आरती प्रभू – "गेले द्यायचे राहून"

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४

"कै.चिं.त्र्यं खानोलकरांच्या समग्र वाङमयाचा अभ्यास" हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आरती प्रभूंच्या कवितांचा अभ्यास. या विषयावर सलग सहा-सात वर्षे काम करून मी माझी पी.एच.डी.ची पदवी पुणे विद्यापीठातून (सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) संपादन केली होती. त्या प्रबंध लेखनाला त्या वर्षीचे उत्कृष्ट प्रबंध लेखानासाठीचे डॉ.वि.रा.करंदीकर पारितोषिक मिळालेले होते. या विषयावरचा माझ्या अभ्यासाचा कालखंड हा माझ्या आयुष्यात आलेला एक आनंदयोग आहे. त्या कालखंडात मी या लेखकाच्या प्रत्येक साहित्यकृतीने झपाटूनच गेले होते. खानोलाकरांचे समग्र साहित्य माझ्या जणू मानगुटीच बसले होते. त्या काळात आरती प्रभू किंवा चिं.त्र्यं.खानोलकरांवर जे जे प्रसिद्ध होईल ते ते मी वाचत होते. जे जे सादर होईल ते ते ऐकत होते, बघत होते. त्या विषयावर सादर होणारी नाटके, चित्रपट या साऱ्यांचा आस्वाद मी न चुकता घेत होते. ते सारेच आसुसून बघणे हा माझ्या नुसताच आनंदाचा नव्हे तर अभ्यासाचाही भाग होता. 

"एक शून्य बाजीराव" ही खानोलकरांची एक अनोखी, मनस्वी कलाकृती. विजया मेहता आणि माधव वाटवे यांनी केलेला "एक शून्य बाजीराव" चा प्रयोग जरी बघायला मिळाला नाही, तरी कोणत्या तरी दुसऱ्या संस्थेने केलेला या नाटकाचा प्रयोग मी बघितला होता.श्याम बेनेगल यांचा "कोंडुरा" हा चित्रपट बघितला होता. अमोल पालेकरांचा "अनकही" हा चित्रपट बघितला होता. व्ही.शांताराम यांच्या बद्दल मनात नितांत आदर असूनही त्यांचा "चानी" मात्र बघितला नाही. चानीची पोस्टर्स बघून ते धाडस माझ्याकडून झाले नाही. आपण हा चित्रपट बघताना आपल्या मनातली चानीची प्रतिमा कुठेतरी उद्ध्वस्त होईल, आपल्या मनाला ही गोष्ट झेपणार नाही असे वाटले होते. असो. पण एक चांगला योग या नंतर आला. आत्ताचे आघाडीचे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी तेव्हा सोलापूरच्या कोणत्या तरी संस्थेने बसवलेल्या "चाफा" या एकांकिकेत काम केले होते. ती एकांकिका बघायला मी व श्री.वैद्य आवर्जून गेलो होतो. "चाफा" ही खानोलकरांनी लिहिलेली माझी अतिशय आवडती कलाकृती होती. त्या संस्थेने देखील ही एकांकिका अतिशय ताकदीने उभी केली होती आणि अतुल कुलकर्णी यांनी त्यात अतिशय चांगला अभिनय केला होता. त्यांची प्रमुख भूमिकाच या एकांकिकेत होती आणि त्यांनी ती भूमिका अर्थातच फार मनस्वीपणे साकारली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी त्या भूमिकेला न्याय दिला होता. ती एकांकिका बघत असताना मला काय वाटले कोणास ठाऊक, मी श्री. वैद्यांना एकदम म्हणून गेले की कधी काळी मी खानोलाकरांवर जर दृक-श्राव्य काम केलेच तर मी या मुलाला "तू खानोलाकरांचे काम करशील?" असे जरूर विचारीन. पुढे हा योग लवकरच जुळून आला. तेव्हा अतुल कुलकर्णी एन.एस.डी.मध्ये शिकत होता आणि त्याला मी खरोखरच खानोलकरांच्या भूमिकेसाठी विचारणा केली. 

त्याचे असे झाले, चिं.त्र्यं. खानोलकर म्हणजेच आरती प्रभूंच्या एपिसोडचा विचार करताना खानोलकर हयात नसल्याने हा मालिकेचा भाग कशा प्रकारे चित्रित करता येईल याच विचार आम्ही करत होतो. काही व्यक्तींच्या मुलाखती आठवणींच्या स्वरूपात घ्यायच्या आणि कुडाळ-सावंतवाडीला जाऊन तिथले चित्रीकरण करायचे असे ठरले. पण तितकेच पुरेसे नव्हते. कोणाकडून तरी खानोलकरांची भूमिका करून घ्यावी असे मनात येत होते; आणि या वेळी मला नेमकी स्मरली ती काही वर्षांपूर्वी पाहिलेली अतुल कुलकर्णी यांची चाफ्यातील भूमिका. अतुल जर काही वर्षांपूर्वी बघितला तशाच अंग काठीचा असेल, तर मग माझा हेतू नक्कीच साध्य होईल असेही वाटले. त्याचा दिल्लीचा फोन नंबर मी मिळवला आणि आणि त्याला थेट दिल्लीला फोन लावला. त्या वेळेला त्याची आणि माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. हे खरे आहे. परंतु आम्हा दोघांना वाटणाऱ्या खानोलकरांवरील प्रेमाने आम्हाला त्याची फारशी गरजही भासली नसावी. मी त्याला हाती घेतलेल्या कामाची सविस्तर ओळख करून दिली; आणि न राहवून चक्क विचारूनच टाकले,"मला एक सांगशील? तुझी आत्ताची शरीरयष्टी जेव्हा तू पूर्वी काही दिवसांपूर्वी "चाफा" ही एकांकिका केली होतीस तशीच आहे की त्यात काही बदल झाला आहे?"

तो हसून म्हणाला,"हो,हो! माझी शरीरयष्टी अगदी तशीच आहे." 

मी मनातल्या मनात हुश्श म्हटले. म्हटलं चला निम्मे काम तर फत्ते झाले. नंतर मी लगेच पुढचा प्रश्न केला,"आणि तुझ्या केसांची ठेवण?" 

तो उत्तरला,"हो हो! माझ्या केसांची ठेवणही अगदी तशीच आहे."

मला परत एकदा हायसे वाटले. हे सगळे कळल्यावर जरा धीर आला. आता आपले काम होणार, अशी सुचिन्हे मला दिसू लागली. खानोलकरांची भूमिका करण्यासाठी मी अतुलचे नाव पक्के करून टाकले. मग फोन वरूनच त्याच्याशी एपिसोड च्या संदर्भातले सर्व बोलणे झाले, कारण हाताशी फार वेळच नव्हता. त्याच्याशी झालेल्या बोलण्यातून विषय जरा पुढे सरकला. अतुल जसा चांगला अभिनेता आहे, तसाच चांगला, सजग वाचकही आहे. प्रत्येक भूमिकेविषयी तो चांगले चिंतनही करतो. त्यासाठी भरपूर परिश्रम घेण्याची त्याची तयारी असते. चाफ्यातील विष्णूची भूमिका देखील त्याने फार ताकदीने पेलली होती. त्यासाठी त्याने घेतलेले परिश्रम त्याच्या कामातून दिसून आले होते. चाफ्यातील विष्णूची भूमिका तशी करायला फार अवघड होती, कारण विष्णूच्या भूमिकेतून प्रत्यक्ष खानोलकरांची व्यक्तिरेखा जोडली जात होती, ते खानोलाकारांचेच आत्मकथन आहे असेही जाणवून जात होते. हे खानोलाकारांचे अंतस्थ रूप दाखवणे म्हणूनच सोपे नव्हते आणि अतुलने ते फार अभ्यासपूर्वक साधलेले होते. म्हणूनच अतुलचा या भूमिकेसाठी होकार मिळणे माझ्यासाठी फार आवश्यक होते. त्याने या भूमिकेसाठी आपला होकार देणे हे मी माझ्यासाठी एक सुचिन्हच मानले म्हणानात!

खानोलकरांच्या समग्र साहित्यावर अभ्यास केल्याने, त्या संशोधनातून माझी त्यांच्या साहित्यावरील अभ्यासाची बैठक पक्की झाली होती. शिवाय आरती प्रभूंच्या कवितेवर मी "अनन्वय" तर्फे "दिवेलागण" हा कार्यक्रमही सादर केला होता. तो रसिकमान्यही झाला होता. म्हणजे आधी प्रबंध लेखन मग त्याचा रंगमंचीय आविष्कार या दोन पायऱ्या मी अगोदरच चढल्या होत्या. आता मला दृक-श्राव्य माध्यमाद्वारे हा कवी सादर करायचा होता. त्यामुळेच आता आवश्यकता होती ती शब्दांहून दृश्याला अधिक महत्त्व देण्याची. त्या दृष्टीने संहितेचे वेगळेपण ध्यानात घेणे गरजेचे होते. शिवाय आणखी एक आव्हान होते ते म्हणजे खानोलाकरांची भूमिका साकारताना ती व्यक्तिरेखा आत्ता हयात नाहीये याचे भान प्रेक्षकांच्या मनात सतत जागे ठेवण्याची. या दृष्टिकोनातून विचार करताना मी एक विचार मनाशी पक्का केला, की सबंध एपिसोडभर अतुलचा वावर मूकच ठेवायचा. असे करण्यामुळे एपिसोड मधील त्याचे अस्तित्व आभासी राहिले असते. जर असे न करता एपिसोड मध्ये तो संवाद बोलू लागला तर ती भूमिका जिवंत वाटेल कदाचित आणि साक्षात खानोलकरच वावरत आहेत असा प्रेक्षकांचा समज होण्याची शक्यता जास्त! तेव्हा यासाठी या एपिसोडमध्ये अतुलचे बोलणे, संवाद महत्त्वाचे नसून त्याचे वावरणे जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी खानोलकरांच्या मनोभूमिकेत शिरून, त्यांच्या हालचालीतील, वावरण्यातील सर्व लकबी अभ्यासून खानोलकर साकार करणे हे खरोखरच आव्हानात्मक काम होते. नक्कीच होते; पण अतुल सारखा कसदार नट हे काम यशस्वीपणे करेल, असा विश्वास देखील मनामधे होता. यासाठी या लकबी माहिती करून घेण्यासाठी आम्हाला खानोलकरांचे नातेवाईक आणि त्यांचे मित्र यांचा फार उपयोग झाला. उदा.खानोलकरांची चष्म्यातून विशिष्ट पद्धतीने बघण्याची ती खानोलकरी लकब, त्यांची एखादा कोकणी माणूस बसतो त्या पद्धतीने खोंगी घालून बसण्याची पद्धत, त्यांची विमनस्क मन:स्थितीत येरझार्‍या घालण्याची पद्धत, लिहिण्यातली एकाग्रता आणि त्यावेळी होत असलेली मनाची धुंदावस्था, त्यांची चिंतन मग्नता, समाधी अवस्था, आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या प्रचंड दारिद्र्याला आणि एकाकीपणाला सामोरे जात असताना सोसाव्या लागणाऱ्या वेदना, यातना यांचा त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम, बोकांडी येऊन बसलेली नियती आणि तिच्या विरुद्ध लढताना स्वत:च स्वत:ला थोपटत केलेली स्वत:ची समजावणी, या साऱ्या मनोवस्थांचा घेतलेला धांडोळा आणि त्यासाठी केलेला अभ्यास आणि त्याचा विचार आम्हाला ती व्यक्तिरेखा ताकदीने साकारण्यासाठी फार फार उपयोगी ठरला. अतुलला शूटिंगच्या आधी खानोलकरांचे सर्वच साहित्य वाचून काढायची विनंती मी केली होती; आणि त्याच्या अभ्यासूपणावर माझा पूर्ण भरवसा होता. या साऱ्या घेतलेल्या मेहेनतीमुळे अतुलची ही व्यक्तिरेखा कमालीची यशस्वी झाली हे वेगळे सांगयला नकोच. खानोलकर म्हणजेच आरती प्रभूंवर अनेकांनी अतोनात प्रेम केले होते, त्यामुळेच मालिकेतल्या या भागाकडे सर्वांचे डोळे लागलेले असणार, याचीही खात्री होतीच. या कसोटीला आपण उतरायला हवे याचेही पुरेसे दडपण मनावर होते.

इतकी पूर्व तयारी झाल्यावर अतुलसाठी खानोलकरांच्या वेशभूषेसाठी लागणाऱ्या कपड्यांच्या खरेदीसाठी आम्ही पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीरोड गाठला; आणि सरळ खादीच्या दुकानाकडे धाव घेतली. आता इथून पुढे माझ्या कल्पनेतील खानोलकरांचे रूप साकारायला सुरुवात झाली. कारण जरी खानोल्करांवर मी प्रबंध लेखन केलेले असले तरी त्यांना मी प्रत्यक्ष कधीच पाहिले नव्हते. त्यांच्याशी कधी फोनवर देखील बातचीत करण्याचा प्रसंग आला नव्हता. मी त्यांच्यावर प्रबंध लेखन सुरु करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. ज्याला आपण प्रत्यक्ष बघितलेले असते त्यालाही रंगमंचावर उभे करणे सोपे नसते. या पूर्वी सेंट मीरा महाविद्यालयात असताना मी साधू टी. एल. वासवानी यांच्यावर एक नृत्य नाटिका बसवली होती, तेव्हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भक्त गणांसमोर ती नृत्य नाटिका सादर करताना, साधू वासवानी यांची व्यक्तिरेखा उभी करताना मला मनावर विलक्षण ताण जाणवून गेला होता. इथेही तोच ताण मला जाणवत होता; कारण मी खानोलकरांना जरी बघितलेले नसले तरी अनेकांनी त्यांना बघितलेले होते. मुख्य म्हणजे काळाच्या दृष्टीने विचार करता साधू टी. एल. वासवानींच्यापेक्षा खानोलकरांची व्यक्तिरेखा नजिकच्या काळातली होती. त्यामुळेच खानोलकरांबद्दलच्या लोकांच्या मनात असणाऱ्या आठवणी अगदी ताज्या होत्या. पु. ल. देशपांडे , श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, गंगाधर महाम्बरे, हृदयनाथ मंगेशकर, विंदा करंदीकर, मधु मंगेश कर्णिक अशा अनेक नामवंत व्यक्तींची नावे, विचार मनात येताच डोळ्यांपुढून सरकून जायची. या साऱ्यांचे खानोलकरांवर निरतिशय प्रेम होते. ही सर्व मोठी माणसे आपण बनवलेला खानोलकरांचा एपिसोड आवर्जून आस्थापूर्वक बघणार आहेत, असेही वाटून जायचे. म्हणजे आपल्याला मोठी परीक्षाच द्यायची आहे, असा भाव मनात जागृत व्हायचा आणि वाटायचे, बापरे! आपण किती मोठ्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत! आपल्याला ही परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होणे अत्यावश्यकच आहे.

आमची लक्ष्मी रोडची खरेदी चालूच होती. अतुल साठी राखाडी रंगाचा लांब कुडता आणि पायजमा आम्ही खरेदी केला. हा रंग निवडताना देखील खानोलकरांच्या साहित्यातून आलेल्या रंग संवेदना मनात जाग्या होत्याच. त्यांच्या साहित्यातून त्यांनी उदास रंगांचीच पखरण अधिक केली आहे. कपड्यांची खरेदी तर झाली पण खानोलकर जो चष्मा वापरीत असत त्या प्रकारची चष्म्याची फ्रेम शोधताना मात्र आमची चांगलीच दमछाक झाली. दुकानदारांना आम्ही चक्क खानोलकरांचा फोटोच दाखवत फिरत होतो; पण फोटोतल्या फ्रेम सारखी चष्म्याची फ्रेम काही मिळेना. दुकानदारांचे म्हणणे होते की या प्रकारची फ्रेम आता कालबाह्य झाली आहे. त्यावर असा विचार मनात आला की आता एखादे जुने चष्म्याचे दुकान गाठून बघूयात, म्हणून एक अगदी जुने दुकान गाठले. फोटोतल्या फ्रेमच्या जवळ जाणारी एक फ्रेम आम्हाला तिथे मिळाली खरी पण ती अतुलने डोळ्यांवर चढवून बघितली तर ती काही खानोलकरी 'लुक' देणारी वाटेना. म्हणजे बघा हं, जे आपल्याला डोळ्यांनी दिसते, बरोबर वाटते, ते बरोबर असतेच असे नाही. तसेच हे झाले. इतक्या प्रयत्नांनंतर काहीच जमून येत नाहीये म्हणून मन जरा खट्टू झाले. एक मात्र जाणवले की एखादा माणूस आपल्यापर्यंत पोहोचतो तो, तो वापरत असलेल्या एखाद्या वास्तूतूनच. त्या मुळेच त्याची अशी विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. ती वस्तू त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग, अंग झालेली असते; किंवा ती वस्तू त्याचा ब्रँड बनलेली असते. तसे या खानोलाकरांच्या चष्म्याबाबत झाले होते. शेवटी आत्ता मिळालेला हा चष्मा आपल्याजवळ असू द्यावा असा विचार करून आम्ही तो चष्मा खरेदी केला खरा; पण मनासारखी खरेदी झाली असे मात्र वाटत नव्हते. एक तरी चष्मा हाताशी असलेला बरा या भावनेनी आम्ही तो खरेदी केला ही गोष्ट खरी; पण मन भरले नव्हते. आणखीही एक गोष्ट मनात येऊन गेली की जो चष्मा आपल्याला पुण्यात इतके घुमवातोय तो कदाचित खानोलकरांच्या कुडाळला गेल्यावर चटकन मिळूनही जाईल. म्हणजे कुडाळला पोहोचलो की चष्म्यासाठीची शोध मोहीम हाती घ्यावी लागणार! खरं सांगू का, माझ्यातही एक आर्टिस्ट दडून बसलेला आहे. मी कमर्शिअल आर्टसची, अभिनव महाविद्यालयाची विद्यार्थिनी होते. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात माझी तीन बाटिकची प्रदर्शनेही झालेली आहेत. ही गोष्ट तशी कोणाला फारशी माहीत नाही. पण तो माझ्यात दडलेला आर्टिस्ट माझ्यासाठी मी त्याला हाक घालीन, तेव्हा धावून येतो इतके मात्र खरे! चित्रातल्या रंग रेषांचा उचित तोल मला समजतो, रंगसंगतीचे चांगले भानही असते. शूटिंगच्या वेळी हे सारे भान तुम्हाला उपयोगी पडते. त्या बाबतीत मी फार नशीबवान आहे. जसे मला चित्रकलेचे सजग भान आहे तसेच सुरांचेही चांगले भान आहे. मी वाढले तीच मुळी सुरांबरोबरच. माझे वडील बालगंधर्वांना ऑर्गनची साथ करीत असत. ते जन्मजात कलावंत होते. माझ्या वडिलांबरोबर मी लहान असताना बालगंधर्वांच्या मैफिलींना नेहमीच जात असे. त्यांचे सूर माझ्या घरात सदैव उमटत, रेंगाळत. त्याचमुळे मी वाढले ती सुरांची श्रीमंती घेऊन, असे जर मी म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. हे संस्कार अमिट असतात, वैभवीही असतात. त्यांचा कुठे न कुठे तरी निर्मिती प्रक्रियेसाठी उपयोग होत असतो. असो. 

अशा प्रकारे मनाने आणि इतरही सर्व प्रकारे सिद्धता झाल्यावर आम्ही शूटिंगसाठी कुडाळच्या दिशेने कूच करायचे ठरवले. मी, अतुल कुलकर्णी, राहुल घोरपडे, श्याम भूतकर, बाबू सोनावणे, दोघे साउंड रेकॉर्डीस्ट, एक कॅमेरासहाय्यक, दोन लाईट बॉईज अशी आमची टीम कुडाळच्या दिशेने मार्गस्थ झाली. गाडी सुरू झाल्यावर गाडीतील वातावरण खानोलकरमय झाले होते. खानोलकरांचे मित्र श्री.सी.श्री.उपाध्ये आणि विद्याधर भागवत दोघेही सावंतवाडी, कुडाळच्या परिसराचे माहितगार, त्याच परिसरात राहणारे. एकेकाळचे खानोलकरांचे जिवलग मित्र. जेव्हा खानोलकरांना कुडाळ मध्ये कोणीच दोस्त नव्हता तेव्हा या दोघांनी त्यांना मित्रत्वाचा हात पुढे केला होता. खनोलकरांसारख्या प्रतिभेचा वरदहस्त मिळालेल्या एका संवेदनशील मनाला या दोघांनी भावनिक आसरा दिला होता. त्यांना जपले होते. या दोघांनाही आमच्या शूटिंग विषयी आणि एकूणच प्रकल्पाविषयी आधीच माहिती देऊन ठेवली होती. त्यांनीही आपल्या कडून लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली होती.

कोकणात निघायच्या आधीच आरती प्रभूंची दोन गाणी आम्ही रेकोर्ड केली होती. एक होते देवकी पंडित यांच्या आवाजातले आणि दुसरे होते श्री. रवींद्र साठे यांच्या आवाजातले. दोन्ही गाण्यांना संगीत दिले होते श्री.राहुल घोरपडे यांनी. ती गाणी अर्थातच आम्ही बरोबर घेतली होती. ती गाणी जेव्हा आम्ही गाडीत सर्वांना ऐकवली तेव्हा तर वातावरण अधिकच खानोलकरमय झाले. सोबत माझ्या व घोरपडे यांच्याही आरती प्रभूंच्या सर्व कविता तोंडपाठ होत्या. हळूहळू गाडी कोकणात शिरायला लागली आणि आरतीच्या कवितेतील नागमोडी वाटा वळणे, लाल मातीचा रस्ता सुरू झाला. हीच माती, कोकणाची लाल माती आरती प्रभूंच्या पायतळी घट्ट चिकटून बसली होती. जगण्यासाठी म्हणून जरी खानोलकरांनी मुंबईकडे धाव घेतली तरी त्यांच्या मनात कोकणचा हा परिसर शेवट पर्यंत जागाच राहिला होता. जसजशी गाडी कोकणात शिरू लागली तसतसा कोकणचा निसर्गही दृष्टीपथात येऊ लागला. लाल माती, ताड माड, उंच उंच वाढलेली नारळी पोफळीची झाडे आणि आरती प्रभूंच्या ओळीही मनात जाग्या झाल्या…
लाल माती पाउलांशी, निळा ढग डोईवर 
डहाळीचा काळा पक्षी, स्वरांहून बोले खोल

राहुल घोरपडे यांनी खानोलकरांच्या कवितांना फार विचारपूर्वक स्वरबद्ध केले होते. त्या चाली ऐकत ऐकत आमचा प्रवास सुरु होता. हळुहळू संध्याकाळ व्हायला लागली. उन्हे कलू लागली. सूर्य क्षितीजी बुडू लागला, दिवेलागण व्हायची घटिका जवळ येऊन ठेपली. त्याच वेळी आम्ही राहुलनी केलेली मनस्वी चाल ऐकत होतो.

जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे
दूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे
मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी
वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी
वेळू रंध्री का परंतु जीव घेणी स्तब्धता 
का समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता 

आरतीची ती समेच्या पूर्वीची टिपलेली आर्त शांतता मला टिपता येऊ देत अशी प्रार्थना मी मनातल्या मनात करीत होते. संध्या समय ही आरती प्रभु आणि ग्रेस या दोघांचीही आवडती घटिका. बघता बघता काळोख दाटून यायला लागला आणि ताड, माड त्या नीरव, शांत वातावरणात विचित्रसे डोलायला लागले. झाडाझाडांवर काजव्यांची चमक चमचमायला लागली. दिवेलागणीची वेळ होऊन गेली होती. मला आठवली आमची प्रबंधाच्या निमित्ताने केलेली अभ्यास सहल. त्या वेळी बरोबर होते श्री .प्र. श्री. नेरुरकर. ते तर खानोलकरांच्या म्हणजे चिंतूच्या आठवणी सांगताना चिंतूमय होऊन गेले होते. तेव्हाही आरतीच्या गावी जाताना आरतीच्या कविता गुणगुणतच वाटचाल झाली होती. त्या वेळी आम्ही एक वेगळाच थरार अनुभवला होता. आम्ही "कोंडुरा" बघायला निघालो होतो; आणि आमच्या वाटेत एक भला मोठा माड आडवा पसरला. वादळ वाऱ्याने हा भला मोठा माड उन्मळून पडला होता. आपली कविता वाचताना आरती प्रभूंनी जो धाक वाचकांना घातला होता, त्याचे स्मरण आम्हाला त्यावेळी झाल्याशिवाय राहिले नाही. एका कवितेत त्यांनी म्हटले होते,

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका 
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या 
मोडून पडाल.......

कवीचे या कवितेत असे सांगणे होते की माझी कविता अशी सहजच तुम्हाला कळून येणे अवघड आहे. तिला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या संज्ञेचे व्याघ्रचर्म पसरावे लागेल. तिला पाहायचे डोळे तुम्हाला प्रथम प्राप्त करून घ्यावे लागतील आणि मगच तिच्याकडे तुम्ही नीट बघू शकाल; कारण ती भोगतेय जे जे काही, त्यातल्या तिळमात्रही वेदना तुम्हाला सोसायच्या नाहीत. कारण मीच पाहतोय माझ्या कवितेला एखाद्या पेटत्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून. वाचकाची अशी तयारी नसेल तर कवी असा इशाराही देतो की, "तुमच्या देखील मनाची अशी सिद्धता जर नसेल तर जा आपल्या वाटा धुंडाळत आल्या वाटेने." त्यावेळी तो मोठा थोरला वाटेत पसरलेला माड बघितल्यावर हा कवितेचा आशय जास्तच मनात घुसला. मन जरा दचकलेच. अशा मनाच्या अवस्थेत रात्रीचा रातकिड्यांचा आवाज वातावरणाची शांतता भंग करीत होता. या सर्व वातावरणात नेरूरकर कोकणच्या गजाली सांगून आम्हाला अधिकच भेदरवून टाकत होते. गाडी चालवणाऱ्या माझ्या यजमानांना, वैद्य साहेबांना ते म्हणाले होते, "वैद्य साहेब! कोणी तरी बाई येईल...उभी राहील गाडी समोर..तिने पांढरे पातळ नेसलेले असेल, मळवट भरलेला असेल, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असेल, केस मोकळे सोडलेले असतील, आणि म्हणेल, 'वडे द्या वडे! वडे द्या!' पण तिला दाद देऊ नका...नाहीतर आपले कल्याण होईल. मग तिच्या या म्हणण्या बरोबर कुठून तरी गरमागरम वड्यांचा खमंग वास यायला लागेल...पण तिकडेही तुम्ही लक्ष देऊ नका...तुम्ही आपले चित्त विचलित होऊ न देता गाडी चालवत राहा....". बापरे, खरे तर भीतीने गांजून जायला झाले होते. कोणीच कोणाशी बोलेना, अशी अवस्था. खरे तर चांगले सुशिक्षित, शिकले सवरलेले आम्ही. या गोष्टींवर फार विश्वास होता असेही नाही, पण मनात भीती दाटून आली होती हे खरे आहे. त्या वातावरणात भीतीने अंगावर अगदी शंभर टक्के काटा उभा राहिला इतके मात्र खरे. त्या दिवशीच्या त्या आठवणीत मी बुडून गेले होते. इतक्यात मला त्या तंद्रीतून कोणीतरी जागे करत म्हटले,"चला बाई! कुठे तंद्रीत हरवला आहात? चला, चला आलं ना कुडाळ! आरती प्रभूंचं गाव आलं.” मी भानावर आले. कोकणातल्या त्या वळणावळणाच्या रस्त्याने अंग अगदी आंबून गेले होते; पण पुढे डोंगराएवढी महत्त्वाची कामे दिसत होती. आम्ही गाडीतून खाली उतरलो. बाकीचे सारेजण गाडीतून समान काढायला लागले होते. मी आणि अतुल लगेचच चष्म्याच्या शोध यात्रेला बाजारात निघालो. शूटिंगसाठी एक जनरेटर देखील हवा होता. त्याचाही तपास घ्यायचा होता. बाजारात पोहोचल्यावर समोरच एक चष्म्याचे दुकान दिसले. माझ्या हातात आरती प्रभूंचा चष्मा घातलेला फोटो होताच. त्या फोटोशी साधर्म्य असलेला चष्मा पडताळत आमची शोध मोहीम परत एकदा सुरु झाली. अखेर शेवटी यश आले. समोरच्या चष्म्यांच्या फ्रेम मधून अतुलने एक फ्रेम उचलली आणि डोळ्यांवर चढवली. ती फ्रेम फोटोतल्या फ्रेमशी फारशी मिळती जुळती होती असे नाही; पण त्या चष्म्यातून त्याने टिपिकल खानोलकरी स्टाईलनी एक नेत्रकटाक्ष टाकला. म्हणजे चष्म्याच्या फ्रेमच्या चौकटीच्या वरून माझ्याकडे रोखून बघितले आणि अहो आश्चर्य! अतुल मला चक्क आरती प्रभूच वाटला! 

या शोध मोहिमेत आमचा आणखी एक फायदा झाला. फायदा झाला म्हणण्यापेक्षा लाभ झाला असेच मी म्हणीन. आम्ही चष्मा बघत बाजारात हिंडत असतानाच तिथे एक सदगृहस्थ आले. खरे तर माझा शोध घेत घेतच ते तिथे आले होते. साऱ्या गावात कळले होते की चिंतूवर म्हणजेच खानोलकरांवर कोणीतरी फिल्म करते आहे. ते काम करायला एक बाई आल्या आहेत. त्या एका जनरेटरच्या शोधात आहेत. लहान गावात एखादी वार्ता कशी वाऱ्यासारखी पसरते याचे प्रत्यंतर मी घेत होते. त्या वेळी अतुल कुलकर्णी एन.एस.डी.मध्ये शिकत होता. अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द तितकी पुढे आली नव्हती. नाहीतर त्याला बघायला सारा गावच लोटला असता आणि आम्हाला शूटिंग करणे मुश्किल झाले असते. त्यांची शोधक नजर माझ्याकडे वळली आणि ते विचारते झाले,"आपण माधवी वैद्य? चिंतूवर फिल्म करायला आलात काय?" मी "हो" म्हणाले. त्यांना आनंद झाला म्हणाले,"नाही म्हणजे काही मदत लागली तर जरूर सांगा. मी आनंदाने करीन." आमची चष्म्याची शोध मोहीम संपली होती. आता जनरेटर मिळवायचा होता. हाताशी वेळ तसा कमीच होता. मी न राहवून त्यांना म्हटले ,"आपण इथले माहितगार दिसता. आम्हाला एक जनरेटर हवा आहे. आम्हाला इथली काहीच माहिती नाही. आपण जनरेटर कुठे मिळेल ते सांगितलंत तर फार मोठी मदत होईल आपली आम्हाला. मी आपली आभारी होईन." यावर ते हसून म्हणाले," अहो! इतकंच ना! मग जेनसेट तर माझ्या घरीच आहे. तो मी तुम्हाला अवश्य देईन. त्याची काळजी नका करू. तुमचाच आहे असे समजा हवं तर. केव्हा हवा आहे ते सांगा. पाठवून देण्याची व्यवस्था करतो. हं..आणि फक्त एकाच विनंती आहे की आमच्या गावात आला आहात तर माझ्या घरी चहा घेऊन जा. बरं वाटेल मला आलात तर." त्यांनी इतका मदतीचा हात पुढे केल्यावर मला त्यांची ही वनंती मान्य करावीच लागली . आम्ही त्यांच्याकडे चहा घ्यायला गेलो. चहा घेऊन झाल्यावर म्हणाले,"आता जेवूनच जा ना! रात्र झाली आहे. कुठेतरी जेवणारच ना तुम्ही!" मनात विचार आला साऱ्या युनिटचे जेवण राहिले आहे. सारेच दमलेले आहेत. वाट बघत असतील आपली. साधारणपणे शूटिंगच्या वेळी मी एक पथ्य पाळते की सर्वांनी एकत्र जेवायचे. अगदी लाईट बॉईज पासून सर्वांचे खाणे, जेवण, नाष्टा एकत्रितपणे असला पाहिजे. असे वागण्याने ग्रुप मधले वातावरण चांगले राहते. त्याचा कामावरही चांगला परिणाम होतो. सगळ्यांना "हे काम आपले आहे" अशी भावना मनात निर्माण होण्यास मदत होते. काम सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते. ई.एम.आर.सी.च्या संहिता लेखनाच्या शर्ले व्हाईट यांनी दिलेल्या या धड्यांचाही हा परिणाम असावा. असो. मी जरा संकोचानेच त्यांना म्हणाले,"नाही, जेवलेही असते. पण माझ्या बरोबरची सगळी मंडळी हॉटेलवर आहेत. त्यांचीही जेवणं व्हायची आहेत." त्यांनी विचारले,"अशी किती मंडळी आहेत? आणि किती का असेनात! काही हरकत नाही सगळ्यांना येऊ द्यात जेवायला. देव दयेने आपल्याला काही कमी नाही. आमच्या चिंतूवर फिल्म करायला आला आहात, आमचं कामच आहे तुमचा पाहुणचार करायचं." त्यांनी लगेच आपली माणसं हॉटेलवर पाठवली. साऱ्यांना बोलावून घेतले. जेवायला गरम गरम भात पिठल्याचा बेत होता. सारे दमले भागलेले होते. श्रमलेल्या जिवांना ते जेवण रुचकर लागले नसेल तरच नवल! मुखी आपोआप शब्द आले,"अन्न दाता सुखी भव!" परक्या गावात पूर्वीची काहीही ओळख पाळख नसताना कोणीतरी आपल्याला मदतीचा हात पुढे करतो आहे. इतकेच नव्हे तर काहीही मदत लागली तर जरूर या, अशी हमी देतो आहे, आणखी भाग्य ते कोणते? आम्ही त्यांच्या आश्वस्त पाहुणचाराने सुखावून गेलो. त्यांच्या मुलाला फिल्म मेकिंग मध्ये बरीच रुची होती.त्यानेही 'मी तुमच्या बरोबर जरूर असेन,' असे सांगितले. बरे वाटले. सर्वजण तृप्त मनाने हॉटेलवर गेलो. पुढच्या दिवसाची सर्व आखणी केली. चर्चा करून कामाचे वेळापत्रक ठरवले. बराच उशीर झाला होता. पण कामे झपाझप मार्गी लागल्याने शांत मनाने झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच आम्ही तयार झालो. आता आज पासून चित्रीकरणाला खरा प्रारंभ व्हायचा होता. भल्या सकाळीच श्री .सी. श्री.उपाध्ये यांचे घर गाठायचे होते. जाताना वाटेत मला एक कल्पना सुचली. म्हटले आपण जे काय योजत आहोत त्याची जरा आपली आपणच परीक्षा घ्यावी. मी श्याम भुताकरांना म्हटलं,"वाटेत जाताना रस्त्यात जरा गाडी थांबवूयात. तुम्ही अतुलचा मेकअप करा." भुतकर कामाला लागले. अतुलचा हलाकासा मेकअप करून त्यांनी अतुलला लहानशी मिशी लावली. अतुलनी आम्ही त्याच्यासाठी पुण्याला खरेदी केलेला झब्बा पायजमा चढवला. गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळला. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि उपाध्यांच्या घराची वाट धरली. श्री.उपाध्यांचे घर जरा चढणीवर आहे. घराकडे जाताना ओढ्यावरील साकव ओलांडून घराकडे जावे लागते. मग लहानसा चढ येतो. चढणीवरून चढून गेल्यावर मग जरा सपाटी. त्या सपाटी वरून खालचे ओढ्यावरचे साकव, गर्द हिरवी झाडी फार छान दिसते. आम्ही साकवाकडे जाताना मी अतुलला म्हटले,"अतुल, झाली आता आपल्या परीक्षेला सुरुवात. तू आता खानोलकर मनात साठवत, त्यांचे मॅनरिझम लक्षात घेऊन साकवावरून घराकडचा रस्ता चढून वर सपाटीला ये. त्या आधी मी उपाध्यांच्या घरातल्या मंडळींना घेऊन खाली डोंगर सापाटीला येऊन थांबते. मी खूण केली की तू चढण चढायला लाग. तू चढावरून वर येताना उपाध्ये तुला बघतीलच. तुझ्याकडे बघून त्यांना "चिंतू"चा भास झाला आणि त्यांच्या तोंडून जर "अरे हा चिंतू! पण हा इथे कसा?" असा अनाहूतपणे आश्चर्याचा उदगार निघाला तर आपण परीक्षेत पास झालो असे समजायला हरकत नाही." अतुलला इतके सर्व सांगून आणि कॅमेरामनला सूचना देऊन मी उपाध्यांच्या घरी गेले, तर तिथे खानोलकरांचे दुसरे स्नेही श्री.विद्याधर भागवतही येऊन थांबले होते. मी घरातल्या साऱ्या लोकांना बरोबर घेऊन डोंगर सापाटीला आले. अतुलला खूण केली आणि साऱ्यांचे लक्ष साकवाकडेच वेधण्यासाठी मी उपाध्यांना विचारले,"उपाध्ये! हे साकव म्हणजे नक्की काय भानगड असते हो? मी तर असा ओढ्यावर घातलेला बांबूचा पूल प्रथमच बघते आहे." या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून उपाध्ये साकवाकडे हात करून मला काही सांगणार इतक्यात त्यांना आणि तिथे उभ्या असलेल्या साऱ्यांनाच अतुलकडे लक्ष गेल्यावर एकदम धक्का बसल्यासारखे झाले. अतुल मी केलेल्या इशाऱ्यानुसार चढण चढायला लागला होता. अतुलनी आपल्या अभिनयाची कमाल केली होती. त्याला बघितल्यावर उपाध्यांच्या तोंडून आश्चर्याचा उद्गार निघाला,"अरे हा आपला चिंतू!" त्यावर भागवत म्हणाले,"अरे छे! छे! तो इथे येईलच कसा? छे! अरे चिंतू कसा येईल आता, इथे? तो तर... छे! काही तरी घोटाळा वाटतोय..." इतक्यात अतुल चढ चढून आला त्यांच्याजवळ येऊन उभा ठाकला आणि चष्म्याच्या वरून विशिष्ट खानोलकरी नजर रोखत त्यांच्याकडे पाहून मनस्वीपणे म्हणाला,"हं...काय मग? कसे आहात? ठीक ना, सगळे?' इतके झाल्यावर सगळ्यांना खरा प्रकार लक्षात आला. सगळ्यांनीच अतुलची पाठ थोपटली. उपाध्ये न राहवून म्हणाले,"कमाल आहे बुवा! आम्हाला अगदी तंतोतंत चिंतूचाच भास झाला. अगदी अस्साच दिसायचा. चालणं, बोलणं अगदी चिंतूसारखंच...खरोखर एक क्षण वाटून गेलं....तोच आलाय म्हणून...डोळ्यांत पाणी आलं त्याच्या आठवानी..... शाब्बास!" हे सर्व ऐकून आम्हाला वाटले चला, आपण आपली परीक्षा पहिल्या श्रेणीत 'वुईथ मेरिट' पास झालो. आम्ही समाधानाचा सुस्कारा सोडला. जीव भांड्यात पडला. या परीक्षेत पास होणे आमच्यासाठी नितांत गरजेचे होते. त्यावरच तर सबंध एपिसोडचा डोलारा उभा राहाणार होता. हे जमले नसते तर सारे प्रयास वाया गेले असते. मग या दोघांकडून खानोलकरांच्या व्यक्तिमत्वातील आणखी काही बारकावे, त्यांचा स्वभाव, त्यांचे मूड्स, त्यांच्या वावरण्यातील, उठण्या बसण्यातील खास लकबी, सर्व सर्व आम्ही समजून घेतले. अतुलच्या अभ्यासू वृत्तीचा सारेचजण अनुभव घेत होते. या सर्व खटाटोपातून भूमिकेची अतुलची समज वाढायला नक्कीच मदत झाली. एकंदरच खानोलकरांचे कलंदर व्यक्तिमत्व या दोघा मित्रद्वयांनी कमालीच्या सामर्थ्यानिशी आमच्या समोर उभं केलं होतं.

खनोलकरांचा जिथे जन्म झाला ती 'बागलांची राई' हे जन्मस्थान, खानोलकरांची वास्तू, खानोली निवतीचा समुद्र अशा अनेक ठिकाणी शूटिंग करणे गरजेचे होते. आरती प्रभूंनी ज्या ठिकाणी आपल्या कविता लिहिल्या ती 'वीणा गेस्ट हाउस'ची माडीही चित्रित करायची होती. खानोलकरांच्या कोकणातल्या वास्तव्यात 'वीणा गेस्ट हाउस'ला अनन्य साधारण महत्त्व आहे. या आणि आणखीही काही इतर जागांचे शूटिंग घेणे या एपिसोडच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. खानोलकरांच्या लिहिण्यातील, चालण्यातील, स्वभावातील, चिंतनातील, मनातील अस्वस्थता दाखवणारे अनेक शॉट्स घ्यायचे होते. मग सारा दिवस हे शॉट्स घेण्यात आम्ही गढून गेलो होतो. वळणावरून चालत येताना, झाडाला टेकून उभे असताना, आराम खुर्चीत बसून मनस्वीपणे लेखन करताना, कॉटवर झोपून पाय वर भिंतीवर रेलले आहेत आणि लिहायची वही खाली जमिनीवर ठेवून लेखन चालले आहे अशा काहीशा 'शीर्षासनी', विचित्र पोझ मध्ये चाललेले लेखन, अशी कितीतरी क्षणचित्रे कॅमेऱ्यात चित्रबद्ध करून घेतली, ज्यातून कवीला साकारणे महत्त्वाचे होते. अनंत शॉट्स घेतले खरे; पण त्यात अतुलनी एक अक्षर देखील संवाद स्वरूपात बोललेले नव्हते. त्याचे अतुललाही आश्चर्यच वाटत होते. शेवटी त्याने मला विचारले,"मॅडम! एक विचारू? आज सारा दिवसभर काम झाले आज, पण मला एकही संवाद दिला नाहीत तुम्ही...." मी त्याला ठामपणे म्हटले,"हो. तुला मी आज सबंध दिवसात एकही संवाद नाही दिला बोलायला, हे खरे आहे. त्या मागे मी काही विचार केला आहे, हे देखील खरे आहे. पण अतुल एक मात्र खरे, की मला जे हवे होते ते मात्र तू मला उत्कृष्ट पद्धतीने दिलेले आहेस. आजचा दिवस तू सार्थकी लावलास इतकंच मी तुला सांगते. सो थँक्स! जेव्हा मालिकेचा हा भाग टेलिकास्ट होईल तेव्हा जरूर बघ. मी असे का केले त्याचा उलगडा होईल तुला." आणि मला आठवते आहे जेव्हा एपिसोड दूरदर्शनवर टेलिकास्ट झाला तेव्हा अतुलचा फोन आला होता,"काय माधवी ताई! कुठल्या कुठे नेलात एपिसोड! आत्ता मला समजले मला तुम्ही का बोलू दिले नाहीत ते! ग्रेट! सिम्पली ग्रेट!" मलाही त्याचे बोलणे ऐकून धन्यता वाटली.मनात म्हटले," खानोलकराय नमो नम:!" 

मालिकेच्या या भागासाठी खानोलकरांच्या मालिकेतील अपेक्षित सर्व कथनाला आमच्या “अनन्वय” संस्थेच्या कलाकाराने योगेश सोमण याने उसना आवाज दिला होता. त्यामुळे आरतीच्या बाबतीत गत स्मृतीतील वावरण्याचा आभास, फील मला यशस्वीपणे दाखवता आला. खानोलकरांच्या आवाजातील मनस्विता आणि दुखरी वेदना योगेश सोमण याने आपल्या आवाजातून अत्यंत परिणामकारकतेने व्यक्त केली. आरती प्रभूंच्या कवितांचे वाचनही फार ताकदीने केले. त्याचे त्यासाठी कौतुक करावे तितके थोडेच आहे. हा प्रयोग यशस्वी करणे फार अवघड होते. जर अतुलला मी संवाद दिले असते तर त्याची व्यक्तिरेखा जिवंत झाली असती. पण आपल्या स्मृती पटलातून आरती प्रभूला साकार करण्यात हा प्रयोग फार यशस्वी ठरला. 

आरतीच्या कवितेतेला दुखरा सूर सांभाळण्यात संगीतकार घोरपडे यशस्वी ठरले. त्यांनी अतिशय समर्पक चाली आरती प्रभूंच्या गाण्यांना दिल्या आणि त्या चालींना अतिशय गुणी गायिका देवकी पंडित यांनी न्याय दिला असे म्हणायला हवे. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आरती प्रभूंच्या कवितेवर काही भाष्य करावे म्हणून आम्ही शेवट पर्यंत प्रयत्न केले. कारण “ये रे घना,ये रे घना “ याआपल्या संगीत रचनेतून त्यांनी आरती प्रभूंना घराघरात पोहोचवले होते. पण त्यांची मुलाखत या मालिकेसाठी घेण्यात आम्ही अयशस्वी ठरलो.

श्री.पु.भागवत आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर या दोघांनीही आरती प्रभूंना पदराआडच्या दिव्याप्रमाणे जपले,जगवले होते. २ फेब्रु.१९५९ ला खानोलकर जगण्यासाठी मुंबईला आले. त्यांच्या काहीशा अनघड हिऱ्यासारख्या चमकणाऱ्या प्रतिभेची जोपासना केली ती ‘मौजे’च्या श्री. पु. भागवत यांनी. त्यांच्या कवितेची आणि सगळ्याच साहित्याची ताकद श्री. पु. भागवतांनी बरोबर ओळखली होती. श्री. पु. भागवत यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना आरती प्रभूंच्या विषयी बोलण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी ती आनंदाने मानली. आम्ही त्यांच्याच घरी चित्रीकरणही केले. श्री. पु. आरतीच्या कवितेविषयी भरभरून बोलले. मोजकेच पण मार्मिक. ते म्हणाले, "खानोलकरांना जगण्यासाठीची धडपड जी होती आयुष्यातली, ती शेवटपर्यंत करावी लागली; आणि त्यात त्यांची खूप शक्ती खर्च झाली. एका दृष्टीने जगण्याची शक्ती खर्च झाली पण त्या धडपडीतूनच त्यांना कवितेचं बळदेखील मिळालं असेल. कवितेमध्ये मात्र ...लेखक जो असतो तो आपलं इमान कुठे राखतो,त्यावर त्याचं मोठेपण अवलंबून असतं. काही वेळेला काहींचं इमान एखाद्या माणसाशी असेल,काहींचं एखाद्या संस्थेशी असेल,काहींचं एखाद्या मूल्याशी असेल, यांचे इमान लेखनाशी होते आणि विशेषत: कवितेशी होतं. एकंदरच लेखक म्हणून विचार करत असताना मला त्यांच्याच कवितेच्या ओळींची आठवण येते. त्यांनी त्या कवितेत नायिकेच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की 'तू कशी आहेस?' अगोदरची कडवी नायिकेसंबंधीची आहेत. पण शेवटच्या कडव्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तू एखाद्या पक्ष्याच्या पंखावरील नक्षी असते ना! तशी आहेस...आणि ती नक्षी देखील कशी? तर कवितेच्या ईश्वराची... अशीच त्यांची कविता होती. कुणा सामान्य कलाकाराची नव्हे तर कवितेच्या ईश्वराने काढावी तशी नक्षी त्यांच्या कवितेची आहे" हे बोलता बोलता श्री.पुंचा आवाजही थोडा ओलावला. असा इतका मोठा कवी मला एक प्रकाशक म्हणून लाभला या बद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मनात खानोलकरांविषयी अनंत आठवणी दाटून आल्या होत्या. खानोलकरांच्या स्वभाव विशेषाविषयी बोलतांना ते म्हणाले, "गप्प राहणं हा त्यांचा स्वभाव होता. क्वचितच काही वेळेला, काही मित्रांजवळ ते काही बोलत असतील, काही वेळेला माझ्याशीही त्यांच्या आयुष्यातील काही ते बोलले आहेत पण पिंड त्यांचा गप्प राहाण्याचा होता. त्यांच्या कवितेतदेखील मौनाचे उल्लेख फार येतात. मग ते मौन ओलावलेलं मौन असतं, केव्हा त्या मौनाचीच झालेली घुसमट असते, काही वेळेला ते फुटू पाहातं पण आवरण्याचा प्रयत्न असतो, तर असं मौन जपाणारा असा हा एक कवी होता." खानोलकरांच्या एकंदर साहित्यिक म्हणून कारकीर्दीचा आढावा घेताना ते म्हणाले, "माझं स्वत:चं असं मत आहे की त्यांचं सगळ्यात मोठं यश ,कलावंत म्हणून त्यांच्या कवितेत आहे. त्या खालोखाल त्यांच्या सुरुवातीच्या काही कथांमध्ये आहे,तिसरे त्यांचे खात्रीचे, भरवशाचे नाही पण जिथे यश मिळाले तिथे चांगले असं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे आणि सगळ्यात कमी यश त्यांना नाटकात मिळालं. पण अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळून पाहिले." मला वाटते श्री.पु. भागवत यांची या निमित्ताने केलेली ही एकमेव द्द्क-श्राव्य चित्रफीत फक्त आमच्या पाशीच असावी. आरती प्रभूंच्या केवितेचे सुंदर विश्लेषण तर त्यांनी केलेच; पण त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या आठवणींनाही त्यांनी उजळा दिला. खानोलकरांची अतिसंवेदनशील वृत्ती, त्यांच्या स्वभावातला अत्यंतिक हळवेपणा या विषयीही श्री. पु. भरभरून बोलले. श्री. पुं. ची मुलाखत घेऊन आम्ही अक्षरश: धन्य झालो इतकेच म्हणावेसे वाटते.

शालेय जीवनात खानोलकरांनी कवी 'पुष्पकुमार' या टोपण नावाने कविता लिहिली होती. पण नंतर पुढे त्यांची 'शून्य शृंगारते' ही कविता 'सत्यकथे'त प्रसिद्ध झाली ती 'आरती प्रभु' या नावाने. त्या कवितेखाली तारीख होती ७.१०.५३. श्री.सी.श्री.उपाध्ये आणि विद्याधर भागवत हे खानोलकरांचे कुडाळच्या वास्तव्यातील सच्चे मित्र. त्यांना एकदा श्री. प्र.श्री.नेरूरकरांनी सांगितले की आरती प्रभु ही व्यक्ती कुडाळचीच आहे. उपाध्ये सांगतात ,"मग आमची मैत्री अधिक दृढ झाली" .या मित्रांनी आरती प्रभूंच्या काव्यातील ताकद अगदी सुरुवातीच्या काळातच ओळखली होती. तेव्हा खानोलकरांना आपल्या साहित्यिक वाटचालीत आपल्याला दाद देईल असा समानधर्मा भेटला नव्हता. आपले लेखन ज्याला वाचून दाखवावे असा कोणी जाणकार रसिक त्या परिसरात मिळत नव्हता, अगदी त्याच नेमक्या वेळी हे दोघे मित्र त्यांना लाभले, ज्यांच्याशी साहित्यक चर्चा आणि विचारांची देवाण घेवाण होऊ शकत होती. या दोघांबरोबर घडणाऱ्या साहित्यक मैफिली त्यांच्या जगण्याला उभारी देत असत. आणि अशा मैफिली अनेकदा घडून येत असत. त्यासाठी भागवत सावंतवाडीवरून लांबचा पल्ला गाठत आपल्या मित्रांना भेटायला येत आणि खानोलकर कुडाळ वरून सावंतवाडीला पायपीट करत, वळणा वळणांच्या रस्त्याने येत येत उपाध्यांचे घर गाठत असत. मग कुठे तरी बसून "सत्यकथा", "मौज"च्या अंकांचे वाचन होत असे. इंदिरा संत यांची कविता खानोलकरांना फार आवडत असे. पु.शि.रेगे, बोरकर, पाडगांवकर यांच्या कवितांचे वाचन होत असे. मग त्यावर तासन तास चर्चा चालत असे. विंदा सुद्धा कोकणातलेच. त्यांच्या कविता वाचल्या गेल्या नाहीत तरच नवल! विंदांच्या काव्यवाचनात रंगून जाऊन खानोलकारांनी आपली परीक्षाही बुडवली होती. 'चिंतू'च्या भावविश्वाला या मित्रांनी असा भावनिक आधार दिला होता. तेव्हा नुकताच कुठे "आरती प्रभु" या नावाला आकार येऊ पाहत होता. त्यावेळी मग सी.श्री. उपाध्ये यांनी आपल्या मित्राला एक प्रेमळ सल्लाही दिला. त्यांनी खानोलकरांना विचारले की, "आता तुम्हाला कोणी जर विचारलेच की तुम्ही आरती प्रभु या नावाने लेखन का करता बुवा? तर तुम्ही काय उत्तर द्याल?" ते बुचकळ्यात पडलेले बघून सी.श्री.त्यांना म्हणाले,"याचा विचार खानोलकर तुम्ही आत्ताच करून ठेवायला हवा." सी.श्रींनी त्यांना सांगितले ,"खानोलकर आता या नावाला अर्थ द्या. तुमच्या कवितेचा सूर वेदनेचा आहे .तेव्हा 'प्राणिनाम आर्ति नाशनम' या संस्कृत वाचनावरून मला हे नाव सुचले असे तुम्ही सांगू शकाल. वेदना दूर करणारा म्हणजे प्रभु. अशा अर्थी आहे तुमचं नाव, चांगलं आहे ते. म्हणून असे तुम्ही सांगू शकता." आणि आरती प्रभूंना हे त्यांचे म्हणणे तेवढ्या पुरते का होईना पण पटलेही होते, असे उपाध्ये सांगतात. आरती प्रभूंनी पुढे आपण हे नाव काव्य लेखनासाठी का घेतले, या बद्दल ज्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या त्यापैकी ही व्युत्पत्ती ते बरेच दिवस रसिकांना सांगतही असत. पण या सर्व चर्चांमधून त्यांना जगण्याचे बळही मिळत असे हे मात्र खरे. त्यांच्या दारिद्र्यावर यामुळे जरा फुंकर घातली जात असे. त्यांना या चर्चा मनापासून आवडत असत. खाणावळीच्या धंद्यापासून त्यांची होणारी कुचंबणा जरा त्यांना सुसह्य होत असे. या एपिसोडच्या निमित्ताने या साऱ्या गतस्मृतीत हे दोघे मित्र अगदी बुडून गेले होते. किती सांगू आणि किती नको अशीच त्यांची स्थिती झाली होती. मलाही या सगळ्या आठवणी त्यांच्याकडून हव्याच होत्या. कारण खानोलकर जरी जगण्यासाठी मुंबईला आले तरी त्यांचा खरा जीव घुटमळला तो कोकणातच. खानोलकरांच्या पायी कोकणाची लाल माती घट्ट चिकटून बसली होती. मुंबईत बसून त्यांच्या कानी येत होती ती "कोंडूऱ्या" ची गाजच! कोकणच्या निसर्गावर खानोलकरांनी भरभरून प्रेम केले. ते म्हणतात,"कोकणचा निसर्ग नुसताच देखणा नाही, चांदण्या रात्री पाहिलं तर त्याची नदीकाठची झाडं,माड, घरं, काही वेगळीच दिसतात. ....स्वत:तच पाखरासारखी गपगार पडून राहिलेली.हा निसर्ग जेवढा देखणा आहे, तेवढाच अंतरी रौद्र भीषण .त्यावरचा माणूस भलताच तालेवार. इथल्या या मातीने माणसांच्या जीवन मरणाच्या रेषा वाकवलेल्या आहेत. या रेषा माझ्या साहित्य धर्माच्या मुळाशी आहेत. या माणसांशी खूप जमतं माझं खूप जमतं .त्यांनी मला लिहायला शिकवलं आहे, त्यांच्यामुळे मी लेखक झालोय." उपाध्यांच्या आणि भागवतांच्या मनात उचंबळून आलेल्या त्या धुंद फुंद आठवणींनी त्यांच्या मुलाखती रंगल्या. मुलाखती आम्ही घेतल्या पण मुलाखतीचे तंत्रच आम्ही बदलले होते. या मालिकेच्या तेराही भागातील मुलाखती आम्ही "ऑफ द कॅमेरा" या टेक्निकनी घ्यायचे ठरवले. त्यामुळे मुलाखत देणाऱ्याला भरपूर वेळ दिला जात होता. मुलाखत घेणाऱ्याची प्रश्न विचारण्याची लांबण लागत नव्हती. तो वेळही मुलाखत देणाऱ्याला मिळत होता. त्याच्या बोलण्याचा ओघ कुठेही खंडित होत नव्हता. हे तंत्र खास विश्राम रैवणकर यांचे. त्यांनी शिकवलेले. ते नेहमी सांगायचे,"चित्रीकरणासाठी हाती असलेला वेळ फार काटेकोरपणे वापरणे आवश्यक असते. हे फार खर्चिक माध्यम आहे. तेव्हा दिग्दर्शकाने या माध्यमाचा उपयोग फार विचारपूर्वक करायला हवा."

उपाध्यांच्या घरचे म्हणजे सावंतवाडीचे चित्रीकरण संपवून आम्ही आमचा मोर्चा "वीणा गेस्ट हाउस" कडे, म्हणजे कुडाळच्या दिशेने वळवला. "वीणा गेस्ट हाउस" म्हणजे खानोलकरांची खाणावळ. म्हणजे ही खाणावळ खरे तर चालवत असे ती त्यांची आईच. आणि खानोलकर फक्त त्या खाणावळीच्या गल्यावर बसत असत. पण खरे तर कवी वृत्तीच्या या माणसाला खाणावळ चालवणे वगैरे फार जमलेच नाही. खाणावळीचा धंदा डबघाईला येणे, त्यातच त्यांचा एक मुलगा औषध पाण्यावाचून दगावणे हे सारेच त्यांच्या हळव्या मनाला व्यथित करून गेले नसेल तरच नवल. या अश्राप जिवाचा मृत्यू बघून त्यांच्या मनाच्या खोल तळातून अचानक ओळी स्फुरल्या......

हसायाचे आहे मला 
कुठे आणि केव्हा? कसे आणि कुणापास? 
येथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास...... 

अशा मनाच्या भावविभोर झालेल्या अवस्थेत मग कविता हाच त्यांच्या जगण्याचा एक आधार राहिला असल्यास नवल ते काय? अशा अवस्थेत मग मनातल्या व्यथा शब्दांद्वारे कागदावर उमटल्या असतील! त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे ना!

कथा व्यथातील होतात बोलक्या 
गातात अभंग होऊन साळुंक्या
स्वप्नी चंद्र्गौर मिटता पापणी 
मीच माझ्यातून जन्मते देखणी 

हे अगदी अनुभवाचे बोल आहेत. या व्यथांतूनच खानोलकरांची कविता निसर्ग रम्य कोकणात बहरून येत होती,फुलून येत होती.इंदिरा संत आपल्या एका कवितेत म्हणतात

व्यथा सोसायची तुझी किती वेगळी ग रीत,
जिथे रुजलीसे व्यथा वेल होऊनिया येत 

या इंदिरा संतांच्या ओळी आरती प्रभूंच्या कवितेला तंतोतंत लागू पडतात.वास्तवाचे कडू जहर पीतच ही कविता लिहिली जात होती,म्हणूनच ते म्हणतात,

हवे झाड घ्याया लपेटून वक्षी
मिळेना कवीला चहूं बाजूंनी
उठाया धजेना दऱ्यांतून आभा 
उरी रक्तगाभा निळा गोठुनी

असे आक्रंदन करावे इतके निर्दय वास्तवाचे चटके या कवी मनाला तेव्हा बसत असतील.... अशा वेळी "वीणा गेस्ट हाउस" ची ती माडी ही त्यांच्या काव्य प्रतिभेसाठी एक निवांत सर्जनशील वास्तू म्हणून त्यांना आधारभूत ठरली असेल. म्हणूनच या वीणा गेस्ट हाऊसच्या माडीला खानोलकरांच्या कुडाळच्या वास्तव्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. या दोन दिवसांच्या शूटिंगमधे काही प्रसंग मनावर कोरले गेले त्यातील एक गोष्ट म्हणजे 'वीणा गेस्ट हाऊस'चे चित्रीकरण. वीणा गेस्ट हाऊस ही खानोलकरांची खाणावळ. पूर्वी इथे जी पाटी होती त्यावर म्हणे सरस्वतीचे वीणा वादन करतानाचे चित्र होते. आता ते चित्र अर्थातच तिथे नाही. आता या वास्तूचा खालचा मजला एका बँकेकडे आहे आणि इमारतीचा वरचा मजला जिथे खानोलकर आपले कविता लेखन करायचे ती माडी मात्र रिकामीच आहे. आम्ही तिथल्या बँकेच्या मॅनेजरला भेटलो. म्हणालो, "आम्ही पुण्यावरून आलो आहोत. खानोलकरांवर एका मालिकेच्या भागाचे चित्रीकरण करीत आहोत. या वास्तूचे चित्रीकरणही करायचे आहे.आपली परवानगी आम्हाला मिळेल का?" हे ऐकल्यावर त्यांना आनंदच झाला. म्हणाले,"अहो! आमची परवानगी कसली मागता? खानोलकरां सारख्या प्रतिभावान लेखकाची ही वास्तू आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. खरं तर आमचंच भाग्य म्हटलं पाहिजे की आपण आमच्याकडे आलात. या वास्तूचं , जिथे हा प्रतिभावंत वावरला त्या वास्तूचं चित्रीकरण झालं, तर त्यात आम्हालाही आनंदच आहे. नव्हे ते होणं आवश्यकही वाटतं. अवश्य चित्रीकरण करा. तुम्हाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. " त्यांनी आम्हाला त्यांच्या इमारतीचा दुसरा म्हणजे वरचा मजलाही उघडून दिला आणि आमच्या समोर आरती प्रभूंच्या अनेक कवितांच्या जन्माला साक्षीभूत असलेली ती वीणा गेस्ट हाउसची माडी खुली झाली . "जोगव्या"तील अनेक कवितांचे जन्मस्थान असलेली ती माडी. समोरच होते मारुतीचे मंदीर. जे खानोलकरांच्या "रात्र काळी घागर काळी" या कादंबरीमधे येते. डोक्यावरची जळमटे बाजूला सारत त्या माडीचा जिना चढताना मन थरारून जात होते. वाटत होते. एखादी कविता सुचली तर या निवांत माडीकडे खानोलकरांनी कितीदा तरी धाव घेतली असेल. इथेच सहजच बोलता बोलता आणखी एक गोष्ट कळली. ती म्हणजे "रात्र काळी घागर काळी"ची नायिका 'लक्ष्मी' याच गल्लीत, इथल्या बाजारात घर करून राहते. ती आपल्या बरोबर पाच, सहा कुत्रे बाळगते. गावातल्या बड्या बड्या धेंडांना लोळवणारी ही लक्ष्मी आज साठी, सत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. तिच्या तोंडी असते अस्सल कोकणी शिव्यांची लाखोली. मनात विचार आला या लक्ष्मीला आपल्या कॅमेऱ्यात बद्ध करून ठेवता येईल का? गरज भासली तर पुढे मागे हा शॉट आपल्याला वापरता येईल, पण ही संधी पुन्हा मिळणार नाही. हे साधावे कसे? मग त्या बँकेच्या मॅनेजरलाच मनातले निदान बोलून तर टाकूयात, असे वाटले. तो सुचवेल उपाय काहीतरी अशी अटकळ मनात बांधत त्याच्याशी बोलणे केले. त्याने सांगितले असे करता येईल पण तिला नकळतच हे सारे करावे लागणार. तिला आपण असे काही करतो आहोत याचा जरासाही सुगावा लागला तर मग आपली काही खैर नाही. ती आपल्यावर पुरेपूर तोंडसुख घ्यायला मागे पुढे बघणार नाही. खूप तमाशा करून सारे लोक गोळा करायला ती मागे पुढे बघणार नाही. एकदमच कडक काम आहे ते." शेवटी विचारांती असे ठरले की त्या मॅनेजरनी काहीतरी काम काढून तिला बाहेर बोलवायचे आणि आपण दुरूनच तिचे शूटिंग घ्यायचे. ठरले. आम्ही मोहिमेवर निघालो. तिच्या घरासमोरच्या रस्त्यावर बाजार भरला होता. त्या बाजारात अबोलीचे वळेसर विकणारा एक माणूस उभा होता. मनात आलं, या अबोलीच्या वळेसरांच्या आत कॅमेरा दडवून चित्रीकरण घतले तर तिला काही कळणार नाही. मी त्या गजरे विकणाऱ्या माणसाला तशी विनंती केली. मला इथे एक शूटिंग घ्यायचे आहे. तुझ्या या अबोलीच्या वळेसरात मी कॅमेरा लपवून एक शूटिंग घेऊ का? तो आपल्यापाशीच फक्त या विचारायला आलेल्या आहेत याचे अप्रूप वाटून चटकन "हो! चालेल की" असे म्हणून गेला. आता आमचे काम होणार असे वाटू लागले. त्या मॅनेजरनी एक बँकबुक घेऊन लक्ष्मीकडे जात तिला "काही तरी काम आहे बँकेचे" असे भासवत बोलत बोलत घराबाहेर आणले. एका हातानी आपल्या नऊवारी साडीच्या ओच्याचा घोळ सावरत, दुसरा हात दाराच्या चौकटीवर टेकवून शरीराला आधार देत उभी असलेली लक्ष्मी बघून मन हरखून गेले. मॅनेजर तिच्याशी पैशाच्या व्यवहाराविषयी बोलत तिला गुंतवू बघत होता. आमचा कॅमेरा समोरचे दृश्य त्याच्या अधिऱ्या नेत्रांनी टिपत होता. अशा पद्धतीने ज्या व्यक्तीवर खानोलकरांच्या कादंबरीतील लक्ष्मी हे महत्त्वाचे पात्र बेतले होते, ती व्यक्ती कॅमेऱ्यात चित्र बद्ध झाली देखील. ही आम्ही केलेली एक साहसकथाच होती म्हणानात! दाराच्या चौकटीवर हात ठेवून उभी असलेली ती 'त्या' लक्ष्मीची आकृती आजही माझ्या नजरे समोरून हलायला तयार नाही. काळी सावळीच, उफाड्याच्या बांध्याची , उंच निंच, या वयातही आखीव रेखीव चेहरेपट्टी असणारी लक्ष्मी! मला हिंदीतली ती म्हण आठवली,"खंडहर कहेते है, इमारत तो बुलंद थी" आम्ही या चित्रीकरणामुळे खरोखरच धन्य झालो. 

असेच त्या बाजारपेठेत फिरत असताना 'वासू वर्दम' नावाचा एक खानोलकरांचा मित्र अगदी बोलावणे पाठवल्यासारखा आमच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्याचे रुपडे बघितल्यावर मला खानोलकरांच्या 'चानी' कादंबरीताल्या चानीच्या सौंदर्याचीच आठवण झाली. अगदी तसेच अँग्लो इंडिअन सौंदर्य. निळे निळे डोळे, गोरीपान अंगकांती. भुरे भुरे सोनेरी छटा असलेले केस....मनात विचार आला म्हणजे या जातीचे सौंदर्य खानोलकरांनी तेव्हा कुडाळमधे बघितले होते तर...जे चानीची व्यक्तिरेखा रंगवताना त्यांनी उपयोगात आणले आहे... हे ही खरेच आहे अगदी की शेजारीच असणाऱ्या गोव्यातील पोर्चुगीज सोल्जरांपासून वर्णसंकरातून ही प्रजा निर्माण झाली असेल, आणि हे सौंदर्य तेव्हा तरी सर्व कोकणी लोकांमधे उजवेपणाने उठूनही दिसत असेल. असो.. या वासू वर्दमनेच खानोलकरांच्या 'वीणा गेस्ट हाऊस'चा सरस्वतीचे चित्र असलेला बोर्ड रंगवला होता . 

या पूर्वी जी अभ्यास सहल पी.एच.डी .चा अभ्यास करताना आखली होती, तेव्हा आम्ही "कोंडुरा" या कादंबरीतील त्या स्थळालाही भेट दिली होती. त्या वेळी आमच्या बरोबर होता कोकणातला कवी महेश केळुसकर. कोंडुऱ्याकडे जाताना आम्हाला अचानकच एका संकटाला सामोरे जावे लागलेहोते. जायच्या वाटेत एक भला मोठा माड आमच्या वाटेत आडवा आला होता. तो वादळ वाऱ्याने उन्मळून जाऊन भुईसपाट झाला होता. याचा उल्लेख मागे आलाच आहे. कोकणात माड पडणे, म्हैस हरवणे या दोन गोष्टी भयानक स्थिती निर्माण करतात. त्यावेळची कोकणी माणसाची होणारी हतबल अवस्था वर्णन करणे कठीण आहे. अशी परिस्थिती उद्भवणे हे त्या त्या प्रदेशातील लोकांचे प्राक्तनच असते म्हणानात ! तर आठवण आली त्या वेळी घेतलेल्या त्या कोंडुऱ्याच्या दर्शनाची. तो माड आडवा आल्याने साऱ्यांनाच समुद्राच्या तापलेल्या वाळूतून पायाला चटके बसत बसत कोंडुऱ्याकडे चालत जावे लागले होते. खानोली निवातीचा तो शांत,निर्मनुष्य किनारा आणि समोर उभा असणारा तो आव्हान दिल्यासारखा उभा असलेला कोंडुरा! समोर पसरलेला तो कोंडुऱ्याचा काळाशार कातळ आणि आणि डोक्यावर हैराण करणारा तळपता सूर्य! तो काळा कातळ चढताना त्याच्या धारदार कडा पायाला कातरून काढायला बघत होत्या. पण मनात दाटून आलेली अपार जिद्द, त्याकडेही दुर्लक्ष करायला लावीत होती. आमचे नशीब बलवत्तर ...त्यावेळी समुद्राला नेमकीच ओहोटी लागलेली होती. त्यामुळे आम्हाला कोंडुऱ्याच्या घळीपर्यंत पोहोचण्यात अखेर यश आले. कोंडुऱ्याच्या माथ्यावर पोहोचलो आणि खाली बघितले. खाली कोंडूऱ्याची घळ अगदी स्पष्ट दिसत होती. खानोलकरांनी केलेले कोंडुऱ्याचे वर्णन आठवले. "आपल्या परिसरातील वीस पंचवीस मैलांचा परिसर आपल्या गर्जनामंत्राने भारून टाकणारा हा 'कोंडुरा'. कोंडुरा म्हणजे समुद्राच्या नजीक असणाऱ्या कमी अधिक उंचीचा उंचवटा असलेला एक भाग. निसर्गाचा एक चमत्कार! समोर खानोली निवातीचा अथांग समुद्र क्षितिजापर्यंत पसरलेला आहे. त्यातूनच एक खडक अक्षरश: नागाच्या फण्यासारखा वर उचलून आला आहे आणि त्या खाली खडकांच्या खबदाडीत आहे एक काळेशार विवर. हे विवर भूगर्भात खूप लांबवर पसरलेले आहे. डोंगराच्या भागाचा फण्यासारखा दिसणारा तो खडक तांबड्या खडकाचा आहे. म्हणजे कोकणातल्या जांभ्या दगडाचा आहे .समुद्राच्या लाटा भूगर्भातल्या त्या विवरातून आत घुसतात आणि मग त्या पाण्याचा आवाज त्या सर्व परिसरांत घुमून उठतो. समुद्राच्या लाटा त्या खडकांवर जोरदार आपटतात. त्या घुमण्यातून एक गर्जना उठते विश्वाला साद घालणारी ...."धो...धस्स" पावसाळ्यापूर्वी जेव्हा वारे जोर धरतात तेव्हा ते या भूगर्भाच्या पोकळीत घुसतात. आणि मग जोरकस आवाज घुमू लागतो,"धो... धस्स". हा आवाज सुरु झाला आणि ही गाज कानी आली की समजायचे,"कोंडुरा गरजतां, आता पावसाक येळ नाय." ही गर्जना त्या परिसरात अगदी सुदूर पर्यंत ऐकू येते. 'कोंडुरा' हे तिथल्या आसपासच्या परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. कोंडुऱ्याच्या विवराच्या वर उभारलेल्या नागाच्या फण्यासारख्या खडकावर एक वडाचे झाड आहे. ते कोंडुऱ्याचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. उडीद वडे,नारळ,कोंबडा,यांचा नैवेद्य दाखवला जातो. एका पोवळीत कोंबड्याची मान,पिठाची बाहुली ,पेटता काकडा ठेवून समुद्रात सोडून दिला जातो. 'कोंडुरा'आपले रक्षण करतो या भावनेने हे सर्व केले जाते. ते आपल्या रखवालदाराला प्रसन्न करण्याच्या भावनेतून! 'कोंडुरा' आपले रक्षण करतो अशी या परिसरातील लोकांची दृढ भावना आहे. हे सर्व बघताना खानोलकरांनी केलेले कोंडुऱ्याचे वर्णनही सतत आठवत राहतेच. ते म्हणतात,"या घड्याला नाद आहे, हा घडा तर मीच आहे. कोंडुऱ्याच्या नावानं घडलेल्या त्या नादानं....अगदी बाराव्या वर्षापासून या कानाची भोकं भरली आहेत.....या नादानं मी ही घडलोय....म्हणूनच मी माझ्यावर प्रेम करतोय ....आणि म्हणूनच मी थोडा लेखकही झालोय" ते त्यांनी केलेले कादंबरीतील वर्णन आठवून आम्ही त्यांच्या प्रतिभेला मनापासून हात जोडले होते. समोर जे बघत होतो त्याहूनही ते वर्णन कितीतरी उंची गाठत होते. त्यांनी केलेले कोंडुऱ्याचे वर्णन त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची खरोखरीच साक्ष देत होते असेच म्हटले पाहिजे. त्यांनी रंगवलेल्या कोंडुऱ्याचे आपण याचि देही याचि डोळा दर्शन घेत आहोत, यावर प्रथम विश्वासच बसेना. मला आठवते आहे की महेश केळुसकर तर इतका भारावून गेला होता, त्याने त्या घळीत उतरून त्या पाण्याचे दोन चार थेंब आपल्या तोंडात तीर्थ म्हणून प्राशन केले होते. काही काही आठवणी मनात ठाण मांडून बसतात, त्यापैकी ही एक आठवण. कोंडुऱ्याचे चित्रीकरण खरे तर करायचे होते पण ते अशक्यही होते. त्याला दोन कारणे. एक म्हणजे हाती असलेला अपुरा वेळ आणि अपुरे बजेट. असो. सगळेच आपल्या मनासारखे घडतेच असे नाही.

'बागलांची राई' या स्थळाला खानोलकरांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. तेथील मठाचे खानोलकरांच्या मनावर झालेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. ते एके ठिकाणी म्हणतात, "माझ्या सगळ्या आठवणी माझ्या आजोळच्या घराभोवतीच गुंफल्या आहेत. गर्द झाडी असलेल्या एका टेकडीच्या उतारावर ते घर होतं आणि पायथ्याशीच चिदानंद स्वामींची समाधी असलेला मठ होता. त्या जागेभोवती मोठे मोठे वृक्ष होते. इतके दाट की सकाळी नऊच्या सुमारास प्रकाशाचा एक किरण देवळात शिरत नसे. मी सहा सात वर्षांचा होईपर्यंत देऊळ पाहिलेलं नव्हतं.मला फक्त मठच माहीत होता." या 'बागलांची राई' येथे आम्ही जाऊन पोहोचलो, आणि अर्थातच त्या मठाचे, त्यांच्या मागेच असलेल्या जन्म स्थानाचे शूटिंग घेताना माझ्या मनाची इतकी भावविभोर अवस्था झाली की काही विचारू नका. तशातच त्या मठाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना खरोखरीच एक पाकोळी त्या गाभाऱ्यातून गिरकी घेत उडाली. आणि खानोलकरांनीच एके ठिकाणी लिहून ठेवले आहे ते आठवले. ते म्हणतात,"मीच्या घटाची शेवटची माळ ज्या दिवशी पुरी होईल त्या दिवशी माझ्या आत्म्याची पाकोळी होऊ देत फेर धरण्यासाठी. त्या अंधाराशी फेर धरता धरता त्या पिवळ्या पाकोळीला झपूर्झा घालता यावा. पण तोवर या 'मी'च्या घटाभोवाती झालेली रुजवण. त्या रुजवणीच्या प्रत्येक तृणपात्यावर किरण येताहेत ते त्या मठातील गंधमयी अंधारातून..." वाटले अशी पाकोळी भिरभिरत येणे... म्हणजे....हा योगायोग समजायचा की चिदानंद स्वामींचा आशीर्वाद समजायचा की खानोलकरांच्याच आत्म्याचे अस्तित्व समजायचे? हा प्रश्न मनात येऊन गेला खरा. पण क्षणभरच..... आणि त्याच बरोबर मनही जरा भांबावून गेले. पण माझ्या मनाची झालेली ही अवस्था अर्थातच मी कोणाला जाणवून दिली नाही. कारण खानोलकरांचे समग्र साहित्य इतरांना तसे अपरिचितच होते. ते सगळेजण त्यांची त्यांची कामे करण्यात मग्न होते...असो. बागलांची राई... या इथेच खानोलकरांचा जन्म झाला. ८ मार्च १९३० ला.वेळ होती ९ वाजून २१ मिनिटे.त्यांची जन्म पत्रिकाही आम्ही एपिसोडमध्ये दाखवली. खानोलकरांच्या जन्म स्थळाचे, तिथल्या न सळसणाऱ्या व्रतस्थ, वटवृक्षाचे शूटिंग फार चांगले झाले. 

कुडाळ येथील वीणा गेस्ट हाउस, 'चानी' कादंबरीतील चानी सारखे सौंदर्य साधर्म्य असणारा अँग्लो इंडिअन लुक असलेला सुबक,नाजूक,साजूक,गौर वर्णाचा आणि खानोलकरांचा कुडाळचा स्नेही वासू वर्दम, रात्र काळी घागर काळी या कादंबरी तील लक्ष्मीची व्यक्तिरेखा जिच्यावरून बेतली आहे ती व्यक्ती, बागलांची राई इथला चिदानंद स्वामींचा मठ, खानोली निवातीचा निवांत समुद्र किनारा, तिथला सूर्यास्त, कोकणातले वळणा वळणाचे नागमोडी रस्ते, कोकणची लाल लाल माती, झाडावरून ऊंच ऊंच सूर ताणणारा एक अनाम पक्षी, कुडाळची बाजार पेठ,तिथल्या तळ्याकाठचा पाखरासारखा गपगार पडून राहिलेला निसर्ग, तिथली देवळे, त्याच्या समोरच्या दीपमाळा आणि बारांदे, उंचच उंच झुलणारे ताड माड,ओढ्यांवर घातलेले साकव कोकणातल्या वाड्या,सारे सारे आमच्या कॅमेऱ्यात आम्ही चित्रबद्ध करून घेतले. हे सारे करता करता दोन दिवसांचे आमचे शूटिंग कधी संपले आम्हाला कळलेच नाही. मी 'प्लीज पॅक अप' म्हटले आणि माझ्या सहयोगी कालाकारांचे, कॅमेरामनचे आणि अर्थातच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत केली त्या सर्वांचेच मन:पूर्वक आभार मानले. दोन दिवसांच्या शूटिंगसाठी सगळ्यांनीच मन:पूर्वक मदत केली होती. कॅमेरे खांद्यावर घेऊन खानोली निवतीच्या समुद्राच्या वाळूतून पळत जाऊन आणि सूर्यास्ताचे मनोहारी चित्रीकरण करणे खूप अवघड होते. पण माझ्या सर्व टीमने त्यासाठी जिवाचे रान केलेले मला आजही आठवते आहे. हे सर्व आज मला आवर्जून सांगितलेच पाहिजे. कोणतेही यश जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्यासाठी कष्ट उचलणारे अनेक हात राबलेले असतात. त्या शिवाय चांगले काम होऊ शकत नाही हे अगदी खरे आहे. त्यांनी घेतलेल्या अपार परिश्रमावर सारा डोलारा उभा रहात असतो,याची जाणीव मनात सतत जागी असली पाहिजे.

मालिकेच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करून आम्ही परतत होतो. पण या सर्व धावपळीत अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांनी मला खूप मदत केली त्यांचे नाव बापू नाईक. त्यांचे कुडाळात एक कार्यालय आहे. आणि या कार्यालयात एक गणपतीचे मंदीर देखील आहे. त्यांच्यामुळे शूटिंगच्या दरम्यान मला अनेक गोष्टी सुकर झाल्या. त्यांनी आम्हा सर्वांना परतीच्या जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्या दिवशी नेमकी चतुर्थी होती म्हणून मोदकाच्या जेवणाचा बेत त्यांनी आखला होता. सगळ्यांनीच त्यांच्या आदरपूर्वक केलेल्या आतित्थ्याचा मनोभावे आदर राखत स्वीकार केला. त्यांची निरोप घेण्याची वेळ आली आणि सर्वांनाच जड गेले निरोप घेताना. आता जाता जाता एक फार महत्त्वाचे काम राहिले होते, ते म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत मनोभावे मदतीचा हात पुढे केला होता त्याचा हिशोब चुकता करण्याचे. त्यांनी आम्हाला जी मदत केली होती त्याची परत फेड पैशातून होणे शक्यच नव्हते हे ही आगदी खरे होते.पण आपल्याकडून व्यवहार सांभाळला जाणे हे देखील आवश्यकच होते. अतुल कुलकर्णी पुढे रवाना झाला होता. सामानाची बांधाबांध सुरू होती आणि मी त्या भल्या गृहस्थांकडे त्यांचा निरोप घ्यायला म्हणून गेले. त्यांचे मन:पूर्वक आभार मानून मी त्यांना विचारले,"बापू! आम्ही आता परतत आहोत.खूप मदत झाली तुमची. दोन दिवस सतत बरोबर होता आमच्या. जेवणखाण ,अगदी मोदकाच्या मेजवानी सकट जेवण देऊन खूप कौतुक केलंत आमचं! तुमचा निरोप घेतानाही वाईट वाटतं आहे. पण तो तर घ्यायलाच हवा...आता एक नाजुक प्रश्न विचारते. या सगळ्याचे पैसे किती द्यायचे?" हे ऐकताच त्यांनी मन:पूर्वक हात जोडले. घरात हाक दिली आणि म्हणाले,"अगं! आपली माहेरवाशीण चालली आहे गं! फार मोठे काम करून यशस्वी होऊन चालली आहे. तिची पाठवणी चांगल्या प्रकारे करा. खणानारळाने ओटी भरा तिची. दारचा असोल्या नारळ घेऊन या . त्यांच्यासाठी पाट मांडा .......ताई! तुम्ही बसा पाटावर." मी त्यांच्या म्हणण्याचा आदर करत पाटावर बसले. ओटीत प्रेमपूर्वक भरलेली ओटी घेतली. सर्वांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सगळ्यांचेच मन भरून आले होते. मलाही गहिवरल्यासारखे झाले. मनांत विचार आला,कोण कुठली मी या गावात काही कामानिमित्ताने येते काय! या सर्वांशी ओळख होते काय, ते मन:पूर्वक मदतीचा हात पुढे करतात काय आणि दोनच दिवसात आमचे ॠणानुबंध इतके दृढपणाने जमतात काय! सारेच आश्चर्यवत! पण इतके झाले तरी मला व्यवहार सांभाळणे सुद्धा आवश्यक वाटत होते. मी परत एकदा त्यांना विचारले,"बापू! प्लीज सांगाल मला पैसे किती झाले ते!" ते हसले. म्हणाले,"अहो माधवीताई! मघा मी काय म्हणालो तुम्हाला? माहेरवाशीण म्हणून संबोधलं ना मी तुम्हाला? मग? मला सांगा आपल्या बहिणीकडून कोणी कशाचे पैसे घेतं का? जा. आनंदाने जा. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. मी तुमच्यासाठी जे जे केले ते बहीण समजून केले. जे केले ती सर्व एका भावाने बहिणीला दिलेली भेट होती." आता काय बोलणार यावर? तरीही माझ्या शहरी वातावरणात वाढलेले हे मन हा आपुलकीचा व्यवहार मानायला तयार होईना. शेवटी अगदी न राहवून त्यांना विचारलेच,"नाही म्हणजे, मला तुमची आपुलकी ,तुम्ही दिलेले प्रेम या भावना कळत आहेत. त्या बद्दल मला काही शंकाच नाहीये .सारे सारे कळूनही असे वाटते आहे की तुम्ही फार म्हणजे फारच केलेत आमच्यासाठी....अहो, इतकी माणसे रोज जेवली आहेत तुमच्याकडे.आणि इतरही मदत काय थोडी केलीत का तुम्ही?..मला सारेच तुमच्या कडून विनामूल्य घेणे प्रशस्त वाटत नाहीये हो! इतर सोडा पण जेवण,नाश्त्याचे पैसे तरी देऊ देत ना मला! काय पैसे असतील ते अगदी नि:संकोचपणे सांगा... .” ते म्हणाले ,” अगदी खरं सांगू का ताई ! तुम्ही आमच्या चिंतूवर काम करताय ना! म्हणजे ते काम आम्ही आमचेच आहे असं समजतो. तुम्ही सारेच चिंतूवर काम करीत असल्याने तुम्ही सारेही आमचेच आहात अशीच आमची भावना आहे. आणि एक गोष्ट सांगतो. खरं वाटणार नाही कदाचित तुम्हाला,पण मी देखील चिंतूसारखाच गरीब होतो. आता सर्व ठीक आहे .हे कार्यालय उभे राहिले आहे,गजाननाचे मंदीर आहे,देवदयेने आता काहीच कमी नाही.सारे सारे व्यवस्थित आहे. पण एके काळी आम्हा दोघांनाही दारिद्र्यानं ग्रासून टाकलं होतं हे खरं आहे. आपलं दु:ख कुणी कोणाला सांगायचं अशी स्थिती होती आमची.तशातच एक दिवस चिंतूचा मुलगा आजारी पडला. तो फार काळजीत होता.माझ्याकडे आला मला म्हणाला,’बाबारे ! एक मूठ तांदूळ देतोस ? मुलाला पेज करून घालीन म्हणतो.’ मी मनात म्हटलं एकादशीच्या घरी आली शिवरात्र....माझ्या घरी तरी कुठे होते मूठभर तांदूळ ! त्याला द्यायला ! मी ही तसाच होतो ना ! हात हलवत जावं लागलं त्याला माझ्या घरातून. आज तुम्ही त्याच्यावर काही काम करायला गावी आलात. बघतो आहे मी. अतिशय तळमळीनं काम करताय तुम्ही सारेजण. वाटलं तुम्हाला माझ्याकडून होईल तशी मदत करता आली तर थोडा भार उतरेल माझ्या मनावरचा. तुम्हाला मला जमेल ती मदत करतोय, ती माझ्या मनाला जरा बरं वाटावं, हलकं वाटावं म्हणून. दुसरं काही नाही. थोडा उतराई होऊ देत मला माझ्या मित्राच्या मैत्रीच्या ॠणातून.. ताई ! आणखी एक विनंती कधीही या भावाच्या घरी .बरं वाटेल मनाला. आता झालं आपल्या शंकेचं निरसन ? “ काय बोलणार मी यावर ? मी स्तब्धच झाले. परतत असताना बापूंनी आपल्या मनाच्या मोठेपणाची साक्ष पटवून दिली आम्हाला. त्यांचे मनोमन ॠण मानून आम्ही कोकणच्या देव भूमीचा निरोप घेतला आणि आगेकूच केले बेळगांवच्या दिशेने. 

अशीच अकृत्रिम मदत केली व जिव्हाळा दिला आम्हाला श्री. सी.श्री.उपाध्ये आणि श्री.विद्याधर भागवत या खानोलकरांच्या मित्रांनी. या दोघांनी आरती प्रभु कोकणात असताना त्यांच्या कोसळत्या मनोवास्थेला सावरले होते. या दोघांचा भक्कम आधार त्यांना मिळाला होता. तसा आधार त्यांना मिळणे तेव्हा फार गरजेचे होते. महत्त्वाचेही होते. नाही तर खानोलकरांची कविता त्या कोकणच्या कठीण काळात हरवून गेली असती.आणि मराठीच्या साहित्य प्रांगणात ‘आरती ‘ हे नक्षत्र उगवलेच नसते. या दोघांनी आम्हाला चित्रीकरणाच्या दोन दिवसात मनोमन मदत केली.मन:पूत साथ दिली.आपला वेळ दिला. श्री. उपाध्ये यांनी आपले घर तर या दोन दिवसात आंदण म्हणून जणू बहालच केले होते. उपाध्ये काकूंनी चुलीवर केलेली गरम गरम भाताची पेज ,वरण भाताची चव जिभेवर अजूनही रेंगाळते आहे. परतीच्या वाटेवर वाटचाल करताना त्यांच्या विषयीही मनात कृतज्ञता दाटून येत होती. 

आणखी दोघाजणांबद्दलचा कृतज्ञ भाव व्यक्त करायचा आहे. तो म्हणजे डॉ.वृषाली पटवर्धन ,आणि योगेश सोमण यांच्या बद्दलचा .हे दोघेही खरे तर आमच्या घरचेच .म्हणजे आमच्या “अनन्वय “ या संस्थेचेच . आणि म्हणूनच आमच्या हक्काचेच. पण त्याचमुळे दोघांचीही जातकुळी चांगलीच परिचयाचीही. योगेशनी तर या आधी अनन्वयच्या “ दिवेलागण “ या कार्यक्रमाची संहिता फारच समर्थपणे वाचली होती. त्याचा आवाज या एपिसोडसाठी अतुलनी केलेल्या खानोलकरांच्या भूमिकेसाठी उसना आवाज म्हणून मी घेतला .त्याच्या उसन्या आवाजाने या एपिसोड मधील दोन गोष्टी साध्य करून घेता आल्या, एक म्हणजे अतुलच्या वावरण्यावर त्याचा हा उसना आवाज फार परिणाम साधणारा ठरला. आणि आठवणी जागवत हा एपिसोड रसिकांसमोर सादर करण्यामध्ये आणि या एपिसोडचे वातावरण गूढ गंभीर राखण्यासाठी हे फार उपयोगी पडले. खानोलकरांच्या मनाची काहीशी अस्वस्थ आणि उदास, अबोल मन:स्थिती दाखवण्यात आम्ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरलो. या एपिसोड मध्ये दोन गायकांनीही आपले योगदान दिले. त्यांनी खानोलकरांच्या कवितांना योग्य न्याय दिला, असेच म्हणावे लागेल. आपल्या आवाजाने त्यांनी खानोलकरांच्या आवाजातले दु:ख अधिक गहिरे केले. या दोन्ही गीतांना स्वर साज संगीतकार राहुल घोरपडे यांनी चढवला. 

आरतीच्या ठणकणाऱ्या वेदनेचा दुखरा सूर व्यक्त करणाऱ्या दोन वेगवेगळया कवितांच्या ओळी आम्ही एकत्र सांधून त्याची एक कविता केली. खानोलकरांची वेदना त्या गीतातून अधिकात अधिक चांगल्या प्रकारे दाखवता यावी असा आमचा प्रयत्न त्या मागे होता. आणि तो देवकी पंडित यांच्या समर्थ गायनाने आणि सुंदर स्वर रचनेच्या बांधणीमुळे सिद्धीस गेला. गाण्यातून भावदर्शन इतक्या चांगल्या प्रकारे व्यक्त झाले होते की त्यावर मला खानोलकरांचे अनेक मूड्स दाखवता आले. त्या गीताच्या ओळी अशा होत्या....

सनई सूर तशा ओळी दूर जुन्या ,हुरहुरीच्या सांज वेळा जीवघेण्या
वेडा रान वाटांसंगे गात भटकता ,वळता वळता आलो असा कडेलोटा
दिवेलागणी सारखे मागे सुख दु:ख ,पुढे पोरके आकाश ,मधे उंच टोक 
मिटू तरी कसे ? कुठे बोलू रुखे ओले ? असे दोन्ही डोळे ,कुठे बोलू ,मनातले ? 

आरतीच्या पुस्तकातल्या या ओळी माझ्या वाचनात जेव्हा आल्या तेव्हा आरतीच्या कवितेतला सारा भावच हाती सापडल्या सारखे झाले मला. या मनस्वी गायानावर झालेले चित्रीकरण आणि त्यासाठी अतुल कुलकर्णी यांनी घेतेलेले कष्ट आणि केलेला अभिनय दोन्ही गोष्टी एपिसोडच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ठरल्या. अशीच एक कविता योगेश सोमण यांनी अतिशय सुरेख वाचली आणि ती सर्व एडिटिंगच्या सहाय्यानी आम्ही अनेक शॉट्स एकत्र जोडून एपिसोडमध्ये सादर केली, ती या एपिसोडचा हायलाईट ठरली. 

खानोली निवतीच्या समुद्र किनाऱ्यावर घेतलेले सूर्यास्ताचे शॉट्स एका गाण्याला समोर ठेवूनच घेतले होते. ती कविता सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे यांनी फार सुरेख गायली होती. आणि घोरपडे यांच्या चालीला न्याय दिला होता. ती कविता म्हणजे ......

जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे 
दूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे
............................................................

पारवा शेला तुझा हा स्पंदने का त्यावरी 
दूर द्दष्टी लागली का ? का तनू ही बावरी ?
जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे 
दूरचा तो रान पक्षी ऐल आता येतसे.....

आरतीच्या या भावविभोर ओळी , रवींद्र साठे यांचा आर्त स्वर आणि राहुल घोरपडे यांची जीवघेणी चाल , त्याला साथ देणारा खानोली निवतीच्या समुद्रकिनाऱ्यावर चित्रित केलेला सूर्यास्त यांचा सुंदर मिलाफ या द्दश्यात झाला....

एकुणात काय ! हे चित्रीकरणाचे दोन दिवस आरतीच्या कवितेनी , खानोलकरांच्या आठवणींनी , न्हाऊन गेले होते. शूटिंग संपल्याची हुरहूर सगळ्यांच्याच मनात दाटून आली होती. त्या वातावरणाची गूढ धुंदी मनातून उतरत नव्हती .आरतीच्या प्रतिभेला मनोमन हात जोडले गेले आणि मनात ओळी दाटून आल्या .......

गेले द्यायचे राहून ,तुझे नक्षत्रांचे देणे 
माझ्या पास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने

मराठी साहित्य क्षेत्राला खानोलाकारांचे साहित्य’ नक्षत्रांचे देणे ‘ देऊन गेले आहे. एपिसोड च्या सुरुवातीला मी खानोलकरांना ( म्हणजे खानोलकरांची भूमिका करत असलेल्या अतुलला ) कोकणातल्या लाल मातीच्या रस्त्याने चालत येताना दाखवले होते. एपिसोडच्या शेवटी मी खानोलकरांना त्याच रस्याने पाठमोरे जाताना दाखवले.त्यावर वृषाली पटवर्धनच्या आवाजात एक निवेदन टाकले...’ खानोलकरांच्या ’ नक्षत्रांचे देणे’ ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना महाराष्ट्रराज्य पुरस्कार मिळाला. ‘अजब न्याय वर्तुळाचा ‘ या नाटकाबरोबर खानोलकर परदेश दौराही करून आले. एकीकडे त्यांना मान मन्यता मिळत होती,यशाची चढती कमान ते चढत होते आणि दुसरीकडे मृत्यूची अदृश्य खेच त्यांना अस्वस्थ करीत होती. स्वरांहून खोल बोलणारा हा अनाम पक्षी थोडा वेळच दहाळीवर बसला आणि उडाला देखील. २६ ए.१९७६ ,रात्री एक वाजता त्यांची प्राण ज्योत मालवली.डॉ.देवलांनी विनंती केल्यावरून त्यांनी आपल्या कवितेच्या चार ओळी लिहिल्या .......

अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाउल सहज उठावे 
आणि सरावा प्रवास सारा

शेवटच्या कवितेच्या चार ओळी योगेश सोमण याने अप्रतिम वाचल्या. माझे नशीब इतके चांगले की या सबंध निवेदनावर जसे मी पाठमोरे होऊन वाट चालणारे खानोलकर दाखवले तसेच मला एका झाडाच्या फांदीवरून आकाशात झेप घेणारा ,स्वरांहून खोल बोलणारा ,एक अनाम पक्षी, त्याचे सुंदर उडणे, त्याची झेप अचानकच चित्रित करता आले. या गोष्टी ठरवून होत नाहीत.त्या घडून जातात.मिळून जातात. तसे झाले. हा नशिबाचा भाग! आणखी काय म्हणायचे ? 

या एपिसोड मधला सगळ्यात माझा आवडता भाग कोणता ,असे जर तुम्ही विचाराल तर तो श्री. नरेंद्र डोळे यांनी एडिट केलेली एक कविता. ही कविता अतुलच्या ज्या भावमुद्रा शूटिंगमधे मिळालेल्या होत्या त्या संकलित करूनच करावी अशा विचारानी आम्ही एडिटिंगला बसलो. आरतीची कविता म्हणजे वेदनेची गाणी.आर्ताचा उद्गार ! मृत्यूला सतत सांगाती ठेवूनच त्यांनी जीवनाची वाटचाल केली. आपल्या लेखनाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती .....

घोषणांनो सिद्ध व्हा ग 
रिक्त ओठांच्या पूजेला 
काळजाची मात्र ज्वाळा
वाहू दे काळ्या दिशेला...... 

त्यांचं सर्व साहित्य याच दिशेनी प्रवाहित होताना दिसतं. त्यांचं जीवन आणि साहित्य देखील लाल किरमिजी संधिप्रकाशासारखं गूढच राहिलं.हा सारा भाव अतुलच्या भाव मुद्रातून आणायचा होता. मी त्याला एक अगदी ‘अॅबसर्ड पॅरिग्राफ’ वाचायला दिला आणि तो अतिशय तिरकस पद्धतीने वाचायला सांगितले. या त्याने वाचलेल्या पॅरिग्राफमधून निवडक भावमुद्रा वेचायच्या आणि त्यातून एक कविता एडिट करायची असा हा अवघड प्रकार होता. कारण अतुलनी पॅरिग्राफ दुसराच वाचाला होता, योगेशनी वाचलेली कविता वेगळीच होती. त्या कवितेवर योग्य भावमुद्रा टाकताना आम्ही फिल्मचा आवाज म्यूट केला आणि योगेशनी वाचलेल्या सबंध कवितेवर त्या भावमुद्रा टाकून ती एडिट केली. त्या कवितेचे शब्द असे......

कापऱ्या हातांनी लिहीले तोतरे 
मुके शब्द शब्द बधीर बहिरे
थोडेसे गगन कडू आणि काळे 
अर्धेच औषध घशात राहिले 
सनईचे सूर तीक्ष्ण पर्णोपर्णी 
विळखा घालून डंख देती मनी 
उलट्या पायांनी पिशाच्च चालते 
ठिगळे जोडीत आसवे ढाळीते 
मरणाचा अर्थ तोकडा मिळतो 
कातर वेळेला घर लुबाडतो.......

आणि काय सांगू,कविता आम्हाला उत्तम एडिट करता आली. योगेशनी ज्या इंटेंन्सली कविता वाचली होती त्याच तीव्रतेनी आणि त्या अर्थातली गूढता कायम राखत आम्ही ती कविता एडिट करू शकलो यामुळे आम्ही खरोखर धन्य झालो.

या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही आणखी एक धाडस केले.ते म्हणजे या एपिसोडची ची सुरुवात करण्यासाठी आम्ही सुप्रसिद्ध रंगकर्मी,दिग्दर्शक,निर्माते अमोल पालेकर यांना पाचारण करण्याचे ठरवले.तसे आम्ही काही पुरेसे नाव कमावलेल्या व्यक्ती नव्हतो. आमचा आणि अमोल पालेकरांचा फारसा परिचयही नव्हता. पण जरासे धाडस करून आम्ही त्यांच्या घरी गेलो. आम्हाला हे पक्के माहीत होते की ते खानोलकरांच्या साहित्याचे चाहते आहेत.” नक्षत्रांचे देणे “ या आरतीच्या कवितांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी खनोलाकरांना त्यांच्या मृत्यूनंतर आदरांजलीही वाहिली होती. त्यांनी काढलेला “अनकही” हा चित्रपटदेखील याचीच एक साक्ष होता. त्यांनी आमचे सारे म्हणणे ऐकून घेतले.आणि आपला त्यासाठी होकार दिला.मालिकेच्या ओपानिंगच्या दृष्टीने त्यांचा सहभाग असणे ही आमच्यासाठी एक जमेची बाजू झाली.गंमतीचा भाग असा की या निमित्ताने मला एका दिग्गज दिग्दर्शकाला काही दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली ... चला! हे ही नसे थोडके!

- माधवी वैद्य



१३ टिप्पण्या:

  1. एका व्यक्तिरेखेसाठी तुमचे किती किती कष्ट घेतले आहेत ते कळते . वाचताना मजा आली . खूप छान

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान लेख. माझे आदर्श आरती प्रभू. त्यांना पाहता आले नाही. परंतु शब्द बध्द चांगले केले.

    उत्तर द्याहटवा
  3. किती दिवसांनी तुम्हाला भेटल्यासारखं वाटलं...लेखातून का होईना.साहित्य सहकारचे दिवस आठवले

    उत्तर द्याहटवा
  4. फारच सुंदर कथन, माधवी ताई! एकाच लेखात खानोलकरांचे कोकण आणि त्यांचे भावविश्व साकारण्याचा तुमच्या मनातील ध्यास ह्या दोन्ही गोष्टींचा सुंदर प्रत्यय आला. तुम्ही बनवलेले हे एपिसोड कुठे पहायला मिळतील?

    उत्तर द्याहटवा
  5. मस्त लिहिलं आहे .. मजा आली वाचून ! हि आरती प्रभू / खानोलकरां वर बनवलेली सिरीज कुठे बघायला मिळेल ? आवडेल बघायला ..
    धन्यवाद !
    प्रसाद भावे

    प्र भा http://prabhave.blogspot.com/

    Musings on Music http://pbhave.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा
  6. लिहीलं तर छान आहेच. वाचता वाचता अनेक वेळा डोळे भरुन वाहायला लागले. धन्यवाद माधवीताई

    उत्तर द्याहटवा
  7. आरती प्रभू.. मराठी साहित्याला पडलेलं एक पहाट स्वप्नं.

    उत्तर द्याहटवा
  8. छान! तुमचा लेख वाचल्यावर एक गोष्ट नक्की केली. खानोली निवती ला एकदा जाणारच!

    उत्तर द्याहटवा
  9. माधवी ताई तुम्ही तयार केलेला हा माहितीपट कुठे पहायला मिळेल?

    उत्तर द्याहटवा
  10. अंधारात चाचपडत आरती प्रभूंना शोधताना आपला हा दीर्घ लेख तेजल दिपप्रमाणे बरेच काही दाखवून गेला. आपले मनःपूर्वक आभार तरी कसे मानावेत!! आपल्यावर साहित्य शारदेची कृपा निरंतर राहो!! धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा
  11. Wow. किती सुंदर लिहिले आहे. आरती प्रभूंच्या कवितांची छान ओळख करून दिली.

    उत्तर द्याहटवा
  12. अप्रतिम आणि विस्तृत लेख. एपिसोड कुठे बघता येईल?

    उत्तर द्याहटवा