परिवार वार्ता

मोहना कारखानीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन 


मोहना कारखानीस लिखित 'जाईचा मांडव' ह्या कथासंग्रहाचे प्रकाशन ३० नोव्हेंबर, २०१५ रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र इथे संपन्न झाले. हे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिका आणि विश्वकोशाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड आणि इतर मान्यवर ह्यांच्या हस्ते झाले. मान्यवरांमध्ये सुप्रसिध्द कथालेखिका माधवी कुंटे, कवयित्री गौरी कुलकर्णी, रिलायन्सचे अध्यक्ष रवींद्र आवटी, लेखिका रेखा नार्वेकर, संपादिका लता गुठे, अभिनेत्री मीना नाईक, एकाक्षरी गणेश कलाकार राज कांदळगावकर होते. हा कथासंग्रह डिम्पल प्रकाशन घेऊन येत आहे. प्रकाशक श्री. अशोक मुळे ह्या सोहोळ्यास उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विजया वाड ह्या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाल्या की ह्या कथुल्या अतिशय सुरेख जमल्या असून डिम्पल प्रकाशनाने हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचवावे. आपल्या प्रास्ताविकात मोहना कारखानीस ह्यांनी ह्या पुस्तकापर्यंतचा प्रवास सांगताना दिवाळी अंक वाचनाची आवड आणि अनेक दिग्गज साहित्यिकांचा सहवास ह्या लेखनास कारणीभूत झाला असे सांगितले. जगभर प्रवास करण्याचे स्वप्न साकारताना लेखन समृद्ध होत जाते असेही त्या म्हणाल्या.

माधवी कुंटे ह्यांनी अतिशय हळुवारपणे पुस्तकातील कथांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले तर गौरी कुलकर्णी ह्यांनी दमदार आणि हृदयाला हात घालणाऱ्या आवाजात कथेचे अभिवाचन केले.

ह्या प्रसंगी को.म.सा.प. चे अनेक साहित्यिक, कवी, कवयित्री उपस्थित होते. दर्दी आणि रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर ह्यांनी केले तर सांगता सुवर्ण जाधव ह्यांनी मानलेल्या आभाराने झाली.

नीतीन मोरे यांना सुहासिनी इर्लेकर पुरस्कार 


महाराष्ट्र साहित्य परिषदेचा या वर्षीचा नवोदित कवीसाठी दिला जाणारा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार, कवी श्री . नीतीन मोरे यांच्या "एकलकोंड्याचा कबीला" या कविता संग्रहास देण्यात येत आहे.

ऋतुगंध साठी विशेष म्हणजे, श्री. नीतीन मोरे हे २०१५ च्या ऋतुगंध चे संपादक देखील आहेत. श्री नीतीन मोरे यांचे ऋतुगंध समिती तर्फे मनः पूर्वक हार्दिक अभिनंदन! व पुढील लेखन वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!!!