किस्से मोहम्मद रफी यांच्या गाण्याचे

रफीसाहेब यांना आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. ते लहान असताना त्यांच्या भावाच्या दुकानात एकदा ते पंजाबी गाणे गुणगुणत होते तेव्हा एका साधूने त्यांचे गाणे ऐकले आणि भविष्यवाणी केली, ‘हा पोरगा पुढे जाऊन एक मोठा गायक होईल’. साधूचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. रफी यांनी गायक व्हावे म्हणून मोठे परिश्रम घेतले ते त्यांचे मोठे बंधू हमीदभाई यांनी. हमीदभाईंची ऊठबस लाहोर मधील मोठ्या गायकांमध्ये होती, त्या ओळखीवर त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली यांना भेटून आपल्या भावाला गाणे शिकवण्याची विनंती केली. खांसाहेबांनी छोट्या रफींना आपले बंधू उस्ताद बरकत अली खांसाहेब यांच्या हाती सुपूर्द केले. उस्ताद बरकत अली खांसाहेब (जे स्वतः एक समर्थ गायक होते, उस्ताद बडे गुलाम अली खांसाहेब एकदा म्हणाले होते राग पहाडी ठुमरी कानाची ऐकाययची असेल तर बरकत अली यांचीच ऐकावी) हे रफीसाहेबांचे पहिले गुरु. 

पहिले चित्रपट गीत त्यांनी संगीतकार श्यामसुंदर यांच्या संगीत निर्देशनात गायले आणि त्यानंतर हमीदभाई यांनी संगीतकार नौशादअली यांच्या वडिलांचे शिफारस पत्र मिळवले आणि रफींना मुंबईला घेऊन आले. नौशादअली आपल्या वडिलांच्या शिफारसपत्राकडे दुर्लक्ष्य करू शकले नाहीत आणि त्यांनी रफी यांना गायला पहिली संधी दिली. पहिली पाच ते सहा वर्ष रफीसाहेब गायक म्हणून उमेदवारी करत होते. १९४९ साली आलेल्या ‘दुलारी’ चित्रपटातील गाण्याने त्याकाळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. त्यानंतर रफीसाहेबांनी मागे वळून बघितले नाही आणि ते किशोरकुमार युग (१९६९) येईपर्यंत आघाडीचे गायक राहिले.

१. १९६० साली आलेल्या ‘कोहिनूर’ चित्रपटात राग ‘हमी’रवर आधारित गीत होते ‘मधुबन में राधिका नाचे रे’. हे गाणे सर्वांगसुंदर होण्यासाठी रफीसाहेब आणि संगीतकार नौशादअली यांनी प्रचंड मेहनत घेतली. गाण्याचे ध्वनिमुद्रण झाल्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. यु. सनी यांना वाटले की गाणे जरी उत्तम झाले असले तरी हे गाणे या चित्रपटात ठेवू नये कारण शास्त्रीय ढंगाचे गाणे लोक ऐकतीलच असे त्यांना वाटले नाही. तेव्हा नौशादअली यांनी विनंती केली हे गाणे काढू नका आणि रफीसाहेब तर सनी यांचे वक्तव्य ऐकून हादरले आणि म्हणाले मला माझे परिश्रमिक (मानधन) आताच देऊ नका. गाणे जर प्रसिद्ध झाले तरच द्या. रसिकांचे मोठे भाग्य होते चित्रपटातून गाणे काढले नाही गेले आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या गाण्याला मोठी लोकप्रियता लाभली. आज पन्नास वर्षानंतरही गाणे तितकेच ताजे आणि श्रवणीय वाटते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि गाण्याची लोकप्रियता मिळालेली बघून सानी यांनी गाण्याचे मानधन रफीसाहेब यांना देऊ केले तेव्हा रफीसाहेबांनी मानधन घेण्यास नकार दिला आणि म्हणाले गाण्याची लोकप्रियता हेच माझे मोठं मानधन आहे. 

गीत: मधुबन मे राधिका

या गाण्याचे एक वैशिष्ट्य असे की गाण्यातील तराणा संपल्यानंतर सतार, जलतरंग आणि सरोद यांची छोटीशी जुगलबंदी अवर्णनीय आहे. यातील सतार वाजवली आहे महान सतारवादक अब्दुल हलीम जाफर खांसाहेब यांनी.

दुसरे वैशिष्ट्य असे की या गाण्यात अभिनेते दिलीपकुमार यांनी पडद्यावर सतार वाजवली आहे. तिचा अभिनय खरा वाटावा म्हणून चित्रिकरणाअगोदर वर्षभर उस्ताद अब्दुल हलीम जाफर खांसाहेब यांच्याकडे जाऊन सतार वादन शिकले आणि नंतर काही वर्ष आपल्या मित्र मंडळींमध्ये सतार वाजवून मनोरंजनही ते करत असत.

तिसरे वैशिष्ट्य असे की अभिनेते मुक्री यांनी पडद्यावर जो आलाप घेतला आहे तो आलाप ध्वनिमुद्रणात गायला आहे तो त्याकाळातील शास्त्रीय गायक निस्सार अहमद खांसाहेब यांनी.

२. ‘हब्बा खातून’ या अप्रदर्षित चित्रपटामध्ये एक राग मधुवंतीवर आधारित गाणे होते, ‘जिस रात के ख्वाब आये’.
ध्वनिमुद्रण संपल्यानंतर रफीसाहेब ध्वनिमुद्रण ऐकायला फारसे कधी थांबले नाहीत. गाणे पूर्ण झाल्यावर ते त्या गाण्याचा परत विचार करत नसत, पण या गाण्याचे ध्वनिमुद्रण ऐकायला ते थांबले आणि जेव्हा निर्मात्याने परिश्रमिक (मानधन) देऊ केलं, त्यांनी घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, “हुल्लडबाजीसे मै उब गया हूॅं. इस गानसे जो ख़ुशी मुझे मिली है वही मेरा परिश्रमिक है”.

वरील दोन किस्स्यांनंतर एक गोष्ट जाणवते की रफी साहेब संवेदनशील होते पण ह्या फिल्मी दुनियेत व्यवसायिकतेमुळे कित्येक लोकं आपली संवेदनशीलता गमावून बसले आहेत. 


गीत: जिस रात के ख्वाब आये

३. १९४०/५० च्या दशकात फिल्मिस्तान नावाची एक मोठी नावाजलेली संस्था होती आणि अभिनेते अशोक कुमार त्या संस्थेच्या काही मालकांपैकी एक होते. कुमार स्वतः गायक होते आणि आपली गाणी स्वतः गायचे. साजन नावाचा चित्रपट फिल्मिस्तान तयार करत होती आणि चित्रपटाचे नायक होते अशोक कुमार. ते जरी गायक असले तरी त्यांच्या गायनाला निश्चित मर्यादा होत्या आणि या मर्यादांची कल्पना संगीतकार सी रामचंद्र (अण्णासाहेब) यांना होती. मालकाला, तू गाऊ नकोस आणि कोण्या दुसऱ्याचा आवाज उसना वापरु सांगणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे होते. गाणी बसवणे सुरु असताना काही कामाकरता अशोक कुमार बाहेरगावी गेले होते आणि निर्माते शशिधर मुखर्जी हे अण्णासाहेबांना गाणी लवकर ध्वनिमुद्रित करा म्हणून सांगत होते. अशोक कुमार हजर नसण्याचा फायदा घेऊन त्यांनी रफीसाहेबांच्या आवाजात गाणी ध्वनिमुद्रित केली. जेव्हा अशोक कुमार परतले तेव्हा त्यांनी अण्णासाहेबांना गाठून सांगितले की ते गाणे म्हणायला तयार आहेत, तेव्हा अण्णासाहेबांनी त्यांना रफी यांचे ध्वनिमुद्रित गाणे ऐकवले. आवाजातील गोडवा आणि तिन्ही सप्तकात फिरणारा आवाज ऐकून हाडाचे कलाकार असलेले अशोक कुमार अतिशय खुश झाले आणि म्हणाले हे गाणे कोणी गायले आहे? तेव्हा अण्णासाहेब म्हणाले मोहम्मद रफी नामक एका नवोदित गायकाने. त्यावर अशोक कुमार म्हणाले की एवढे सुंदर गाणे ध्वनिमुद्रित झाल्यावर मी गाण्याची हिम्मत करणार नाही. त्यानंतर रेलगाडी या सारख्या काही गाण्यांचा अपवाद वगळता अशोक कुमार यांनी इतर समर्थ गायकांचा आवाज उसना वापरणे सुरु केले. 

४. एकदा रफीसाहेब महान संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या घरी गेले होते. गप्पा मारताना विषय अर्थात गाण्याचाच होता आणि रफीसाहेब खळेकाकांना म्हणाले काही नवीन तयार केले असल्यास मला ऐकवा तेव्हा खळेकाकांनी वसंत निनावे लिखित चालीत बांधलेले गाणे ऐकवले. शब्द होते ‘चुकचुकली पाल एक’. राग मधुवंतीवर आधारित चाल ऐकल्यानंतर रफीसाहेबांनी हट्ट धरला हे गाणे मला म्हणायचे आहे. पण गाण्याचा पहिला शब्द चुकचुकली या शब्दाचा उच्चार काही व्यवस्थित येत नव्हता. ज्यांची मातृभाषा मराठी नाही त्यांचे ‘च’ या शब्दावरून होणारे उच्चार मराठी माणसाला नेहेमी विचित्र वाटतात. तेव्हा खळेकाका म्हणाले मी तुमच्याकरता दुसरे गाणे तयार करतो पण रसिकांचे दुर्दैव तो योग काही आला नाही कारण या भेटीनंतर काही दिवसांनी रफीसाहेब हे जग सोडून गेले. नंतर हे गाणे लतादीदी यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले.


संदर्भ 
रफीनामा : लेखक इसाक मुजावर 
दिलीप कुमार - शशिकांत श्रीखंडे 
मोहम्मद रफी - लेखक सुभाषचंद्र जाधव 
श्रीनिवास खळे - लेखक मधू पोतदार 
Mohammad Rafi My Abba Author Yasmin Khalid Rafi

- शैलेश दामले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा