स्मृतीची विस्मृती

मूळ मानव निर्मित हा 'शब्द'
शब्दाला जोडलेला मानवी अर्थ 
अर्थात दडलेल्या मानवी भावना 
शब्दात कुठून आले हे सामर्थ्य?

शब्द म्हणजे ध्वनी लहरी
चढ-उतार हा त्यांचा स्वभाव 
श्रवणेंद्रियापासून ह्रदयापर्यंत
सूक्ष्म असा त्यांचा प्रभाव!

श्रवणेंद्रिय करी ग्रहण-कार्य 
मेंदू शोधे साठवणीत
बुद्धी करी तर्क-वितर्क 
ठेवी शब्दार्थ आठवणीत!

ह्या सगळ्या प्रक्रियेत 
मनाला कुठे कळतात शब्द?
भाव समजून घेउन मन
कसे करी प्रतिक्रिया व्यक्त?

मन जणू मुक्त पक्षी 
मर्यादा मात्र शब्दाला
स्मृतीची घडवून 'योग्य' विस्मृती
जपावे आपल्या मनाला!

- वैशाली मारटकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा