माझं स्वतःशी नातं

अल्लड बालपण फुलपाखरासारखं आलं,
ज्याने माझ्या अंगावर हळुवार मोरपीस फिरवलं.
माया बहिणींची आणि पूर्ण कुटुंबाची,
आयुष्यात उणीवच नव्हती कशाची.
दिवस, वर्ष किती लवकर गेले,
हे माझे मलाच न कळे.
कॉलेजचा तो दिवस पहिला,
एक नवीन आशा देऊन गेला.
मित्र, मैत्रिणींचा थवा व गप्पांचे अड्डे,
ओसंडून वाहायचे कॉलेजचे कट्टे.
इंद्रधनुष्याने आपले साती रंग पसरले,
आणि कॉलेजचे ते दिवस भुर्रकन उडून गेले.
मग रचली हातांवर हिरवीगार मेंदी,
ती तर होती नवीन आयुष्याची नांदी.
हिरवा चुडा आणि शालू भरजरी.
लेवून मी झाले नवी नवरी.
संसार मांडत, नाती जोपासत आई मी झाले,
सासू, सासऱ्यांच्या प्रेमाने धन्य मला वाटले.
करिअर आणि संसार दोन्ही उत्तम सांभाळलं,
राजीवच्या हातभाराने यश दोन्हीमध्ये मिळालं.
स्वतःशी नातं हा विषय मनापासून आवडला.
आत्तापर्यंत त्याचा विचार करायला, वेळच नव्हता मिळाला.
म्हणतात ना, दुधापेक्षा साय जास्त प्रिय असते.
ईवानला पाहताच मला ते तंतोतंत पटते.
सगळं पडताळून पाहिलं, आजी आणि माजी.
माझं स्वतःशी सर्वात प्रिय नातं म्हणजे, मी आहे ईवानची आज्जी.

- मेघना असेरकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा