“कवी शब्दांचे ईश्वर” साकारताना…

ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३

“आपण जन्माला आल्याचे सार्थक झाले असे वाटावे” अशी भावना मनात निर्माण करणारे काही क्षणच माणसाच्या वाट्याला आले तर किती समाधान वाटते याचा अनुभव आम्ही एका निर्मितीद्वारे घेतला 'कवी शब्दांचे ईश्वर' ही दूरदर्शन मालिका आम्ही २००५ साली मुंबई दूरदर्शन वरून सादर केली. ही मालिका महाराष्ट्रातील १३ प्रथितयश कवींवर होती.मालिकेला मराठी रसिक प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. खूप जणांनी तिचे चांगले स्वागत केले. मालिका अतिशय गाजली त्यामुळेच या मालिकेने माधवी वैद्य या नावाला काही अर्थ प्राप्त झाला. मालिका लेखक,कलावंत,समीक्षक ,कवी या साऱ्यांच्याच पसंतीला उतरली. सर्व सामान्य वाचकांनाही या मालिकेने खिळवून ठेवले.आपले आवडते कवी,त्यांचे घर,त्यांचे समीक्षक, त्यांच्या गायल्या गेलेल्या कविता,त्यांचे काव्य वाचन,त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग या साऱ्या साऱ्या बद्दलचा त्यांच्या मनातला औत्सुक्यभाव या मालिकेमुळे पूर्ततेस गेला.मुख्य म्हणजे कवींनी केलेले कविता वाचन ऐकताना ,त्यांची जडण घडण कशी झाली ते ऐकताना त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या हे समजून घेताना रसिकांना बरेच काही मौलिक हाताला लागल्यासारखे वाटले. एकूण या मालिकेची संकल्पनाच कवयित्री शांता शेळके, मंगेश पाडगावकर, ना.धों.महानोर यांच्यासारख्या दिग्गजांना भावून गेली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी तर या मालिकेला भरभरून आशीर्वाद दिले होते. 

एकुणात काय तर ही मालिका सर्वार्थाने गाजली. या मालिकेची आठवण आजही रसिकांच्या मनात जागी आहे. अजूनही ही मालिका बघण्याची इच्छा अनेकांच्या मनात आहे; आणि हेच या मालिकेचे यशही आहे. ही मालिका जेव्हा दूरदर्शन वरून दाखवण्यात येत होती तेव्हाही ती लोकप्रियतेच्या निकषावर दुसऱ्या क्रमांकावर होती, हे विशेष! हे सर्व यश नजरेच्या टप्प्यात आल्यावर या मालिकेसाठी घेतलेले सर्व परिश्रम अगदीच सुसह्य वाटायला लागले. एखाद्या केलेल्या परिश्रमातून त्या कार्याची चांगली फळे मिळणे ही भाग्याची गोष्ट असते. त्या भाग्याचे आम्ही धनी ठरलो. जे काम खरे तर महाराष्ट्र सरकारने करायचे ते काम आमच्या हातून झाले; ही भाग्याचीच गोष्ट नव्हे काय? या गोष्टीचा फार सार्थ अभिमान आमच्या मनात आहे हे मात्र खरे! या दिग्गज कवींपैकी कितीतरी कवी आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. काही काळानंतर त्यांच्या आठवणीही काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांचे काव्य वाचन प्रभावी होते म्हणजे काय? नारायण सुर्व्यांसारखे कवी जगाताना दाहक अनुभवातून गेले म्हणजे काय? ग्रेसची मनस्विता कशी होती? सुरेश भट यांची काव्य गायनाची पद्धती कशी होती? या साऱ्याचा अनुभव रसिकांना देणारी ही मालिका होती. हे सारे प्रतिभावंत, त्यांचे काव्य, त्यांच्या भावमुद्रा,भावतंद्री आम्ही आमच्या छायाचित्रणात बद्ध करू शकलो, हे आमचे भाग्यच म्हटले पाहिजे. 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये मराठी भाषेच्या संस्मरणासाठी असे प्रयत्न सजगपणे झाले पाहिजेत म्हणून हा प्रयत्न आम्ही आमच्या परीने केला. आता या मालिकेतील तेरा कवींपैकी फक्त ना.धों.महानोर हे कवीच फक्त हयात आहेत. त्यांनी या मालिकेचे कौतुक सगळ्यांपाशीच केले होते. शांता शेळके यांनी या मालिकेचा प्रत्येक एपिसोड आवर्जून बघितला होता. जयंत साळगावकर यांनी ही मालिका बघितल्यावर म्हटले होते, "या मालिकेनी तुमचे बँक खाते खाली केले हे खरे आहे; पण वरती परमेश्वरानी तुमच्या खात्यावर बरेच पुण्य जमा केलेले आहे हे निश्चित समजा." असो, पण सर्वांच्या आशीर्वादाने व आमच्या अथक परिश्रमाने, चिकाटीने हे मोठे काम पूर्णत्वास गेले हे मात्र खरे! त्या मालिकेच्या निर्मितीच्या वेळचे काही क्षण आपल्या हाती देताना आज विशेष आनंद होत आहे. 

=========================================================

श्री गणेशा

आपले आयुष्य सार्थकी लागावे, आयुष्यात आपल्या हातून काही चांगले काम व्हावे, असे खरे तर प्रत्येकालाच वाटत असते. पण त्यासाठी आयुष्यात काही भाग्ययोग देखील यावा लागतो. असा भाग्ययोग आला तर आपल्या हातून काही "लाईफ टाईम अचीव्हमेंट"चे काम होऊ शकते; आणि असा भाग्य योग जुळूनच यावा लागतो. मला वाटते तो अचानक ध्यानीमनी नसतानाच जुळून येतोही. तसाच भाग्ययोग माझ्या आयुष्यात जुळून आला असेच म्हणावे लागेल. कसा ते सांगते.....

त्या वेळी मी फर्गसन महाविद्यालयात नुकतीच रुजू झाली होते. मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून एका नव्या कारकीर्दीला सुरुवात करताना तशी खरे तर जरा भीतीच वाटत होती. कारण पुणे विद्यापीठात (आताचे सावित्री बाई फुले विद्यापीठ) एम.ए.करताना आम्हाला फार नामवंत प्राध्यापक शिकवायला होते. आतासुद्धा त्यांची नावे मनात येताच त्यांच्या बद्दलचा आदर मनात दाटून येतो. डॉ.रा.शं.वाळिंबे त्या वेळी मराठी विभाग प्रमुख होते. डॉ.भा.दि.फडके, डॉ.आनंद यादव यांसारखी दिग्गज मंडळी आम्हाला विविध विषयांच्या अध्यापनाला होती. त्यांच्यासारखे अध्यापन करणे आपल्याला जमेल? अशी काहीशी भीती म्हणा, दडपण म्हणा मनावर होते. डॉ.भा.दि.फडके हे माझे पी.एच.डी.चे मार्गदर्शक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून मी "चिं.त्र्यं. खानोलकरांच्या समग्र वाङमयाचा अभ्यास" हा प्रबंध पूर्ण केला. त्या प्रबंधाला त्या वर्षीचे उत्कृष्ट प्रबंधासाठीचे डॉ.वि.रा.करंदीकर पारितोषिक मिळाले. मला सरांनी नुसतेच पी.एच.डी.च्या विषयाचे मार्गदर्शन केलेले नव्हते; तर साहित्याकडे बघण्याची एक वेगळी द्दष्टीही दिली होती. अभ्यासाच्या पद्धतीला शिस्त लावली होती. त्यामुळेच सरांबद्दल मनात आदरभावही होता. ज्या दिवशी फर्गसन महाविद्यालयात शिकवायला जायचे होते, त्या दिवशी सरांचा आशीर्वाद घ्यायला मी सरांच्या घरी गेले. सरांनी भरभरून आशीर्वाद तर दिलाच पण त्याच बरोबर एक मोलाचा सल्लाही दिला होता, "प्राध्यापक म्हणून काम काराताना आपले शिकवणे आणि आपण, इतक्यावरच लक्ष केंद्रित करा. आपलं शिकवणं झालं की तडक लायब्ररीत जाऊन बसा. शक्यतो आपल्या अभ्यासावरच सारे लक्ष्य केंद्रित करा." सरांचा हा मोलाचा उपदेश मी शिरोधार्य मानला. माझा तास झाला की मी तडक लायब्ररी गाठायची. या आधी अभ्यास म्हणून वाचन केलेले होते, आता "रियाज" म्हणून वाचन सुरू झाले.फर्गसन महाविद्यालयात डॉ.गं.ना.जोगळेकरांसारखी व्यक्ती विभागप्रमुख म्हणून लाभली होती. त्यांच्या करड्या शिस्तीखाली अध्यापन करण्यात एक वेगळीच परीक्षा होती. आता अशी निष्ठावान माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. नोकरीला लागल्यापासून जोगळेकर सरांनी काही खास जबाबदाऱ्या माझ्यावर वेळोवेळी सोपवल्या. माझ्याकडे प्रामुख्याने "उपयोजित मराठीचा" अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी त्यांनी सोपवली होती. माझ्या समजुतीप्रमाणे पुणे विद्यापीठाने हा अभ्यासक्रम अगदी नव्यानेच सुरु केला होता,आणि तो सर्व प्रथम फर्गसनमध्ये सुरु झाला होता. हा विषय शिकवण्यासाठी त्या प्रध्यापाकाजवळ काही वेगळी पात्रता, कौशल्ये असण्याची आवश्यकता होती जी माझ्या जवळ आहेत असे सरांना वाटत होते. उदा.आकाशवाणी, दूरदर्शन, माहितीपटाचे संहिता लेखन, रंगमंचीय सादरीकरण्याचा अनुभव व अशा अनेक गोष्टी त्या वेळी डॉ.भा.दि.फडके यांच्याच प्रोत्साहनामुळे मी तेव्हा करत होते. डॉ.फडके सरांच्या आग्रहामुळेच मी पुणे विद्यापीठाच्या ई.एम.आर.सी.द्वारा संचलित संहिता लेखनाचा एक महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्या कोर्सच्या अध्य्यापिका होत्या अमेरिकेच्या शर्ले व्हाईट.द्द्कश्राव्य माध्यमासाठी संहिता लेखन कसे करावे याचा सराव त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांकडून इतका उत्कृष्टरित्या करून घेतला होता की त्या शिदोरीवर मी पुढे आत्मविश्वासाने काम करू शकले. पुढील काळात (२००५ साली) मी दिग्दर्शित केलेल्या "इट्स प्रभात" या माझ्या माहितीपटाला राष्ट्रपती पारितोषिक मी मिळवू शकले, त्याचा भक्कम पाया या कोर्स मध्ये घातला गेला असावा. आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि माहितीपट यांचा भक्कम अनुभव गाठीशी बांधून मी फर्गसन महाविद्यालयाच्या "व्यावहारिक व उपयोजित मराठी"चा अभ्यासक्रम शिकवायला प्रारंभ केला. 

हळूहळू मी फर्गसन महाविद्यालयात स्थिरावले. डॉ.जोगळेकरांनी माझ्यावर एम.ए.ला शिकवण्याचीही जबाबदारी टाकली. ही माझ्या आजवरच्या अध्यापनाला त्यांनी दिलेली एक चांगली दादच होती. माझ्यावर इतर काही विषयांबरोबरच "विशेष लेखकाचा अभ्यास" (स्पेशल ऑथर) शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली. त्या वर्षी कवी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचे साहित्य त्या विषयासाठी लावले होते. माझ्या नशिबाने त्या वर्षी वर्गात फार हुशार मुली होत्या. अभ्यासक्रम जवळ जवळ शिकवून पूर्ण होत आला होता. तोवरच जोगळेकर सरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेऊन सांगितले, "हे बघा आपल्या महाविद्यालयात गुरुवर्य रा.श्री .जोगांची पुण्यतिथी आपण दरवर्षी साजरी करतो. या वर्षी या निमित्ताने काही वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम तुम्ही बसवा." जोगळेकर सरांनी एखादी गोष्ट सांगितली की आम्ही तिचे आज्ञा समजून पालन करीत असू; नाही म्हणण्याची सोय नसेच. मला देखील हे एक प्रकारचे आव्हानच वाटले. मी विचार केला कुसुमाग्रजांचा काव्य प्रवासच या निमित्ताने सादर करावा. याची संहिता विद्यार्थ्यांना लिहायला सांगावी, ज्या योगे विद्यार्थ्यांनाही संहिता लेखन कसे करायचे ते आपोआपच शिकता येईल; आणि दुसरे म्हणजे त्यामुळे त्यांचा अभ्यासही पक्का होईल. एक ते दीड तासात एखाद्या कवीचा काव्य प्रवास मांडायचा म्हणजे काय? याचा विचार करताना त्यांचा विषय आपोआप तोंडपाठ होईल. विषयाचे मनन चिंतन होईल. आपले विद्यार्थी हुशार आहेत, मेहनती आहेत. त्यांना हे नक्की जमू शकेल असा विश्वास देखील मनामधे होता. हे जास्त महत्त्वाचे होते. मी सर्वच विद्यार्थ्यांना संहिता लिहायला सांगितले. विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना कुसुमाग्रजांच्या एकेक काव्यप्रवाहाविषयी लिहायला सांगितले. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन केले हे विशेष. त्या साऱ्याचे संकलन करण्याची जबाबदारी सुजाता आफळे (आत्ताची डॉ.सुजाता शेणई) हिच्यावर टाकली व तिने तिची कामगिरी अगदी चोख बजावली. जोगळेकर सरांनी हा प्रकल्प राबवताना मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मग हळुहळू कलाकारांची जमवाजमव झाली. आत्ताची ख्यातनाम अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (तेव्हाची मृणाल देव) फर्गसनमधे एम.ए. करत होती. त्या वेळी ती "स्वामी" या दूरदर्शन मालिकेत रमाबाईची भूमिका साकारत होती. आत्ता सर्वत्र नाव मिळवलेला अभिनेता योगेश सोमण देखील फर्गसनमधे होता. वैशाली आणि विक्रम पेंढारकर हे दोघे बहीणभाऊ महाविद्यालयात शिकत होते. मनीषा पवार (आत्ताची मनीषा जोशी), माझे सहअध्यापक डॉ.अरविंद वामन कुलकर्णी यांचा मुलगा अभय कुलकर्णी हा देखील या प्रकल्पात सामील झाला. हे सर्व कलाकार काही तरी नवीन सादरीकरणाचा प्रकार आपण बसवणारआहोत, या ओढीने या कार्यक्रमात सामील झाले. डॉ.अरविंद वामन कुलकर्णी, डॉ.हरिश्चंद्र निर्मळे हे देखील अत्यंत ममत्वाने लागेल ती मदत देऊ करीत होते. माझ्या बरोबर अध्यापनाचे काम करणारी सौ.वैजयंती चिपळूणकर होती. तिनेही मदत केली. दि.२१ फेब्रु.हा दिवस उजाडला आणि आम्ही "शब्दोत्सव" हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांवरील कार्यक्रम फर्गसनच्या रसिकप्रिय अॅम्फीथिएटरमध्ये सादर केला. त्या प्रयोगाला पुण्यातील कवी, नाटककार, समीक्षक, लेखक, माजी विद्यार्थी सर्वजण प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. प्रयोग फारच देखणा झाला. सर्वांच्या पसंतीस आला. इतका की जोगळेकर सरांनी परत एकदा त्याचा प्रयोग "वन्समोअर" म्हणून महाविद्यालयातच ठेवला आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

आता अशा प्रकारचे खूप प्रयोग होतात. अगदी प्रथितयश कलाकारांना घेऊन खूप कार्यक्रमही होतात. मध्ये "झी मराठी" वाहिनीने "नक्षत्रांचे देणे" हा लोकप्रिय कार्यक्रम केला. तोही रसिक मान्य झाला; पण त्याच्या आधी कितीतरी वर्षे आम्ही "शब्दोत्सव" हा त्याच धर्तीचा कार्यक्रम केला होता; हे अभिमानाने सांगावेसे वाटते. या कार्यक्रमाबरोबरच आणखी एक चांगली घटना घडली. ती म्हणजे अशाच प्रकारचे कवितांचे कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने "अनन्वय" या संस्थेची स्थापना आम्ही केली. पुढे अनन्वयमध्ये मृणाल कुलकर्णीची जागा आजची अत्यंत गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने घेतली. बी.एम.सी.सी. मधे शिकणारा नीलेश श्रीखंडे याचाही उल्लेख मला आवर्जून करायला हवा. तो अनन्वयमधे अगदी पहिल्या प्रयोगापासून सामील झाला आहे. तो एक उच्चशिक्षित, गुणी तबला वादक आहे. नीलेश सारखे आणखी एक नाव योगेश सोमण या गुणी कालाकाराचे. आज अनन्वयचे अनेक कलाकार अनेक ठिकाणी चमकत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. अनन्वयच्या स्थापनेला आता तीस वर्षे होतील, तरीही सर्व गुणी कलाकार अनन्वयने एकत्रितरित्या बांधून ठेवण्यात यश मिळवले आहे; ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे हे मात्र निश्चित! 

फर्गसन महाविद्यालायाच्या अॅम्फीथिएटरमध्ये झालेल्या "शब्दोत्सव" या कार्यक्रमाने "अनन्वय" या संस्थेचा पाया घातला. या गुणी कलाकारांना बरोबर घेऊन अनन्वयने पुढील काळात अनेक कवितांचे कार्यक्रम केले. यातून एक फार महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे या विद्यार्थी कलाकारांवर कवितेचे फार चांगले संस्कार झाले. त्यांना कविता या काव्य प्रकाराची गोडी लागली. त्यांचे अवांतर वाचन वाढले. हळूहळू कमळाच्या भोवती जसे भुंगे जमा होतात तसे चांगले कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊ लागले. मग एकापाठोपाठ एक कार्यक्रमांची आखणी होऊ लागली. बालकवींच्या जन्मशताब्दी निमित्ताने ज्ञानेश्वर समाधी सप्त शताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने, माधव जुलियानांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने, आरती प्रभू, रॉय किणीकर यांच्या स्मरणार्थ, शांता शेळके यांची बाल कविता, ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम, ग्रेस, आरती प्रभू, जी.ए.यांच्या प्रकृती साधार्म्यावर आधारित "सहोदर" हा कार्यक्रम, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर कार्यक्रम, अशी कार्यक्रमांची संख्या वाढत राहिली व अनन्वयचे नावही सर्वतोमुखी झाले. आम्हा सर्व कलाकारांच्या बाबतीत ही अत्यंत समाधानाची गोष्ट होती. या वाटचालीत फर्गसन मधील माझ्या बरोबर अध्यापन करणाऱ्यांचा मला खंबीर पाठिंबा होताच; पण स्वत:जोगळेकर सरांचाही खूप मोठा आधार होता. विक्रम पेंढारकर याने "शब्दोत्सव"ला संगीत दिले होते. त्याला कवितेची उत्तम जाण होती. हे सर्व सहभागी विद्यार्थी कलाकार अनन्वयला लाभणे, ते अनन्वयच्या रंग मंचावर घडणे, ही बाब आमच्या द्दष्टीने फार आनंददायी आणि भाग्याची गोष्ट होती. पुढे काही वर्षांनी एका गुणी संगीतकाराची साथ आम्हाला लाभली. त्या संगीतकाराचे नाव राहुल घोरपडे. अनुराधा कुबेर, मधुरा दातार, मनीषा पवार, मीनल फडके, वैशाली जोशी, राजीव बर्वे, राहुल धोंगडे असे गायक आणि योगेश सोमण, अयभ कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सोनाली साठे, संजय लघाटे, राजीव काटकर, संदेश कुलकर्णी इ.चांगले काव्य वाचक व निवेदक असा तेव्हाचा संच चांगला जमला होता. त्यामधे धनेश जोशी, धीरेश जोशी, डॉ.वृषाली पटवर्धन, अमृता कोलटकर, सक्षम कुलकर्णी, परिमल केळकर, केतकी करंदीकर अशा कितीतरी गुणी कलावंताची साथ वेळोवेळी मिळत गेली. किती तरी जणांची अखंड मेहेनत आणि साधना यामुळे अनन्वयची आजवरची वाटचाल जोमदार झाली. एका मराठीच्या प्राध्यापिकेनी उभारलेल्या या काव्य विषयक चळवळीला, ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा खटाटोप मांडला होता, त्या विद्यार्थ्यांनीच मनावर घेऊन यशस्विता बहाल केली हे विशेष. हे महाराष्ट्रातील महाविद्यालयातील एकमेव उदाहरण असावे. आज अनन्वयचे नाव सर्वतोमुखी करण्याचे श्रेय त्यातील कलावंतांना जाते. त्यांच्या घरातील सगळ्यांनाही जाते.

अनन्वयचाआता कोणता नवीन कार्यक्रम येतो आहे इकडे रसिक प्रेक्षकांचे लक्ष असे. अनन्वयने काही वर्षातच आपला असा खास श्रोतृवर्ग निर्माण केला होता. त्या काळात जे.डी.पानसे, मधु गानू अनन्वयला आर्थिक मदत करत असत. या दोघांचाही अनन्वयवर लोभ होता. मधुभाऊ सर्व कार्यक्रमांवर वडीलधाऱ्या दक्षतेने बारीक लक्ष ठेवून असत. न मागता आमच्या हातावर काही रकमेचा चेक ते ठेवीत असत. काही वेळा रसिकही मदतीचा हात पुढे करीत असत. माझी बाल मैत्रीण चारुशीला श्रीखंडे हिने अनन्वयच्या सुरवातीच्या काळात मला मोलाची साथ केली. घोरपडे यांचे घर, माझे माहेर यांनी आपले घर प्रॅक्टिससाठी दिले. या साऱ्या मदतीमुळे अनन्वयला बळ मिळत गेले. अनन्वय एका कौटुंबिक पातळीवर येऊ शकले. सारेजण काव्यात रमणारे, कवितेला साथ देणारे! या आमच्या कुटुंब कबिल्यात "स्नेह सदन"ची फादर जॉर्ज सारखी व्यक्तीही सहभागी झाली. तेव्हा अनन्वय एक "सांस्कृतिक साप्ताह" देखील साजरा करीत असे. "अनन्वय काव्य पुरस्कार"ही एका नवोदित कवीच्या पहिल्या काव्य संग्रहाला दिला जात असे. तो देखील आरती प्रभूंच्या नावाने! डॉ.प्रियदर्शन पोतदार, प्रकाश होळकर, डॉ.संगीता बर्वे, गणेश विसपुते हे चौघे या पुरस्काराचे मानकरी होते. अनन्वयच्या सांस्कृतिक सप्ताहात गुरु रोहिणी भाटे, विजय तेंडुलकर, डॉ.श्रीराम लागू, भक्ती बर्वे, मंगेश पाडगावकर, गजाननराव वाटवे, श्रीनिवास खळे, ना. धों.महानोर, अतुल पेठे, अरुण फिरोदिया, माधुरी जोशी, डॉ.चंद्रशेखर फळसणकर, विनिता पिंपळखरे, नीलम प्रभू, डॉ.किरण चित्रे, डॉ.सुचेता चापेकर, मालती पांडे, प्रभाकर भावे, व्यंकटेश माडगूळकर अशांसारख्या दिग्गज व्यक्ती अनन्वयमध्ये सांस्कृतिक सप्ताहात सामील होत असत. विशेष म्हणजे सर्वांना दुष्प्राप्य असणारे कवी ग्रेसही अनन्वयमध्ये आले होते. 

अनन्वयचे आधीचे नाव शब्दवेध असे ठेवले होते. पण नंतर ते नाव बदलून "अनन्वय फौंडेशन" असे ठेवण्यात आले. अनन्वय हा एक शब्दालंकार आहे. या अलंकाराचा अर्थ आहे "झाले बहु, होतील बहु, (असतील बहु); परंतु या सम हाच". आमचीही काम करताना हीच धारणा होती व आजही तीच आहे. आमच्यासारखे कार्यक्रम करणारे अनेक असतील पण आमची कोणाशीच स्पर्धा नाही. कारण अनन्वयचे कार्यक्रम कसे तर अनन्वय सारखेच! ही आमची भावना आहे. श्रद्धा आहे. आमचे लक्ष फक्त कामावर केंद्रित झालेले असते. म्हणूनच कार्यक्रम दर्जेदार होऊ शकतात आणि रसिकांच्या पसंतीस उतरतात. आत्तापर्यंत अनेक कवींवर केलेले कार्यक्रम आजही अनेकांच्या स्मरणात आहेत ते त्याच मुळे. अनन्वयच्या वाटचालीत योगायोगाने आणखी एक फार चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे अनन्वयला संगीतकार श्री.राहुल घोरपडे यांची मिळालेली साथ. अनन्वयच्या आजवरच्या सर्वच कार्यक्रमांना त्यांनी फार चांगले संगीत दिले आहे.

आता अनन्वयचे कार्यक्रम पुण्याच्या बाहेरही होऊ लागले. पुण्याच्या बाहेरून व्याख्यानमाला, वार्षिकोत्सव, शारदोत्सव अशा ठिकाणांहून देखील बोलावणी येऊ लागली. अनन्वयचा "गाणी बहिणाबाई" हा कार्यक्रम सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळानी तिथल्या कलाकारांबरोबर सादर करण्याचा मान मला दिला व तो चांगलाही झाला. त्या कार्यक्रमाने सिंगापूरच्या मराठी रसिकांची मने जिंकली. त्यानंतर अशाच प्रकारे म्हणजे सिंगापूरच्या कलाकारांची साथ घेत कवी बा.भ.बोरकारांवरही कार्यक्रम सादर करण्यात आला.आता रसिकांची मागणी ध्वनीफितीसाठीही होऊ लागली. मग काही कार्यक्रमांच्या ध्वनीफितीही आम्ही काढल्या. त्या अ.भा.साहित्य सामेलानात विक्रीसाठीही आम्ही ठेवू लागलो. संस्था स्वयंपूर्ण व्हावी म्हणून आम्ही आमच्या कडून केलेला हा एक लहानसा प्रयोग होता. त्यातून होणारी अर्थप्राप्ती आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी उपयोगी पडत असे. या सर्व वाटचालीत आम्हाला एका फार थोर व्यक्तीचा आशीर्वाद पाठीशी होता. ती व्यक्ती म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज! 

प्रत्येकाची विचार करण्याची धाटणी वेगळी असते. विचारांची धाव, पद्धतीही वेगळी असते. राहुल घोरपडे यांचा "industrial" ब्रेन आहे. त्याचा आमच्या कामाला निश्चितच फायदा झाला. अशीच एक अफाट कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ती म्हणजे, तेरा विभागात सादर करण्यात आलेली दूरदर्शन मालिका "कवी शब्दांचे ईश्वर". एकदा आम्ही पुण्याच्या एका रोटरी क्लबमध्ये कविवर्य कुसुमाग्रजांवरचा "शब्दोत्सव" हा कार्यक्रम करून घरी परतत होतो. कार्यक्रम होता टिळक रोडला, आय. एम. ए. हॉलमध्ये.कार्यक्रम नेहमी प्रमाणे छानच झाला. प्रेक्षक वर्ग चांगला होता. दर्दी लोकांकडून कार्यक्रमाला दाद चांगली मिळत होती. कार्यक्रम रंगत गेला. अर्थातच आम्ही कार्यक्रम चांगला झालेला असल्याने विशेष आनंदित होऊन घरी जायला निघालो. रस्त्यातच श्री.घोरपडे यांनी थांबवले व मला विचारले, "मराठीतील ज्येष्ठ कवींवर दूरदर्शन मालिका तयार करायची आहे. तुम्ही त्याचे लेखन व दिग्दर्शन कराल का?" मला क्षणभर काहीच सुचले नाही. कारण एक नवीनच पण अतिशय चांगली कल्पना माझ्यासमोर ठेवली जात होती. मी गोंधळून जात मोघम उत्तर दिले, "फारच चांगली कल्पना आहे. बघुयात, विचार करूयात." पण त्यावेळी मनात असेही येत होते, हे सहज साध्य नाही. नक्कीच नाही. पण कल्पना सुंदर आहे; साकारता आली तर बहार होईल. आपण मराठी भाषेचे अध्यापन करतो. ती भाषा नुसतीच शिकवून चालणार नाही. त्या भाषेप्रती आपले काही कर्तव्य देखील आहे. या मालिकेतून मराठीतील गाजलेले कवी लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचतील. त्यांची कविता, त्या कवितेमागची निर्मिती, प्रेरणा, त्यांची साहित्यिक जडण-घडण, त्यांनी केलेली शब्दांची आराधना इत्यादी गोष्टी या मालिकेद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या समोर ठेवता येतील. अर्थात मालिका करण्याच्या स्वप्नाबरोबरच त्यासाठी घालाव्या लागणाऱ्या भांडवलाचा विचारही मनात येत होता आणि असा विचार मनात येताच स्वप्न भंग पावत होते. त्याची उभारणी कशी करायची हा यक्ष प्रश्न मनात उठायचा आणि निर्मितीच्या स्वप्नाला कुठेतरी तडा जायचा. पण परत एकदा मालिका करण्याचे स्वप्न हाका घालू लागे आणि विचार मनात येई, मालिका करायची असे तर पक्के करूयात; इच्छा असली की मार्ग दिसेल. पण मग असेही मनात येई की हा नुसता पैशाचा प्रश्न नाही, याला अपार कष्ट करण्याचीही आवश्यकता आहे. यासाठी नुसती संहिता लिहून भागणार नाही; तर प्रॉडक्शनच्या सर्व बाबींचीही जबाबदारी उचलावी लागेल. 

त्या वेळी डॉ.किरण चित्रे आणि समीरण वाळवेकर अशी आमची काही मित्र मंडळी दूरदर्शनवर काम करीत होती. त्यांच्या कडून काही तरी मदत होईल अशी आमची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात त्यांची काही मदत होऊ शकली नाही. उलट समीरण वाळवेकर यांनी त्यांच्या अनुभवातून आम्हाला गंभीर इशारा दिला, "शहाणे असाल तर या फंदात पडू नका." अर्थात ते आमच्याच भविष्याचा विचार करून असा सल्ला देत होते. हे ही आम्हाला कळत होतेच. मला आज आठवते आहे माझ्या घरात मी, राहुल घोरपडे आणि समीरण वाळवेकर या संदर्भात चर्चा करत होतो आणि या विचारांचा खल करून आमच्या असे लक्षात आले की "आपण या सीरिअल वगैरेच्या भानगडीत न पडणेच बरे! या मालिकेची जबाबदारी घेऊन 'आ बैल मुझे मार!' अशी आपली स्थिती करून घेण्यापेक्षा आपण सीरिअल न करणेच आपल्या जास्त हिताचे आणि शहाणपणाचे होईल." त्याचवेळी दाराची बेल वाजली आणि वैद्य कामावरून घरी आले. घरात शांतता होती. आमचे चेहेरे पडलेले! कोणीच कोणाशी बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या चेहेऱ्यावरही प्रश्नचिन्ह! म्हणाले, "कसली इतकी गहन चर्चा करताय?" आम्ही पडीक आवाजात त्यांना सांगितले, "काही नाही. सीरीअल करायची की नाही याची चर्चा करत होतो. सविस्तर चर्चा करून आम्ही या निर्णयाप्रत आलेलो आहोत की आपण या विचारापासून दूर राहिलेलं बरं" ते म्हणाले, "म्हणजे? मी नाही समजलो!" त्यावर मी उत्तरले, "म्हणजे असं की आम्ही आता ही दूरदर्शन मालिका करत नाही आहोत." त्यावर जरा विचार करून वैद्य म्हणाले, "अरे! एकदमच असा निर्णय का बरं घेतला? जरा शांतपणे विचार करा. मालिका करायची नाही असा निर्णय तुम्ही कधीही घेऊ शकाल. 'नाही' म्हणणे कधीही सोपे असते; पण आपण मनात आणलेली गोष्ट जिद्दीने पूर्ण करणे यात खरा पुरुषार्थ आहे." त्यांच्या या बोलण्याने चर्चेचा सगळा माहोलच बदलला. आम्हाला जरा धीर आला आणि विचारांची नकारात्मक दिशेने धावणारी गाडी एकदम सकारात्मक दिशेने धावू लागली. मग आम्ही विचार केला, "प्रथम मनात सकारात्मक विचार मनात आणून कामाला तर लागू! अगदीच आली अडचण तर कधीही फेर विचार करता येईलंच." मग त्यासाठी लागणारी मनाची तयारी केली आणि निर्णय घेऊन टाकला की "सीरिअल करायची!"

पण माझ्या अनुभवावरून सांगते, एकदा एखादी गोष्ट करण्याचे ठरवले की ती थांबवणे तितके सोपे नसते. त्यातून अंग काढून घेणे महाकर्मकठीण असते. कारण त्या कामात आपली आपल्या नकळत भावनिक गुंतवणूक झालेली असते. आमचे देखील अगदी तसेच झाले. या कामात अनंत अडचणी येत गेल्या; पण आम्ही त्या अडचणींवर मात करत त्यातून मार्ग काढत राहिलो. हळूहळू मालिका आकार घेत राहिली. या मालिकेची संकल्पनाच इतकी अभिनव होती की त्या मुळेच आम्ही काम करत राहिलो. नुसते काम हातून झाले असे नाही; तर ते इतके चांगले झाले की ती मालिका तेव्हा खूपच गाजली. त्यावेळी तिला दूरदर्शनवर दुसर्‍या क्रमांकाची पसंती (टी.आर.पी.) मिळाली होती. मालिका खूपच लोकप्रिय झाली. गाजली. इतकी, की लोक मालिका बघण्यासाठी लवकर आपापल्या घरी पोहोचत असत, असेही आम्हाला समजले.

मालिका करायची असा निर्णय घेतल्यावर मात्र आम्हाला एकाच विषयाचा ध्यास लागला. तो म्हणजे ती मालिका करण्याचा. त्यासाठीचा सखोल अभ्यास करणे आता जरुरीचे झाले होते. प्रथमत: मालिकेसाठी तेरा कवींची निवड करणे हे काम आव्हानात्मक होते. त्याची चाचपणी सुरु झाली. कसून अभ्यास सुरु झाला. डॉ.भा.दि.फडके यांनी अभ्यासाला लावलेली शिस्त आणि बैठक मारून अभ्यास करण्याची सवय इथे कामी आली. हळुहळू सहभागी कवींची निवड होत गेली. मालिकेचा आराखडा तयार होत गेला. कवींची निवड करताना अनेक प्रश्न समोर होते. ही निवड वयाच्या श्रेष्ठत्वावर करायची का? का प्रांतवार करावी? निर्णय विचार पूर्वक घेतले जात होते. चर्चा घडत होत्या. त्यासाठी बैठकी होत होत्या. काही ज्येष्ठ कवी दिवंगत झाले होते; तरी त्यांच्या स्मृती लोकांच्या मनात ताज्या होत्या. अशांचा अंतर्भाव मालिकेत करावा की नाही? करायचा असेल तर त्यासाठी मालिकेचा तो भाग कसा चित्रित करायचा? त्या भागाच्या ट्रीटमेंटला काय करावे लागेल? हा एक मोठा प्रश्न समोर होता; पण एकदा काम करायला सुरवात केली की याची उत्तरे बरोबर सापडत जातील, असा विश्वासही वाटत होता. अशा प्रकारे मालिका तायार करण्यासाठीची मनोभूमिका तरी तयार झाली. 

आम्ही अशा प्रकारे महाराष्ट्रातील तेरा कविंवर मालिका तयार करीत आहोत ही गोष्ट एका महान व्यक्तीच्या कानावर घालावी आणि त्या व्यक्तीचे आशीर्वाद घ्यावेत अशा विचाराने आम्ही कुसुमाग्रजांना भेटण्यासाठी तडक नाशिक गाठले. त्यांना मालिकेविषयीची सर्व माहिती सांगितली. त्यांना मालिकेची संकल्पना ऐकूनच फार आनंद झाला. मोठ्या दिलदार मनाने त्यांनी आशीर्वाद दिला, "तुमची ही मालिका सिद्धीस जाऊ देत. तसे झाले तर मीच पेढे वाटीन. तुम्हाला कहीही अडचण आली तर या, मी जरूर मदत करीन." त्यांचा आशीर्वाद घेतल्यावर मनाला शांत वाटले. चला! वडीलधाऱ्या व्यक्तीचा आशीर्वाद तर मिळाला आता, कंबर कसून कामाला लागले पाहिजे. (अर्थात तेव्हा अशी कल्पना आली नाही की कंबर नव्हे, तर कंबरडे चांगलेच मोडणार आहे!). माझा अभ्यासाचा विषय "मराठी साहित्य", माझी पी.एच.डी.देखील याच क्षेत्रातली. मग मी मालिकेचे संहिता लेखन, दिग्दर्शन वगैरे कसे काय एकदम हाती घेतले असा प्रश्न कोणालाही पडू शकेल आणि त्यात काहीच गैर नाही. अनेकांच्या मनात ही शंका असणार. आधी या शंकेचे निरसन करायला हवे. त्याचे झाले असे की डॉ.फडके पुणे विद्यापीठाचे इ.एम.आर.सी.चे डिपार्टमेंट बघत होते. त्यांनी स्वत: पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये "स्क्रिप्ट रायटिंग"चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता व इ. एम. आर.सी.मध्ये डॉ.एम.आर.भिड्यांच्या बरोबर ते त्या विभागाचे काम बघू लागले होते. या विभागातर्फे एक महिन्याचा "स्क्रिप्ट रायटिंग" चा कोर्स आयोजित करण्यात आला होता. दृकश्राव्य माध्यमासाठी संहिता लेखन कसे करावयाचे, यासाठी एक महिन्याचा आयोजित केलेला हा कोर्स म्हणजे या माध्यमासाठीची नवी दृष्टी देणारा ठरणार होता आणि विशेष म्हणजे अमेरिकेच्या शर्ले व्हाईट हा कोर्स घेणार होत्या. ही तर अभ्यासकांच्या दृष्टीनी चांगलीच पर्वणी होती. त्यासाठी काही नावे सरांना पाठवायची होती. मला फडके सरांनी बोलावून घेतले आणि त्या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवायला सांगितले. हा माझ्यासाठी भाग्य योग ठरेल असे जर तेव्हा कोणी मला सांगितले असते तर माझा विश्वास बसला नसता. मला पुढे जो "इट्स प्रभात" या माहितीपटासाठी भारताचे माजी राष्ट्राध्यक्ष मा.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला (२००५), त्याचा पाया इथे कुठेतरी घातला गेला असे म्हणावे लागेल.

या बरोबरच दुसरा भाग्ययोग आयुष्यात आला तो म्हणजे कै.श्री.विश्राम रैवणकर यांची गाठ पडणे. विश्राम रेवणकर ही त्या काळातली माहितीपट निर्मितीतली जानीमानी हस्ती होती. त्या वेळी ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक होते. फार सुंदर माहितीपट करायचे. त्यांच्या माहितीपटांचे संहिता लेखन करण्यासाठी मला डॉ.फडके यांनी त्यांच्याकडे पाठवले. तेव्हा ते मल्लखांबावर माहितीपट करत होते. त्यांच्यासाठी मी संहिता लेखन करावे असे त्यांनी मला सुचविले. तो माझा संहिता लेखानासाठीचा पहिला अनुभव होता. त्या नंतर त्यांना डॉ.जाल मेहतांसाठी एक माहितीपट करायचा होता. डॉ.जाल मेहता यांच्यासारख्या त्यांच्या विषयात निष्णात असणाऱ्या अत्यंत बुद्धिमान माणसाबरोबर काम करणे हा विलक्षण अनुभव होता. ती माझी कसोटीच होती. पण त्या परीक्षेत मी पास होऊ शकले आणि त्या कामात मी यश मिळवू शकले हे माझे भाग्य. त्या नंतर मात्र मी रैवणकरांच्या अनेक माहिती पटांचे संहिता लेखन केले. जवळ-जवळ तीस पस्तीस माहितीपटांचे संहिता लेखन करता करता या क्षेत्रातला खूप अनुभव गाठीशी बांधता आला. या माध्यमाचे चांगले भान येत गेले. त्यांच्याकडून खास प्रशिक्षणही मिळत गेले. त्यांच्या कामाला एक विलक्षण शिस्त होती. रैवणकर स्वत: त्यांच्या उमेदीच्या काळात शोभना समर्थांचे पती श्री.समर्थ यांच्याकडे राहात असत. त्यांच्याकडून त्यांना या माध्यमाचे मर्म समजले होते, धडे गिरवता आले होते. चित्रपट क्षेत्रात असूनही रैवणकर अत्यंत साधे होते. आपल्या कामात मुरलेले होते. त्यांच्याकडे संहिता लेखन करताना माझा भाषेचा सराव आपोआप होत गेला. आजही मला आठवते आहे की रैवणकर अगदी सकाळी सकाळीच माझ्या घरी कामासाठी येत असत. सहा वाजताच दाराची बेल वाजे. चहा घेतला की काम सुरु होई. आमचे काम चाले दुपारी बारा वाजेपर्यंत. आधी ते ज्या विषयांवर माहितीपट करायचा आहे तो विषय नीट समजावून देत. मग त्या विषयावरच्या पुस्तकांचे वाचन करावे लागत असे. आवश्यकता वाटल्यास त्याच्या नोट्स काढाव्या लागत असत. मगच माहितीपटाचा विषय पूर्णपणे हातात आल्यासारखे वाटत असे. त्या नंतरच संहितेचा कच्चा आराखडा तयार होत असे. यासाठी भरपूर वेळ देणे त्यांच्या मते आवश्यक असे. कारण एकदा संहितेची बांधणी चांगली झाली की मग कामाला सुरुवात करणे सोपे जात असे. संहिता लेखन करताना अगदी एक एक शब्द घासून पुसून विचार करूनच वापरायचा इकडे रेवणकरांचा कटाक्ष असे. संहिता लेखनावर कसून मेहेनत घेतली जात असे. कधी एका पानात सांगितलेला आशय अर्ध्या पानातच कसा आणता येईल यासाठी खटपट करावी लागे. तर कधी एका वाक्यात सांगितलेला आशय आणखी विस्ताराने सांगण्याची किमयाही साधावी लागे. मग त्या माहितीपटाच्या शीर्षकासाठी एकच शब्द शोधण्याचे कसब ही करावे लागे. पण मी यात रमत असे. यामुळे मला माझ्या भाषेचा अभ्यास करण्याची उत्तम संधी प्राप्त होत होती. संहिता लेखन करताना कधी आधीच चित्रित केलेल्या किंवा झालेल्या चित्रीकरणानुसार संहिता लेखन करणे देखील आव्हानात्मक वाटे. हे काम करताना भाषेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांनाच अशा प्रकारे भाषेचा अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही जाणवून गेले. याच निमित्ताने हे देखील बोलण्याचे धाडस करावेसे वाटते की आपल्या विद्यापीठातून भाषा शिकवण्यात येत नाही. नुसती पाठ्यपुस्तके शिकवण्यात येतात. स्वतंत्र लेखनालाही आपल्या अभ्यास क्रमात पुरेसा वाव दिला जात नाही. भाषेच्या अभ्यासकालाही ज्या लेखन सरावाची आवश्यकता असते. तसा सराव मला हे संहिता लेखन करताना झाला. माहितीपटाची भाषा साधी, सरळसोपी, सर्वांना आकलन होण्यासारखी अनलंकृत असायला हवी, हे विशेषत्वाने जाणवले. या माध्यमाच्या भाषेला चित्रासोबत, दृश्यासोबत व्यक्त व्हायचे असते, याचेही भान ठेवणे विशेष गरजेचे असते. नव्हे याचे भान राखणे तर अत्यावश्यकच आहे. म्हणूनच माहितीपटाच्या भाषेने फक्त आवश्यक तिथेच आणि कमीत कमी शब्दात व्यक्त झाले पाहिजे. संहिता लेखनाची ही पथ्ये "अवीर फिल्म्स"चे लेखन करताना कटाक्षाने पाळली जात होती. "अवीर फिल्म्स" च्या तीन माहितीपटांना आंतरराष्ट्रीय आणि सहा माहितीपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. या सगळ्या माहितापटांसाठी संहिता लेखन करण्याचे भाग्य मला मिळाले या माहितीपटांमध्ये "स्वीकार" (डॉ.बादोरवाला कुष्ट रुग्णालय), "आधारवड" (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था), "वनशेती" (बायफ संस्था) यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांचा समावेश होता. भारतातील तीन अभयारण्यावरही माहितीपट खरे तर तयार झाला होता. त्याच्या संहितेच्या रेकोर्डींगचे काम पूर्ण करण्यासाठी रैवणकर माहितीपटाची रिळे घेऊन मुंबईला निघाले होते. पण नियतीने आपला डाव साधला. त्यांच्या घराजवळच एका पी.एम.टी. बसने त्यांना उडवले. त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. रैवणकर जागच्या जागीच गेले. माझ्या भाषेवर प्रेम करणारा एक दिग्दर्शक आणि माहिती पटांचा निर्माता काळाने हिरावून नेला. मला फार वाईट वाटले. मनस्वी दु:ख झाले. त्यांच्या बरोबर करण्याच्या अनेक भावी योजना तशाच विरून गेल्या. कोणाच्याही बरोबर काम करायचे म्हटले तर त्याची आणि आपली वेव्हलेन्ग्थ जमावी लागते. तशी वेव्हलेन्ग्थ रैवणकरांशी जुळली होती. पण इतके काम त्यांच्या बरोबर करता आले म्हणूनच "कवी शब्दांचे ईश्वर" ही दूरदर्शन मालिका मला पूर्ण आत्मविश्वासाने करणे शक्य झाले. 

आता परत मालिकेकडे वळते. त्या वेळी अनन्वयच्या कामामुळे सर्व कवी मंडळीना आमचे नाव तसे परिचित झाले होते. थोडी-बहुत प्रतिष्ठाही मिळाली होती. कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर इ. कवी मंडळी तशी परीचयाचीही झाली होती. त्यांना आमच्या कामाविषयी माहिती होती, आस्था होती. काही कवी श्री.राहुल घोरपडे यांच्या संगीतावर बेहद्द खूष होते. त्या पैकीच एक म्हणजे सुरेश भट. त्यांच्याशी घोरपडे यांचा दोस्ताना होता असे म्हटले तरी चालेल. आम्ही करीत असलेल्या आजवरच्या कामामुळे नागपूरच्या राम शेवाळकर आणि मनोहर म्हैसाळकर यांचा आमच्याशी चांगला परिचय झाला होता. त्या दोघांचाही आमच्या कामावर लोभ होता. या दोघांनी सुरेश भट आणि ग्रेस यांची भेट घडवून आणण्यासाठी आम्हाला मोलाची मदत केली. त्यांच्याकडे जायच्या आधी काही मैलिक सूचनाही केल्या. डॉ.फडके यांनी ग्रंथालयात बसून कसून अभ्यास करण्याची दिलेली सूचनाही मी मन:पूर्वक पाळत होते. तेरा कवींवर काम करायचे व मालिकेसाठी संहिता लेखन करायचे म्हणजे तेरा कवींवर पी.एच.डी.चा अभ्यास करण्यासारखेच अवघड काम होते. त्या कवीचे समग्र साहित्य आधी वाचायाचे, तो कवी आधी समजून घ्यायचा, मग त्याची कविता, त्यावरती झालेली समीक्षा अभ्यासायची हे काम तर महत्त्वाचे होतेच; पण मालिकेच्या दृष्टीने त्यांचे समग्र साहित्य दिलेल्या वेळात म्हणजे तेवीस मिनिटात बसवायचे हे फारच कसोटीचे काम होते. ही गोष्ट मला हे काम करताना खूप अवघड आणि आव्हानात्मक वाटत होती. खरोखर शिवधनुष्य पेलण्यासारखीच ही गोष्ट होती. पण असे करताना मी मात्र फार रमून गेले होते. सर्व कवींच्या कविता वाचणे हा माझ्यासाठी फारच आनंद प्रवास होता. प्रत्येक कवीशी त्याच्या सुंदर काव्य निर्मितीतून सुंदर ओळख होत होती. जवळ जवळ सर्व कवींच्या कविता तोंडपाठही होत होत्या. चिं.त्र्यं.खानोलकरांच्या साहित्याचा समग्र अभ्यास हा माझ्या पी.एच डी. च्या अभ्यासाचा विषय होता. त्यांचा अभ्यास करता करता मी त्यांच्या समकालीन असलेले सर्व कवी अभ्यासले होते. त्या सर्व कवींची डोळस ओळख मला झाली होती. इंदिरा संत, बोरकर हे कवी अभ्यास म्हणून नाही तर आवडतात म्हणून समरसून वाचले होते. अनन्वयच्या कार्यक्रमातून अनेक कवींची कविता रसिकांसमोर मांडताना ती कशा प्रकारे मांडली की कवींची मने जिंकता येतात याचाही अनुभव गाठीला होता. यामुळेच या जगड्व्याळ कामाला हात घालताना या अभ्यासाची पुण्याई पाठीशी होती. मुख्य म्हणजे या कवींच्या मनातही माझ्या आत्ता पर्यंतच्या कामामुळे, "माधवी ताई चांगले काम करू शकतील" असा विश्वास माझ्याबद्दल निर्माण झाला होता. ही गोष्ट माझ्या मनात विश्वास निर्माण करणारी, माझ्या मनाला दिलासा देणारी होती.

फर्गसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी मालिकेतील कवींची नावे निश्चित करणे गरजेचे होते. इथे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते की श्री.राहुल घोरपडे हे जरी संगीतकार म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांची साहित्याची विशेषतः कवितेची जाण सुजाण आहे. एखाद्या कवितेला चाल लावायची म्हणून चाल लावून मोकळा होणारा हा संगीतकार नाही. त्यांना कविता कळते हे महत्त्वाचे. त्यांचे वाचन चांगले आहे. काही कवींच्या कविता मुखोद्गत असणारा हा संगीतकार आहे. त्यांना भाषेची जाणआहे म्हणूनच कदाचित त्यांच्या आणि माझ्यामध्ये वैचारिक मतभेद फारसे झाले नाहीत. दोघांनीही एकमताने काही नावे आम्ही ठरवू शकलो. मालिकेतील एकंदर तेरा कवींची नावे निश्चित करून मुम्बई दूरदर्शनाला आम्ही पाठवून दिली. ही नावे पुढील प्रमाणे होती-

१)आरती प्रभु २) इन्दिरा संत ३) मंगेश पाडगावकर ४) विंदा करंदीकर ५) वसंत बापट ६ ) शांता शेळके ७) सुरेश भट ८) ना.धों.महानोर ९) रॉय किणीकर १०) नारायण सुर्वे ११) ग्रेस १२) कुसुमाग्रज. १३) वि.वा.शिरवाडकर

कुसुमाग्रजांनी इतर साहित्य देखील तितक्याच ताकदीने लिहिले असल्याने त्यांच्यासाठी दोन भाग आम्ही दूरदर्शनकडे मागितले होते. पण दूरदर्शनने असे सुचवले की त्यांच्यावर दोन भाग करण्यापेक्षा ग.दि.माडगूळकर यांचा समावेश तुम्ही मालिकेत करा. तसेच रॉय किणीकरांच्या ऐवजी पु.शि.रेगे घ्या. आम्ही त्यांच्या सूचना मान्य केल्या. खरे तर आम्ही दया पवारांपासून अरुणा ढेरे यांच्या पर्यंत सगळ्या कवींचा विचार केला होता. पण फक्त तेरा भागांच्या मालिकेलाच मान्यता मिळाली. खरे तर थोडे आर्थिक बळ मिळाले असते तर आम्हाला मालिकेचे आणखीन भाग वाढवायचे मनात होते; पण आर्थिक गणित लक्षात घेऊन आम्ही तेरा भागांवरच समाधानी राहाण्याचे ठरवले. असो. तेरा भाग तरी आम्ही करू शकलो हे ही नसे थोडके! पण हे काम होणे फार महत्त्वाचे वाटत होते इतके मात्र खरे.

सर्व कवींच्याकडे जाऊन त्यांना मालिकेविषयीची माहिती देणे आणि त्यांची त्यासाठी संमती मिळवणे हे त्यानंतरचे महत्त्वाचे काम होते. आमच्या जवळ त्यासाठी दोन मोठ्या कवींची शिफारस पत्रे होतीच. त्यामुळे आमचे काम तसे सोपे झाले. याआधी आम्ही केलेले काव्य विषयक काम आमच्या पाठीशी होतेच. या सगळ्यामुळे कवींची संमती मिळण्यास काहीच वेळ लागला नाही. उलट सर्वच कवींच्या तोंडी सहकार्याचीच भाषा होती. कवी ग्रेस यांची भेट मात्र या निमित्ताने पहिल्यांदाच घेणार होतो. त्यांची गाठ घेणे फार आव्हानात्मक वाटत होते. या मालिकेसाठी त्यांच्या सहभागाची संमती मिळवणे हे आणखी एक आव्हान पुढ्यात उभे आहेसे वाटत होते. ग्रेसच्या काही कवितांना घोरपडे यांनी फार सार्थ चाली लावल्या होत्या. ते कवी ग्रेस यांचे चाहतेही होते. आणखी एक योगायोग असा की नागपूरच्याच "माग्रस" या साहित्यिक संस्थेने मला ग्रेसच्या कवितांवर एक पेपर वाचायला निमंत्रित केले होते. ही एक ग्रेस जवळ पोहोचण्याची चांगली संधी आहे असे मला वाटले, मी त्यांचे निमंत्रण स्वीकारले. त्या निमित्ताने झालीच तर ग्रेसची गाठ पडेल असेही वाटून गेले. माग्रससाठी पेपर तयार करताना मी परत एकदा ग्रेसची कविता अभ्यासली. आज तो पेपर माझ्या जवळ नाही, पण मला आठवते आहे की मी त्यात असे विधान केले होते की "ग्रेस सारखा स्वयंभू कवी हजारात एखादाच जन्मतो." माग्रसचा कार्यक्रम झाला आणि आम्ही ग्रेसकडे जायला निघालो. मला हे देखील पक्के स्मरत आहे कि नागपूरला जाण्याआधी आम्ही पुण्याच्या ख्यातनाम कवयित्री आसावरी काकडे आणि श्रीनिवास काकडे यांची भेट घेऊन ग्रेसच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बरेच काही जाणून घेतले होते. ग्रेस सारख्या महान प्रतिभेच्या कलंदर व्यक्तिमत्त्वाची गाठ घ्यायची आहे याचा पुरेसा ताण आमच्या मनावर होता. त्याच्या संबंधीच्या अनेक कथा, दंतकथा ऐकिवात होत्या. त्या कदाचित खऱ्या खोट्या कशाही असतील; पण त्यामुळे आमच्या मनात त्यांच्याबद्दल पुरेसा दबदबाही निर्माण झाला होता. आम्हाला कुणीतरी असेही सांगितले होते की ग्रेसकडे गेलो आणि त्यांच्या दाराची बेल वाजवली की ग्रेस स्वत:च दार उघडतात आणि समोरच्या माणसाने जर त्यांना ओळखले नाही तर सांगतात की "ग्रेस घरात नाहीत." आम्हाला भीती होती ती याच गोष्टीची की आपल्याही बाबतीत जर असे झाले तर? त्यांनी दारातूनच जर आपली बोळवण केली तर? तर काय करायचे? मग योजलेला सर्व खेळच खतम, मनातले मांडे मनातच राहणार! असे जरी एकीकडे वाटत असले, तरी दुसरीकडे मनात आशा होती की "नाही. असे काही होणार नाही, आपण 'नेक' काम करतो आहोत, निदान आपल्या बाबतीत तरी असे काही घडणार नाही. म्हणजे असे काही घडू नये. ते आपल्याशी चांगलेच वागतील." राहुलच्या घराण्याचाही कुठेतरी आधार वाटत होता. कारण राहुलचे घराणे तसे वाङमयीन दृष्ट्या घरंदाज घराणे. त्याचे आजोबा कै.बाबासाहेब घोरपडे त्या वेळी सकाळचे संपादक होते. (हे आता अनेकजण सोयिस्करित्या विसरलेले आहेत.) केसरीचे संपादक कै.चंद्रकांत घोरपडे त्याचे वडील. त्यांच्या संपादकीय कारकीर्दीचा मात्र अगदी आजच्या काळात सुद्धा पुरेसा दबदबा आहे. पुष्कळदा त्याच्या या पार्श्वभूमीचा आम्हाला चांगला उपयोग होत असे. पण ग्रेसच्या घरी जाताना या सगळ्यामधले काय उपयोगाला येईल या बद्दल मनात जरा साशंकता होतीच. जरा साशंक मनानेच दारावरची बेल वाजवली. आधी त्यांना फोन करून सांगून ठेवले होते. "यायला हरकत नाही", असेही म्हणाले होते. आम्हीही अगदी दिलेल्या वेळेतच पोहोचलो होतो.

ग्रेस तेव्हा त्यांच्या जुन्या घरी रहात होते.म्हणजे 'रेल्वे लाईन' इथले घर. ग्रेस यांचे जुने घर. घर फार टुमदार होते. कवीचे घर कवीच्या कवितेसारखेच वाटत होते. काहीसे गूढ, मिस्टिक...ती गूढता शब्दात नेमकी सांगणे शक्य नाही. ती अनुभवायलाच हवी. ग्रेसच्या कवितेसारखी. म्हणजे ग्रेसची कविता अनुभवणे हा जसा काहीसा गूढ प्रकार, तसेच कवीचे घरही गूढ आहे असे वाटून गेले. त्याच्या काव्यातली गूढता त्याच्या सान्निध्यात असणाऱ्या चराचराला वेढून बसलेली आहे, असेच वाटायचे. ग्रेस, त्याचे घरआणि ती गूढता एकमेकांपासून वेगळी होणारच नाही असेही वाटून गेले. ग्रेस नंतर ज्या घरात रहायला गेले ते घरही असेच, मिस्टिकच वाटायचे; पण या घराचा सभोवताल काहीसा वेगळाच भासायचा. माझ्या या म्हणण्याचा प्रत्यय अनेकांनी घेतला असेल. व्यक्तिमत्वाचा एक सच्चेपणा असतो आणि कलावंत म्हणून एक मनस्विता असते. या दोन्ही गोष्टी त्याच्या घरानी शंभर टक्के जपल्याचा भास होत होता. म्हणजे आपण काही सर्व सामान्य व्यक्तीच्या घरात बसलेलो नाही, हा विचार त्याच्या घरातील प्रत्येक वस्तू आपल्याला ठणकावून सांगत आहे, असा भास होत असे. मग तो इनग्रीड बर्गमनचा फोटो असो, जपाची माळ असो, घरात लावलेली असंख्य घड्याळे असोत, पेपर वेट म्हणून ठेवलेला एखादा चित्रविचित्र आकार किंवा शिंपला असो. सर्व गोष्टींना त्यांचे म्हणून एक अस्तित्व आहे आणि ते कवीच्या अंतरंगातून न्हाऊन निघालेले आहे,असे सारखे जाणवत राही. आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात एकदा सुखरूप प्रवेश करू शकलो ना की मग त्याच्या मनातही आपल्याला प्रवेश मिळायला अवघड जात नाही असेही वाटले. मग आपल्या मनाची वेव्हलेन्ग्थ त्याच्या मनाशी आपोआपच जुळून आली आहे अशी आश्वासकता मनात निर्माण होते. ग्रेसच्या मनस्वी, लयदार शब्दशृंखलांची ओवणी एकदा सुरू झाली की विलोभनीय वाणीचा अतीव सुंदर प्रदेश आपण अनुभवायला लागतो आणि मग आपल्याला ते "शब्द संमोहन" भुलवायला लागते, याचाही प्रत्यय अनेकांनी घेतलेला आहे. आपण त्याच्या बोलण्यात कुठेतरी वितळून जात आहोत की काय असेही वाटायला लागते किंवा त्याच्या बोलण्याच्या भोवऱ्यात खोल खोल खेचले जात आहोत असाही भास व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्या शब्दगंधाने मोहित होऊन आपल्याला आपण एकाच जागी खिळून राहिलो आहोत, असे वाटायला लागते. आपण काही तरी विलक्षण ऐकत आहोत असे जाणवत राहाते. आपण जे शब्द वापरतो तेच शब्द ग्रेस वापरतात; पण त्यांची श्ब्दानुभूती अलौकिक आहे हे जाणवत राहाते. कवी बोलतच राहतो आणि त्याने थांबूच नये असे आपल्याला वाटत राहाते. कवी एका तंद्रीत तार लागल्यासारखे खूप वेळ बोलतच राहतो आणि त्याची ती भावतंद्री आपल्याकडून भंग होऊ नये असे आपल्याला वाटत राहते. त्याचे ते सुरांनी ओतप्रोत भरलेले बोलणे खंडित करण्याचे पाप आपल्या हातून घडायला नको असेही वाटत राहाते आणि त्याच वेळी असेही वाटते की ही शब्द मौक्तिके आपल्या ओंजळीतून निसटून जाऊ नयेत. कवी ओघवत्या भाषेत बोलत राहातो, "स्त्रीचे सौंदर्य आणि नागिणीचे सौंदर्य .....कवीच्या मनात खोल खोल जाऊन बसलेले निर्मिती नाशाचे भय......." ते ऐकत असताना आपल्याला वाटत राहाते. एखाद्या कसलेल्या कलावंताची सुरेल मैफिल जमून यावी ना! तसेच काहीसे आहे हे... त्यातच ग्रेस विचारतात, "तुम्ही चहा घेणार ना? नाही म्हणजे घ्याच. म्हणजे हे विचारायचे म्हणून नाही मी विचारताय, म्हणजे पुणेरी पद्धतीने! मनापासून विचारतोय. मी एक सज्जन गृहस्थ आहे.पांथस्थाला चहा तरी पाजलाच पाहिजे, इतका गृहस्थ धर्म मी जाणतो, नक्कीच जाणतो. आणि त्यातून कवी असल्याने मी जास्त संवेदनशील आहे. म्हणून मी तो प्राणपणाने जपतो देखील!” असे म्हणत त्या दिवशी ग्रेसने स्वत:च्या हाताने चहा केला देखील. खरं सांगते त्या दिवशीचा तो चहा जरा जास्तच लज्जतदार वाटला. याच्यावर कढी म्हणून की काय ग्रेसने कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता, जराही मानधनाची अपेक्षा न करता, मालिकेतील त्यांच्यावरील भागासाठी संमतीच्या कागदावर आपली एक लयदार सही केली आणि आम्हाला मालिकेचा शुभारंभ झाल्यासारखे वाटले.

सर्व कवींनी मालिकेला आपली संमती दिली आणि शुभेच्छाही दिल्या. दूरदर्शनकडून कवींची सर्व नावे मालिकेतल्या भागासाठी संमत झाली आणि माझ्या अभ्यासानेही जोम धरला. अभ्यासाला शिस्तबद्ध सुरुवात झाली आणि फर्गसनच्या ग्रंथालयात माझा मुक्कामही जास्त पडू लागला. त्यावेळी मला फर्गसनचे ग्रंथपाल आणि सेवकवर्ग यांही फार मदत झाली. त्यासाठी त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत. माझ्या घराच्या ग्रंथालयात देखील माझ्या पी.एच.डी.च्या निमित्ताने आरती प्रभूंच्या समकालीन असलेल्या सर्व कवींचे कविता संग्रह विराजमान झालेले होतेच. माझ्या वारजाच्या घरातील माझे ग्रंथालय समृद्ध आहे. माझ्या घरी सर्व प्रतिभावंतांचे विचारधन, शब्दधन विसावलेले आहे. याचा मला सार्थ अभिमानही आहे.

अभ्यासाला जरी रीतसर सुरुवात झाली असली तरी माझ्यासमोर आव्हान उभे ठाकले होते की प्रत्येक कवी तेवीस मिनिटात कसा मांडायचा. एकेका दिग्गज कवीची समग्र कारकीर्द इतक्या कमी वेळात सादर करणे हे खरोखरच अवघड काम वाटत होते, या विषयी काहीच शंका नाही. ते काम कौशल्याचेही वाटत होते. त्यांच्या काही कविता निवडून त्या वेगवेगळ्या गायकांच्याकडून गाऊनही घ्यायच्या होत्या. त्यानंतर त्या गीतांवर चित्रीकरणही करायचे होते. एकीकडे संहिता लेखन, दुसरीकडे कवितांची निवड, तिसरीकडे कवींच्या मुलाखती, चौथीकडे योग्य अशा निवेदनाची जोड देणे, अशा सर्वाची गुंफण मालिकेच्या प्रत्येक भागात करायची होती. सामान्य रसिकांना "कवी तो होता कसा आननी" बघण्याची उत्सुकता असतेच, ही रसिकांची भूक भागवणे देखील महत्त्वाचे वाटत होते. म्हणूनच खर्च जरा जास्त झाला तरी हरकत नाही; पण हे चित्रीकरण कवीच्या घरीच जाऊन करायचे या निकषावर आम्ही येऊन पोहोचलो.आणि खरे तर हा आमच्या मालिकेतला एक गुणात्मक आधिक्याचा भाग ठरला. मग कवीच्या घरात कितीही लहान जागा असेना का, आम्ही चित्रीकरण तिथेच केले. पण या कवीच्या चित्रीकरणासाठी स्टुडीओ गाठायचा हा विचार मनाला शिवला देखील नाही.

प्रत्येक कवीच्या स्वभाव धर्मानुसार त्या त्या कवीचे चित्रीकरण करायचे असे आम्ही ठरवले. उदा.आरती प्रभूंची कविता साकारताना ती कविता त्या मातीचा गंध घेऊन कशी येईल, याची काळजी आम्ही घेतली. ते वातावरण पुरेसे गूढ कसे ठेवता येईल याचाही विचार बारकाईने आम्ही केला. तर ग्रेसची कविता चित्रित करताना त्याला प्रिय असणारी सांध्यवेळ कशी दाखवता येईल त्याचाही विचार आम्ही केला. शांताबाईंचे पुस्तकांवरील प्रेम, वाचन लेखन विषयक श्रद्धा, दृक माध्यमातून कशी दाखवता येईल याचा विचार केला. शांताबाईंची स्मरणशक्ती आणि त्यांचे पाठांतर याचा प्रत्यय रसिकांना आणून द्यायचा होता. कुसुमाग्रज म्हणजे नाशिक आणि नाशिक म्हणजे कुसुमाग्रज हे समीकरण प्रेक्षकांच्या मनावर बिंबवायचे असेल, तर ते कशा प्रकारे त्याचाही विचार केला गेला. वसंत बापट यांचे आखीव रेखीव व्यक्तिमत्व दाखवले पाहिजे असेही वाटून गेले. इंदिरा संत यांचे त्यांच्या छोटेखानी बागेवर, फुलझाडांवर असणारे नितांत प्रेम आणि त्यांचे झोपाळ्यावरचे निवांत क्षण टिपणेही महत्त्वाचे वाटले. पुस्तकात एक खूण म्हणून त्या एक मोरपीस ठेवीत असत. ते मोरपीस देखील आम्ही चीत्रीकरणाच्या वेळी आवर्जून नेले होते. हे बघितल्यावर त्यांची कळी एकदम खुलली, हे वेगळे सांगायाला नकोच. पाडगांवकरांच्या कवितेतील बहरलेला निसर्ग दाखवताना त्यासाठी उत्फुल्ल निसर्गाचे चित्रण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्याकडेही आम्ही लक्ष द्यायचे ठरवले. या साऱ्या अथक प्रयत्नांमुळेच प्रत्येक कवीच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्या पैलूंवर आम्ही प्रकाश टाकू शकलो आणि त्या कवीच्या अंतरंगाचा परिचय रसिकांना होण्यास मदत झाली.

प्रत्येक कवीच्या काव्याचा कसून अभ्यास केल्यावरच मग प्रत्येक कवीच्या मालिकेतील भागाबद्दल आखणी करण्यात आली हे वेगळे सांगायला नकोच. त्या कवीचे अगदी समग्र म्हणजे काव्येतर लेखन देखील वाचल्यावर त्या त्या कवीचा प्रकृती धर्म लक्षात आला. मालिकेतल्या भागात कवीला कशा प्रकारे सादर करायचे, चित्रीकरणाची शैली कशी ठेवायची हेही लक्षात यायला लागले. कवींच्या आयुष्यातल्या ठळक घटना, जन्म, त्याचे शालेय किंवा महाविद्यालायीन शिक्षण त्याची पहिली काव्य निर्मिती, 

त्याचे पहिले काव्य वाचन, त्याच्यावर झालेले विशिष्ट वाङमयीन संस्कार, त्याची कलावंत म्हणून झालेली जडण घडण, त्याच्या व्यक्तित्वाच्या संदर्भातल्या काही खास गोष्टी, त्यांचे स्वभाव विशेष, त्यांना आवडणारी स्थळं, आवडीच्या विशिष्ट वस्तू किंवा त्यांच्या खुलून येण्यासाठी कारण होणाऱ्या विशिष्ट गोष्टी अटकळी, विशिष्ट गोष्टींचे उल्लेख या साऱ्याचा काळजीपूर्वक विचार संहिता लेखनाच्या वेळेला करावा लागला. प्रत्येक कवीला आधी भेटूनच याचा अभ्यास करणे शक्य होते. त्यासाठी भरपूर वेळ आम्ही देत होतो. या वेळी माझ्या होमिओपाथी आणि डॉ.बाख फ्लॉवर रेमेडीचा केलेला अभ्यास उपयोगाला आला. कारण या उपचार पद्धतीत तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी सहज संवाद साधण्याची व त्या व्यक्तीला भावनिक दृष्ट्या आपलेसे करून घेण्याची अटकळ साध्य झालेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल रास्त विश्वास वाटून ती तुम्हाला आपल्या परीने मदत करण्यास सिद्ध होते. तुमच्या विषयी तिच्या मनात व्यक्त होण्यासाठी एक 'कम्फर्ट झोन' तयार होऊ शकतो. मग ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. हे सर्व मला प्रत्येक कवीचे चित्रीकरण कारताना फार उपयोगाला आले. कारण जरी काही कवींचा आणि आमचा आधी परिचय होता तरी काही कवींना आम्ही प्रथमच भेटत होतो. त्यांच्याकडे जाताना त्यांना आमची ओळख नीट करून देणे नितांत गरजेचे होते. अर्थात जेव्हा मालिकेचे दोन तीन भाग चित्रित झाले तेव्हा आमचा विश्वास दुणावला होता हे नक्कीच. तोवर मालिकेचा बोलबालाही झाला होता. 

प्रत्येक कवीवरील मालिकेचा भाग लिहिताना एका एका कवीच्या साहित्याचा पी.एच.डी.च्या प्रबंधाचा आपण अभ्यास करीत आहोत असेच मला वाटत होते हे येथे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. सर्वच कवींची कविता, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचा जीवनप्रवास, त्यांच्या साहित्यावर इतरांनी लिहिलेले लेख, केलेली टीका या साऱ्याची टिपणे तयार केली जात होती. सर्व कवींच्या शूटिंगच्या आधी ही टिपणे तयार केली गेली होती. त्या त्या कवीच्या बहुतेक कविताही जवळ जवळ पाठ झाली होती. शूटिंगच्या वेळी अंतर्भूत कराव्या लागणाऱ्या तेरा याद्याही तयार होत्या. चित्रीकरण करायच्या आधी त्या मध्ये कोणत्या कविता गाऊन घ्यायच्या आहेत त्याच्याही याद्या तयार होत्या. संगीताची जबाबदारी जरी श्री.राहुल घोरपडे यांच्यावर सोपवलेली असली तरीही गाण्याच्या ध्वनीमुद्रणाच्या दृष्टीने बरीच तयारी करणे आवश्यक होते. त्यासाठी गायक, गायिकांची योजना करणे, त्यांनी दिलेल्या तारखांनुसार स्टुडीओचे बुकिंग करणे, वादकांच्या तारखा ठरवणे, गाण्याच्या कोरससाठी गायकांचा समूह गाठणे, हे सर्व काम वाटते तितके सोपे मुळीच नव्हते. ते ही तुटपुंजे पैसे हातात असताना! या सर्वांना एकत्र करून त्यांच्या तालमी घेणे हे काम तर महाजिकीरीचे वाटे. पण ते आवश्यकही होते. अर्थात अनन्वयच्या कामामुळे या सर्व कामांचा आम्हाला चांगलाच सराव होता. दुसरीकडे शूटिंगसाठी सर्व तयारी चांगल्या प्रकारे करणेही अत्यंत आवश्यक होते. छायाचित्रकार, ध्वनिमुद्रणकार, लाईट्स, माईक्स इत्यादीची जुळवाजुळव करणे, त्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांच्यात संघभावना निर्माण करणे, त्यांना मालिकेचा विषय समजावून देणे याचेही नियोजन एकीकडे चालू होते. घोरपडे यांचे या क्षेत्रातील अनुभवी मित्र श्याम भुतकर आमच्या बरोबर होते. त्यांच्याच मदतीने मालिकेतल्या पहिल्या भागाचे शूटिंग आखले. पहिले तीन एपिसोड सर्वांनी उधारीवर काम करावे असे ठरवले. कारण इतकी मोठी आर्थिक गुंतवणूक करणे आम्हाला शक्य नव्हते. एडिटिंगची जबाबदारीही याच तत्वानुसार श्री.नरेंद्र डोळे यांनी उचलली. या सर्वांनी तेव्हा अत्यंत आपुलकीने जो मदतीचा हात पुढे केला तो अत्यंत महत्त्वाचा होता. त्याशिवाय काम करणे केवळ अशक्य होते. तेव्हा आम्ही बँकांकडेही लोन मिळावे म्हणून गेलो होतो; पण आमच्या आधी ज्या लोकांनी अशा कामासाठी लोन घेतले होते त्यांनी व्यवहारात चुका केल्या असल्याने बँकांनी अशा प्रकारचे लोन देणेच बंद केले होते. त्याचा फटका आम्हाला बसला. त्यांनी केलेल्या घोडचुकांचा परिणाम म्हणून आम्हाला बँकेतून हात हलवत परत यावे लागले. आम्हाला जे उत्तर मिळाले ते फार क्लेशकारक होते, "आता आम्ही असे लोन देणे बंद केले आहे कारण अनेकांनी बँकांना बुडवले आहे." या उत्तराने अर्थातच आमच्या आशेवर मात्र पाणी पडले. परिणामी आमची आर्थिक नड भागली नाही.ती जर भागली असती तर आम्हाला पदरचे पैसे घालावे लागले नसते. तो आर्थिक भार सुरुवातीला तरी उचलणे क्रमप्राप्त होते. मला हे देखील स्मरते आहे की मी दूरदर्शन मधल्या हे काम बघणाऱ्या अधिकाऱ्याला एक कप चहा पाजून सांगितले होते की, "बाबारे! माझ्या जवळ फार पैसे नाहीत. मीच कर्ज काढून हे काम करते आहे. तेव्हा मी दिलेला एक कप चहाचा गोड मानून घ्यावा व मला सर्वतोपरी सहाय्य करावे ही तुम्हाला माझी नम्र विनंती आहे." हातात पैसा नसला की अक्कल काम करायला लागते म्हणतात ना! ते हे असे! तो माझ्या या बोलण्याला नक्कीच "वेडेपणा आहे" म्हणून हसला असणार. पण खरं सांगू का? त्यावेळची माझी मन:स्थितीच अशी होती की मला कोण वेडं म्हणतंय की शहाणं म्हणतंय, याच्याशी मला काहीच कर्तव्य नव्हते. मला फक्त माझे काम होणेच महत्त्वाचे वाटत होते. एक मात्र खरे की माझ्या स्वभावातला सरळपणा तेव्हा माझ्या कामी येऊन अशा प्रकारे माझ्या मदतीला धावला होता.

सुरुवातीला आरती प्रभू, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर यांचे एपिसोड्स चित्रित करायचे ठरवले. रैवणकरांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव गाठी होता. श्याम भुतकर बरोबर होते. त्यांचाही आधार वाटत होता. आम्ही या मोहिमेवर निघालो. पहिल्यांदा आरती प्रभूंच्या एपिसोड साठी सावंतवाडी, कुडाळ गाठायचे नंतर इंदिरा संत यांच्या शूटिंगसाठी बेळगावला जायचे आणि मग पुण्याला परतून मुंबईला जायचे असे सर्व विचार करता ठरले.

("कवी शब्दांचे ईश्वर"—प्रकाशन पूर्व लेखमाला क्रमशः)

- माधवी वैद्य



२ टिप्पण्या:

  1. हा लेख वाचताना मला मी प्रोडकशन असिसटंट असतानाची आठवण झाली. आर्थिक मदत नसली की मालिका कशी कोलमडू शकते हे जवळून अनुभवले आहे. लेख खूपच ईन्स्पायरींग आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. या लेखनातून एकच गोष्ट साध्य होते.ती म्हणजे आत्मविश्वास
    खुपचं सुंदर असा लेख आहे.वारंवार वाचावा ईतका तो छान आहे.मांडलेला प्रवास देखील खुप छान आहे.प्रतीभावान व्यक्तिंचे पाऊल अनन्वयाला लाभले आणि अनन्वयाच पान उजळून निघालं.. खुप खुप शुभेच्छा 🙏

    उत्तर द्याहटवा