सुरुवात

मनाची घालमेल चालूच होती, आपल्याला आठवेल ना सगळं? बोलता येईल ना आत्मविश्वासाने? हातपाय थंड पडू लागले होते, तशी मी चौफेर प्रश्नांना तयार होते परंतू कुठेतरी थोडे दडपण होते, त्या पहिल्या वहिल्या वर्गाचे. 

“काय? झाली का तयारी? आज तुझा पहिला वर्ग ना?” स्वरूपाने चौकशी केली. मी काहीसं हसून होकार दाखविला. 

“एक मुलगा आहे त्या वर्गात, फार त्रास देतो, त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. बाकी मुलं खूप छान आहेत” इतकेच बोलून ती तिच्या वर्गास निघून गेली. 

द्वितीय वर्ष बँकिंग! तसा गंभीर विषय आणि किमान १९ चा वयोगट. मी हातात हजेरी पत्रक घेतलं आणि तडक निघाले. साधारण ५० मुले होती, शांतपणे माझ्याकडे रोखून पाहणारी, कोण कोणाला घाबरत होतं हे कळतंच न्हवतं. स्वतःची ओळख दिल्यावर मी “त्याला” वर्गात शोधू लागले, पण काही कळेना. तास सुरु झाला आणि जवळजवळ १० 

मिनिटांतच “त्याने” स्वतःची ओळख दिली. उगाचच इकडे तिकडे पाहत होता, जमिनीवर काहीतरी पडलं आहे असे दर्शवत होता, मधेच वही बंद करत होता आणि वारंवार घड्याळ पाहत होता. म्हणजे एकंदरीत शिक्षकांचा राग अनावर होईल असे वागत होता. मी दुर्लक्ष करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते पण तो त्याचे प्रयत्न थांबवत न्हवता. बापरे! कसे करायचे दुर्लक्ष? किती त्रास देतो आहे हा? ५० मिनिटे सतत दुर्लक्ष कसे करायचे बरं? आणि या वयात विद्यार्थ्यांना काय शिक्षा करायची? पण काही तर इलाज नक्कीच करावा लागेल.

तो म्हणजे “आकाश” ज्याच्या वर्गात रोज माझा पारा चढायचा, राग अनावर व्हायचा आणि तरीही मी शांत असायचे. त्यानेच मला रागावर नियंत्रण ठेवून पुढे जाणे शिकवले, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांकडून मला मिळालेली ती पहिली भेट असावी. आकाश कधीही गैरहजर नसायचा, वर्गांत मधोमध बसायचा, उगाचंच काहीतरी असंबध्द प्रश्न विचारून वर्गात हशा पिकवायचा, कधीही वेळेवर चाचणी पत्र द्यायचा नाही, जेणेकरून काहीतरी बंडखोरी करू पहात होता. सर्वांना त्याच्या वागण्याचा त्रास होत होता पण काहीच उपाय सापडत न्हवता. जेव्हा तो वर्गात येतो म्हणजे त्याला शिक्षणात रस आहे मग अशी वागणूक का असावी?

शेवटी मी आकाशच्या आईला सांगायचं ठरविले कि तुमच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जा,कदाचित त्याला मानसोपचाराची गरज असावी. परंतु असे काहीही न्हवते, त्याला मानसोपचाराची नाही तर आम्हाला त्याला समजण्याची गरज होती. 

“आकाश” अतिशय हुशार आणि हरहुन्नरी मुलगा होता. घरात आईवडील आणि एक लहान भाऊ, इतकेच कुटुंब. आई सेवा-निवृत्त आणि वडील बँकेत नोकरीस. वडील अतिशय रागीट, घरात सर्वांनी त्यांच्या मनासारखे वागायचं. घरात टीव्ही पाहण्याची बंदी, मुलांना मित्रपरिवारांबरोबर बाहेर जाण्याची बंदी, कोणी किती वाजता उठायचे, काय शिकायचे, काय खायचे हे सगळे वडील ठरविणार.आणि त्यात जर काही वेगळे झाले तर वडिलांमधील जमदग्नी जागा होणार. आणि मग घरातील सर्वांनी मन मारून चुपचाप माना खाली घालून अपराध्यासारखे राहायचे. आकाशवर याचा खूप खोलवर परिणाम झाला होता. त्याच्या मनात जगात कोणीच आपले नाही अशी भावना निर्माण झाली होती. त्याच्यावर होणारी सततची चिडचिड त्याला सहन होत न्हवती आणि जर कोणी आपल्यावर चिडले नाही तर काहीही करून त्याने चिडावे असे त्याला वाटत होते. 

काय असते रागावणं? काही मनाविरुद्ध झाले कि राग येतो आपल्याला. आणि तो आपण आपल्या जवळच्यांवर काढतो. त्याही पेक्षा खरे तर आपल्यापेक्षा लहानांवर काढतो, जसे तुम्हाला मन आहे तसे त्यांना नाही? ती मुलं केवळ तुमच्यावर अवलंबून आहेत म्हणून त्यांच्या रागाला किंमत नाही?

“तुझ्या रागाला कोण विचारतंय?” असा प्रश्न जर तुम्ही त्यांच्या लहानपणी त्यांना विचारलात तर मोठेपणी ती नक्कीच तुम्हाला विचारणार नाहीत. तुम्ही मोठे राहू शकता का रोज मनाविरुद्ध परिस्थितीत? मग त्यांच्या कडून ही अपेक्षा ठेवतांना कसे तुटत नाही मन? 

पालकांनी फक्त एकदा मनापासून विचार करावा की दिवसातून किती वेळा आपण आपल्या मुलाचे ऐकतो. सकाळ ते रात्र होईपर्यंत किती गोष्टी ते मुल आपल्या मनाप्रमाणे करतं? कदाचित यातच त्या रागाचे मूळ सापडेल. शेवटी ती मुले आपल्यालाच पाहून शिकत असतात. मोठे झाल्यावर आपण पण इतरांशी असेच वागायचे इतकेच शिकतात ती, आणि हि कडी तशीच चालू राहते. रागाचे परिवर्तन कित्येकदा मानसिक आणि शारीरिक हानीमध्ये होते आणि त्यालाही लहान मुलांना जबाबदार ठरविले जाते. 

आकाशच्या त्याच्या घरच्यांकडून अपेक्षा खूप कमी होत्या पण त्यालाही एक हक्क होता, एक चांगली वागणूक मिळण्याचा. एका चांगल्या शिक्षणाची सुरुवात हि घरातूनच होते मग रागाचे निर्मूलनही घरातून व्हायला हवे. 

तेजश्री दाते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा