संवेदना

संवेदनेत दडलेल्या वेदनेला 
मार्ग मिळता क्षणीच
उफाळून येतं भावनांचं काहूर 
अन् त्यात तयार होतं
कल्पनेचं वादळ 
जे नसून असल्यासारखं 

मनावर स्वार होतात विचार 
सैर-भैर धावणारे 
मार्गाला कुठही गंतव्य नसलेले 
विचारांची शृंखला 
वाहत्या जलप्रवाहासारखी
कधी एका टोकापासून 
दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचली
कळतंच नाही
मार्गातले अडथळे
कधी पार केले
जाणवतच नाही 

मग अचानक 
एका वळणावर 
जाणीव होते, निसर्गाच्या किमयेची 
वेदनेतील संवेदना पारखण्याची

नंदिनी धाकतोड नागपूरकर