प्रेम

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १
प्रेम म्हणजे असे असते 
प्रेम म्हणजे तसे असते

असे म्हणणारे फक्त बोलत तर राहतात , पण प्रेम म्हणजे काय हे खरंच कळलंय का कुणाला?

नक्की ‘प्रेम’ म्हणजे काय? 

मानवाला मिळालेले हे लेणं कधी खऱ्या अर्थाने उमगलंय का त्याला? प्रेम म्हटलं की प्रथम ‘राधा कृष्णाचे’ प्रेम आठवते. ‘व्हॅलेंटाईन डे ‘आठवतो. पाडगावकरांच्या ओळी आठवतात. कॉलेज आठवते. ते कोवळे, हिरवे दिवस आठवतात. रोमँटिक गाणी आठवतात. गम्मत म्हणजे, एखादी व्यक्ती प्रेमात पडलेय हे प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सोडून सगळ्यांना कळते. पण ह्या सगळ्यांना तरी नक्की प्रेम म्हणजे काय हे कुठे माहीत असते? 

प्रेम म्हणजे जिवंतपणाची एक ‘अदृश्य’खूण

आपल्याही नकळत आपण जन्मल्यापासून कुणावर तरी प्रेम करत आलेलो असतो. कदाचित मातेच्या पोटात असल्यापासून , मग जन्मल्यावर ,मोठे होत असताना आणि अगदी शेवटच्या प्रवासाला निघेपर्यंत. फक्त ते ‘आहे’हे कळत नाही. ‘ते’असते. ‘प्रेम’ही जिवंत मानवाची खरीखुरी अदृश्य खूण आहे. गाण्यात जशी मिठास लपलेली असते, चित्रात ‘दिव्यता’ असते,काव्यात ‘गेयता’असते अगदी तशीच!
प्रेम कुणाचे कुणावरही असू शकते 

प्रेम म्हणजे काही फक्त ‘राधा कृष्ण’, ‘लैला मजनू’ किंवा ‘एक दुजे वाले’प्रेम नसते हे आपल्यापैकी अनेक जण मान्य करतील. व्यक्ती व्यक्तीतील, नात्यागोत्यांतील प्रेम तर असतेच असते पण याशिवाय कुणाचे प्रेम फक्त खाद्य पदार्थांवर असते, तर कुणाचे कपड्यांवरआणि दागिन्यांवर,कुणाचे छानछोकीने राहण्यावर,राहत्या घरावर, देशावर. कुणाचे फक्त स्वतःवर. कुणाचे निसर्गावर, कुणाचे पशु पक्ष्यांवर तर कुणाचे पुस्तकावर आणि ज्ञान मिळवण्यावर. हल्लीच्या काळात केवळ पैशावर प्रेम करणारे बहुसंख्य असतील.या उलट कुणाचे गरिबीवरही उत्कट प्रेम असू शकते. अर्थात हे कुणी तडकाफडकी मान्य करणार नाही. कारण प्रत्येकाला दुसऱ्याकडून ठराविक साच्यातील उत्तर ऐकायला आवडते. प्रांजळ मत देणे आणि ऐकणे ही गोष्ट जरा कठीणच होत चालली आहे नाही? 

असो. कुणी दीन दुःखी माणूस बघितला की पोटात ज्याच्यामुळे तुटते तेही माणुसकीवरील प्रेमच असते. कोणाचे दुःख ज्याला बघवत नाही तो सगळ्या जीवमात्रावर खरा प्रेम करत असतो. थोर संतांनी परमेश्वराला वेगवेगळ्या रूपात कल्पून प्रेम केले. 

ज्ञानेश्वरांनी विरहिणीतून ईश्वरावरील उत्कट प्रेमाचे पदर उलगडले. 

अंदाज अपना अपना

आजच्या काळात LIKE करणे आणि LOVE करणे यात फरक मानला जातो. परंतु एखादी गोष्ट मनापासून आवडत असेल तर त्या गोष्टीवर प्रेम नाही असे कोणी कसे काय म्हणू शकतो ? असो. ये अंदाज अपना अपना है. 

मला वाटते कोणी ‘आवडण्यातही’ प्रेमच लपलेले असते. 

प्रेमाची वर्गवारी करता येते का ?

प्रेमाला नंबर एक, नंबर २,नंबर ३ अशी इतर प्रत्येक गोष्टीत चालते तशी वर्गवारी, प्रतवारी करून लेबल देता येते का ? हं, प्रेमाचा रंग वेगळा असू शकतो, पण हे प्रेम बरे, हे प्रेम चांगले, ते प्रेम अजून चांगले असे ठरवता येते का?वसंत ऋतूत ऐकू येणाऱ्या कोकीळ कूजनाला कधी ही कोकिळा आज बरी गायली, काल जास्ती बरी गायिली असे म्हणून त्या गाण्याची प्रतवारी करता येईल का? 

तसे केले तर येणाऱ्या प्रत्येक वसंत ऋतूला गेल्यावेळी ‘वसंत बरा होता हं’ असे म्हणून हिणवल्या सारखे होईल. 

प्रेमाची अनुभूती घ्यायची आणि द्यायची असते 

निर्व्याज, निर्मळ ,कसलीही अपेक्षा नसणारे प्रेम हे खरे उत्कट प्रेम.बाकी सगळे ‘प्रेम’असे वाटायला लावणारे वाटाणे.

थोडक्यात सांगायचे तर प्रेमाविषयी खूप काही लिहिण्यासारखे आहे.बोलण्यासारखे आहे. ऐकण्यासारखे आहे. माणसाने असे प्रेम सगळ्या मानवजातीवर केले किंवा त्याला तसे करायला जमले तर आज जे काही जगाचे कुरुक्षेत्र घडते आहे ते टाळता येईल. पण असे केले तर तसे होईल असे म्हणून काही करता आले तर गदिमांनी म्हणून ठेवल्या प्रमाणे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ याची प्रचीती कशी येईल? 

-मोहना कारखानीस 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा