उशीर


गायत्री तिच्या मॅनेजरच्या डेस्कपाशी गेली. "दोन मिंटं वेळ आहे का? मला थोडं बोलायचंय." अक्षयानी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या लालबुंद डोळ्यांवरून समजायचं ते समजली. दोघी एका मिटिंग रूममध्ये गेल्या. "मला दिल्लीच्या ऑफिसला पाठव उद्या प्लीज," गायत्री अजीजीनं म्हणाली. अक्षयानी उसासा टाकला. गायत्रीचं दिल्लीच्या ऑफिसला काही काम निघणं शक्य नव्हतं. "तो आज दिल्लीला गेलाय आणि मला कळलंय की ..." "गायत्री, अगं पण..." अक्षया काही म्हणायच्या आतच तिला तोडत गायत्री कळवळून म्हणाली, "प्लीज, अक्षया! तुला म्हायतीये सगळं. प्लीज एवढं मॅनेज कर." "जा," काहीशा अनिच्छेनं अक्षया म्हणाली.

टेक ऑफची वाट बघत फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या गायत्री काय काय आठवत राहिली. कोइंबतूरच्या कंपनीत जेव्हा सुजीत तिला पहिल्यांदा भेटला, तेव्हाच तो तिला खूप आवडला होता. एकदम हुशार, टेक-सॅव्ही, इंजिनियर नसतानाही कोडिंग करणारा, वेल-मॅनर्ड आणि विनोदी. सतत हसवणारा. त्यांची छान मैत्री जमली. ती त्याच्या विनोदांवर खळखळून हसायची आणि त्याला तिचं हसणं मनापासून आवडायचं. मग तो विनोद करत राहायचा आणि ती हसत राहायची. ती एचआर मध्ये होती. त्यामुळे त्याला तिची मैत्री आणखीच आवडायची. सहकर्मचाऱ्यांचे गंमतीशीर किस्से कळायचे, पगार कळायचे, रेटिंग्ज कळायची, आपण किती घासाघीस करायची ते ही कळायचं. तिची मैत्रीण तिला एकदा म्हणाली, "तुमचं जमलंय का गं दोघांचं? असेल तर जरा काळजी घे. तो मुलगा मला पाताळयंत्री वाटतो." ते असूया कॉलमखाली उडवून लावत गायत्री म्हणाली होती, "पाताळयंत्री? का गं बाई? असा काय केलंय त्यानं?" तिची मैत्रीण म्हणाली, "गायू, तू त्याच्या प्रेमात पडलीयेस. टनेल व्हिजन! तुला काही गोष्टी त्यामुळे दिसत नाहीत. तो तुझ्या प्रेमात पडलाय का? मला त्याची नजर भिरभिरती वाटते. आणि तुझी मैत्रीण आहे, तुझ्याबद्दल जिव्हाळा आहे म्हणून स्पष्टच बोलते. तो तुला आवडला यात नवल नाही. तो आवडण्यासारखाच आहे. तू त्याला आवडलीस याचं मात्र मला खूप नवल वाटतंय. तू काही दिसायला कुणी परी नाहीस, डोकंही ठीकठाकच, पगारही तसाच. मग त्याला तू आवडण्याचं काय कारण?" तिचं आणि गायत्रीचं ते शेवटचं संभाषण. आत्ता गायत्रीला वाटलं त्या मैत्रिणीचा नंबर शोधून तिच्याशी एकदा बोलावं. "Ladies and gentlemen, the captain has switched on the seat belt sign. Please wear your seat belts, close the tray table, open the window shades. All electronic devices must be switched off for take off." फोन फ्लाईट मोड वर टाकून गायत्रीनी खिडकीच्या काचेवर डोकं टेकलं आणि डोळे मिटून घेतले. सेक्युरिटी डेमनस्ट्रेशन सुरू झालं आणि विमान रनवेकडे धावू लागलं.

गायत्रीच्या घरी तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळलं तेंव्हा वादंगच झाला. ती पिल्लई, तो कोरन. तिच्या अच्चनना ते अजिबात मान्य नव्हतं. तिचे अच्चन तसे पुरोगामी. मुलींनी शिकावं, नोकरी - करियर करावं या मताचे. गायत्रीला जेंव्हा जेंव्हा काही वेगळं करावंसं वाटलं आणि तिच्या अम्मानी तिला विरोध केला तेंव्हा तेंव्हा तिच्या बाजूनी ते उभे राहिले. पण या वेळी मात्र ते दोघेही तिच्या विरोधात एक फळी करून उभे ठाकले होते.

"अच्चा, पण तो चांगला मुलगा आहे, हुशार आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मग जात कशाला आणायची मधे?"

"हे बघ, गायत्री, मी आजवर तुला कशाला अडवलं नाही. पण काही गोष्टी, काही रीतभात ही मीसुद्धा स्वीकारलेली आहे आणि ती मोडलेली मला चालणार नाही. मी तुला स्पष्ट सांगतोय, तू त्या मुलाशी लग्न केलेलं मला चालणार नाही."

"आणि मी त्याच्याशीच लग्न करणार, अच्चा."

आणि तिच्या अच्चननी आयुष्यात पहिल्यांदा तिच्या मुस्काडात ठेवून दिली होती.

एअर होस्टेसनी दिलेल्या ज्यूसचा घोट घेता घेता गायत्री विचार करू लागली. दिल्लीला गेल्यावर आपण नेमकं काय करायचं, कसं करायचं? तो नेमका कसा रिएक्ट करेल? काय म्हणेल? आपण काय बोलायचं? हे सगळं आपल्याला जमेल का? एअर होस्टेस परत आली आणि काही वेट टिशूज गायत्रीपुढे केले, "I hope you are all right." आपल्या डोळ्यातनं पाणी वाहतंय, याचं गायत्रीला भानच राहिलं नव्हतं. तिनं डोळे टिपले, चेहेरा पुसला. जरा बरं वाटलं.

फिकल जॉईनच करायला नको होती, तिथेच सगळी गडबड झाली - क्षणभर तिला वाटून गेलं. अच्चा, अम्मा, घरचं इतर कुणीच ऐकत नाही म्हंटल्यावर सुजीतनी मांडलेला पळून जाण्याचा प्रस्ताव तिनं स्वीकारला. एके दिवशी कामाला जाते म्हणून ती बाहेर पडली आणि थेट एअरपोर्टला गेली. सुजीत हजर होताच. दोघं विमानानं बँगलोरला गेले. दुसऱ्याच दिवशी फिकलमध्ये इंटरव्यूज होते. दोघांनाही नोकरी मिळाली आणि त्यांचं सहजीवन सुरू झालं. सुजीतच्या घरच्यांनी बँगलोरमध्ये दणक्यात लग्न लावलं. पारंपरिक केरळी पद्धतीनी. फुलांनी सजवलेला केळीचा मांडव, एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यासारखा. सनई - चौघडा. त्यावरच्या पारंपरिक धुनी. मोतिया रंगाचा मुंडू आणि त्याच रंगाचा सदरा घातलेला सुजीत एकदम उठून दिसत होता. पण केरळी सोनेरी काठाच्या साडीत, गंगावन लावून वाढवलेल्या वेणीवर भरगच्च गजरा घातलेली, सोन्यानी मढलेली गायत्रीसुद्धा काही कमी दिसत नव्हती. ती घरातनं निघताना तिचं सोनं घेऊन आली होती. वर नोकरी दरम्यान स्वतःसाठी केलेले दागिनेही होते. पण सुजीतच्या घरच्यांनी आपणहून तिच्या अंगावर सोनं घातलं होतं. फिकलमधले अमेरिकन सहकर्मचारीही लग्नाला आले होते. त्यामुळे लग्न एकदम आंतरराष्ट्रीय पातळीवरचंच झालं.

गायत्रीच्या घरचं कुणीच लग्नाला आलं नाही. उलट तिच्या अच्चननी केलेली किडनॅपिंगची केस निस्तरताना त्रास झाला. गायत्रीला आता सुजीत आणि त्याचे कुटुंबीय सोडता आपलं असं कुणी उरलं नव्हतं. पण सुजीतच्या लोकांनी तिला एकदम आपलंसंच करून टाकलं. त्याची आई तिच्यावर मुलीसारखं प्रेम करायला लागली. वडीलही सुनेच्या अधीन झाले. अर्थात गायत्रीही त्यांचं सगळं आपल्या अम्मा-अच्चनसारखंच करत होती - उलट जास्तच. सकाळी कामावर जायच्या आधी नाष्टा - दुपारचं जेवण तयार करून ठेवायची. त्यांना जे हवं ते. आणि कामावरून परतल्यावरही लगेच किचनमध्ये शिरायची. सासू नको - नको म्हणत असतानाही. कमावती सून, पळून आलेली. आणि तरीही इतकं सगळं आपल्यासाठी करते, याचा त्यांना कोण आनंद झालेला. सुजीतलाही गायत्रीनं घर असं जिंकून घेणं आवडलं होतं.

सगळं एकदम मस्त चालू होतं. दृष्ट लागावं असं. आणि ती लागली. एकदा लंचला तिच्या टेबलवर एका बिजनेस टीमची काही नवीन पोरं बसली होती. कॉलेजच्या मुलांच्या चालतात तशा गप्पा चालू होत्या. सिनेमा, नट-नट्या करता करता विषय ऑफिसातल्या जोड्यांवर घसरला. ह्याचं कुणाबरोबर, तिचं कुणाशी सुरू झालं. आणि अचानक एक जण म्हणाला, "सुजीतचं कुणाशी ए म्हायतीये?" गालातल्या गालात हसत गायत्रीनं कान टवकारले. कामावरच्या नवीन पोरांना ती आणि सुजीत नवरा-बायको आहेत हे माहीत नव्हतं. खरं म्हणजे काही जुन्या लोकांनाही ते माहीत नव्हतं. ती दोघं ऑफिसवर कामाव्यतिरिक्त फारशी बोलत नसत. त्यामुळे त्यांचा काही संबंध आहे हे सांगितल्याशिवाय लक्षात येणं कठीण होतं. "कुणाशी रे?" "निधीशी!" गायत्रीला जोरदार ठसका लागला. "Are you OK?" कोणीतरी म्हणालं. पाणी पुढे केलं. "Yeah, yeah, I'm OK," म्हणत गायत्री उठली. काळीज जोरजोरात धडधडत होतं, पाय किंचित कापल्यासारखे होत होते, कानशिलं तापली होती, उगाचंच डोळ्यात पाणी आल्यासारखं होत होतं. ती वॉशरूममध्ये गेली. निधी?! सुजीतचं निधीबरोबर अफेअर चाललंय आणि आपल्याला माहीतसुद्धा नाही? एका ऑफिसात असून? असं कसं झालं? आणि सुजीत? तो असं वागलाच कसा? रागानं तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहायला लागलं. तिनं तोंडावर पाण्याचे हबके मारले, चेहेरा टिपला आणि वॉशरूममधूनच सुजीतला फोन लावला.

"काय करतोयंस?"

"काही नाही. काम."

"माझ्याबरोबर खाली चल जरा. लॉबीत भेटते तुला खाली."

"आत्ता?"

"हो."

"बरं."

ती दोघं खालच्या फूडकोर्टमधल्या कॉफी शॉप मध्ये शिरली. जेवणाची वेळ संपत आली होती. फारशी गर्दी नव्हती. तिनी कोपऱ्यातलं टेबल धरलं. सुजीत कापुचिनो घेऊन आला.

"काय गं? काय झालं?"

"काही नाही रे. म्हंटलं जरा तुला एक गोष्ट सांगावी. आत्ता कॅफेटेरियात ऐकली. गंमतशीर वाटली जरा."

"सांग ना मग."

"तुझं म्हणे निधीबरोबर अफेअर ए?" ती रोखलेल्या नजरेनी त्याचे भाव टिपत राहिली.

"आलं का तुझ्या कानावर?"

"म्हणजे? खरं ए?" गायत्री आवाज स्थिर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत म्हणाली.

"तुला काय वाटतं, गायत्री?"

"मला काय वाटतं ते राहू दे. काय आहे ते सांग, सुजीत."

"गायत्री, तू माझ्यावर अविश्वास दाखवतीयेस."

"सुजीत, काय आहे ते मला तुझ्या तोंडून ऐकायचंय."

"आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. त्याचा लोक गैरसमज करून घेतायत. आणि तू ही?" त्यानं नाराजीनं खिडकीबाहेर बघितलं आणि आठ्या घालत तो कापुचिनो पीत राहिला. गायत्री कधी त्याच्याकडे, कधी ग्लासकडे पहात घोट घेत राहिली. "खोटं आहे, मग झालं तर. त्यात चिडण्याचं काय कारण? आणि तुझ्याशी बोलले त्यात अविश्वास कसला? अविश्वास असता तर हेर लावले असते तुझ्यामागे. चल. निघू या." कॉफी शॉप मधून बाहेर पडताना गायत्रीला जत्रेतल्या उंच चक्रात वरून खाली येताना पोटात कालवतं तसं होत होतं. उलटी होईलसं वाटत होतं. प्रेम गप्प बसून खिडकीबाहेर पहात होता तेंव्हा त्याच्या चेहेऱ्यावरून सरकून गेलेली काळजीची छटा तिच्या नजरेतून सुटली नव्हती. 

गायत्री घरी निघाली ती मैत्रिणीला सुजीतवर लक्ष ठेवायला सांगून. ती घरी पोचायच्या आतच तिच्या मैत्रिणीचा फोन आला, "तुझा नवरा आत्ताच गेला गं." म्हणजे तासाभरात घरी यायला हवा. सुजीत जेवणाची वेळ होऊन गेल्यावर घरी आला. "वाढू का? गायत्रीनं विचारलं. "नको. जेवून आलोय." "कुठे?" "कुठे काय? कंपनीवर," सुजीत म्हणाला. "साडेपाच वाजता जेवलास?" गायत्रीनं विचारलं. सुजीतनं चरकून तिच्याकडे पाहिलं आणि उठून त्यांच्या खोलीत निघून गेला. अप्पा - अम्मा विलक्षण आश्चर्यानं बघत राहिले. गायत्रीनं टेबल आवरलं आणि काही झालंच नाही अशा अविर्भावात अप्पा - अम्मांना "गुड नाईट" म्हणून ती आत गेली. सुजीत लॅपटॉपवर होता. ती खोलीत येताच त्यानं लॅपटॉप बंद केला. "का? निधीशी चॅटिंग करत होतास? मी वाचीन वाटलं तुला?" "तुझं डोकं फिरलंय का गायत्री? आज चालवलंयस काय तू?" सुजीत खेकसला. "हो ना? मग साडेपाचला कंपनी वरून निघून तू साडेनऊला घरी पोचतोस, ते पण कंपनीवर जेवून. कसं काय, राजा?" सुजीत गप्प बसला. ती त्याच्या शेजारी बसली. त्याचा हात हातात घेत म्हणाली, "सुजीत, काय खरं ए ते मला सांगून टाक. लपवून लपणाऱ्या या गोष्टी नाहीत. मी ऐकलं त्यात तथ्य असेल तर आपल्याला या विषयी बोललं पाहिजे." सुजीत गप्पच राहिला. "सुजीत?" गायत्री त्याचा चेहेरा आपल्याकडे वळवत म्हणाली. "गायत्री, तीच लागलीये माझ्या मागे. मी करू तरी काय?" गायत्रीला अंदाज नसताना एखाद्या हळुवार लाटेनी अलगद यावं आणि आपल्याला जोरात पाडावं, तसं झाल्यासारखं वाटलं. घशात एकदम काहीतरी दाटून आलं. चढू पाहणाऱ्या आवाजाला सावरत ती म्हणाली,

"तुझं काय, सुजीत?"

"माझं काय?"

"तुला तिच्या विषयी काय वाटतं?"

"ती मैत्रीण ए फक्त माझी. बस."

"नक्की?"

"हो, नक्की"

"ठीक ए. मी बोलते उद्या तिच्याशी."

"गायत्री, तू तिच्याशी बोलणार नाहीयेस."

"का?"

"मला ऑफिसमध्ये तमाशा नकोय. कामाच्या ठिकाणी काहीतरी बकवास सुरू करू नकोस. आपल्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे."

"तिघांच्या?"

"नाही का?"

आपल्या लग्नात मोडतं घालणाऱ्या मुलीच्या करिअरची तुला काळजी वाटतीये, सुजीत?"

"उगीच कुणाचं आयुष्य कशाला बरबाद करा."

"माझ्या आयुष्याचं काय?" गायत्री थक्क होऊन म्हणाली.

"काय झालंय काय तुझ्या आयुष्याला? नवरा आहे, नोकरी आहे, घर आहे. तिला बिचारीला कोणीच नाही."

"बिचारी?" गायत्री जवळ जवळ किंचाळलीच.

"गायत्री, आवाज खाली. अप्पा - अम्मांपर्यंत हे गेलेलं मला चालणार नाही."

"हो ना? मग बंद कर हे सगळं. आणि मी आत्ताच सांगतीये तुला. उद्या मी तिच्याशी बोलणार ए."

सुजीतनी लॅपटॉप दाणकन बेडवर आपटला. टेबललॅम्प बंद करून तो आडवा पडला. गायत्री बेडवर बसून राहिली कितीतरी वेळ, मुसमुसत. खूप दिवसांनंतर तिला खूप एकटं वाटत राहिलं.

ऑफिसवर पोचल्या पोचल्या गायत्री निधीच्या डेस्कपाशी गेली. ती नव्हती. चरफडत गायत्री कामाला लागली पण सगळं लक्ष निधीच्या येण्याकडे होतं. मधून मधून तिच्या डेस्कवर फोन कर, चकरा मार असं तिचं चालू होतं. पण निधी काही आली नाही. मग तिनी निधीच्या मॅनेजरला विचारलं तेव्हा कळलं की ती WFH आहे. ती सुजीतकडे गेली.

"निधी आज आली नाहीये."

"हो, तिला जरा कणकण वाटतीये त्यामुळे ती आज WFH ए. तिचा फोन आला होता."

"अच्छा! मी तिच्याशी बोलणार कळल्यामुळे एकदम कणकण आली असेल बिचारीला." सुजीत काम करत राहिला. "आज संध्याकाळी आपण तिला भेटून येऊ या. तब्येत बरी नाहीये तिची." गायत्री म्हणाली. सुजीतनं आश्चर्यानं, रागानं गायत्रीकडे पाहिलं. मग दबक्या आवाजात म्हणाला, "गायत्री, जास्त होतंय. ती काही नोकरी सोडून गेलेली नाही. येईल उद्या तेंव्हा बोल." गायत्रीनी त्याच्या डोळ्यात डोळे घातले, तितक्याच रागानं. "बायकोला सोडून तू तिला पाठीशी घालतोयंस. एका मैत्रिणीकरता एवढं करणारा मित्र मी पाहिला नव्हता आजवर, सुजीत. आज एकाच कॅबनी घरी जाऊ या." आणि ती निघून गेली. पाच वाजता तिनं सुजीतला मेसेज केला, "निघायचं का?" "तू जा, मला मिटिंग आहे." "घरनं कर मिटिंग." "नाही, आम्ही तीन चार लोक थांबणार आहोत. त्यामुळे घरनं नाही करता येणार." "बरं, मी जेवायला वाट बघते."

"गायत्री, बेटा, काय झालंय? तुमचं काही भांडण झालं का?" अम्मांनी पाठीवर हात ठेवून विचारलं. गायत्रीला एकदम भरून आलं पण डोळ्यातलं पाणी आवरत ती म्हणाली," छे, हो. काही विशेष नाही. छोट्या छोट्या कुरबुरी चालणारच ना. तुम्हांला कॉफी बरोबर काय देऊ?" कॉफीसाठी स्टीलचे ग्लास मांडत गायत्रीनं विचारलं. पण तिचं सगळं लक्ष सुजीतकडे लागून राहिलं होतं. तो आता निधीकडे जाईल का? तिचा पिच्छा कसा सोडवायचा? तिनं मैत्रिणीला मेसेज पाठवला. तिचं उत्तर आलं, "अजून इथेच आहे, काम करतोय." सुजीतचं हे असं सुरू झालंय हे माझ्या आधीच कसं लक्षात आलं नाही? इतकी कशी मी बावळट? गायत्री स्वतःला दोष देत राहिली. कडला करीचा कुकर लावून तिनं पुट्ट भरायला घेतले. ह्याला निधी आवडण्याचं काय कारण? माझ्यापेक्षा जास्त त्याला काय मिळालं तिच्यात? गोरी आहे एवढंच. पण बाकी दिसायला ठीकठाकच. मग ह्याला एवढं तिच्यामागे लागायला झालं काय? तेवढयात तिचा फोन वाजला. मैत्रिणीचा मेसेज होता, "निधी आत्ताच ऑफिसला आलीये. ते दोघेही कॅफेटेरियात खिदळत बसलेत."

"Ladies and gentlemen, we will be starting the meal service now. Please keep your seat backs upright," एअरहोस्टेसनी अनाउन्समेंट केली. गायत्रीला एकदम कुळकुळल्यासारखं झालं. काल रात्रीपासून तिनं काही खाल्लं नव्हतं. काल संध्याकाळी सुजीत दिल्लीसाठी बाहेर पडला. गायत्रीनं स्वैपाक केला आणि जेवणाची ताटं घेतली - अम्मा अप्पांकरता. "हे काय? तू नाही जेवत एस?" अम्मांनी विचारलं. "नको, अम्मा. खावंसं नाही वाटत ए." "का गं?" त्यांनी उठून तिच्या कपाळाला हात लावला, "बरं नाही वाटत ए का?" "नाही, बरं ए." "गायत्री, बस इथे," अप्पा म्हणाले. "तुमच्या दोघांचं काहीतरी बिनसलंय एवढं आम्हांला माहितीये पण तुमच्यापैकी कुणीच आम्हांला काही सांगत नाही. सुजीत नाहीये आता तर तू तरी सांग काय झालंय. आम्हांला काळजी वाटते तुमची पोरी." आणि गायत्रीचा बांध फुटला. पाय गळल्यासारखे झाले. तिथेच खुर्चीत कोसळून ती हमसाहमशी रडू लागली. अम्मा तिला थोपटत उभ्या राहिल्या. त्यांच्याही डोळ्यातनं पाणी घळघळू लागलं. अप्पांचा चेहेरा काळजीनं काळवंडून गेला."गायत्री, बेटा, काय झालंय ते तरी सांग." गायत्रीनं निधी प्रकरण आणि सुजीतचं दिल्लीला जाणं याबद्दल त्यांना सांगितलं. मग म्हणाली, "अप्पा , मी पण उद्या सकाळी दिल्लीला जाणार ए. मला खरंच बघायचंय ते दोघं एकत्र आहेत की नाहीत ते." "मी पण येतो तुझ्याबरोबर." "नको, अप्पा. एक म्हणजे आता तिकीट मिळणं अवघड आहे. आणि जे होईल ते तुमच्यासमोर नको. तुम्हांला त्रास होईल त्याचा. मी तुम्हांला कळवीन सगळं. फक्त मी तिकडे पोचेतोवर तुम्ही त्याला काही सांगू नका. नेहेमीप्रमाणेच त्याच्याशी बोला. माझ्याबद्दल विचारलं तर ऑफिसला गेलीये असं सांगा. एवढं कराल ना दोघं?" अम्मांनी तिला पोटाशी धरलं. अप्पा दोन्ही हात एकमेकांच्या जबडयात देऊन मान खाली घालून बसले.

"What would you like to have, m'm? Veg or non-veg?" "Veg, please," गायत्री ट्रे टेबल उघडत म्हणाली. सांबाराचा वास आला. "Some tea or coffee?" "Coffee, black." एअरहोस्टेसनी तिला ट्रे दिला. गायत्रीनी फॉईल काढली. बटन इडली, डोश्याचे दोन छोटे तुकडे, सांबार असा नाश्टा होता.

"अगं, तू नॉन-व्हेज ट्राय तरी करून बघ. नाही आवडलं तर नको खाऊस," सुजीत तिच्या मागे लागला होता.

"अरे, पण मला खावंसं वाटत नाही."

"अगं, का पण? काहीतरी बावळटासारख्या पाप-पुण्याच्या कल्पना घेऊन बसतेस बुवा तू!"

"अरेच्चा, यात पाप पुण्याचा संबंध कुठून आला? मला नाही खावंसं वाटत नॉनव्हेज. बास."

"तेच ते! जुनाट कल्पना आवडी-निवडीखाली खपवायच्या. न ट्राय करता 'आवडत नाही' हे कळलं कसं तुला?"

"तू प्रत्येक गोष्ट ट्राय करून मगच ठरवतोस का आवडते की नाही ते? मग कारलं का खाऊन बघत नाहीस?"

"कारण ते नॉनव्हेज नाही."

"मग मी ही हे खात नाही कारण हे व्हेज नाही."

"बरं. मी कारलं खाऊन बघतो. तू हे ट्राय कर. ओके?"

"सुजीत, मी प्रत्येक गोष्ट ट्राय करून मग ठरवत नाही."

"That's presumptuous."

"Whatever it is. But spare me non-veg, okay?"

तिनं लग्नबाह्य संबंध ट्राय न करताच गैर ठरवले होते, सुजीत बहुधा ट्राय करून बघत होता, तिच्या डोक्यात विचार आला. आणि त्याला ते आवडलं तर? कॉफीचे घोट घेता घेता ती विचार करत राहिली. तो आपल्याशी खोटं बोलतो हे तर उघडच आहे पण आपल्याला ते दोघं फक्त मित्र नाहीत हे सिद्ध करता आलेलं नाही. तो टेक-सॅव्ही आहेच, फूटप्रिंट्स सोडत नाही अजिबात. आपण त्याला ऍप वगैरे वापरून नाही पकडू शकणार. त्यामुळेच तर हा दिल्लीचा उपद्व्याप! वर फिकलनी सरळ हात वर केले. एम्प्लॉईच्या खाजगी आयुष्यात आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही म्हणून. अक्षयामुळे हा एक प्रयत्न तरी करता येतोय. काय निष्पन्न होणारे माहीत नाही. "Please fasten your seat belts. All electronic devices must be switched off for landing."

एअरपोर्टवरून गेस्ट हाऊसकडे जाताना गायत्रीचे ठोके गाडीच्याच गतीनी पडत होते. आपण त्यांना रंगे हाथ पकडणार ही एक उत्सुकता होतीच. पण त्याच बरोबर ते काय म्हणतील, कसे वागतील, इथनं गेल्यावर सुजीत काय पाऊल उचलेल, अम्मा-अप्पांना कळलंय हे त्याला कळल्यावर तो काय करेल - नाना प्रश्न तिच्या डोक्यात रस्त्यावरच्या असंख्य गाड्यांसारखे धावत होते, वेडेवाकडे, एकमेकांना ओव्हरटेक करत. गाडी गेस्ट हाऊसला पोचली. कापत्या हातानी लॉगबुकमध्ये सही करून गायत्री गाडीतून उतरली. बेल डेस्कवरच्या पोरानं तिची बॅग घेतली. चेक इन करताना गायत्री रिसेप्शनिस्टला सहज म्हणाली, "माझे कलीग्ज उतरलेत इथे - सुजीत आणि निधी. त्यांचे रूम नंबर काय आहेत?" सगळे फिकल एम्प्लॉईज असल्यानी रिसेप्शनिस्टनी तिला नंबर सांगितले. "थँक यू" म्हणत गायत्री बेलबॉयच्या मागे आपल्या खोलीकडे गेली.

जेवणाची वेळ झाली होती. हे दोघं ऑफिसला गेले असतील. म्हणजे रात्रीपर्यंत कुणाला कळू न देता इथं बसणं आलं. तिनं लॅपटॉप सुरू केला आणि दिल्ली ऑफिसच्या एचआर मधल्या एका मैत्रिणीला मेसेज केला. "सुजीत दिसला का गं तुला?" "तुझा नवरा? नाई!" "एकदा बघ की त्यांच्या बे मध्ये किंवा कुणाला तरी विचार ना!" "बघते बाई" म्हणत ती चॅट वरून थोडा वेळ गायब झाली. "नाही आलाय ऑफिसला. यायचा होता पण तब्येत बरी नाही म्हणून गेस्ट हाऊसवरून काम करतोय म्हणाले." "हो का? अरे बाप रे! ह्याला काय झालं? जाऊ दे. थँक यू गं," गायत्री म्हणाली. तिचं काळीज धडधडू लागलं. म्हणजे नक्की ते दोघं इथेच आहेत! ती उठली. फोन, की कार्ड घेतलं आणि बाहेर आली. सुजीतची खोली वरच्या मजल्यावर होती. छोटं गेस्ट हाऊस होतं. लिफ्ट नव्हती. पायऱ्यांवरून वर चढताना पायात गोळे आल्यासारखे झाले तिला. मध्ये थोडं थांबून तिनं घाम टिपला. एक दीर्घ श्वास घेतला आणि सुजीतच्या खोलीच्या बाहेर पोचली. पावलांचा आवाज तिनं होऊ दिला नाही. बाकी सगळी दारं बंद होती. लोक खोल्यांमध्ये होते की नाही कुणास ठाऊक पण लॉबीमध्ये वाद घालायला लागू नये, असं तिला वाटून गेलं. ती थोडी दारापाशी रेंगाळली, मग दाराच्या अगदी जवळ सरकत तिनं बेल दाबली. काही हालचाल नाही. तिनं परत बेल दाबली. पावलांचा आवाज आला आणि मग सुजीतचा, "Who is it?" "It's me, Gayatri." शांतता पसरली. काहीतरी कुजबुजण्याचा आवाज आला. मग सुजीतनी दार उघडलं, "How come you are here?" "आत येऊ ना?" म्हणत गायत्री आतच शिरली. स्टडी टेबलवर खुर्चीत निधी बसली होती. गायत्रीनी रागानी सुजीतकडे बघितलं. "आता कळलं how come I am here?" "गायत्री, तू सुतावरून स्वर्ग गाठतीयेस. निधीची रूम तयार नव्हती म्हणून ती इथे थांबलीये." "हो? काल रात्रीपासून तिची रूम तयार नाहीये का? मग रात्रभर ही इथेच?" "गायत्री!" सुजीत ओरडला. त्याच्या वर आवाज चढवत गायत्री ओरडली, "Shut up. Don't shout you dog. आता सगळं समोरासमोर आहे. आणखी खोटं बोलू नकोस, नालायका! आणि काय गं तू? लोकांची लग्नं मोडताना लाज नाही का वाटत तुला? मुलगी एस ना? एवढं कळत नाही दुसऱ्या मुलीला काय वाटेल?" निधी शांत स्मित करत तिच्याकडे पाहत राहिली. "हसू नकोस, निलाजरे." "गायत्री, जीभ आवर." "तू मध्ये बोलू नकोस, सुजीत. बोल ना गं. का दातखीळ बसली तुझी?" गायत्री निधीला म्हणाली. निधी स्टडी टेबलवर कोपर टेकून छान रेलून गायत्रीकडे गंमतीनं बघत बसली होती. सुजीतकडे वळत ती म्हणाली, " हे असलं थिल्लर बोलते तुझी बायको? इतके दिवस राहिलास कसा हिच्या बरोबर?" "ए टवळे, त्याच्याशी काय बोलतेस? माझ्याशी बोल. आणि थिल्लर कोण? दुसऱ्यांच्या नवऱ्यांबरोबर संबंध ठेवणारी का आपलं लग्न वाचवणारी? काय गं?" "गायत्री, तमाशा बास झाला. जे आहे ते आहे, असं आहे. तुझ्या समोर आहे. आरडाओरडा करून काय मिळणार ए? आपण तिघं शांत डोक्यानं विचार करू आणि काहीतरी मार्ग काढू," सुजीतनं गायत्रीला दंडाला धरून बेडवर बसवू पाहिलं. तिनं त्याचा हात झिडकारला आणि जाऊन खिडकीपाशी उभी राहिली. "बोला, काय ठरवलयत तुम्ही पुढे? निधी नोकरी आणि शहर सोडून जाणार की आपण नोकरी सोडून दुसरं शहर गाठायचं, सुजीत?" गायत्री म्हणाली. सुजीत अविश्वासानं तिच्याकडे पाहत राहिला. मग मान हलवत मिनी बारकडे गेला आणि एक बिअर कॅन काढून त्यानं एक घोट घेतला. निधी त्याच्याकडे बघत राहिली. मग म्हणाली, "तू बोलणारेस का मी बोलू?" "तू बोल," सुजीत म्हणाला. गायत्रीला लढाई सुरू व्हायच्या आधीच हरल्यासारखं झालं. "गायत्री," निधी म्हणाली. गायत्रीच्या चेहेऱ्यावर तिरस्काराची एक मोठी रेघ उमटली. "राग राग करून काही होणार नाही, बदलणार नाही. यापासून पळत राहिलो तर आपल्या तिघांनाही त्रासच होणार आहे. त्यामुळे बोलून पुढे काय ते ठरवू." गायत्री किळसभरल्या नजरेनी निधीकडे पाहत राहिली. "मला तुझं लग्न मोडायचं नव्हतं. माझं स्वतःचं लग्न मोडलंय. लग्नाच्या ऐन वेळेला वरात आली नाही आणि नुसतं 'आम्हांला हे लग्न करायचं नाही' एवढा निरोप आला. भरल्या मांडवातनं मी तशीच घरी गेले. मानहानी, संताप, तिरस्कार ... मी सगळं भोगलंय. आणि ते इतर कुणाच्या वाट्याला यावं अशी माझी इच्छा नव्हती. पण प्रेमाला या गोष्टी कळत नाहीत. स्वतःला अडवायचा खूप प्रयत्न करूनही मी ह्याच्या प्रेमात पडले. पण तिथवरच हे राहतं तर मी एकतर्फी संपवलंही असतं. पण हा ही प्रेमात पडलाय माझ्या. आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं भलं यातच आहे की तू याला मोकळं करावंस." "सुजीत मी हिच्याशी का का बोलतीये? माझा काय संबंध हिच्याशी? तिला जायला सांग तिच्या खोलीत. आपण दोघं बसून बोलू." गायत्री तावातावानं म्हणाली. निधीनं एक मोठा उसासा टाकला आणि ती उठली. सुजीत तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत त्यानं तिला परत खुर्चीत बसवलं. गायत्रीला पुरतं निःशस्त्र झाल्यासारखं वाटलं. "गायत्री, तुला अजूनही कळत नाहीये. We are in a relationship. आपलं लग्न नावापुरतं उरलंय, गायत्री. I have checked out of it. आता बोलायचं एवढंच की पुढे काय... ?" सुजीत तिच्याकडे पाहत वैतागून म्हणाला. गायत्री स्तंभित होऊन त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या आवळलेल्या मुठीत तिची नखं रोवत होती. चपलेत तिनं पायाची बोटं घट्ट आवळून घेतली होती. नाकातनं पाणी वाहायला लागलं होतं. तिच्या डोक्यात एक जोरदार कळ आली. तिनं त्या दोघांकडे पाहिलं आणि रागारागानं खोलीच्या बाहेर पडली. तिनं दरवाजा बंद केला नाही.

"अम्मा, अप्पा, आहे ते असं आहे. माझं निधीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार ए. गायत्रीनी मला घटस्फोट दिला नाही तर माझी हरकत नाही. ती निधीबरोबर इथे राहू शकते. पण त्याचा तिलाच त्रास होईल. तिचा विचार करूनच मी घटस्फोट सुचवतोय." अप्पा चवताळून उठून उभे राहिले. "अप्पा, माझ्या अंगावर हात टाकायचा विचारही करू नका. मी लहान नाहीये." "अरे नालायका!" अप्पा म्हणाले आणि धपकन खुर्चीत बसले. अम्मा जोरजोरात रडायला लागली. गायत्रीच्या डोळ्यातनं अखंड पाणी वाहत होतं. "गायत्री, तुमची तिघांची रडाय-भेकायची नाटकं झाली असतील तर आपण घटस्फोटाच्या डॉक्युमेंट्सवर सह्या करू या का?" "मी तुला असं मोकळं करीन असं वाटलंच कसं तुला? हरामखोरा, तुझ्यासाठी मी माझं घरदार सोडलं, गाव सोडलं, मित्रमैत्रिणी सोडल्या आणि तू हे पांग फेडतोयंस काय त्याचे? बघते, मी पण बघते तू कसा लग्न करतोस ते. मी लग्नाची बायको ए तुझी. मी तुला मोकळं करीन हे तू विसरूनच जा. उलट आता बऱ्या बोलानं ऐकलं नाहीस तर मला पोलिसात जावं लागेल, कळलं?" गायत्रीनी आवाज चढवत धमकी दिली. "साली! वाटलंच होतं मला," सुजीत म्हणाला आणि उठून आपल्या खोलीत गेला. 'साली!' गायत्री अविश्वासानं त्याच्याकडे बघत राहिली. आपली बॅकपॅक घेऊन सुजीत बाहेर आला आणि तिघांना खाऊ का गिळू असं पाहत दार आपटून बाहेर निघून गेला. सुमा डोकं धरून खुर्चीत बसली आणि ते तिघंही आपापल्या दुःखाला अभिषेक घालत डायनिंग टेबलभोवती बसून राहिले.

कधीतरी अपरात्री दाराची लॅच उघडल्याचा आवाज आला. गायत्री लिव्हिंग रूममध्ये बसूनच होती. सुजीत आत आला. गायत्रीचं काळीज, का कुणास ठाऊक, थोडं चरकलं. सुजीत तिच्याजवळ एका खुर्चीवर येऊन बसला. मान खाली घालून आपल्या पायांकडे बघत राहिला. मग तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे अजूनही ओले होते. त्याच्या डोळ्यांमध्ये थोडी कणव दाटून आली तिच्याविषयी. हतबल होऊन तो म्हणाला, "मी काय करू, गायत्री? असं काही होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण आता ... काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. जाऊ दे. आपण सगळेच थकलोय. नंतर विचार करू." "काय विचार करणार, सुजीत?" गायत्री कसंबसं म्हणाली आणि तिचे डोळे पावसाळ्यात भरलेल्या नदीसारखे वाहू लागले. त्यानं सुस्कारा सोडला. तिच्याजवळ येऊन तिला खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, "चूक झाली, गायत्री. पण दुरुस्त तर करायला हवी. तेवढंच करतोय." तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं तिच्या डोक्यावर लहान पोरासारखं थोपटलं आणि आत निघून गेला.

मग एक आठवडा एकदम शांततेत गेला. सुजीत रोज नेहेमीसारखा घरी येत होता. त्या चौघांत फार संवाद नसला तरी चौघं जेवायला एकत्र होते. गायत्रीच्या काउन्सेलरला हे ऐकून बरं वाटलं. तिनं गायत्रीला सध्या वाद न घालता "हॅपी मोमेंट्स" वर भर द्यायला सांगितलं. गायत्री मग आठवडाभर सुजीतच्या आवडीचं खाणं करत राहिली. अप्पा - अम्मांनाही झालं त्या विषयी बोलायला तिनं मनाई केली होती. असंच चालू राहिलं तर सगळं हळूहळू सुरळीत होईल, अशी अंधुक आशाही तिला वाटायला लागली. "ह्या विकेंडला मी माझ्या मित्रांबरोबर दांडेलीला जाणार ए," सुजीत त्या दिवशी जेवताना म्हणाला, "शुक्रवारी रात्री." "मी पण येऊ?" गायत्रीनं विचारलं. "मला आवडलं असतं गं, पण ऑल स्टॅग ग्रुप ए. तुला माहितीच्चे." गायत्रीच्या अगदी तोंडावर आलं होतं, "निधी पण स्टॅगच धराल तुम्ही, नाही का?" पण तिनं ते गिळून टाकलं. शुक्रवारी रात्री ट्रेकिंगचे कपडे घेऊन सुजीत त्याच्या खाली थांबलेल्या मित्रांबरोबर बाहेर पडला.

सोमवारी सकाळी ठरल्या वेळी सुजीत आला नाही आणि गायत्रीचा ठोका चुकला. तिनं त्याच्या मित्राला फोन लावला.

"संदेश, तुम्ही लोक परत आलात का?"

"हो, सकाळीच!"

"आणि सुजीत?"

"म्हणजे?!"

"म्हणजे सुजीत अजून घरी आला नाहीये ना!"

"गायत्री, तू काय बोलतीयेस मला काही कळत नाहीये. सुजीत आमच्या बरोबर नव्हता."

"तो तुमच्या बरोबर दांडेलीला नव्हता?"

"नाही."

गायत्रीनं आवंढा गिळला आणि फोन कट केला. सुजीत कामावर नव्हता. त्याच्या मॅनेजरपासून कुणालाच काही खबर नव्हती. निधीही गायब होती. "त्यानं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना, गायत्री?" अम्मांनी काळजीनी विचारलं. गायत्रीनं थकून जाऊन त्यांच्याकडे नुसतं पाहिलं. "नाही गं. एरवी तिच्याकडे आहे एवढं माहिती तरी असायचं आपल्याला," पदरानं डोळे टिपत अम्मा किचनमध्ये गेल्या. "गायत्री, पोलीस स्टेशनात मिसिंगची तक्रार देऊ या, बेटा," अप्पा तिला समजावत म्हणाले. "त्यानं काय होईल, अप्पा?" "काही होणार नाही पण खरंच काही बरं वाईट झालं असेल तर आपण आपलं काम केल्यासारखं होईल." गायत्री काही बोलली नाही. 'आज कामावर येणार नाही अशी' इमेल टाकून द्यावी म्हणून तिनी फोन उचलला आणि तिला नुकतीच आलेली एक इमेल दिसली. एका अनोळख्या आयडी वरून आलेली. "आम्ही दोघेही सुखरूप आहोत. शोधायचा प्रयत्न करू नका. पोलिसात गेला नाहीत तर बरं होईल कारण जाऊन काही उपयोग होणार नाही. आम्ही भारताबाहेर आहोत. अम्मा - अप्पांना नमस्कार." गायत्रीनं अप्पांना इमेल दाखवली. तिचे हात पाय गळून गेले. संताप, फसवणूक, पराभव, अपमान या सगळ्याचा एक कडू काढा तिच्या गळ्याशी दाटला. "पोलिसात जायला उशीर झाला, अप्पा," ती म्हणाली. त्यांचे डोळे भरून आले नि तिच्याकडे पाहत ते एखाद्या आश्रितासारखे बसून राहिले. अम्मांनी तिच्यापुढे कॉफीचा ग्लास ठेवला आणि वर आलेल्या दुधाचा गॅस बंद करायला त्या आत धावल्या.


नितीन मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा