मी आणि माझा शत्रुपक्ष

ऋतुगंध हेमंत - वर्ष १२ अंक ५

(महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याने आमच्या किराणा माल वाल्याने आता गोष्टी कागदात गुंडाळून द्यायला सुरुवात केली आहे. परवाच्या दिवाळी साहित्य खरेदीनंतर असाच एक कागद आला असता त्याचे (म्हणजे कागदाचे) ऐतिहासिक मूल्य लक्षात आल्याने आम्ही त्याच्याकडे (म्हणजे दुकादाराकडे) चौकशी केली. तेव्हा तो कागद अण्णूराव शेषराव मोगलगिद्दीकरांकडून आणतो असे कळले. अशेमोंकडे रद्दी चाळताना सापडलेल्या कागदांवरून साभार.) 

महानगरपालिकावाल्यांनी रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे आपण फूटपाथवरून तिथे लावलेल्या टू-व्हीलर चुकवत जात असतो. ऑफिस मधून घरी जाताना चतुर्थी म्हणून गणपतीला जायला म्हणून कसब्यात आलेलो असतो. देवाला नमस्कार करून बाहेर येताना समोर शाळेतला जुना मित्र दिसतो. तिथेच भरभरून गप्पा सुरु होतात, आणि बायकोनी हाक मारल्यावर तो म्हणतो, ‘मुलाचं लग्न काढलंय, म्हणजे काय त्यानेच जमवलंय, आज देवाला पहिली पत्रिका, त्यानंतर सगळीकडे वाटप. येईनच घरी दोन आठवाड्यात, भेटूयात.’ खरोखरच तो दोन आठवड्यांनी येतो, आपल्या वाड्यातल्या घरी येतो, बाहेरच्या बोळकांड्यात ड्रायव्हरसकट गाडी उभी करून येतो. पाचंच मिनिटं आहेत असं म्हणून अर्धा तास बसतो, भरपूर गप्पा मारतो, चहा, पोहे, वेफर्स खाऊन निघताना, ‘दुपारी लग्नाला आणि संध्याकाळी रिसेप्शनला सगळ्यांनी नक्की या’ म्हणतो. आपल्याला रजा मिळत नाही पण आपण रिसेप्शनला आवर्जून जातो. गाठीभेटी होतात. रिसेप्शन नदीकाठच्या मोठ्या लॉन्सवर असते. मित्राच्या सासऱ्यांच्या श्रीमंतीचा हेवा करत आपण विविध प्रांतातील पदार्थांचा पोट भरेपर्यंत आस्वाद घेतो. एकीकडे फोटो सेशन्स चालू असतात, आणि एका बाजूला मैफिल. आपण गाणी ऐकता ऐकता आईसक्रीम्सचा फडशा पाडून पळायच्या विचारात असतो, तेवढ्यात हे शेजारी येतात! 

ह्यांच्या हल्ल्याची सुरुवात साधारणतः ‘आहा !’, ‘वाह !’, ‘काय षड्ज लावलाय बाईंनी !’ अश्या उद्गारांनी होते, जणू काही हे बाईंकडे रोज संध्याकाळी चहा-बिस्किटाला जातात. एक तर आपण व्हॅनिला आईसक्रीमवर चॉकोलेट सॉस घ्यायचा का थेट चॉकोलेट आईसक्रीम घ्यायचे ह्या गहन प्रश्नात गढून गेलेलो असतो, अश्यावेळी हे लोक आपल्याला गाठतात आणि घेतलेले आईसक्रीम पातळ होईपर्यंत चालू असलेल्या गाण्यातले बारकावे समजावून सांगतात! मग हळूहळू चालू असलेले गाणे आणि गायिका बाजूला पडून हे लोक जे घराणे ‘follow’ करतात किंवा एकेकाळी ज्या घराण्याच्या तालमीत शिकले होते त्याची तारीफ सुरु होते. म्हणजे असतो लोकांना अभिमान, पण उगाच कुठल्या बुवांनी कुठे कसा पंचम स्वर लावला, किंवा कुठे कसा धैवत उचलला हे ऐकण्याची आपली इच्छा (किंवा हवं तर पात्रता म्हणा) नसते. 

ह्या अश्या लोकांबरोबर किंवा त्यांच्यासमोर गाणी ऐकण्याचं मी शक्यतो टाळतो. बहुतांश वेळा ह्या लोकांना गाण्याचे बोल पाठ नसतात. मग ते काहीही शब्द जोडून म्हणतात किंवा आलाप, ताना वगैरे घेत बसतात. आपण ऐकत असलेल्या गाण्याचा आपल्या दृष्टीने पूर्ण विचका करूनही ह्यांचा आत्मा तृप्त होत नाही. पुढे जाऊन ते आपल्याला दहा गाणी ऐकवतात आणि प्रत्येक गाण्याच्या संथ रनिंग कॉमेंटरी सकट! आपल्याला त्या बुवांनी वेडेवाकडे चेहरे करत आणि विचित्र हातवारे करत गायलेल्या ‘अ’ च्या बाराखडीत फारसा रस नसतो, पण ह्या लोकांना मात्र यशोदेला श्रीकृष्णाच्या मुखात दिसलेल्या ब्रह्मांडाप्रमाणे त्यात संपूर्ण संगीत जगताचा अनुभव येत असतो. 

हे लोक कधीच समोर चालू असलेल्या संगीताचा (म्हणजे म्युझिक हो !) आनंद घेऊ शकत नाहीत. गायक किंवा गायिका त्यांच्या मान्यताप्राप्त यादीतील तर असेल तर त्याच्या महानतेचं वर्णन, आणि नसेल तर गाण्यातल्या उणीवा ऐकाव्या लागतात ! आणि सगळ्यात कहर म्हणजे ‘लता कि आशा’ वाले लोक ! आता ह्या दोघींमध्येही कोण सरस हे का ठरवायला पाहिजे आणि ह्यासाठी ‘ह्या’ लोकांची पात्रता काय ते एक तो मंगेशच जाणे.

- शेरलॉक फेणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा