रागाची गोष्ट

मुंबईमध्ये त्यावेळी एका बैठ्या चाळीमध्ये १० खोल्या, अशा १०० चाळी मिळून एक ब्लॉक, म्हणजे एका ब्लॉक मध्ये १००० खोल्या, असे ६ ब्लॉक मिळून मध्यमवर्गीय लोकांची सुखी कॉलनी होती. हन्ना व मोझेस २ नंबर ब्लॉक मध्ये व सुषमा व सुभाष हे बंगाली जोडपे ५ नंबर ब्लॉक मध्ये रहात असत. हन्ना व सुषमा दोन जीवाभावाच्या मैत्रिणी. हन्ना स्वतः मुस्लिम होती, पण मोझेस नावाच्या ज्यू मुलाशी तिचा प्रेमविवाह झाला होता. मोझेस स्वभावाने खूपच चांगला होता, सर्वांना कधीही मदतीसाठी धावून जात असे. सुभाष एका शाळेवर प्रिन्सिपॉल च्या पदावर काम करत असे, व त्याच शाळेत हन्ना प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करत असे. हन्ना व सुभाष दर वर्षी न चुकता रक्षाबंधन व भाऊबीज साजरे करत असत, एकमेकांच्या घरात अशा प्रकाराचा एकोपा होता. हन्ना व मोझेस मुस्लिम लोकांचे ईद व ज्यू लोकांचे सर्व उत्सव साजरे करत असत व चाळीमध्ये आजूबाजूला महाराष्ट्रीयन लोक असल्यामुळे दिवाळीला घरासमोर आकाशकंदील पण लावत असत, त्यामुळे शेजाऱ्यांना कधी परकेपणा असा वाटत नसे. 

सुषमाचा गिरीश नावाचा ५ वर्षांचा मुलगा हन्ना टिचरच्या वर्गात शिकत असे. हन्ना व सुषमा दोन्ही कुटुंबांचे एकमेकांकडे जाणेयेणे असल्याने गिरीश ला हन्ना टिचरचा खूप लळा होता, म्हणून सुषमाला दहा दिवसांच्या जरुरी कामासाठी त्यांच्या गावी जायचे होते व परीक्षेचा हंगाम असल्याने गिरीशला सोबत नेऊ शकत नव्हती, म्हणून तिने त्याला हन्नाकडे ठेवले कि, हन्ना शाळेत जातायेता त्याला सोबत घेऊन जाऊ शकेल. तसेच सुरु होते; पण एके दिवशी हन्नाला डॉक्टर च्या अपॉइंटमेंट मुळे लवकर घरी यायचे होते, ती पहिलटकरीण असून ८ वा महिना चालू होता, म्हणून तिने स्कूलबस च्या क्लीनरला सांगून गिरीशला बसमधून आणण्याची व्यवस्था केली, त्याने बस मधून उतरवून दिले कि तिकडून हन्ना टिचरचे घर जवळच २ मिनिटांवर होते व घरासमोरून एक छोटासा पायवाटेचा रस्ता होता, जिकडून फक्त माणसे चालत, गाड्या वगैरे जात नसत, त्यामुळे गिरीश एकटा घरी येऊ शकत असे व गिरीश घरी यायच्या वेळेला नेमकी ती घरी नसेल, म्हणून तिने शेजाऱ्यांना सांगून ठेवले कि, ‘थोडा वेळ गिरीश ला घरी बसवून ठेवा’, १-२ तासात ती त्याला तिकडून आणू शकेल. 

त्या दिवशी नेमके काही वेगळेच घडायचे होते. दुपारी २ च्या सुमारास गिरीश शाळेतून घरी येताना स्कूल बसच्या क्लीनर ने त्याला बसमधून उतरविले व बस निघून गेली. तेवढ्यात पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या स्कुटर चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने नेमकी ती येऊन गिरीश वर आदळली व गिरीश खाली कोलमडला. त्या अपघाताच्या आवाजाने रस्त्यावरील आजूबाजूच्या लोकांनी त्याला बाजूला घेतले व ऍम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलला नेण्याची व्यवस्था केली. वरवर पाहता त्याला काही इजा झालेली दिसत नव्हती. तो अभ्यासात खूप हुशार होता व त्याला परीक्षा चुकवायची नव्हती, म्हणून सारखा सांगत होता कि, ‘मला शाळेत जायचे आहे, माझी उद्या परीक्षा आहे’. लहान असल्याने अँब्युलन्समध्ये सोबत गेलेले शेजारी काका काहीतरी सांगून त्याचे मन रमविण्याचा प्रयत्न करत होते. तो सारखे पाणी मागत होता व अशावेळी पाणी देत नाहीत, म्हणून अँब्युलन्समध्ये नर्स शक्यतो पाणी देण्याचे टाळत होती, पण त्याच्या सतत मागणीमुळे घशाला कोरड पडली असेल, असे समजून तिने १-२ घोट पाणी भरविले व क्षणात त्याला रक्ताची उलटी होऊन तो अस्ताव्यस्त झाला व हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचरवरून उतरवून त्याला वार्डमध्ये शिफ्ट करण्याच्या फॉर्मॅलिटीज होईपर्यंत उशीर होऊन त्याचा श्वास बंद झाला. नंतर त्याचे पोस्टमोर्टम वगैरे करण्याचे ठरले, हॉस्पिटल ला एकदा गेल्यावर ह्या सर्व गोष्टी पार पडेपर्यंत त्यातून सुटका नसते. समजले कि, स्कुटरच्या जबरदस्त धक्क्याने त्याच्या कोवळ्या बरगड्यांचा जवळजवळ चुरा व्हायचा बाकी होता.

ही बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी घराघरात फोन नव्हते, मग मोबाईल ची तर गोष्टच दूर राहिली. त्यामुळे ह्या सर्व दुर्घटनेची हन्ना टिचरला काहीच कल्पना नव्हती. पण हन्नाच्या घराबाहेर माणसे जमा झाली होती. जेव्हा ती तिच्या डॉक्टरकडून पुन्हा घरी येत होती, तेव्हा तिने काही अंतरावरून पाहिले, पण तिला काही कळेना कि, घरी तर कोणीच नव्हते, मग माणसे का गोळा झाली आहेत. पण जेव्हा ती घरी पोचली व तिला कळले तेव्हा ती भीतीने धपकन खालीच बसली व क्षणात तिच्या डोळ्यासमोर मैत्रिणीने विश्वासाने आपल्या मुलाला तिच्या भरवंशावर तिच्या घरी सोडले होते व आता ती तिला कसे तोंड देणार होती व काय सांगणार होती, ह्या भीतीने तिची दातखिळीच बसली, तिथे जमलेल्या लोकांना पण आता गिरीशचे आईबाबा पुन्हा आल्यावर त्यांना समजल्यावर काय प्रसंग उभा राहील, हा विचार करून काहीच सुचत नव्हते. काही लोक हन्नाला सावरण्याचा प्रयत्न करत होते कि, तिला स्वतःला किंवा तिच्या पोटातील बाळाला काही इजा पोहोचू नये, म्हणून सर्वांचा प्रयत्न चालला होता. 

तेवढ्यात मोझेस ऑफिस मधून घरी परतला व हे सर्व समजून त्याला तर घाबरून अटॅक यायची पाळी आली, पण कसेतरी त्याने स्वतःला सावरले व हन्ना ला धीर देणे जास्त महत्त्वाचे होते म्हणून तिला म्हणाला कि, झाल्या प्रकारात तिचा काहीच दोष नव्हता. आणखी एक महिन्याने त्यांच्या घरात पण छोट्या बाळाचे आगमन होणार होते, तेव्हा तो बाळ आपण सुषमा भाभीला देऊ, ‘आपला बाळ आपल्या घरी वाढला काय किंवा सुषमा भाभीकडे वाढला काय, सारखेच आहे’; असे सांगून त्याने तिला तात्पुरते सावरले, पण २ दिवसांनी सुषमा व सुभाष जेव्हा परत आले, तेव्हा भीतीने तर त्यांची गाळण उडाली. सुषमा ला झालेली दुर्घटना समजली, तेव्हा आपला चालताबोलता मुलगा अचानक नाहीसा झाल्यामुळे वाईट वाटणे साहजिक होते, पण २-३ दिवसांनी तिने स्वतःला सावरले व हन्नाला म्हणाली कि, 'मनाला लावून घेऊ नको, त्यात तुझा काहीच दोष नाही, त्याचे आयुष्यच तेवढे होते असेल, म्हणून देवाने त्याला आपल्याकडे बोलावून घेतले. देवाची कृपा झाली तर पुन्हा त्यांच्या घरामध्ये छोट्या बाळाचे आगमन होईल’. 

आणखी एक महिन्याने हन्नाला एक सुंदर मुलगी झाली व हन्ना व मोझेस ने त्या मुलीला सुषमाला देण्याचा प्रस्ताव मांडला. हन्नाला पण ते सोपे नव्हते, आपले स्वतःचे मूल लगेच देऊन टाकणे तिलापण मुश्किल होते; पण आपल्यामुळे सुषमा स्वतःच्या मुलाला गमावून बसली, असा तिच्या मनाने धसका घेतला होता. सुषमा आता आपला रागराग करील, असे वाटून तिचे मन तिला खात होते. पण सुषमा व सुभाष एवढ्या वर्षांच्या मैत्रीला विसरले नव्हते, त्यामुळे सुषमाने हन्नाची समजूत काढायचा परोपरीने प्रयत्न केला. हन्नाला त्या धक्क्यातून सावरणे फार मुश्किल झाले. 

नंतर नोकरीच्या बदलीमुळे सुभाष व सुषमा ला दिल्लीला जावे लागले. २ वर्षांनी सुषमाला पण दुसऱ्या पुत्ररत्नाचा लाभ झाला, व तो दिसायला अगदी गिरीश सारखाच होता व सुषमाने त्याचे नाव पण गिरीशच ठेवले, तेव्हा हन्ना ला जरा हायसे वाटले. पण तो प्रसंग तिच्या आयुष्यभर लक्षात राहिला आहे व आठवण झाली कि, तिचे मन खात असते.

प्रतिमा जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा