सण चैत्रातले, माझ्या दिवेआगरचे

महाराष्ट्राला मुंबईपासून गोव्यापर्यंत पश्चिमेला लांबच लांब फारंच सुंदर आणि नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. हे महाराष्ट्राचे वैभव आहे असे म्हटले तरी चालेल. यालाच आपण कोकणपट्टी असेही म्हणतो. ह्या पट्टीतील जमीन अतिशय सुपीक आहे. म्हणूनच हापूस आंबे, फणस, केळी, काजू, करवंदं, बोरं, कोकम, सुपारी, नारळ हा कोकणचा मेवा इथे खायला मिळतो. या किना-यावर अनेक प्रसिध्द देवळेही आहेत. उदाहरणार्थ गणपतीपुळे, श्री हरीहरेश्वर इत्यादी इत्यादी. महाराष्ट्र राज्यातील याच कोकणात, रायगड जिल्ह्यात, श्रीवर्धन तालुक्यात असलेलं दिवेआगर हे असेच एक सुंदर गाव. मुंबईच्या दक्षिणेला १७० कि.मी.वर वसलेलं आहे. इथे विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळ, सुपारी, आंबा आणि केळीच्या बागा आहेत. अशा शांत वातावरणात वसलेल्या ह्या गावाची लोकसंख्या फक्त ५००० च्या आसपास आहे. या गावाला ऐतिहासीक परंपरा लाभली आहे. येथील मावलभट्टकालीन सुवर्ण गणेश मुर्ती बाबत सर्वांना माहिती आहेच.

ऐतिहासिक माहितीनुसार ५०० वर्षापेक्षा अधिक जुने असलेले हे गाव, ३/४ वेळा अरब, पोर्तुगीज, आणि मुघलांनी लुटले होते. गावात गणपती, शंकर, रुपनारायण, सुंदरनारायण, केदारनाथ बहिरी आणि सिद्धनाथ बहिरी अशी सुंदर देवळे आहेत. गावातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या सर्व परंपरांची जपणूक गावकरी मंडळींनी उत्साहाने चालू ठेवली आहे. गावात माळी, न्हावी, भंडारी, कोळी आणि ब्राम्हण वस्ती आहे. सर्वजण अतिशय एकोप्याने रहातात आणि सर्वजण एकत्र येऊन सणवार साजरे करतात. ह्या सर्व सणवारांची मजा व अनुभव मी लहानपणापासून घेतला आहे. ह्याचे कारण मी माहेरची बापट व दिवेआगर हे माझे माहेर आहे.

मला आठवते, चैत्र महिना आला की आम्हा मुलांचा उत्साह व्दिगुणीत होत असे. एक तर शाळेला सुट्टी आणि एकाच महिन्यात तीन सण. गुढीपाडवा, चैत्रगौरीचे हळदीकुंकू आणि गावची मोठी जत्रा. गुढीपाडव्याला सकाळी लौकर ऊठून मागल्या दारी परसात फुललेली सुंदर फुले तोडून आणणे, त्यांचा हार करणे हे आम्हा मुलांचे काम असे. कडूलिंबाची डहाळी सुध्दा मागील दारच्या बागेतच मिळायची. ‘कडुलिंबाचं एक तरी पान आज चावून खायचं बरंका, म्हणजे रोगराई लांब राहते आपल्यापासून’ असं आजी सांगायची. तेव्हा महत्व समजायचे नाही पण आजीने सांगितले म्हणून आम्ही एक पान, तोंड वेडंवाकडं करत खाऊन टाकायचो. बाबा घरच्या गड्याला एक मोठी वेळूची काठी आणायला सांगायचे. फुलांची माळ, कडुलिंबाची डहाळी, एक सुंदर जरीचं कापड, बत्ताशाची माळ आणि वर छोटासा तांब्याचा गडू अशी छान गुढी सजायची आमची. ईतकी मोहक दिसायची गुढी. अगदी नव्या नवरीसारखी नटली आहे असे वाटायचे मला. अंगणात दिमाखाने ऊभी असायची दिवसभर. मग तिची पूजा, नैवेद्य, नवीन कपडे घालून मिरवणं. खूप छान वाटायचं. संध्याकाळी तिला उतरवताना खूप वाईट वाटायचे. गणपती विसर्जनाच्या वेळी वाटते ना तसे.

चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाची नंतर आतुरतेने वाट पहायचो आम्ही. सर्व गावाला आमंत्रण असायचं. हॉलमध्येच पाय-यांची रचना करुन वर अन्नपूर्णा विराजमान व्हायची. तिच्यासमोर आमची, भातुकली मधील छोटी छोटी गोड खेळणी मांडायची आमची आई. इतर सजावट पण असायची. आंबे आलेल्या डहाळीची आंब्यांसकट केलेली सजावट आणि भरपूर फुलं! अहाहा! इतकी छान दिसायची ना आमची गौर. अजून जशीच्या तशी डोळ्यांसमोर आहे माझ्या. कधिकधी झोपाळयावर बसवायची आई तिला. दारासमोर सुंदर चैत्रांगणाची रांगोळी काढली जायची. दुपार झाली की नटायचे आणि बायकांची वाट पहात बसायचे. त्या यायला सुरवात झाली की हास्याचे फवारे उडायचे. ’अगं कित्ती छान डेकोरेशन केलं आहेस’, ‘डाळ अगदी चविष्ट झाली आहे गं’ असे संवाद ऐकू यायचे. खूप छान वातावरण असायचे घरात. आनंद असायचा छोट्या छोट्या गोष्टीत. कैरीचं पन्हं, भिजवलेले चणे आणि कैरीची डाळ हा ठरलेला बेत. कैरीची डाळ कोकणात वडाच्या पानावर द्यायची पध्दत आहे. अशा प्रकारे खाल्यामुळे वडाच्या पानांचा थोडा वास, डाळीला लागतो म्हणून असेल किंवा निसर्गाच्या आणखी जवळ जाण्यासाठी हा आणखी एक प्रयत्नही असेल. आत्ता विचार केला तर असे वाटते की प्लास्टीक पिशवीचा वापर टाळण्यासाठी सुध्दा असेल. काहीही असो आम्हाला आवडायचे पानावर डाळ खायला. गंमत म्हणजे, हा बायकांचा कार्यक्रम म्हणून पुरूष लोकांना त्या दिवशी घरात जागा नसे. गेले तीन वर्ष सिंगापुरमधे सुध्दा आम्ही हे हळदिकुंकु करतोय आणि त्याचा आनंद लुटतो आहोत.

चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी केदारनाथ आणि पौर्णिमेच्या दिवशी सिद्धनाथ बहिरी ह्या दोनही देवळात दोन मोठ्या जत्रा भरतात. दोन्ही जत्रांचे स्वरूप सारखेच असते. जत्रेचा दिवस आला कि गावात फार उत्साहाचे वातावरण असते. काही वर्षांपूर्वी, जेंव्हा ह्या गावातील काही जमातींचा शहराशी संबंध कमी होता, तेंव्हा शहरात मिळणाऱ्या काही वस्तू, खेड्यात मिळत नसत. उदाहरणार्थ लहान मुलांची खेळणी, वेगवेगळ्या मिठायांचे प्रकार, बेकरीचे प्रकार, कपडे. हे सर्व जत्रेमधे मिळत असे, त्यामुळे सर्वजण खूष असत. आता तशी परिस्थिती राहिली नाही. कारण शहरं आणि खेडेगावं आता जोडली गेली आहेत. वाहतुकीच्या साधनांमुळे त्यांच्यातले अंतर कमी झाले पण तरीही ह्या जत्रेचे आकर्षण आजही लोकांना वाटते, ह्याचे कारण म्हणजे इथल्या जत्रेची एक वेगळी परंपरा 'गळ टुपण्याची'. जत्रेचा दिवस आला की, गावातुन बाहेरगावी, सासरी गेलेल्या अनेक माहेरवाशिणी गावात हजर होतात. तसेच शहराकडूनही हा प्रकार पाहायला बरेच लोक आपापले कॅमेरे सज्ज करून उपस्थिती लावतात. 

केदारनाथ बहिरीच्या देवळासमोर एक प्रचंड मोठे असे पटांगण आहे, त्या ठिकाणी हि जत्रा भरते. ‘गळ टुपणे’ या कार्यक्रमासाठी एक लाकडी कठडा बांधून त्यांवर जाड लाकडी खांब रोवलेला आहे. त्यांवर मोठा जाड आडवा ओंडका. आडव्या खांबाला एका बाजूला लोखंडी हूक लावतात आणि दुसऱ्या बाजूला बँलन्सिगसाठी जाड दोरी बांधलेली असते. जत्रेच्या दिवशी सकाळी गावातील काही मंडळी तेथील सर्व देवतांना जत्रेचं आमंत्रण देण्यासाठी वाजतगाजत देवळात जातात. याला ‘परडी ‘असं म्हणतात. ह्या देवळाच्या पूजेचा मान माळी समाजालाच असतो. हा पुजारी गळ टुपण्याच्या आदल्या रात्रीपासून उपवास करतो. संध्याकाळी त्या बांधलेल्या चौथ-यावर गावातील काही अनुभवी न्हावी समाजातील माणसे (हा मान या न्हावी समाजालाच असतो) जातात आणि तो लोखंडी हूक त्या पुजा-याच्या पाठीची 'स्कीन' ओढून धरून त्यात दोन ठिकाणी पाठीत ओवतात किंवा टुपवतात. सिंगापूरमधे तैपुसम हा तामिळी लोकांचा फेस्टीवल ब-याच लोकांनी पाहिला असेल तसाच काहीसा हा प्रकार असतो. फरक एवढाच कि तैपुसमला सगळ्या अंगभर सुया टोचून घेतात पण त्या बारिक सुया असतात आणि हा मात्र पाठीत रुतवलेला मोठा हूक असतो ज्यावर तो माणूस टांगुन स्वतःच्या वजनासकट खांबाला तीन किंवा पाच फे-या मारतो. खांबावर दुस-या टोकाला दोन माणसे दोरी धरून बॅलन्स करतात. विशेष म्हणजे या टोचण्यामुळे त्याला अजिबात वेदना होत नाही किंवा झालेल्या जखमेतून थेंबभर रक्तही येत नाही. याचे कारण यामागे काहीतरी साधना व दैवी शक्ती आहे असा गावातल्या लोकांचा विश्वास आहे. अशी ही अजब जत्रा पाहायला देशविदेशातूनसुध्दा लोक येतात आणि आश्चर्याने तोंडात बोट घालतात. गळ टुपल्यानंतर पुजा-याचा उपवास गावातील आमच्या बापट कुटुंबाकडून आलेल्या प्रसादाने सुटतो ही परंपरा सुध्दा फार पूर्वीपासून चालू आहे.

कोकणात बालपण गेल्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा आनंद आम्हाला घेता आला. आमच्या मुलांनाही काही प्रमाणात तो घेता आला. पण नातवंडे परदेशात असल्यामुळे ती ह्या आनंदाला मुकत आहेत असं सारखं वाटतं. पण मी ठरवले आहे नक्की एक दिवस त्यांना कोकणात नेईन आणि त्यांना वाळूतले शिंपले गोळा करण्यात, फुले वेचण्यात, विहिरीच्या पंपाखाली बसून आंघोळ करण्यात कशी मजा येते ते दाखवायचे आहे. ही मजा तुम्हालाही अनुभवायची असेल तर मला फोन करा. आपण सहल काढू दिवेआगरची.

- स्नेहल केळकर

    

९ टिप्पण्या:

  1. स्नेहल खूप छान झालाय लेख. दिवेआगरची ट्रीप परत एकदा खास तुझ्याबरोबरच काढायला हवी.:)

    उत्तर द्याहटवा
  2. Sunita khup chan lihila aahes.Kharach aapla sagla lahanpan dolyasamor aala.

    उत्तर द्याहटवा
  3. Sunita lekh khup chan. Lahnpan aathavale. Ashvini Maydeo (Kumud bapat)

    उत्तर द्याहटवा