ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
हिरवंगार शेत माझं आज ओसाड पडलंय,
दुष्काळाच्या हट्टापायी पावसानं नातं तोडलंय...
लेकरावानी जपलेलं उभं पीक जळून गेलं,
कष्टानं कमावलेलं नशिबानं ओढून नेलं...
थेंबभर पाण्यासाठी कोसभर पायपीट केली,
जनावरांच्या जीवासाठी छावणीची वारी केली...
भेगाळलेली जमीन बघून काळजाला गेलाय तडा,
आभाळाकडे डोळे लावून शिंपतोय अश्रूंचा सडा...
तगमग होते जीवाची, जगण्याचं कोडं सुटत नाही,
पावसाच्या कृपेशिवाय शेतकऱ्याचं कर्ज फिटत नाही...
सांग तरी देवा तुझ्या मनात काय दडलंय,
दुष्काळाच्या हट्टापायी पावसानं नातं तोडलंय...
- प्रतिभा तळेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा