क्लास फोर सरवटे

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४

"ओ विजयराव, चला चहा घेऊन येऊ.", सरवटे विजयच्या टेबलाच्या कडेवर येऊन बसत म्हणाला. विजयने नाखुशीनेच कामातून डोकं बाहेर काढलं. खरं तर त्याची जायची इच्छा नव्हती; पण सरवटेला नाही म्हणण्यात शहाणपणा नाही हे त्याला नोकरीवर लागल्या-लागल्या महिनभरात कळून चुकलं होतं. एक तर पोस्टात कारकुनाची नोकरी करण्याची त्याची इच्छा नव्हती; पण "नोकरीचं बघा आता, बास झालं शिक्षण! इथून पुढं तुला शिकवणं मला परवडणार नाही. माझी नोकरी आता दोनच वर्ष राहिली आहे.आता काहीतरी कमवून प्रपंचाचा भार उचल तू!", असं त्याचे वडील निर्वाणीचं बोलले आणि त्याला काही मार्गच उरला नाही. ते कोर्टात बेलिफ होते. तुटपुंज्या पगारात मोठा प्रपंच चालवणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. त्यातून रिटायरमेंट जवळ आलेली! म्हणून विजयने थोडा हातभार लावावा असं त्यांना वाटत होतं.

वास्तविक पाहता विजय हा अत्यंत हुशार मुलगा होता. शाळेत असताना पहिला नंबर कधी सोडला नाही म्हणून मॅट्रिक झाल्यावर त्याला डिप्लोमा इंजिनियरिंगला घातले; पण काय दैवगती कोण जाणे? पहिल्या वर्षीच विजय चक्क नापास झाला अन् वडलांचं हे निर्वाणीचं बोलणं त्याला ऐकावं लागलं. त्याला पुढे शिकायची इच्छा होती; पण आता नाईलाजच झाला. त्याने रागारागाने वर्तमानपत्रं चाळायला सुरुवात केली आणि दिसतील त्या जाहिरातींच्या पत्यावर अर्ज पाठवायला सुरुवात केली. मॅट्रिकला चांगले मार्क असल्यामुळे त्याला पोस्टात सहज नोकरी लागली व तो लगेच नोकरीवर रुजू झाला.

नवीन असल्यामुळे त्याला पहिल्यांदा R&D (Receipt and despatch) ब्रॅंचचं काम मिळालं. तिथेच त्याची सर्वात प्रथम सरवटेशी ओळख झाली. सरवटे एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी - क्लास फोर! सरकारी खात्यात क्लास फोर नावाची एक जमात असते. त्या जमातीचे सगळे 'गुण' सरवटेत ठासून भरले होते. सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा युनिफॉर्म खात्याने दिलेल्या खाकी कापडाचा असायचा; पण सरवटेचा युनिफॉर्म टेरिकाॅटच्या भारी कापडाचा असायचा. खात्याकडून मिळालेले कापड तो विकून टाकायचा! डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा असायचा. चतुर्थ श्रेणी असूनही त्याची राहाणी अशी रुबाबात असायची. आता ही राहाणी त्याला कशी परवडायची याचं उत्तर त्याच्या बेरकी स्वभावातच होतं. कधी कोणाला तो गोत्यात आणील याचा काही भरवसा नसे म्हणून त्याला चहापाण्याचा नैवेद्य दाखवून प्रसन्न ठेवावं लागे. तसं त्याचं अक्षरही चांगलं होतं म्हणून तो विजयला त्याच्या ब्रॅंचचं बरंच काम करू लागायचा म्हणजे आलेल्या टपालाची पाकिटं फोडणं, आतील कागदांवर तारखेचा शिक्का मारणं इत्यादी; पण त्याचं लक्ष मात्र सतत कोणाला गोत्यात आणता येईल, कोणाला त्रास देता येईल ह्याकडेच असायचं.

एके दिवशीची गोष्ट. रोजचं टपाल सरवटेनं साहेबांच्या टेबलवर नेऊन ठेवलं. टपाल पाहता पाहता साहेब अचानक थांबले अन् त्यांनी हाक मारली,

"सरवटेsss"

सरवटे लगेच नम्रतेने साहेबांपुढे येऊन उभा राहिला.

"हे टेंडर कोणी फोडलं?", साहेब गरजले.

सरवटेने बिनदिक्कतपणे विजयचं नाव सांगितलं.

"बोलवा त्यांना", साहेब रागानं म्हणाले.साहेबांचा पारा फार चढला होता; पण सरवटेची कळी खुलली होती. 

"तुम्हाला सायबांनी बोलवलंय्....."

सगळ्या आॅफिसला ऐकू जाईल अशी सरवटेनं मोठ्यानं आरोळी ठोकली. आता साहेब विजयला चांगलं तासणार म्हणून बाकीचा स्टाफ उत्सुकतेनं पाहू लागला.

नेमकं काय झालं याची विजयला काहीच कल्पना नसल्यामुळे तो साहेबांपुढे येऊन उभा राहिला.

"काय झोपेत काम करता काय? हे टेंडर कसं काय फोडलं तुम्ही? तुम्हाला माहित नाही टेंडर फोडायचं नसतं म्हणून?" साहेबांचा पट्टा सुरु झाला.

"पण सर, पाकिटावर टेंडर असं लिहिलंच नव्हतं, मला काय माहित पाकिटात टेंडर आहे म्हणून! पाकिट सीलबंदसुद्धा नव्हतं, मी फोडलं ते पाकिट...!"

"आणा बघू ते पाकीट. दाखवा मला..."

केराच्या टोपल्यात टाकलेल्या पाकिटांमधनं विजयनं ते पाकीट आणून दाखवलं. त्याचं म्हणणं खरंच होतं; त्यामुळं साहेब एकदम गप्प झाले. कोणाला तरी तासण्याची आयतीय संधी गेल्यामुळं त्यांचा विरस झाला व गंमत बघायला मिळाली नाही म्हणून बाकी स्टाफही खाली मान घालूनि काम करू लागला. जागेवर येऊन बसता बसता विजयने मात्र निश्चय केला की खात्याच्या परीक्षा देऊन आपणही साहेब व्हायचं म्हणजे अशी बोलणी खावी लागणार नाहीत. शिवाय सरवटेपासून सावध राहायचं ह्याचीही पक्की नोंद त्याच्या मेंदूने घेतली.

एकदा असंच साहेब सरवटेला कशावरून तरी रागावले तेव्हा, "असले छपन्न साहेब आले न् गेले! मला कोणीच हात लावू शकत नाही, त्यांना माहित नाही अजून या सरवट्याचा इंगा!!" अशी सरवटेनं तणतण केली. मग त्यादिवशी घरी जायला निघाले तेव्हा साहेबांची गाडी पंक्चर झालेली होती.

विजय नोकरीला लागून एखादा आठवडाच झाला असताना असंच एकदा पोस्टमननं एक पत्र पत्ता अपुरा म्हणून परत आणून दिलं. सरवटेने ते परत आलेलं पत्र विजयला दाखवलं व म्हटलं हे सिव्हिल जुडगे कोण आहे? तो पत्ता सापडत नाही असं पोस्टमन म्हणत होता. विजयनं सरवटेच्या हातातून ते पत्र घेऊन पत्ता वाचला आणि हसता हसता त्याची पुरेवाट झाली. पाकिटावर लिहिलं होतं "Civil Judge". तो सरवटेला हसत हसत म्हणाला,"अहो हे सिव्हिल जज् आहे, जुडगे नाही!!". हसता-हसता त्याने सरवटेकडे पाहिलं आणि त्याच्या चेहर्‍यावरचे खुनशी भाव पाहून चपापलाच.

दुुपारी जेवणाचे डबे खाऊन झाले की सर्व पुरुष मंडळी पान खायला जात असत व बायका गप्पा मारत. जेवणाची सुट्टी अर्धातास व पान खाणे, गप्पा यात अर्धातास अशी एक तास सुट्टी ते घेतच असत. सरवटे पान खात नसे, त्याला सुपारी लागायची. मंगलाबाईंच्या पर्समध्ये नेहमी सुुपारी असते हे त्याला माहित होतं. तो बिनदिक्कतपणे त्यांचं कपाट उघडून त्यांच्या पर्समधून सुपारी घेऊन खात असे. एकदा त्यांनी काढून आणलेले पैसे व पासबुक पर्समध्येच होते ते मात्र पासबुकासह गायब झाले. त्यावर पुष्कळ भवति न भवति झाली; पण कोणालाही सरवटेवर सरळ आरोप करणं शक्य झालं नाही. 

एखाद्याला विनाकारण त्रास देण्यात सरवटेला गंमत वाटत असे किंवा एखाद्याची जिरवायची असली तरी तो अफलातून गोष्टी घडवून आणीत असे.

"माझं समरीचं(summary) मोठं रजिस्टरच सापडत नाही हो", निशा मंगलाबाईंना एक दिवस सांगत होती, "सगळीकडं शोधून झालं, एवढें मोठं रजिस्टर दिसणार नाही असं तर होणार नाही". 

शोधून शोधून निशा अगदी रडकुंडीला आली होती; पण रजिस्टर कुठंच सापडले नाही. मंगलाबाईपण तिला शोधू लागल्या, बाकी स्टाफने पण शोधलं; पण रजिस्टर काही मिळालं नाही. आता चार महिन्यांचं जुनं रेकाॅर्ड काढून पुन्हा सगळी समरी लिहून काढावी लागणार होती. केवढं काम होतं ते! पण निशापुढे दुसरा पर्याय नव्हता, मुकाट्यानं तिनं नवी समरी लिहायला घेतली. जवळजवळ सगळी समरी लिहून होत आल्यावर मग हळूच एके दिवशी ती जुनी समरी सरवटेला एका कपाटाच्या मागे सापडली. अन् सगळा प्रकार निशाच्या लक्षात आला. दोन महिन्यीपूर्वी सरवटेनं निशाकडे पैसे उसने मागितले होते, ते तिने दिले नव्हते; म्हणून सरवटेनीच ती समरी गायब केली आणि निशाला पुरेसा त्रास देऊन झाल्यावर त्यानेच ती समरी कपाटामागे आणून टाकली हे तिच्या लक्षात आलं; परंतु काहीही पुरावा नसल्याने कोणालाही काहीही करता आलं नाही.

सगळ्यांची कुचेष्टा करण्यात, त्यांची नक्कल करण्यात सरवटे पटाईत होता. प्रत्येकाला त्याने कु़चेष्टेने काही ना काही टोपणनाव ठेवले होते.

एकदा आॅफिसमध्ये जेवणाची पार्टी करण्याचं ठरलं. सगळ्यांनी मिळूनच स्वयंपाक करायचा होता, म्हणून मंगलाबाईंनी व निशाने आपल्या घरून स्वयंपाकासाठी लागणारी मोठी पितळी भांडी आणली होती. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी मिळून आनंदानं स्वयंपाक केला. अगदी आनंदात सगळ्यांची जेवणं झाली. बासुंदी-पुरीचा बेत केला होता. दिवसभर सगळा कार्यक्रम हसतखेळत पार पडला. नाईटवाॅचमन सगळी भांडी घासून ठेवणार होता, म्हणून भांडी उद्या घेऊन जाऊ असं म्हणून मंगलाबाई व निशासुद्धा घरी गेल्या. दुसर्‍या दिवशी आॅफिसमध्ये येऊन बघतात तो काय, सगळी पितळी भांडी चोरीला गेलेली! आता घरी काय सांगायचं म्हणून दोघींचंही धाबं दणाणलं. नाईटवाॅचमन म्हणून मलुष्टेकाकांची ड्यूटी होती. सगळं खापर त्यांच्यावर फोडलं गेलं न् त्यांच्याकडून भरपाई करून घेतली गेली. तरी चोरी काही सापडली नाही. सरवटे नामानिराळा राहिला; पण सगळ्यांना खात्री होती हे काम सरवटेचंच! 

"मला कोणी हात लावू शकत नाही, माझं कोणी वाकडं करु शकत नाही", ही त्याची दर्पोक्ती वाढत चालली होती! शिवाय "असले छपन्न साहेब वाटेला लावलेत" हे एक पालुपद त्याला जोडलेलं असायचंच!

जुनं, न लागणारं फर्निचर स्टाॅकमध्ये टाकलं जायचं. एकदा स्टाॅकमध्ये ते गेलं की त्याच्याकडे पुन्हा कोणी बघते नसे. मग सवडीने त्या फर्निचरला पाय फुटत आणि ते सरवटेच्या घरी जाऊन पडत असे. अशी आॅफिसची कितीतरी स्टेशनरी, कागद, कोरी रजिस्टरं सरवटेच्या घरी जाऊन पडत.

रोज दुपारी क्लासफोर मंडळीनी पँट्रीत सगळ्या स्टाफसाठी चहा बनवण्याची परंपरा होती. सगळी पुरुषमंडळी चहा प्यायला पँट्रीत जात; पण महिला कर्मचार्‍यांना टेबलवर चहा आणून दिला जाई. सरवटेने मात्र हे करणं बंद केलं. स्त्रियांना चहा नेऊन देणं त्याच्या अहंकाराला दुखावणारं वाटे. मग सगळ्या स्त्रिया पँट्रीत जाऊन एका बाकावर बसू लागल्या. मग मात्र त्यांच्या हातात चहा नेऊन देणे सरवटेला भाग पडले. एक दिवस सगळ्या स्त्रिया चहा घ्यायला पँट्रीत गेल्या आणि पाहतात तर काय, तर ज्या बाकावर त्या बसायच्या, त्या बाकाला उलटे खिळे ठोकून ठेवलेले! सगळ्या पँट्रीत शांतता पसरली. सगळ्यांना कळलं की ते कोणी केलंय; पण कोणीही काहीही बोललं नाही. 

विजय स्पर्धापरीक्षेला बसलाय हे सरवटेला माहित होतं. तो विजयला नेहमी म्हणत असे, "तुमचं काही खरं नाही राव! ती परीक्षा म्हणजे काय पोरखेळ वाटला काय तुम्हाला? चार न् पाच वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच ती परीक्षा पास झालं नाही. बोरकर भाऊसाहेब, ईनामदार भाऊसाहेबांनी तर सगळे पाचही चान्स घेतले तरी त्यांचा नंबर लागला नाही!"

विजय ते ऐकून घेत असे व जास्तच जिद्दीने अभ्यास करीत असे. जात्याच हुशार असल्यामुळे विजय पहिल्या़च प्रयत्नात ती परीक्षा पास झाला आणि त्याच आॅफिसमध्ये पोस्ट व्हेकंट असल्यामुळे त्याला तिथल्यातिथे ताबडतोब प्रमोशन मिळाले. अवघी पाच वर्षं सर्व्हिस झालेलं, अजून पुरतं मिसरूडही न फुटलेलं हे गुडघ्याएवढं पोरगं आपला बाॅस झालेलं बघून सिनीअर लोकांना हे पचवणं जसं जड जात होतं तसंच सरवटेसारख्या सिनीअर क्लासफोरला सुद्धा ते जड जात होतं!

मग मुद्दामच त्याने सांगितलेली कामं न ऐकणं वगैरे प्रकार त्याने सुरू केले. साहेबलोकांना चहा नेऊन देताना मुद्दाम विजयला वगळणे, त्याने काही काम संगितलं तर ते न करणे, त्याच्याशी बोलत असलं तरी भलतीकडेच पाहणे असे प्रकार सुरु केले; पण विजयने सुरवातीपासून सरवटेचं सगळं वागणं पाहिलं होतं. सगळ्या घटना त्याला माहित होत्या. सरवटेला अद्दल घडवायचीच असा त्याने निश्चय केला. तरूण रक्त आणि नुकतंच अधिकारपद हाती आलेलं त्यामुळं त्याला कामाचा उत्साह होता शिवाय लिखापढी करायचा त्याला कंटाळा नव्हता. त्याने सर्व घटना लिंक अप केल्या, कागदोपत्री पुरावे जमा केले, स्टॉकमधल्या फर्निचरचे व्यवस्थित रेकाॅर्ड तयार केले, स्टेशनरीचं ऑडिट करण्याची पद्धत बसवली व त्याची जबाबदारी आलटून पालटून स्टाफ मेंबर्सना दिली. सरवटे रागाने धुमसत होता; पण साहेबाविरुद्ध त्याला फार काही करता येत नव्हतं. त्याच्या क्लास फोर सहकर्मचार्‍यांमध्ये त्याची बडबड मात्र चालू असायची. एक दिवस बोलता बोलता "पुढच्या सोमवारी साहेब ऑफिसात येईल तेव्हा ह्या सरवटेचा इंगा दिसेल त्याला" असं तो म्हणून गेला. 

मलुष्टे काकांनी दुपारचा चहा देताना विजयच्या कानावर ही गोष्ट घातली. विजयने लक्षपूर्वक ऐकून घेतलं; मग मंदस्मित करत म्हणाला,"थँक यू मलुष्टे काका. मी पाहतो काय करायचं ते."

शुक्रवारी सकाळी सगळा स्टाफ ऑफिसमध्ये आला आहे हे पाहून विजय केबिनच्या बाहेर येऊन ऑफिसच्या मधोमध उभा राहिला आणि त्याने मोठ्याने सरवटेला हाक मारली. सगळ्यांनी काम थांबवून चमकून वर पाहिले. सरवटेही हातातले काम थांबवून उभा राहिला. काहीतरी विपरीत घडतंय हे त्याला जाणवलं. हळू-हळू चालत तो विजयकडे आला. तो जवळ आल्यावर विजयने त्याच्या हातात एक लिफाफा ठेवला. सरवटेनं प्रश्नार्थक मुद्रेने विजयकडे पाहिले.

"तुमच्या बदलीची ऑर्डर आलीय", विजय शांतपणे त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवून म्हणाला.

सरवटेच्या डोळ्यात अंगार उसळला आणि तो रागाने विजयकडे पाहात राहिला. विजयही पापण्या न झुकवता त्याच्या डोळ्यांमध्ये पाहात राहिला. सगळा स्टाफ जणू श्वास रोखून पाहात होता. ऑफिसमध्ये टाचणी पडली तर आवाज होईल अशी शांतता पसरली.

"तुमच्यावर आणखी काही अ‍ॅक्शन घेऊ नये अशी विनंती मी साहेबांना केली होती", विजय शांतपणे म्हणाला.

सरवटेला हळूहळू परिस्थितीची जाणीव झाली. त्याच्या पापण्या झुकल्या, मग्रूरीने पुढं काढलेली छाती आत गेली आणि खांदे पडले. खाली बघून पाय ओढत चालत जाऊन तो जागेवर बसला.

एका क्लासफोरचं साम्राज्य उधळलं गेलं होतं.


- निर्मला नगरकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा