आजोबांची ओसरी (गप्पागोष्टी भाग १)

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १ 

आजोबांची ओसरी मधील गोष्ट येथे एक ऑडिओ स्वरूपात:


माझ्या छोट्या मित्रांनो, या अंकापासून मी तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला येणार आहे. कसं आहे, मला तुम्ही अरुण आजोबा म्हणून हांक मारू शकता. मला तुमच्याच सारखे छोटे आणि गोड नातू, नात आहेत. ते घरी आले की मी त्यांच्याशी गप्पा मारतो. आम्ही खूप मजा करतो.

आजकाल नुसत्या गप्पा अशा कधी होतच नाहीत नां? शाळेत टीचर अभ्यासाचे बोलते. घरी आई बाबा त्यांच्या कामात असतात, किवा थकून विश्रांती घेत असतात. तुम्ही नुसत्या गप्पा करायला गेलात तर अभ्यासाचे विचारतात, हो नां? आणि शाळेतले किवा बाहेरचे मित्र मैत्रिणी? प्रत्येकाचे आपापले उद्योग म्हणजे अभ्यास नसेल तेव्हा कार्टून्स, किंवा मग मोबाईलवर गेम्स! होय नां?

काय आहे मित्रांनो, अभ्यास, खेळ, टीव्ही सगळे थोडे थोडे हवेच की! तसेच केवळ गप्पा देखील हव्याच! आणि आपल्याला नेमका जेव्हा वेळ असेल, तेव्हा कोणाशी बोलायला मिळेलच असे नसते नां? अशा वेळेस पुस्तक हे आपले बेस्ट मित्र असते! पुस्तक आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी सांगते, अभ्यासाशिवाय दुसरे काही मजेदार शिकवते. आणि हो! कधी आपले म्हणणे पटले नाही तर मित्र देखील आपल्याशी वाद घालतो की नाही? पुस्तक मात्र कधीच तुमच्याशी भांडत नसते. तुमचे मन गुंतवून ठेवणे, छानछान माहिती देणे एवढेच ते न चुकता करते!

म्हणूनच पुस्तकासारखा दुसरा चांगला मित्र नाही असें म्हणतात. आपले ऋतुगंध आपल्याला भेटायला वर्षातून सहा वेळा येतं की नाही? मला सांगा कोण कोण याची वाट पहात असतो? ऋतुगंध आल्याबरोबर आई कडून किंवा बाबांकडून तुम्ही त्यातला छोट्यांचा विभाग वाचून घेत असाल! किंवा स्वत:ही वाचत असाल? बरोबर नां? मला माहीत आहे ते! म्हणूनच मी ठरविलं, की मी सुद्धा नवीन छोटे मित्र मिळवतो. म्हणजे ऋतुगंधमध्ये तुम्हाला भेटायला दर अंकात यायचं असं! मग आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू! आता तुम्ही म्हणाल, पण अरुण आजोबा, आम्ही तुमच्याशी कसे बोलणार? ते सोप्पे आहे. ऋतुगंध येण्याच्या आधी तुम्हाला कुठल्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत, किंवा काय नविन मजेदार वाचायला आवडेल ते, आई किंवा बाबांना सांगून ऋतुगंध संपादकांकडे पाठवा. म्हणजे त्यांचेकडून मला ते समजेल आणि मी हव्या त्या गप्पा घेऊन येईन! चालेल? मग आपण करून बघूया तसे.

मग आज काय सांगू तुम्हाला? असं करुया, या अंकाचा विषय आहे “प्रेम”. तुमचे आईबाबा तुमच्यावर प्रेम करतात म्हणजे नक्की काय करतात? लोभ करतात, गोड गोड खाऊ, नवीन कपडे आणतात. बरोबर? तुम्ही सुद्धा त्यांच्यावर प्रेम करता? होय नां? तुम्ही त्यांना काय देता? गोड पापी? किवा प्रेमाने जवळ घेऊ देता, बरोबर? दिलेली वस्तू काहीही असो, कितीही महाग किवा स्वस्त असो! ती आपल्यासाठी कोणी मुद्दाम आणली आहे हे किती छान वाटते नाही? मी तुम्हाला प्रेमाचीच गोष्ट सांगतो! या गोष्टीमध्ये सुद्धा मुलांनी आईसाठी काही तरी भेट आणली होती. 

काय झाले, की एका गावात एक गरीब बाई रहात होती. गरीब असली तरी मनाने श्रीमंत होती हो ती! म्हणजे काय ते तुम्ही आईला नक्की विचारा हं! तर तिचे नांव होते लक्ष्मी! तिला तीन मुले होती. सगळ्यात लहान रामा, मधला शिवा, आणि मोठा गोविंदा. लक्ष्मी जरी गरीब असली तरी सणाच्या दिवशी नेहमीच जशा जमेल तशा मुलांसाठी भेटी आणायची. त्या मिळाल्या की तिघेही भाऊ अगदी आनंदून जायचे. आईचे आपल्यावर एवढे प्रेम आहे याचा आनंद असायचा तो! 

“उद्या आईचा वाढदिवस आहे” मोठा गोविंदा भावांना म्हणाला. “आई नेहमीच आपल्याला भेटी देते. आपण सुद्धा तिला काहीतरी दिले पाहिजे.” 

“ हो! देऊ या!” लहाना रामा म्हणाला.

“पण आपल्याकडे तर पैसेच नाहीत. आपण काय आणणार?” मधला शिवा म्हणाला.

“आपण नाण्यांच्या पेटीत बघुया किती जमलेत ते.” मोठा गोविंदा म्हणाला.

आईने खाऊसाठी दिलेले एकेक दोन दोन पैसे ते तिघेही त्यांच्या नाण्याच्या पेटीत ठेवायचे. त्यामध्ये त्यांना चांगले तीन रुपये मिळाले. 

प्रत्येकाने एकेक रुपया घ्यायचा. उद्या प्रत्येकाने आईसाठी काहीतरी भेट आणायची असे ठरले.

लक्ष्मीने त्यांचे हे बोलणे ऐकले. मुले जमविलेली मोठी रक्कम आपल्या प्रेमासाठी खर्च करायला तयार झालीत हे बघून तिला खूप आनंद झाला. भेट देतांना किती किमतीची भेट दिली हे महत्वाचे नसून त्या भेटीने समोरच्याला आनंद व्हावा हे महत्वाचे असते. हे मुलांना समजावणे आवश्यक होते. त्याच बरोबर त्यांना मजेदार कोडे देखील घालायचे असे तिने ठरवले.

“मुलांनो! तुम्ही मला वाढदिवसाची भेट देणार आहात हे मी ऐकले. परंतु त्यासाठी तुम्ही तुमची जमवलेली पूर्ण रक्कम संपवून टाकावी असे मला वाटत नाही. तुम्ही काही पण आणले, किंवा नुसतेच लोभाने माझ्या जवळ आलात तरी मला तुमचे प्रेम समजेल.”

“नाही आई! आम्ही काहीतरी आणूच तुझ्यासाठी.” तिघेही एकासुरात म्हणाले.

“ठीक आहे. पण माझी एक अट आहे. प्रत्येकाने फक्त एक आणा खर्च करायचा. आणि असे काहीतरी आणायचे की आपली ही खोली पूर्ण भरून गेली पाहिजे!”

“असं कसं शक्य आहे? एका आण्यात फार फार तर चार गोड गोळ्या येतील. खोली कशी भरणार?” मोठ्या गोविंदाने विचारले.

“ते मला काही माहीत नाही. तुम्ही बाजारात जा आणि शोधा.” लक्ष्मी म्हणाली.

दुसऱ्या दिवशी एकेक आणा घेऊन ते तिघे बाजारात गेले. मधला शिवा आणि मोठा गोविंदा यांनी स्वत: विचार करून एकेक भेट विकत घेतली. परंतू लहानग्या रामाला काहीच सुचेना. त्याने दोघा भावांना विचारले, की एक आण्यात मी काय घेऊ. परंतू ते त्याची मदत करू शकले नाही. थोडावेळाने तिघेही घरी आले. 

“आणली कां माझी वाढदिवसाची भेट? दाखवा पाहू! पण माझी अट लक्षात आहे नां? त्या भेटीने आपली पूर्ण खोली भरून गेली पाहिजे.” लक्ष्मीने विचारले.

“हो आई. बघच तू!” शिवा आणि गोविंदा म्हणाले.

शिवाने त्याची पुडी उघडली. आतमध्ये सुंदर सुवासिक मोगऱ्याची फुले होती. ती आईला दिली. वाऱ्याच्या एका झुळकीबरोबर पूर्ण खोली सुगंधाने भरून गेली.

गोविंदाने पुडीतून एक पणती काढली. तीमध्ये कापसाची वात आणि थोडे तेल टाकून वात पेटवली. मंद प्रकाशाने खोली उजळून निघाली.

लक्ष्मी खूप आनंदली. तिने उत्सुकतेने लहान्या रामाला विचारले. “तू काय आणले बेटा?” रामा काहीच नं बोलता हिरमुसल्या चेहऱ्याने गप्प उभा राहिला. ते पाहून लक्ष्मीने ओळखले की रामाने काहीच आणले नाही. तिने दोन्ही हात पसरून त्याला कडेवर घेतले आणि त्याचा खूप लोभ केला. तेव्हा रामाने देखील घट्ट मिठी मारून आईला एक पप्पी दिली. ते बघून लक्ष्मी आनंदाने हसू लागली. तेव्हा रामा सुद्धा मघाचा हिरमुसलेपण विसरून खळखळून हसला. त्या दोघांचे निर्व्याज हसणे बघून शिवा आणि गोविंदा दोघे हसू लागले आणि आईकडे गेले. लक्ष्मीने तिघांनां जवळ घेतले आणि ते सगळे मोठमोठ्याने हसू लागले.

“मुलांनो, तुमच्या तीनही भेटी मला खूप आवडल्या. शिवाने फुलांच्या सुगंधाने घर भरून टाकले. गोविंदाने प्रकाशाने ते उजळले. आणि लहान्या रामाने तर कमालच केली. काहीच खर्च न करता त्याने केवळ प्रेमाने वागून नुसते घरच नाही तर आपणा सगळ्यांना आनंदाने भरून टाकले. माझे तुम्ही खूप लाडके आहात!”

आपली मुले यातून खूप मोठे शिकली याची लक्ष्मीला खात्री पटली. 

तर अशी होती ही प्रेमाच्या भेटीची गोष्ट! मित्रांनो यातून तुम्ही काय शिकलात ते नक्की आईला सांगा बरे. आणि हो, पुढच्या अंकात तुम्हाला अरुण आजोबांकडून काय ऐकायला आवडेल ते नक्की कळवा.

पुन्हा भेटू!

-अरुण मनोहर


२ टिप्पण्या: