सावली

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ५



डोक्यावर ठेवलेल्या रुमालात असते 
पर्समध्ये असलेल्या छत्रीत असते 
कडेला मांडलेल्या दुकानाखाली असते 
सावली कुठेही असते

उन्हात गेलास तर याद राख 
आईच्या ह्या रागात असते
आमच्यावानी अडानी राहू नका रं 
बापाच्या ह्या त्राग्यात असते 
हुंदका गिळून बसलेल्याला 
भरवणाऱ्या घासात असते 
सावली कुठेही असते

सावली पुढे असते 
सावली मागे असते
दिसेनाशी झाली तरी 
आपल्याच पायाशी असते 
कुठेही गेलो तरी
तिची नेहमीच साथ असते 
सावली कुठेही असते

पण काही वेडे आपली सावली दुसऱ्यांना देतात
स्वतः मात्र उन्हाच्या घरात राहतात
मग त्यांच्या सावलीत झाडलेल्या बोटांनाही अंकुर फुटतो 
वठलेल्या झाडात प्राजक्त फुलतो 
पोरक्या पोकळीला निरभ्र आकाश गवसते 
सावलीच्या कुशीत जग सारे विसावते 
सावली कुठेही असते

कधी हातभार असते 
कधी वीतभर असते 
कधी आपल्यापेक्षा छोटी असते 
कधी आभाळापेक्षाही मोठी असते
खूप खूप मोठी असते
- प्रमोदिनी देशमुख




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा