणेरी पाट्यांचा सुळसुळाट आता जिकडे तिकडे चोहीकडे झालाच आहे . डॉक्टारांच्या क्लिनिक मधे" आपले गुगल चे ज्ञान इथे पाजळु नका" "तुमच्या वाय फाय बद्दलच्या वायफळ तक्रारी ऐकायला आम्ही कंपौंडर ला पगार देत नाही" वगैरे . 

कधी मनाला असं वाटून जातं कि आपल्या जनतेला साध्या सरळ शब्दात सांगितलेलं डोक्यात शिरत नाही , म्हणून ह्या पुणेरी पाट्यां चा उगम झाला असावा . शिस्त लावण्यासाठी ह्या पद्धतीचा कॉर्पोरेट मॅनेजमेंट ने ऑफिस , फॅक्टऱ्या , शाळा , कॉलेज, स्वच्छ भारत अभियान ह्या सर्व ठिकाणी वापर केला तर किती मज्जा येईल ना ? ही थोडी कुचकट टाईपची, टोचणारी टोमणेबाजी एखाद वेळी सुंदर कामगिरी करून जाईलही असेही कधी वाटून जाते. सतत मोबाईल वर मेसेज व गेम्स खेळणाऱ्या मुलांना अभ्यास करा म्हणून सरळ न सांगता त्यांच्या खोल्यात जर पुणेरी पाट्यां सारख्या पाट्या झळकवल्या तर कित्येक पालकांचे काम सोपे होईल. गृहिणींनी जर असा बोर्ड घरात लावला " आपलया घराला अंबानींचे घर समजून वागु नका . वस्तू वापरून जागचे जागी ठेवा " तर लाजेकाजे का होईना कुटुंबियांना थोडा व्यवस्थितपणा येईलच . बरेचदा चक्क थोड्या inhuman वाटणाऱ्या ह्या human communications चा चांगला वापर केला तर human life ला फायदा होऊ शकेल . 

अशा ह्या पुण्य नगरी ला कुठल्याच एका मोजमापाने अथवा यार्ड स्टिकने तपासणे अति कठीणच . म्हणून अशा अगणित पाट्यांनी सजलेल्या शहरा बद्दल म्हणावे वाटते,
 
"नाही पुण्याची मोजणी , जिथे पाट्यांची पर्वणी ".

- नंदकुमार देशपांडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा