सिंगापूर: एक प्रेरणा

माझे आई बाबा तीन वर्षांनी पुन्हा सिंगापूरला आले. गप्पा मारताना घराच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर आश्चर्याने बाबा म्हणाले, "अगं, आम्ही मागच्या वेळी आलो तेव्हा समोर मोकळी हिरवीगार जागा होती आणि आता तीन वर्षांनी २० मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत?" मी त्यांना म्हणाले, " बाबा या इमारती दोन वर्षात बांधून झाल्यात कारण या इमारतींच्या भिंती, बाथरूम आणि जमीन प्री-कास्ट पध्दत वापरून तयार केली आहे . भिंती आधी फॅक्टरीमध्ये तयार करून साईटवर बसवल्या आहेत. तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. "असे का केले?" असे त्यांनी विचारले.

मग मी त्यांना सांगायला सुरुवात केली. सिंगापूरमध्ये बांधकामासाठी परदेशी कामगारांची गरज भासते कारण आर्थिक सुबत्तेमुळे ही कामे करण्यासाठी स्थानिक लोक मिळत नाहीत. आणि देश लहान असल्यामुळे बाहेरून जास्त कामगारही आणता येत नाहीत. ती समस्या कमी करण्यासाठी सुरूवातीला सरकारने प्री-कास्ट पध्दत वापरून बांधकाम करण्यासाठी बिल्डर लोकांना प्रोत्साहित केले आणि काही वर्षांनी ते अनिवार्य केले. त्याचा परिणाम असा झाला की भिंती, खिडक्याच नव्हे तर संपूर्ण बाथरूम प्री-कास्ट करून साईटवर आणले जाऊ लागले. बांधकामाचा वेग वाढला, दर्जा सुधारला आणि साईटवर कामगारांची गरज कमी भासू लागली व त्यामुळे तयार होणारे सामाजिक प्रश्न आपोआप सुटले.

इथले पब्लिक ट्रान्स्पोर्ट जगातले सर्वात उत्तम समजले जाते. प्रदूषणाची आणि वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त बस आणि ट्रेनचा वापर करावा म्हणून सर्वत्र ट्रेनचे नेटवर्क उभारण्यात येत आहे. मुख्य भागांमध्ये प्रत्येक ८०० मीटर अंतरावर एक ट्रेन स्टेशन असेल अशा पद्धतीने रचना करण्यात येत आहे. तसेच सिंगापूरचे उष्ण हवामान आणि इथला वेळी अवेळी येणारा पाउस लक्षात घेऊन सर्वत्र मुख्य इमारतीपासून ट्रेन स्टेशनपर्यंत कव्हर्ड लिन्कवे बांधले जातात, जेणे करून लोकांना पाऊस अथवा उन्हाचा त्रास न होता ट्रेन स्टेशनपर्यंत पोहोचता येईल. हा देश लहान असल्यामुळे येथे जागेची टंचाई सतत भसते. त्यामुळे ट्रेन्स शक्यतो भुयारी मार्गाने जातात आणि ट्रेन स्टेशनची रचना करत असतानाच त्याच्यावर बांधल्या जाणाऱ्या इमारतीचाही विचार होतो आणि त्याचा पाया ट्रेन स्टेशन बरोबरच बांधला जातो.

कुठेही नवीन वसाहत निर्माण करताना तेथे शाळा, मार्केट, दवाखाने आणि पब्लिक ट्रान्स्पोर्ट यांच्या रचनेचाही विचार केला जातो. त्यामुळे नवीन भागात राहायला जाणाऱ्या लोकांची कुठलीही गैरसोय होत नाही. एवढेच नव्हे तर सिंगापूर हा पहिला देश आहे ज्यानी वन्य प्राण्यांना मुक्त फिरता येण्यासाठी हायवेवर पूल बांधला आहे.

येत्या काही वर्षात चांगी विमानतळावर अजून दोन टर्मिनल्स बांधण्यात येणार आहेत. भुयारी ट्रेनचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवले जाणार आहे.

बाबा हे सर्व ऐकून मंत्रमुग्ध झाले आणि म्हणाले की येथील इमारती कायम नव्या दिसतात आणि कुठेही अनिर्बंध बांधकाम केलेले आढळत नाही. देश लहान असूनही सर्व जागेचे सुयोग्य नियोजन, लोकहिताच्या योजना आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे अवघ्या ५० वर्षात सिंगापूरने जी प्रगती केली आहे, त्याला तोड नाही. खरोखर जगातल्या बाकी देशांना सिंगापूरकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे.

 विनया रायदुर्ग


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा