सिंगापूर ज्युबिली वॉक

सिंगापूरच्या ५० व्या वाढदिवसाची आठवण म्हणून सिंगापूर सरकारने काही महिन्यांपूर्वी सिंगापूर ज्युबिली वॉक तयार केला. १४ व्या शतकातल्या छोट्या बंदरापासून ब्रिटीशांच्या काळात बनलेलं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र. आणि मग साम्राज्यवाद आणि दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत होरपळून निघाल्यावर जगभरातून पोटापाण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये सिंगापुरीयन स्वत्व घडवत स्वातंत्र्य मिळवून जगातील एक अग्रगण्य संपन्न देश म्हणून मारलेली भरलेली या प्रवासाची ओळख करून देणारा हा वॉक. चला, आज आपण सगळे सिंगापूरच्या इतिहास, वर्तमान, आणि भविष्याला जोडणाऱ्या काही ठिकाणांना भेट देत हा वॉक घेऊ या. 

याची सुरुवात करण्यासाठी नॅशनल म्युजियमहून अधिक योग्य ठिकाण नाही. १८८७ साली रॅफल्स म्युजियम म्हणून ब्रिटिशांनी बांधलेली ही दिमाखदार वास्तू आजही सिंगापूरच्या इतिहासाचा ठेवा समर्थपणे लोकांपुढे मांडत आहे. या सुंदर नांदीनंतर आपण चढतो फोर्ट कॅनिंगची टेकडी. मूळची १४व्या शतकातल्या तेमासेकची राजधानी पुढे १९ व्या शतकात बनली गवर्न्मेंट हिल. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश इस्ट एशिया आर्मीचं कमांड सेंटर असलेला बंकर बॉक्स इथेच आहे.टेकडीवरून खाली उतरून आपण भेटतो १९ व्या शतकातल्या काही वास्तूंना. जगभरातून आलेल्या लोकांनी आपापल्या समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या धडपडींची ही गोष्ट. आर्मेनियन स्ट्रीटवर दिसतात दोन छोट्या पण टुमदार वास्तू - पेरानाकन म्युजियम आणि फिलॅटेलिक म्युजियम. शिक्षणाचं महत्त्व ओळखून समाजासाठी चिनी लोकांनी स्थापलेल्या या शिक्षणसंस्था. इथेच प्रथमच सर्व बोली भाषांतील समाजांना एकत्र आणून मँडॅरिन द्वैभाषिक शिक्षण सुरु झाले. पुढे दिसतं आर्मेनियन समाजाच्या योगदानाची आठवण करून देणारे आर्मेनियन चर्च. नंतर हिल स्ट्रीटवर गुजराती बोहरा समाजाने बांधलेली बुऱ्हाणी मशीद तर दुसऱ्या बाजूला चेट्टीयार समाजाचे हिंदू मंदिर. 

यानंतर आपण पुढे येऊ लागतो २० व्या शतकात. हिल स्ट्रीट वरचंच चायनीज चेंबर ऑफ कॉमर्स आणि जपानी बॉंबहल्ल्यांमध्ये वाचलेलं १९०९ सालचं सेन्ट्रल फायर स्टेशन. हिल रोडच्या शेवटी रंगीत खिडक्यांनी नटलेली १९३४ सालची पोलीस मुख्यालयाची बिल्डींग. नदीच्या उत्तर तटावर वसल्या आहेत अगणित वास्तू ज्या सांगतात ब्रिटीश साम्राज्याची आणि सिंगापूरच्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी. नदीवर उभा असलेला रॅफल्सचा पुतळा, एशियन सिविलायझेशन म्युजियम व एम्प्रेस प्लेस, नॅशनल गॅलरी आणि क्रिकेट क्लब व पुढचं पडांग / पटांगण. याच पडांगावर नेताजी सुभाषचंद्र बोसांनी गर्जना केली होती "चलो दिल्ली" आणि आझाद हिंद सेनेला घेऊन मारली होती धडक ब्रिटीश इंडियामध्येही. आजही आझाद हिंद सेनेचं स्मारक जवळच्या एस्प्लेनेड पार्कमध्ये बघायला मिळतं. याच नॅशनल गॅलरीच्या पायऱ्यांवरून केली होती घोषणा जपानच्या शरणागतीची आणि सिंगापूरच्या स्वातंत्र्याची. एम्प्रेस प्लेसने ऐकल्या घोषणा मेडीका (स्वातंत्र्य) च्या आणि सूर उमटले माजुला सिंगापुराचे शेजारच्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये.


पुढे दिसते सिंगापूर नदी आणि ती आपल्याला नेते आजच्या काळात, दाखवते सिंगापूरची प्रगती आणि खुणावते भविष्याकडे ७० च्या दशकात दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर स्वच्छ झालेली सिंगापूर नदी आणि तिच्या दक्षिण काठावरचं चमचमतं नाईट लाईफ. नदीच्या मुखाशी कात टाकलेलं पंचतारांकित फुलर्टन हॉटेल. डावीकडे ड्युरियन च्या आकाराचं एस्प्लेनेड थिएटर तर उजवीकडे सिंगापूरचं प्रतीक असलेला मर्लायन. त्या दोघांना जोडणारा आणि ज्युबिली वॉकच्या निमित्ताने आत्ताच उद्घाटन झालेला ज्युबिली ब्रिज. या सगळ्यांना कोंदण म्हणून पाठीमागे उभ्या राहतात गगनचुंबी इमारती. या आधुनिक सुबत्तेचा सरताज म्हणजे आयकॉनिक मरीना बे सँड्स. ८० च्या दशकात सिंगापूर नदीपुढल्या समुद्रात भर टाकून रीक्लेम केलेला हा मरीना बे एरिया. १२-१५ वर्षांपासून जेथे गवताच्या कुरणात मुलींना घेऊन पतंग उडवला होता तेथे उभं रहिलेलं हे भव्य MBS. हे सर्व साक्ष देतात सिंगापूरच्या श्रीमंतीची. 


हा आस्वाद घेतल्यावर आपण पुढे जातो गार्डन्स बाय द बे आणि मरीना बराजला. एक साक्ष देते आर्थिक सुबत्तेपलीकडच्या हिरव्या निसर्गरम्य आयुष्याची तर दुसरे साक्ष देते समुद्राला हटवून गोड्या पाण्याचा विस्तीर्ण जलाशय बनवायच्या सृजनशीलतेची आणि शाश्वत भविष्याची.

नोव्हेंबर २०१५ मध्ये आयोजित केलेल्या पहिल्या ज्युबिली वॉक मध्ये आम्ही भाग घेतला होता. सिंगापूर पायोनियर पिढीपासून बालगोपालांपर्यंत पंचवीस हजारांहून जास्त लोक यात सहभागी झाले होते. सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लूंग आणि अनेक लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये मिसळून बरोबरीनं हा पूर्ण वॉक घेतला आणि SG ५० आनंदसोहळ्यामुळे एकंदरच वातावरण उत्साहाचे होते.


हा साधारण ८ किलोमीटरचा वॉक करायला सोपा आणि फॅमिली, मुलाबाळांसोबत करण्याजोगा आहे. शहरी वॉक असल्यामुळे वाटेत विश्रांतीची आणि खाण्यापिण्याची सोय आहे. वॉकचा शेवट गार्डन्स बाय द बे किंवा मरीना बराजला पिकनिक करूनही करता येतो. वॉकचं माहितीपत्रक ऑनलाईन उपलब्ध आहे आणि आयफोन एण्ड्रॉइडवर ज्युबिली वॉक ऍप्लिकेशनही आहेत.   


विजय पटवर्धन