ओडिशाच्या ओढदिशा

पर्यटन हा मुळातच बहुतांश जनांचा आवडीचा विषय. वेगवेगळी ऐतिहासिक, सांस्कृतिक व निसर्गरम्य ठिकाणं पाहण्यात, तेथले विशेष, माहिती वगैरे गोष्टी बारकाव्याने निरखण्यात जवळ जवळ सर्वांनाच रुची असते हेही तितकेच सत्य. १६ -१७ वर्षांहून अधिक काळ भारताबाहेर सिंगापुरात राहावे लागल्यामुळे असे सतत वाटत राहते की भारतात बघण्यासारख इतकं काही आहे पण दर वेळी स्वदेश दौऱ्यात धावपळीत ठराविक स्थानांव्यतिरिक्त खऱ्या अर्थाने सहली व पर्यटन असे आवर्जून क्वचितच घडते. पण या वेळी वर्षा अखेरच्या रजेच्या सुट्ट्यात अनायासे असा योग जमून आला. यंदा ओडिशा या प्रदेशाच्या दिशेने कूच केले. श्रीमान मेव्हणे यांनी भुवनेश्वर या शहरात नव्याने नोकरीनिम्मित्त वास्तव्य केल्याने सौ चे माहेर पण व आमच्या कुटुंबाच्या सुट्ट्या हे दोन्ही सुयोग एकत्र जुळून आले.

ओडिशाचे आधीचे नाव ओरिसा असे होते हे सर्वांना ज्ञात आहेच. मुळात हा प्रदेश तसा प्राधान्याने आदिवासी रहिवाश्यांचा असा मानला, गणला जायचा. भारताच्या पूर्व समुद्रतटावर स्थित हे राज्य वरच्या बाजूला कोलकाता व खालच्या बाजूस विशाखापट्टणमच्या आसपास मध्यावर पडते. भुवनेश्वर ही या राज्याची राजधानी. पुरी, कोणार्क व कटक ह्या राज्यातली अन्य परिचित स्थानं. आम्ही पाहिलेलं पहिलं ठिकाण म्हणजे जगन्नाथपुरीचे विख्यात देऊळ. १२ ज्योतिर्लिंगांपैकी जरी हे स्थान नसले तरी चार धाम यात्रांपैकी एक आहे. जगन्नाथ, बहीण सुभद्रा व थोरले बंधू बलभद्र (बलराम) अशा तिघांच्या मूर्ती या देवस्थानी मुख्य गाभाऱ्यात पाहण्यास मिळतात. सुमारे ८०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले. निमुळते कळस असलेले हे मंदिर दगडी बांधकाम व नक्षीदार शिल्प-सौंदर्य लाभलेले आहे. दर वर्षी जुलै महिन्यात होत असलेली जगन्नाथ रथयात्रा येथील प्रसिध्द धार्मिक सणसोहळा आहे. ह्या रथयात्रेत जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा या तिघांचे विग्रह तीन रथांतून पालखी स्वरुपात २ कि. मी. अंतरावर असलेल्या त्यांच्या आत्या गुंडीचा देवीच्या मंदिरात नेले जातात व एक आठवडाभर तिथे राहून परततात. आषाढ शुक्ल द्वितीया या तिथीवर ही रथयात्रा दर वर्षी आरंभिली जाते. दर १२ वर्षांच्या कालांतरावर जेंव्हा दोन आषाढ मास एका वर्षी येतात तेंव्हा हे तिन्ही विग्रह नव्याने बदलले जातात. ह्या मूर्ती एका प्रकारच्या लिंबोणी वृक्षाच्या लाकडापासून केल्या जातात. ह्या मंदिरात दररोज ५६ भोग म्हणला जाणारा नैवैद्य देवांना दाखवला जातो. हे असे असणे बरोबर अथवा नाही हा भाग मात्र वेगळा पण वस्तुस्थिती अशीच आहे. 

भुवनेश्वर येथे स्थित असलेले ओडिशातले आणखी एक मंदिर म्हणजे लिंगराज मंदिर. सन ११०० च्या सुमारास हे मंदिर राजा लाला तेंदु केशरी याने बांधले व इथले दगडी कोरीव बांध काम अतिशय कौशल्यपूर्ण व आपल्याला थक्क करून सोडणारे आहे. भगवान शिवशंकराचे हे मंदिर खरोखरीच प्रेक्षणीय आहे. येथे लहानमोठी सर्व मिळून जवळ जवळ १५० उपमंदिरे आहेत. या मंदिराची उंची १८० फूटाची आहे. 

ओडिशातले सर्वात प्रसिध्द पर्यटनस्थान म्हणायचे झाले तर ते आहे कोणार्क चे सूर्यमंदिर. १३ व्या शताब्दीत राजा लांगुला नरसिंग देव याने बांधलेले हे अप्रतिम मंदिर भारतातल्या अत्यंत प्रेक्षणीय स्थानातील एक ठरेल यात वाद नाही. इथे कुठल्याच देव अथवा देवीची मूर्ती अशी नाहीये. संपूर्ण मंदिर सूर्यदेवाच्या भव्य रथाच्या रूपात शिल्पकलेच्या अगम्य आविष्काराने घडवले गेले आहे. याच्या बांधकामाला तब्बल १२ वर्षे तेंव्हा लागली होती. २२८ फूट उंचीचा हा सूर्यरथ सात अश्व व २४ चाकांनी सुसज्ज कोरला गेलेला आहे परंतु काळाच्या ओघात मुख्यत्वेकरून समोरील अश्व व तसेच काही भाग भग्न पावले आहेत. 

गाईडकडून मिळालेल्या माहितीनुसार परकीय राजांकडून झालेल्या आक्रमणातही ह्या स्थानावर हल्ले होऊन सुरुंग लावून ही दशा करण्यात आली. संपूर्ण रथरुपी मंदिराच्या बाह्य भिंतींवर अगणित लहानमोठी लेणी कोरलेली आहेत जी त्या काळाचे राहणीमान व ऐतिहासिक पुराव्यांची साक्ष देत आजही उभी आहेत. पुरीपासून ३६ कि. मी. अंतरावर हे सूर्यमंदिर स्थित आहे. कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी हे मंदिर पाहिल्यावर "इथे मनुष्याच्या भाषेवर दगडातल्या भाषेने मात केली आहे" असे उद्गार काढल्याचे म्हण्टले जाते. भारताच्या पूर्व समुद्रतटावर असलेल्या राज्यात साक्षात रविराजांसाठी त्यांना सन्मुख असा भव्य रथ घडवला जावा व सूर्यकिरणे त्यावर पडताच जणू सूर्यदेव त्या रथावर आरूढ होऊन त्यांची स्वारी नित्य निघते असे वाटावे, हे प्रत्यक्ष पाहून असे काही विचार मनात तरळून गेले की यासारखा विलक्षण संयोग हाच. 

वर उल्लेखली गेलेली तीन स्थाने जगन्नाथ पुरी मंदिर, लिंगराज मंदिर व कोणार्क चे प्रसिध्द सूर्यमंदिर - या तिन्हीस मिळून ओडिशाचा सुवर्णत्रिकोण असे म्हणले जाते. 

मंदिरदर्शने झाल्यानंतर आम्ही काही अन्य रमणीय जागांच्या शोधात असताना चीलिका तलाव (Chilika Lake) हे स्थान पाहण्यात आले. हा भारतातला सर्वात मोठा तलाव असल्याचे नुकतेच कळले. ११०० व. कि. मी. (सिंगापूरच्या दीडपट मोठा) चे आकारमान असलेला हा तलाव म्हणावा का एक भली मोठी नदीच असा प्रश्न मस्तकात डोकवून गेला. भुवनेश्वरहून १०५ कि. मी. व पुरीहून १६५ कि. मी. अंतरावर चीलिका तलाव स्थित आहे आणि तो बंगालच्या महासागरास जोडलेला असून यात बरीच लहान लहान बेटे आहेत. मासे फासण्यास कोळी लोकांचे हे आवडते स्थान असून, दूरच्या देशविदेशाहून लांबचे पल्ले पार करून आलेले विविध पक्षीही इथे पाहायला मिळतात व या निसर्गरम्य स्थानास अधिकच रमणीयता प्रदान करून जातात. 

धउली गिरी भुवनेश्वरहून केवळ ८ कि मी अंतरावर असलेले आणखी एक पाहण्याजोगे स्थळ आहे. दया नदीच्या तटावर हे ठिकाण स्थित असून येथे १९०० सालच्या सुमारास जपानी उत्खननकारांद्वारे इथे शांतीस्तूपे स्थापित करण्यात आली. याच ठिकाणी कलिंग युद्धात विजयानंतर राजा अशोक याने हजारो शवांना पाहिल्यानंतर स्वतःचे संपूर्ण परिवर्तन घडवून बुद्धधर्माच्या प्रसारास सुरुवात केली असे मानण्यात येते. 

मुक्तेश्वर मंदिर या ठिकाणाची नोंद ही ओडिशा पर्यटकांनी विशेष करून घेतली पाहिजे. लिंगराज मंदिराहून केवळ २ कि. मी. अंतरावर असलेले हे मंदिर एक हजार वर्षांपूर्वी बांधलेले असून इथले कोरीव कारागिरीचे शिल्पकौशल्यही पाहण्याजोगे नक्कीच आहे. याची उंची ३५ फुटाची असून भुवनेश्वरचे हे आणखी एक आकर्षण असे खचितच म्हणता येईल. 

पुरी या पावन स्थानास एक खूप लांब असा देखणा समुद्र तट लाभलेला आहे. बंगालच्या महासागराच्या या भागास महादधी असे म्हणतात. या तटावर समुद्र अधिक आक्रमक नसून जास्त करून सौम्य सागर असा मानला जातो. महादधीच्या घाटाचे नाव स्वर्गद्वार असे आहे व येथे मृत शवाचा अंतिम संस्कार घडल्यास त्यास मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते. या तटावर पर्यटकांसाठी अनेक हॉटेल स व रिसॉर्टस आहेत. काहींना त्यांचे खाजगी किनारे (private beaches) लाभलेले आहेत. 

इतर शहरां प्रमाणेच भुवनेश्वर शहरासही एक प्राणी संग्रहालय लाभलेले आहे - नंदनकानन झू पार्क. पण येथील प्राण्यांची संख्या, देखरेख व त्यांच्यातला जिवंतपणा विशेष वाटला. उदाहरणार्थ पांढरे वाघच जवळ जवळ २० ते २५ च्या संख्येत आढळले तर पिवळे वाघही इतर प्राणी संग्रहालयांपेक्षा बरेच अधिक पाहण्यास मिळाले. आणि मुख्य म्हणजे पर्यटक पाहण्यास येतात तेंव्हा ही जनावरे अर्धमेल्या अवस्थेत लोळत पडलेली नसून चांगल्या ताज्यातवान्या अवस्थेत पाहायला मिळतात हे एक विशेष वाटले. 

चीलिका तलावाच्या उत्तरपूर्व भागात स्थित असेलेले मंगलाजोडी पक्षी आश्रयस्थान (bird sanctuary) हे आणखी एक भेट देण्याजोगे स्थान आहे. भुवनेश्वर पासून ७० कि. मी. अंतरावर हे आहे. जवळ जवळ १५० प्रजातींचे पक्षी येथे स्थलांतरात भेट देतात. काही काळापूर्वी इथे पक्षांना गावकऱ्यांकडून पैशासाठी जीवानिशी मारले जायचे परंतु आता हळू हळू हे कमी होत आहे असे समजले. फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी हे ठिकाण नक्कीच आकर्षण ठरेल यात शंका नाही. 

उदयगिरी व खंड गिरी या गुहा २ हजार वर्षांहूनही अधिक काळापूर्वी (इ. पू. ३००) कलिंग प्रदेशाच्या खारवेल नावाच्या राजाने बांधल्या होत्या. पूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या गुहा जैन धर्माच्या साधूंच्या ध्यानसाधनेसाठी वापरल्या जात. भुवनेश्वरच्या उत्तरपश्चिम दिशेला सुमारे ८-१० कि. मी. अंतरावर या गुहा स्थित आहेत. यांची उंची जवळ जवळ १३० फूट असून उदयगिरीत ४४ गुहा तर खंड गिरीत १९ गुहा आहेत. राणी गुहा, गणेश गुहा अशी काही प्रमुख गुहांची नावे आहेत. 

राजा-राणी मंदिर हे भुवनेश्वर शहरातच स्थित असून सुमारे १००० वर्षां पूर्वी बांधले गेलेले आहे. पूर्वी हे इंद्रेश्वराचे मंदिर असेही म्हणले जायचे. येथील शिल्पकला ही मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिराप्रमाणेच स्त्री-पुरूषां च्या कामक्रीडांसंबंधित छबींची छटा दर्शवून जाते. या मंदिरातही कुठल्या देव वा देवीची मूर्ती अशी नाहीये. भुवनेश्वरातील मोठे संगीत व कलांचे कार्यक्रम सहसा ह्या मंदिराच्या परिसरात आयोजिले जातात. 

बाकी इतर बाबी लक्षात घेता, भारतात नेहमी प्रमाणेच पर्यटनस्थानांच्या ठिकाणी व्यवस्था, स्वच्छता पुष्कळ सुधारण्याची आवश्यकता आहे हे प्रकर्षाने जाणवतेच हे ही तितकेच खरे. तरी अशा एकंदर पर्यटन फेरीनंतर एक चांगला बदल जाणवला. कधी त्या भागात जाण्याची संधी लाभल्यास किंवा आवर्जून ओडिशाच्या दिशेने भ्रमणानुभवाचा संयोग अवश्य घडवून आणावा हा सल्ला देत इथेच थांबतो! 

नंदकुमार देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा