स्व. शांताबाई पाठक

आत्मचरित्र हा खरं म्हणजे साहित्याचा अतिशय अर्थपूर्ण प्रकार आहे. एके काळी थोरामोठ्यांच्या आत्मचरित्राबद्दल बरेचसे वाचण्यात यायचे आणि आत्मचरित्रांचा सर्व सामन्यांवर होणारा सशक्त प्रभाव दुर्लक्ष करण्याइतका नक्कीच नसतो, हे आपण सर्वांनाच पटत असेल. कुठे तरी मला ही हे पटत असले तरी आत्मचरित्रांबद्दल तितकीशी ओढ आता वाटत नाही. त्याला कारण असे की अलीकडे उठसूट आत्मचरित्र लिहिण्याचा प्रकार इतका काही बोकाळलेला आहे की वरचेवर भल्यामोठ्या प्रमाणात स्वतःच्या जीवनावर कित्येक नवप्रसिध्द लोक चक्क आत्मचरित्रांच्या प्रतीचे विमोचन वगैरे करताना सहज आढळतात. हपापलेल्या भावनेने, त्वरित प्रसिद्धीकरता आसुसलेल्या प्रवृत्तीमुळे म्हणा किंवा इतर कशाही मुळे म्हणा, सध्या भरमसाठ संख्येत आत्मचरित्रे प्रकाशित होत आहेत.

एके काळी संपूर्ण आयुष्य समाजाकरिता झटून, कुठल्याही प्रसिद्धीचा झोत अंगावर न झेलता ती थोर माणसे ह्या
स्व. शांताबाई पाठक 
जगाचा निरोप घेऊन निघून गेल्यावर, त्यांनी समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल जर कुणाच्या लक्षात आलेच तर त्यांची आत्मचरित्रे जन सामान्यांपर्यंत पोहचत होती आणि त्यातून त्यांच्या विषयक माहिती समाजास मिळत होती. आता मात्र संपूर्ण जीवन जगण्यापूर्वीच कर्तृत्वाचा टेंभा मिरवणाऱ्यांची संख्या भलतीच वाढली असून, खासगी आयुष्य लोकांसमोर मांडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आणि त्यामुळेच आत्मचरित्रांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुन्हा, प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे कुठल्याही प्रकाशन संस्थेच्या मध्यस्थी शिवाय सहजपणे blog रुपात आत्मचरित्रे लिहिता येण्याच्या स्वातंत्र्यामुळेही जगाच्या कानाकोपऱ्यातून चिक्कार प्रमाणात लिहिले जात असले तरी, मला वाटते त्यात प्रामाणिकपणा मात्र पूर्णपणे लोपलेला आहे.

आपल्या सर्वांचे आयुष्य, आपले अनुभवविश्व जीवन जगत असताना आलेल्या निरनिराळ्या कडू गोड आठवणींमुळेच निरनिराळे असते. आणि माझ्या मते, माणसास आत्मचरित्रे लिहिताना स्वतःच्या अनुभवांचे खरेखुरे विश्लेषण, त्याचा खरा उल्लेख, जगतानाचा संघर्ष, प्रसंगी स्वतःची उलट तपासणी - ह्या सर्वाचा प्रामाणिक आराखडा मांडायला पाहिजे. आणि तसे जर एखाद्याला करता आले नाही तर त्याने ह्या भानगडीत पडूच नये ...

"ऋतुगंध"चा हा वसंत विशेषांक मनगटाच्या बळाकरिता वाहिला असल्याने, आज मला मिळालेल्या संधीचा उपयोग करताना, माझ्या आयुष्यात - अल्पावधी करताच का होईना - आलेल्या माझ्या आजे सासूंचे आयुष्य जगासमोर मांडण्यास नक्कीच आवडेल.

१९ व्या शतकात जन्मलेल्या शांताबाईंचे आयुष्य वाचताना आपण सर्वांना नक्कीच प्रचंड प्रेरणा मिळेल, प्रसंगी गलबलूनही येईल कारण एके काळी अगदीच अशक्य अश्या भासणाऱ्या कित्येक अडचणींवर मात करून केवळ ठाम निर्धाराच्या जोरावर "त्या जगण्यावर" स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शांताबाई जश्या मला प्रेरणास्थान वाटल्या तश्या त्या तुम्हा सर्वांनाही वाटतीलच.

कोवळ्या अल्लड वयाच्या, अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाच्या शांताबाईंच्या नूतन परिणीत आयुष्याची सुरवात तशी सुखासीनपणेच सुरु झाली. संभ्रांत पण संकुचित विचारधारेच्या कुटुंबामध्ये लग्न होऊन आलेल्या शांताबाईंचे पती श्री रामचंद्रराव हे revenue क्लर्क असून त्यांचा रेशमी साड्या विक्रीचा व्यवसाय त्यांच्या यादीत असलेल्या उच्चभ्रू गिऱ्हाईक वर्गामुळे चांगलाच भरभराटीला आला होता. त्यामुळे समाजात त्यांचे राहणीमान त्या जुन्या काळातही तसे बऱ्यापैकीच होते. पण अचानक १९३४ साली रामचंद्ररावांच्या अकाली निधनामुळे नवथर वयातच वैधव्याचा तडाखा सोसणाऱ्या शांताबाईंच्या आयुष्याची पुढची वाटचाल मात्र ह्या अकल्पित प्रसंगाने फारच खडतर झाली.

दोन वर्षाची मुलगी आणि सात महिन्याच्या मुलासकट, त्यांच्या सासरच्या मंडळींकडून त्यांची रवानगी माहेरी करण्यात आली. सासरच्यांकडून कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना शांताबाईंना त्यांच्या आईकडे आधाराला जाण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नव्हता. त्यांची आई चार घरी स्वयपाक करून किडूक मिडूक मिळकतीत घर चालवत असल्याने अजाण वयात गळ्यात पडलेल्या जबाबदारीमुळे शांताबाईंनी त्या दु:खाला पचवून राहिलेल्या शिक्षणाला पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ठरविले. त्यांनी पुढील तीन वर्षात गणितासारख्या कठीण विषयात प्रथम श्रेणी विशेष गुणवत्तेसकट मिळविली आणि त्यामुळे लवकरच त्यांना शिक्षिकेची नोकरीही मिळाली. कुठे तरी स्थिरावू पहात असलेल्या शांताबाईंना पुन्हा एकदा नियतीने त्यांच्या मुलीच्या निधनाचे दु:ख दिले. पुन्हा एकदा खचलेल्या शांताबाईंनी उचल धरली ती केवळ मुलापायी - जो आता त्यांच्या जगण्याचा एकमेव उद्देश होता.

मुलाला शिक्षित करतानाचा त्यांचा संघर्ष देखील सोपा नव्हता. संस्कृत शिकून देवळात पुजारी होईल हा, असे भवितव्य सांगणाऱ्या पत्रिकेनुसार, मुलाने पुढे पुजारीच व्हावे, असला सल्ला देणाऱ्या जुनाट बुरसटलेल्या विचारसरणीच्या नातेवाईकांच्या सल्ल्यांना न जुमानता त्यांनी मुलास विज्ञान आणि गणित विषय देण्याचा निर्णय घेऊन गुलाम भारतावर इंग्रजांचे शासन असणाऱ्या त्या काळात एक प्रकारचा क्रांतिकारक निर्णयच घेतला होता.

शिष्यवृत्त्यांवर शिक्षण घेत, भौतिक शास्त्रात पदवी घेऊन पुढे phosphorescence ह्या थिसिस वर रिसर्च करून doctorate मिळविण्याचा त्यांच्या मुलाचा तो सोनेरी दिवस शांताबाईंच्या संघर्षपूर्ण अन कष्टमय आयुष्यात आलेल्या काही मोजक्याच सुखाच्या क्षणांपैकीचा पहिलाच सुखाचा क्षण होता. पुढील जीवनात आपल्या नातवंडांनाही आपले मार्गदर्शन दिल्याने ती सगळी आज जगाच्या विविध देशांमध्ये राहून मोठ्या पदांवर पोहोचण्यात सक्षम झालीत, ती फक्त ह्या हुरहुन्नरी स्त्रीनं दिलेल्या प्रेरणेमुळेच! त्यांच्या नातवंडांपैकी माझे दीर हे आज एका नामवंत फ्रेंच इलेक्ट्रिक Schneider ह्या कंपनीत इंजिनियर तर नणंद ही senior neuro physician म्हणून अमेरिकेत वास्तव्य करत आहे, तर माझे पती हे जर्मन कॉर्पोरेट giant SIEMENS सारख्या नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीच्या मेडीकल इंजीनियरिंग विभागात कार्यरत असून Asia pacific headquarters असलेल्या सिंगापूर ह्या देशात आपले आयुष्य जगत आहेत.

आपल्या सशक्त अर्थव्यवस्थेमुळे जागतिक पातळीवर आघाडीवर राहून पाश्चिमात्य देशांना लढत देत असलेल्या सिंगापूर सारख्या देशात, माझ्या पतींच्या सोबत आयुष्य जगताना मी काळाच्या पडद्याआड गडप झालेल्या माझ्या ह्या दिवंगत आजेसासूला स्मरण करते आणि मला आणि माझ्या मुलांना त्यांच्याच मुळे मिळालेल्या ह्या ऊबदार आश्वासक आयुष्याचे श्रेयदेखील देते.

स्त्रीने देखील समाजात ओळख, स्थान या करिता बाहेर पडून काही करावे असे वारंवार जाहिरातीतून सांगितले जात आहे. अगदी खरंय! स्वतःची स्वतंत्र सावली पडावी असे वाटत असले तर त्याकरिता भर उन्हात उभे ही राहावे लागते. नवऱ्याच्या सावलीत उभे राहिल्यावर समाजात स्वतःची सावली व ओळख कधीच होत नाही. पण हे जरी खरे असले तरी सांगावेसे वाटते की घरसंसाराच्या चौकोनी विश्वात राहून बाहेरची आघाडी सांभाळणाऱ्या नवऱ्याला पाठिंबा देणाऱ्या, काटकसरीने, नेटकेपणाने, संसार - मुले सांभाळणाऱ्या स्त्रियादेखील प्रेरणास्थान असू शकतात आणि त्याही घराला, काही अंशीच का असेना, आर्थिक पाठबळच देतात. त्यामुळे त्याही अनुकरणीय असतात. संसाराच्या रहाटगाड्याची दोन्ही चाके (स्त्री आणि पुरुष ) स्वकर्तृत्व गाजवण्याकरिता बरोबरीने धावली तर त्यात होणाऱ्या फरफटीत, घरादाराच्या मानसिक स्वास्थ्याचा पायंडाही कोलमडतोच. आणि म्हणूनच आज समाजातील सुज्ञ विचावंतांना फक्त एकच सांगावेसे वाटते की आमची जुनी सामाजिक घडण, कुटुंबव्यवस्था देखील अनुकरणीयच होती. स्त्रिया घरसंसार सांभाळून, स्वतःची ओळख व्हावीच अशी अपेक्षा किंवा जिद्द न बाळगता, नवऱ्याची सावली होऊन राहण्यात कधीच दुय्यमपणा किंवा मिंधेपणा मनात ठेवत नव्हत्या.

आज संयुक्त कुटुंबे नाहीत. समाजात आज संयुक्त कुटुबे दुभंगलीत पण अपेक्षा मात्र दुणावल्यात आणि म्हणूच गरजा देखील वाढल्यात. कदाचित म्हणूनच, वाढत्या गरजांचे ओझे एकट्या नवऱ्याच्या मनगटाच्या बळावर, तेही कमीत कमी अवधीत, होणे अशक्य दिसत असल्याने अख्ख्या घराला धावाधाव करावी लागत आहे. जीवघेण्या प्रतिस्पर्धेच्या युगात "साई इतना दिजीये जामे कुटुम समायेI मै भी भूखा न रहू, साधू न भूखा जाय" अर्थात "गरजेपुरता पैसा असावा," ह्या अर्थाचे वहन करणारी राहणीमानाची म्हण आता कालबाह्य झाली आहे.

टीव्हीवर नुकत्याच झळकत असणाऱ्या Airtel च्या एका जाहिरातीतून देखील संकुचित, पारंपरिक भारतीय पुरुषांपर्यंत जाहीरपणे हा संदेश पसरवण्यात येत आहे की स्त्री ही सुपर ह्यूमन नसते. तेव्हा तिने स्वकर्तृत्वावर स्वतःची ओळख करावी, अशी अपेक्षा असलीच तर तिला घरकामातही मदत करण्याची पुरुषाची मानसिक तयारी होणे, हे ह्या अतिमहत्त्वपूर्ण काळात गरजेचे आहे.

सौ रुपाली मनीष पाठक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा