अध्यक्षांचे मनोगत

ऋतुगंध शिशिर (२०१९-२० कार्यकालातील अंतिम आवृत्ती):

अध्यक्षांचे मनोगत

सर्वांना सप्रेम नमस्कार! 
महाराष्ट्र मंडळाने आपले रौप्यमहोत्सवी वर्ष थाटामाटात साजरे केले. प्रथम गुढी पाडव्याच्या मंगल मुहुर्तावर “गुण गाईन आवडी” या कार्यक्रमाद्वारे, भारताबाहेरील अनेक शहरांत आयोजिलेल्या “जागतिक पुलोत्सव” सोहळ्याचा पहिला कार्यक्रम सिंगापूरात करण्याचा मान, आपल्या मंडळाने पटकावला. पुढे, सर्व-व्यापक, सर्व-कला-समावेशक, तसेच सरकार दरबारातील ज्येष्ठ मंत्री/ भारताचे राजदूत/शेजारी राष्ट्रांच्या महाराष्ट्र मंडळांतील प्रतिनिधी या सर्वांच्या योगदानाने संपन्न झालेल्या रौप्यमहोत्सव सांगता सोहळ्या द्वारे व दिवाळीत ’सब कुछ अरूण-तरूण’ हे सूत्र असलेल्या “सूर निरागस” या कार्यक्रमाद्वारे, कार्यकारिणीने मंडळाच्या उद्दिष्टांची परिपुर्ती साधण्यात, धोरणात्मक प्रगती केली. सभासदांचे, कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे, प्रेषकांचे, हितचिंतकांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार!

२५ वर्षांच्या कारकिर्दित मंडळाने आपल्या कारभारा भोवती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण अनुभवले. गाणे/वाद्यवृंद असो, गणपतीतले कार्यक्रम असोत, नाटक असो, क्रिडास्पर्धा अथवा साहित्यिक कार्यक्रम असोत, सिंगापूरातील मराठी भाषिक जनतेसाठी, नेहमी सर्वांशी संवाद, सर्वांचा सहभाग आणि त्या द्वारेच आपल्या ७००+ सभासदांना “मराठी सहवासाची” पुरेपूर संधी, हे धोरण मंडळाने कायम ठेवले.

गेल्या काही वर्षांत सिंगापूरात अनेक ईतर भारतीय भाषांची मंडळे स्थापन झाली आहेत. तसेच असंख्य भारतीय सणांचे सोहळे व “बॉलीवूड” चा आधार घेऊन, प्रेक्षक (व त्यांचे करमणूकीचे/सांस्कृतिक रंजनाचे मासिक बजेट!) आपल्याकडे ’ओढण्याचा’ खूप चांगला/यशस्वी प्रयत्न करणाऱ्या, व्यापारी तत्वावर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या, अनेक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. याचा परिणाम अर्थातच महाराष्ट्र मंडळासारख्या सामाजिक संस्थेवर होणे साहजिक आहे. तो होत आहेच व पुढे वाढणारच आहे.

परंतू ईथेच आपण मंडळाचे ध्येय आणि त्याच बरोबर मंडळ उपलब्ध करून देत असलेला “मंच” यांची भूमिका किती महत्वाची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या सभासदांमधे व आपल्या पुढल्या पिढीत कलागुण व आपल्या संस्कृतीची/भाषेची जाणीव व आत्मीयता जागृत/वृध्दिंगत करण्यासाठी, तसेच तिचा यशस्वी पाठपुरावा होण्यासाठी, महाराष्ट्र मंडळ हे महत्वाचे, एकमेव आणि निर्णायक स्थान आहे. ईतर भाषेतील गाणी, नाटक, साहित्य (प्रामुख्याने हिंदी, ईंग्रजी) यांचे सादरीकरण/संवर्धन करणाऱ्या अनेक व्यापारी/व्यापारेतर संस्था सिंगापूरात कार्यरत आहेत. छान काम करीत आहेत. त्यांच्याशी आपल्याला स्पर्धा करायची नाही. तसेच, मराठेतर माध्यमांचा वापर करून जास्त प्रेक्षक, जास्त प्रसिध्दी, जास्त पैसे मिळवण्याच्या आकर्षणाने आपले मुख्य ध्येय दुय्यम होईल हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या सभासदांना इतर माध्यमांतील कार्यक्रम अनुभवण्याचे डझनांनी पर्याय आहेत. पण मराठी भाषेला, संगीताला, नाट्याला, साहित्याला, काव्याला, सणांना, मराठी सभासद/प्रेक्षक हा एकच पर्याय आहे..! तेव्हां मराठी कार्यक्रमांचाच पाठपुरावा मंडळ का करते आणि पुढेही करीत रहाणे का/किती महत्वाचे आहे, हे सर्वांच्या लक्षात येईल. म्हणूनच आपले “महाराष्ट्र मंडळ” आहे ! (“अमुक अमुक सांस्कृतिक कलामंडळ” नाही!!). अर्थात एक सिंगापूरची स्थानिक संस्था या नात्याने इथल्या इतर स्थानिक व सरकारी/निम-सरकारी संस्थां बरोबर, सुयोग्य व प्रभावी सहकार्य, मंडळ उत्साहाने/जोमाने करीत आहेच; उद: होळीचा असा कार्यक्रम येतोच आहे, पी.ए.चे कम्यूनिटी कल्ब, “लिशा” ईत्यादीं बरोबरचा सहयोग आहेच.....

यातूनच निर्माण होणारा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मंडळाला आपल्या या मंगल विधायक उद्दिष्टांचा पाठपुरावा प्रभावीपणे करता यावा यासाठी श्रमदान करणारे कार्यकर्ते/स्वयंसेवक व अर्थसहाय्य करणारे प्रेषक/हितचिंतक/देणगीदार यांची अत्यंत निकडीची गरज असते. २०१८/१९ या काळात जगात मंदीची लाट आली आहे आणि मंडळाला मिळणाऱ्या देणग्या/प्रेषकांचे योगदान यात कमालीचा उतारा आला आहे. मोठ्या देणग्या तर वाळूनच गेल्या. कार्यकारिणीला याचा अंदाज आहे आणि म्हणूनच तब्बल १० वर्षांनी मंड्ळाचे सभासद शुल्क वाढवण्याला पर्याय नव्हता. हे काम ऑक्टोबरच्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठरावाने पार पडले व १ जानेवारी २०२० पासून शुल्क-वृध्दी अंमलात आली. हे सर्व मंडळाच्या भविष्यासाठी किती महत्वाचे आहे हा देखिल मुद्दा सर्वांच्या लक्षात आला असेल.

माझा शेवटचा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा हा जरा आणखी व्यापक आहे. २५ वर्षांपुर्वी महाराष्ट्र मंडळाची नोंदणी झाली तेव्हांचे सिंगापूर आणि आताचे, यात एका पिढीचे अंतर आहे (साधारण २५-३० वर्षांत एक पिढी होते असे म्हणतात). आता आपली पुढची पिढी आर्थिक/सामाजिक दृष्ट्या सक्रिय होत आहे. बरीच वर्षे, मंडळात अरूण-तरूण (१५-२५) या वयोगटातील मुलांचा सहभाग जवळजवळ नाहीच, ही जाणीव माझे मन खात होती. मंडळाच्या उज्ज्वल भविष्याला लागाणारे जिज्ञासू कार्यकर्ते याच समूहातून येणार आहे. तसे झाले नाही तर त्याचे दूष्परिणाम काय होतील ह्याचा दृष्टांत मला मला ईतर मोठ्या आणि जुन्या मंडळांत काम करताना आला. अरूण-तरूण समूह कार्यरत झाला आणि आज ~३५ लोकांच्या या समूहाने २०१९ मधे मंडळाच्या गतिविधींना छान योगदान दिले. २०१९ मधल्या सर्व कार्यक्रमांची मराठीत निवेदने, अरूणतरूण सभासदांनी केली. दोन छोटे, एक मोठा असे कार्यक्रम स्वत: केले. मंडळाच्या कार्यकारिणीत व विविध संयोजनात नेतृत्व करण्याची तयारी देखिल अरूणतरूणांनी केली आहे. ही प्रगती खूप महत्वपुर्ण, उल्लेखनीय आणि मंडळाच्या भक्कम भविष्याच्या प्रवासात एक मोठी झेप आहे. समूहातील अरूणतरूणांनी “आम्ही मराठीत संपर्क/संवाद करण्याचा चंग बांधला आहे” असे सांगितले! माझ्या प्रमाणे अनेकांना ह्याचे कौतूक आहे यात शंकाच नाही.....! रौप्यमहोत्सव विशेष स्मरणिका अंकात (मंडळाच्या संकेतस्थळावर “Smaranika” पहा) मी अचल आणि परिवर्तनिय गोष्टींचा उल्लेख केला होता. तो जरूर पहावा.

या वर्षी मंडळाने What’s App या सामाजिक माध्यमाचा उपयोग करून संपर्क/संवाद व त्याद्वारे सहभाग/सहवास वाढ्वण्यासाठी विविध समूह स्थापन करण्याचे ठरवले आहे. या मागचे प्रयोजन असे की, विविध कलाक्षेत्रांत विशेष रूची असणाऱ्या सभासदांना एकमेकांशी संपर्क/संवाद आणखी सुलभ व्हावा. या समूहांचे नियंत्रण कार्यकारिणी सदस्य आणि समूहांचे संयोजक करतील. मंडळाच्या कार्यक्रमांचा दर्जा, वैविध्य आणि सहभाग या मुळे आणखी वाढेल ही कार्यकारिणीची अपेक्षा आहे.

म.मं,सिं ऋतुगंध समूहाने मानवी भावना ही शृंखला निवडली. सहा प्रमुख भावनांचे विश्लेषण झाले. शेवटी आपले आयुष्य समृध्द किंवा रूक्ष करतात ती माणसं आणि आपल्या/त्यांच्या भावनाच. मंडळाचा मंच वापरून याचा छोटासा मागोवा घेणे व वेळोवेळी पोषक सामाजिक भावना निर्माण करणे शक्य आहे; याचा सर्वांनी लाभ घ्यावा. २०१९-२० कार्यकालाची सांगता, मंडळाचे कलाकार, सदैव चिरंतन आणि मराठी मनांमधे कायम रूजलेल्या गीतरामायणाने करणार आहेत. सदा सर्वकाळात आदर्शच, अशा राम-चरित्राचे गायन हा आपल्यासाठी केवढा गौरवपुर्ण व प्रेरणादायी प्रसंग ठरेल! आपली वार्षिक सर्वसाधारण सभा लवकरच संपन्न होईल तेव्हां विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातील हा शेवटचा अंक, त्यामुळे माझे ऋतुगंधसाठी शेवटचे ’मनोगत’ आणि सर्वांना, खास करून माझ्या सहकारी कार्यकारिणी सदस्यांना व ऋतुगंध चमूला, ऋतुगंध २०१९-२० मधील या माध्यमाद्वारे केलेला मानाचा मुजरा/नमस्कार..!

आपला स्नेहाभिलाषी,
संतोष अंबिके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा