दिवाळी: पारंपरिक आणि आधुनिक

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४

खुसखुशीत पारंपारिक...घराघरात साफसफाईची धांदल उडाली,
रंगा-यांची चांदी चालू झाली,
ताई,माई,अक्का,वहिनीची गडबड सुरू झाली,
बच्चेकंपनीला मजा आली, सुट्टीच लागली
ऐका हो ऐका,वाजत गाजत दिवाळी आली

धान्यांनी मजेमजेत शेकून घेतले,
माऊलीच्या जात्यावर दळूनही घेतले.
खमंग भाजणी पट्कन झाली तयार,
पण तिला सो-यात जायची वाट बघावी लागणार!

नाजुक साजुक करंजी लाजली,
कानवल्यांना छानशी मुरडही पडली.
शेवेचा चवंगा हलकेच तरंगला,
नि चकल्यांवर सरसरून काटाच फुलला।

चिवड्याचे सारे सवंगडी जमले,
दाणे,खोबरे,काजू तुपात तळलेले.
बेसनाच्या लाडवांत बेदाणे खोचलेले,
खारी नि गोड चव पुरविती लाडके शंकरपाळे।

अनरशांची किनई मिजासच भारी,
नखरे त्यांचे संभाळतांना दमते गृहिणी बिचारी!
पण एकदाचे करून झाले की वेगळीच खुमारी,
सुगरणपणाची ही एक पावतीच खरी।

सोनपापडी,सुतरफेणी बालूशाही पाहुणे म्हणून येती,
चौळाफळी,मोहनथाळ हे विशेष गुजराती,
सुबकशा रांगोळ्या अंगणे सजविती,
वसुबारसेपासूनच पणतीच्या वाती उजळती।

डाएट बिएट तुम्ही आम्ही विसरलेलेच बरे,
छानशा फराळाचा फडशा पाडून टाकू मिळून आपण सारे।।


दिवाळी आधुनिक अवतारात:

ऐकतोस का रे डियर,रस्त्यावरच्या गर्दीत फार अडकते माझी कार,
का कोण जाणे लोकांना दिवाळीचा उत्साहच फार।
सारखी तर खरेदी चालूच असते, नवीन कपडे कशाला?
मस्त जीन्स घालावी, हवा असेल तेव्हा शर्ट तेवढा बदला।

कसले हे मातीचे दिवे, तेलाचे डाग पडतात,
वेळ कुठेय रांगोळी काढायला, स्टिकर तर मिळतात।
प्लॅस्टिक पेंट लाऊन घर केलय चकचकीत
पाण्याच्या शिडकाव्यानेही दिसते टकटकीत।

आकाशकंदील बनविणे रिकामटेकड्यांचे काम,
इंपोर्टेड माळेने दिसत़ो तामझाम।
फळीवरचे डबे कधीच विकून झाले,
माझ्याकडे तर पर्लपेटच आहे बाई सगळे।

So called फराळ असतो तेलकट न् तुपकट
आमच्या सारख्या dietfreak ना नाही काही आवडत।
हां, ह्या निमित्ताने ऑफिस असते रिकामे
आले कोणी तरी धीमेच चालतात कामे।

म्हणे घरोघरी द्यायची फराळाची ताटं, असते पद्धत,
अहो आता शेजारी कोण आहेत हेच नाही कळत।
फटाक्यांनी होते कितीतरी pollution
पोरांच्या आईवडिलांना मात्र उगीच टे़ंशन।

ह्यापेक्षा online book करून हवे ते मागवावे,
फ्रेंडसबरोबर enjoy करत unwind व्हावे।
नवल वाटते काही जणांचे nostalgic होतात
नि चान्स बघून तिथेही मजेत असतात।

दिवाळी काय दरवर्षी येते नि जाते,
हनीला मस्का मारून यंदाचे डेस्टीनेशन ठरवते......!

फोटो सौजन्य : स्नेहा मुक्कावार

- जयश्री भावे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा