ऋतुमहात्म्य कि स्थलमहात्म्य ?

आज हा एक अत्यंत दुर्लक्षिलेला विषय आम्ही आपणासमोर मांडायचे ठरवले आहे. ह्या ६ ऋतूंच्या नावाखाली आपण (म्हणजे आपण सर्वजण - ऋतुगंधचे वाचक, लेखक, आणि अनेक जिवंत आणि स्वर्गस्थ मराठी साहित्यिकांनी) जी काही साहित्यनिर्मिती केली आहे, त्यामुळे ह्या ऋतूंचे फार स्तोम माजले आहे. पण ह्या सगळ्या गदारोळात ज्या महत्वाच्या गोष्टीमुळे, म्हणजे स्थळामुळे, ऋतूंना महत्व प्राप्त झाले आहे त्या स्थळांना विचारतो कोण?! (इथे स्थळ ह्या शब्दाची योजना जागा ह्या अर्थाने केलेली आहे, तरी इच्छुकांनी आणि त्यांच्या घरच्यांनी इकडे लक्ष देऊ नये. ‘त्या’बाबतीत स्थळाला महत्व फार!)

हे ऋतू का आहेत? आपण समशीतोष्ण कटिबंधातल्या, समुद्राचे सान्निध्य लाभलेल्या प्रदेशात राहतो म्हणून ही ऋतूंची श्रीमंती! पण समजा जर आपण अश्या देशात न राहता उत्तर ध्रुवाजवळच्या एखाद्या देशात राहत असतो तर? तर कुठले एवढे सगळे ऋतू? तिथे इन मिन २, फार तर फार ३ ऋतू! आता इथे आमचा एखादा चौकस वाचक (किंवा वाचिका) आपली शंका आमच्याकडे निर्देशित करेल कि ‘आपण तर सध्या सिंगापूर मध्ये राहतो!’ तर त्यास ‘म्हणजे सध्या आपण विषुववृत्ताजवळ सिंगापूरमध्ये आहोत हे जरी खरे, पण हा सगळा ऋतुगंधचा उद्योग महाराष्ट्रदेशीच्या ६ ऋतूंमुळेच तर आहे ना! तर ह्या विद्वतसभेत आमची बाजू मांडताना वरील मुद्दा मांडताना आम्हास शाब्दिक अर्थ अभिप्रेत नसून लाक्षणिक अर्थ अभिप्रेत आहे!’ असे आमचे उत्तर आम्ही आधीच प्रतिनिर्देशित करीत आहोत. सिंगापूरमध्ये तर ऋतूच नाहित! नाही म्हणायला (किंवा ‘इनोद’ करायला) रस्त्यावर आलटून पालटून ग्रीष्म किंवा वर्षा आणि ‘हपिसात’ शिशीर! काही देशांमध्ये ‘फॉल’चे फार कौतुक असते, (‘फॉल-पिको’ वाला नाही, पानगळ वाला फॉल!), पण भारतासारखे देश सोडल्यास इतर ठिकाणी उन्हाळा आणि हिवाळ्याव्यतिरिक्त फारसे ऋतू (म्हणजे वर्षातील वेगळा ओळखता येण्याएवढा काळ सलग तशी हवा असेल) असे नाहीत, असे आमचे ठाम आणि निर्भीड (आणि कदाचित, अज्ञानावर आधारित चुकीचे!) मत आहे!

तर मूळ मुद्दा हा की आपण सर्व वर्षातील विविध वेळी विविध ऋतूंची आभूषणे मिरवणाऱ्या महाराष्ट्र देशात जन्माला आलो असल्याने (इथे मूलनिवासी असल्याने असं म्हणायचं होतं, पण हल्ली ह्या शब्दाने फार गोंधळ माजतो!) ही सगळी साहित्याची रेलचेल! नाहीतर काय! कल्पना करा कि माडगूळकर अगदी उत्तर ध्रुवाजवळच्या एखाद्या देशात जन्माला आले. मग कसला ‘नवीन आज चंद्रमा’ आणि ‘नवीन आज यामिनी, सगळं सहा महिने जुनं! त्यांनी ‘कधी रे येशील तू’ मध्ये सहा ऋतूंची वर्णने करताना मिनी-ऋतुसंहार कसं लिहिलं असतं? खुद्द कालिदासाला ऋतुसंहार तर सोडाच पण मेघदूतात लिहिलेले ढगांचे बावीस का चोवीस प्रकार सोडून बर्फाचे प्रकार मोजत बसावं लागलं असतं! अश्या ठिकाणी मर्ढेकरांना ‘पितात सारे गोड हिवाळा’ ऐवजी ‘पितात सारे कडू हिवाळ्यात’, (इंदिरा) संतांना ‘नको नको रे पावसा’ ऐवजी ‘नको नको रे हिमवर्षावा’ असं काहीतरी खरडावं लागलं असतं! ‘वसंतसमये प्राप्ते’, कोकिलान्योक्ति वगैरे वाल्या मोरोपंत वगैरे तमाम कवींना पांढऱ्या अस्वलांच्या निद्रेबद्दल लिहावं लागलं असतं! कसलं ‘सायंकाळी एके मेळी द्विजगण अवघे वृक्षी’! कसले ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ आणि अहो दस्तुरखुद्द ‘ऋतुगंध’च्या संपादक महाशयांना ‘प्रत्येक ऋतुतल्या जीवनाचा आणि जीवनातल्या प्रत्येक ऋतुचा जीवनोत्सव साजरा करण्याचा यंदाचा मानस’ पूर्ण करताना सहा वेळा अंक काढणार कसा? असा प्रश्न पडला असता! (ब्लॉगर टीमने सुस्कारा सोडला असता!)              

असो! अशी कित्येक उदाहरणे देता येतील, पण वानगीदाखल एवढीच पुरे! तेव्हा ऋतूंचे (आणि आपल्या आयुष्यातील इतर कित्येक गोष्टींचे) महात्म्य हे केवळ वेगळ्या रूपातील स्थलमहात्म्य असल्याचे आमचे म्हणणे मांडून आम्ही आपली रजा घेतो! बाकीच्या गोष्टींसंदर्भातले आमचे म्हणणे आणि सविस्तर उदाहरणे पुन्हा केव्हा तरी..!

- शेरलॉक फेणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा