मित्रपरिवार

नमस्कार! 

लेख लिहण्याचा माझा पहिलाच अनुभव. प्रत्येक वेळी ऋतुगंधचे इमेल आले कि त्या विषयाला अनुसरुन विचार मनात चालू होतात. बरेच काही सुचत असते पण या वेळी विषयच असा आहे कि क्षणात मी वही पेन घेऊन माझे विचार शब्दात मांडायला सुरुवात केली. तो विषय म्हणजे " मैत्री"! माझ्यासाठी सर्वात जवळचा, मनाला मनाशी जोडणारा धागा म्हणजे मैत्री, जसं इंग्लिश मध्ये म्हणतात "Friends are the family we choose", अगदी खरे आहे. मित्र मैत्रीण हे आपण निवडलेले कुटुंबिय असतात. लहानपणापासूनच मला एकटं राहायला, खेळायला कधीच आवडलं नाही. शाळा कॉलेज मध्ये पण मला असे मित्र मैत्रीण मिळाले कि जे अजूनही माझ्या मनात खूप जवळ आहेत, त्यांची माझ्या जिवनात वेगळी स्पेशल जागा आहे, खूप छान छान आठवणी आहेत. 

लग्ना नंतर माझे पती श्रीनिवास यांच्या नातेवाईकांशी जसे माझे नाते जुळून आले, तसेच त्यांच्या मित्रपरिवराशी माझे ऋणानुबंध कधी जोडले गेले समजलेच नाही. श्रीनिवासच्या नोकरीच्या निमीत्ताने आमची सतत ट्रांस्फर होत राहिली. त्यामुळे आम्ही नेहमीच आमच्या घरच्यांपासून आणि जुन्या मित्र मैत्रिणींपासून दूर राहिलो. पण आम्हादोघा नवरा बायकोंचा स्वभाव तसा मनमोकळा आणि मिळुन मिसळुन राहण्याचा, त्यामुळे एकटे कधीच वाटले नाही. जीथे जाऊ तीथे मित्रपरिवार तयार झाला, त्यांनाच आपले कुटुंब मानुन, एकमेकांचे, सुखदुःखांचे साथी झालो. आमच्या दोघां प्रमाणेच आमची मुलगी इशिता एकुलतीएक आणि लाडात वाढलेली. तिला पण खुप गप्पागोष्टी करायला आणि लोकांशी बोलायला आवडते. खरे सांगायचे तर आम्हीं मित्रां बाबतीत खूप भाग्यवान आहोत. जशी टाळी एका हातानी वाजत नाही तसच मैत्रीचं नातंही दोन्ही व्यक्तींवर अवलंबुन असतं. याचे श्रेय मी माझ्या मित्र परिवारालाही तितकेच देते. आम्हाला नेहमीच जीवाला जीव देणारी लोकं भेटत गेली. विशेष संगावसं वाटतं म्हणजे यामधे अगदी लहान मुलांपासुन ते आजी-आजोबां पर्यंत सगळे वयोगट आहेत. 

लग्नानंतर कोल्हापूरला रहात होतो ...घरमालकीणबाई आजी ... माझे आणि त्यांचे असे काही मैत्रीचे नाते जुळून आले कि वयातील अंतर कधीच जाणवले नाही. त्या माझ्यावर आणि इशितावर अगदी निस्वार्थी प्रेम करायच्या. आम्हीं कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला गेलो कि त्यांची भेट घेतल्या शिवाय परत येत नाहीं. आम्ही असेच सतत नवीन ठिकाणी नवीन मित्रपरिवार साठवत राहतो. त्याच बरोबर संधी मिळेल तेव्हा जुन्या मित्रपरिवराच्या भेटी घेतो. यातून आम्ही खूप गोष्टी शिकलो, प्रत्येकाने कशा न कशा रुपात, छोट्या वा मोठ्या गोष्टींनी नेहमीच प्रभावित केले आहे. अगदी आत्ता हे लिहिताना देखील साऱ्यांचे चेहरे जसेच्या तसे माझ्या डोळ्या समोर येत आहेत. अशा प्रकारे चार वर्षांपूर्वी सिंगापूर मध्ये आलो. या वेळी तर भारतातील सारा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांपासूनच नव्हे तर आपल्या देशापासूनही लांब आलो आहोत. पण इथला अनुभव काही वेगळाच! आल्या दिवसा पासून खुपच छान अनुभव आले. नवीन नवीन लोकं भेटत गेले आणि कधी ते आमच्या जीवनाचा भाग होऊन गेले समजले नाहीं. यातील काही तर माझे सिंगापूरचे कुटुंबीय झाले आहेत. इंडियन स्कूल आणि आपले महाराष्ट्र मंडळ यामूळे सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने, एकसारखी आवड असणारे मित्र मिळाले. त्यामुळे या नवख्या देशात चार वर्षे कशी उडुन गेलीं समजले नाहीं. परदेशात आपली माणसे आणि आपली संस्कृती याची खुप छान सांगड झाली आहे. "Friends are connected Heart to Heart. Distance and time can't break them apart" - सातासमुद्रापार बसुन इंटरनेट आणि सोशल मिडिया यामुळे सारा जुना मित्रपरिवार पण सहज संपर्कात आहे. दररोज सकाळी good morning पासुन प्रत्येकाची आठवण येते, दिवसाची सुरुवात अशी मस्त होते! 

आता डिसेंबर महिना आला कि भारतात जायचे वेध लागले. भारतातील मित्रांचे, नातेवाईकांचे भेटीचे प्लॅन्स सुरू झालेत, "कधी येणार? काय काय मज्जा करायची? कुठे कुठे फिरायला जायचे?", अशा प्रश्नांची सुरुवात झाली आहे. या साऱ्यांना कधी भेटेन असे झाले आहे. मैत्रीच्या या नात्याने आमचे जीवन संपन्न आहे आणि असेच राहो. असा हा प्रेमाने मानाने जुळलेला मित्रपरिवार दिवसेंदिवस वाढत जावो अशी इश्वर चरणी प्रार्थना.

- सौ. मिनल पै रायकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा