रागाच्या तऱ्हा, तऱ्हेवाईक राग

गायकाच्या गळ्यातला एखादा सूर घसरला तर कानसेन एवढे भडकतात का? कारण सुरेलपणा हे गायकासाठी एक पायाभूत मूल्य आहे. ते मूल्यच अवमानलं तर मग गाणं कसलं? विद्यार्थी वेळेवर वर्गात आले नाहीत तर शिक्षक एवढे का चिडतात? कारण शिस्त हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असं मूल्य आहे. आणि त्याबरोबरच कदाचित विद्यार्थ्यांनी वेळेवर वर्गात न येण्यानं त्यांचा होणारा निरादर. आदर हे ही एक मूल्य आहेच ना. एकंदर कुणाला राग येण्यामागे त्यांना महत्त्वाचं असणाऱ्या मूल्याची पायमल्ली हे कारण असू शकतं. 

आपल्याला पाहिजे ते न मिळणं हे रागाचं आणखी एक कारण. लहान मूल त्याला हवं ते मिळालं नाही की कुठेही भोकाड पसरतं. बक्षीस मिळालं नाही की मुलं चिडतात. प्रमोशन मिळालं नाही की कर्मचारी संतापतात. दुसरं वाहन आपल्यापुढे घुसलं की लोक उचकतात. निवडणुकीचं तिकीट न मिळण्यापासून खुर्ची न मिळण्यापर्यंत कशानंही राजकारणी चिडतात. एकंदर अपेक्षाभंगानं बरेच लोक संतापतात. 

राग अनिष्ट. रागाच्या भरात काही करू नये; नाहीतर महाभारत घडतं; सूडसत्र जडतं असं सगळं माहीत असूनही लोक रागाच्या आहारी जातातच. का? कारण ॲमिग्डॅला आपल्या मेंदूला वेठीला धरतो. ॲमिग्डॅला काय प्रकरण आहे ते तुम्ही गूगलून पहा. पण आपल्याला मेंदूत असणारी ही साधारण गोलाकार जोडगोळी उर्मीक्रियांची (impulsive actions) संचालक. जेव्हा मेंदू एखादी गोष्ट, परिस्थिती, व्यक्ती, परिवेश आपल्याकरता धोकादायक आहे असं ठरवतो तेव्हा मेंदूची पलगा प्रतिक्रिया (पलगा आठवतंय का? नाहीतर राग येईल हां मला 👹) कार्यप्रवण करण्यामागे ॲमिग्डॅलाच असतो. त्याचं काम शरीराला पळणे, लढणे किंवा गारठण्यासाठी तयार करणे हे आहे. मग ॲमिग्डॅला शरीरात ॲड्रेनलिन, काही काॅर्टिसाॅलही सोडतो. त्यानं होतं काय तर आपले हातपाय पलगासाठी तयार होतात. स्नायू ताठरतात आणि दोन बुक्क्या द्यायला घ्यायला आपण सरसावतो. 

मानव उत्क्रांतीच्या प्रवासात मेंदूचा विकास ह्या पद्धतीनं झाला. सतत काही ना काही धोका. त्यामुळे पलगासाठी तयार राहण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते ही पापणी लवायच्या आत होणं आवश्यक नाहीतर कधी आपण कुणाची मेजवानी झालेलो असू कोणास ठाऊक? त्यामुळे मेंदूनं ह्या उर्मीक्रियेकरता विशेष जोडगोळी तयार केली आणि तिला विशेषाधिकारही दिले. एखाद्या असुरक्षित परिस्थितीत आपण सापडू तेव्हा तार्किक मेंदूकडून नियंत्रण ॲमिग्डॅला आपल्या ताब्यात घेतो आणि झटपट निर्णय घेऊन कृती करतो. अर्थातच ही कृती आपल्याकरता योग्य असेलच असं नाही कारण तिच्यामागे विचार नसतो. पण अशा वेळी आपल्याला तेवढा वेळही नसतो. पाषाणयुगात किंवा अरण्ययुगात मेंदूला हे करावं लागणं स्वाभाविकच होतं. आजकालचं जग मात्र तसं राहिलेलं नाही. आता कुठे पावलापावलावर रानटी जनावरं नाहीत, साप नाहीत किंवा इतर तत्सम धोका नाही. पण मेंदूनं मात्र उर्मीक्रियेत काही बदल केलेला नाही. 

मग आता धोके काय? अपमान होणं (वाहनचालकांची रस्त्यांवरची भांडणं आठवा), कुणी आपल्याला कमी लेखणं, अपेक्षाभंग, परक्यासारखी वागणूक अशा “सामाजिक” धोक्यांना मेंदू असुरक्षित मानतो आणि पलगानंच उत्तर देतो. बरं पलगामुळे रक्तात ॲड्रेनलिन आणि काॅर्टिसाॅल जातं त्याचं काय? ते कुठून तरी बाहेर तर पडणारच. मग माणसं भांडतात, अर्वाच्य शिव्या देतात, आणि प्रसंगी मारामारीही करतात. AA म्हणजे Alcoholics Anonymous हे आपल्याला माहिती आहेच. पण AA म्हणजे Adrenaline Anonymous ही आहे. काही लोकांना ॲड्रेनलिनचं चक्क व्यसनच लागतं आणि मग रागनियंत्रणासारखं व्यवस्थापन तंत्रच आपल्याला वापरावं लागतं. 

एकंदर काय असुरक्षित वाटलं की मेंदू पलगा वापरणार. त्याला लढायचं असेल तर त्यासाठी सज्ज होण्यासाठीची रासायनिक द्रव्यं रक्तात मिसळणार. मग लढण्याशिवाय गत्यंतर नाही. हे मग थांबवणार कसं? आपल्याला असुरक्षित वाटलं की त्याची कारणमीमांसा करायला लागावी. मेंदूला प्रश्न दिले सोडवायला की तार्किक मेंदू बंद पडत नाही. तो ॲमिग्डॅलाला नियंत्रण बळकावू देत नाही आणि आपण अविचार करण्याची शक्यता कमी होते. 

पटलं नसेल तरी राग मानू नका बरं का, मंडळी?!

- नितीन मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा