आयुष्य

जन्म - मृत्यूच्या मधलं अंतर
म्हणजे आयुष्य असतं
पण ते अंतर कापणं
एवढं सोपं नसतं

जवळीक साधण्यासाठी
थोडं अंतर ठेवावं लागतं
नाती तुटू नयेत म्हणून
'ना' त्यात राहावं लागतं

ओळख असूनसुद्धा
अनोळखी व्हावं लागतं
शब्दाला किंमत राहावी म्हणून
थोडं मौन बाळगावं लागतं

डोळ्यातील अश्रू आवरून
ओठांवर हसू आणावं लागतं
सुखाची किंमत कळावी म्हणून
दुःख हे भोगावच लागतं

सतत सुखाच्या शोधात फिरतो
ते सुख तरी आपलं कुठे असतं ?
आपल्या माणसाच्या सुखातच
आपलं सुख दडलेलं असतं !

काही कमावण्यासाठी
काही गमवावं लागतं
आयुष्य जगण्यासाठी
सतत मरावं लागतं

कठीण चढ चढून उंचावर जावं
तरी दऱ्यांचंच दृश्य दिसतं
उंच शिखरावर उभे राहिलो
तरी आकाश मात्र लांबच असतं

दुसऱ्याचा वेध घेताना
आपलंही आयुष्य संपत असतं
पकड घेतली तरी सुटून जाणारं आयुष्य
मुठीत पकडलेल्या वाळूसारखं असतं

उलगडत गेलो तरी गुंतत जातं
कधीही न सुटणार ते कोडं असतं
सार काही मिळवण्याच्या संघर्षात
आयुष्य जगायचं मात्र राहूनच जातं

मायेच्या मोहपाशात अडकलेलं
नात्यांच्या धाग्यात जखडलेलं
त्या सूत्रधाराच्या तालावर नाचणारं
आयुष्य असतं एका कठपुतळीसारखं

बंधनात जखडलेल्या आयुष्याला
मोकळ्या नभाच आकर्षण असतं
पण जेंव्हा ते नभात विहरू लागतं
त्याच अस्तित्व संपलेलं असतं


- सौ. प्रिया पराग बेडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा