ऑस्ट्रेलिया

न अभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते वने
विक्रमार्जित सत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता
अभिषेक करतं का कोणी सिंहावरी?
विक्रमाने स्वत्व कमवून, राज्य करी अरण्यावरी
हे सुभाषित ऐकून का कुणास ठाऊक पण मला ऑस्ट्रेलिया विषयी लिहावसं वाटलं.

माझे यजमान डॉ. राजीव असेरकर ह्यांच्या कामाच्या निमित्तानी एवढ्यात ऑस्ट्रेलियाला जाण्याचा बरेचदा योग आला. उत्सुकता म्हणून ह्या देशाचा थोडा इतिहास वाचला, जो फारच इंटरेस्टिंग आहे. समुद्रमार्गांनी ४००००-७०००० वर्षांपूर्वी aboriginal australians ह्या देशात आले. पहिला डच नेविगेटर Willem Janszoon, १६०६ मध्ये ऑस्ट्रेलियात आला. १७७० मधे जेम्स कुकनी ऑस्ट्रेलियाच्या ईस्ट कोस्टवर ब्रिटिशांचा अधिकार नोंदवला. ब्रिटिशांची पहिली ११ जहाजे गुन्हेगारांना घेऊन १७८७ मधे botany बे करता निघाली व २० जानेवारी १७८८ मधे सिडनीला पोचली व पेनल कॉलोनी बनवली गेली. ही ऑस्ट्रेलिया मधली पहिली युरोपियन वस्ती होती. टास्मानिया, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, queens land ह्या पेनल कॉलोनी नंतर बनवण्यात आल्या.

१७८८ ते १८६८ ह्या काळात १,६१,७०० गुन्हेगारांना ऑस्ट्रेलियाला न्यू साउथ वेल्समधे रवाना करण्यात आलं. त्यात midlands व नॉर्थ इंग्लंडचे गुन्हेगार होते. ऑस्ट्रेलिया खंड बाकी देशांपासून लांब व अगदी एकीकडे असल्यानी गुन्हेगारांना ठेवण्या करता ideal होता. १८३० च्या सुमारास सर्वात जास्त गुन्हेगार पाठवण्यात आले. १० जानेवारी १८६८ मधे गुन्हेगारांची शेवटची खेप येऊन पोचली. चोरी, खून, छोटे मोठे अपराध, व राजकीय गुन्हेगार असे सर्व प्रकारचे लोक त्यात होते.

१८०१ नंतर त्यांना त्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल ‘tickets ऑफ लिव’ मिळायला लागले होते व त्यातील बहुतांश लोक ऑस्ट्रेलियातच स्थायिक झाले. त्यातल्या बरेच जणांनी नंतर दुसऱ्यांना सुधारण्यात मदत केली. व reformer म्हणून काम केले. आत्ताच्या आधुनिक ऑस्ट्रेलियामधे २०% लोक हे गुन्हेगारांचे वंशज आहेत. एके काळी कलंक मानली जाणारी ही गोष्ट, पण आज कितीतरी ऑस्ट्रेलियन्स हे अभिमानानी सांगतात की आम्ही convict lineage चे आहोत. ऑस्ट्रेलिया देश घडवण्यात ह्या सगळ्यांचा कसा महत्त्वाचा वाटा आहे, ह्याचा अभ्यास बऱ्याच इतिहासकारांनी व लेखकांनी केला.

मेजर जनरल मेक्वेरी १८१० – १८२१ न्यू साउथ वेल्सचे गवर्नर होते. त्यांच्या काळात ह्या भागाची अर्थिक, सामाजिक खूप प्रगती झाली. न्यू साउथ वेल्सला पेनल कॉलोनी पासून फ्री सेटलमेंट बनवण्याचं बरचसं श्रेय त्यांना जातं. मेक्वेरीनी ज्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे, अशांना सरकारी पदांवर पण नेमलं, त्यांना जबाबदारीची कामे दिली. त्यांना सर्जन, magistrate म्हणून नेमले. म्हणूनच त्यांना “फादर ऑफ ऑस्ट्रेलिया” म्हणलं जातं. त्यांच्या नावानी मेक्वेरी आयलंड, मेक्वेरी लेक, मेक्वेरी नदी, मेक्वेरी डोंगर, मेक्वेरी स्ट्रीट, मेक्वेरी लाईट हाउस अशा अनेक जागा आहेत.

१८५१ मधे एडवर्ड हरग्रेवझला बाथरस्ट मधे सोन्याचा दाणा सापडला. त्यानी कॅलीफोर्नियातील सोन्याच्या खाणी पहिल्या असल्यानी, त्याचा अंदाज खरा ठरला. १८५२ मधे न्यू साउथ वेल्स मधे २६.४ टन सोनं मिळालं. ऑस्ट्रेलियामधे गोल्ड रश सुरु झाला. पूर्ण जगाच्या १/३ सोनं विक्टोरिया मधे मिळालं. एकीकडे १८५५ ते १८९० मधे ६ कॉलोनीजनी आपापला राज्यकारभार सांभाळायला सुरवात केली. तरीही ते ब्रिटीश राजवटीचा हिस्सा होतेच.

ह्या देशाला १ जानेवारी १९०१ मधे ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं व commonwealth ऑफ ऑस्ट्रेलिया तयार झाला. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कॅनबेरा असून, सिडनी सगळ्यात मोठं शहर आहे. इथे लोकशाही असून, जनसंख्या फक्त २ कोटी ४० लाख आहे. हा एक अतिशय प्रगत व उत्तम आर्थिक परिस्थिती असलेला देश आहे. माईनिंग, शेती व सर्विस सेक्टर इथले मुख्य उद्योग आहेत. आर्थिक दृष्टीने जगात ह्याचा १२ वा नंबर आहे. २०१४ मधे ऑस्ट्रेलियाची पर कॅपिटा इनकम जगात ५ व्या नंबर वर होती. सगळी महत्त्वाची शहरे समुद्र किनाऱ्यावर वसली आहेत. जागतिक तुलनेमधे आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय हक्क, उत्तम राहणीमान ह्या सर्व गोष्टींमधे ह्या देशाचा बराच वरचा नंबर आहे. भारतातून तिथे कायमचे स्थायिक होण्याकरता जाणाऱ्या लोकांची संख्या पण सध्या खूप वाढलीये. शिक्षणाकरता तिथल्या युनिव्हर्सिटीज जगप्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलियन national युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबोर्न, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी, युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्स, युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्स land, मोनाश युनिव्हर्सिटी इत्यादी.
सिडनी आणि मेलबॉर्न ही राहण्याकरता जगातल्या उत्तम शहरांमधे गणली जातात. सिडनी शहरात Paramatta नदी व Bondi आणि Manly सारखे उत्तम बीचेस आहेत. इथली लोकं पोहणे, सर्फिंग ह्यात पटाईत आहेत. अगदी लहानपणापासून मुलांना पोहायला, सर्फ करायला शिकवलं जातं. वीकेंडला दिवसभर बीचवर जाणे, तिथे water स्पोर्ट्स खेळणं ते खूप एन्जॉय करतात. खेळ हा तिथल्या लोकांच्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. कुठलाही स्पोर्ट खेळणे, त्याच्या tournaments पाहणे, व त्यावर चर्चा करणे त्यांना खूप आवडते. क्रिकेट, फुटबॉल, रग्बी, हॉर्स रेसिंग, गोल्फ, एरोबिक्स, टेनिस, बास्केटबॉल हे सगळे खेळ अतिशय आवडीनी खेळले जातात. सिडनी ऑलिम्पिक पार्क मधे वेगवेगळ्या खेळांचे स्टेडियम्स आहेत. आम्ही राहायला तिथे अगदी जवळ असल्यानी, मला त्याचा खूप छान अनुभव घेता आला. ऑलिम्पिक स्विमिंग पूल बघणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. इथे ऑलिम्पिकच्या सर्व स्टेडियम्सचा भरपूर वापर केला जातो. सतत tournaments चालू असतात. मी बऱ्याचदा त्या tournaments बघायला जायची. शाळेच्या किंवा कॉलेजच्या मुलांचे तासन तास चालणारे ट्रेनिंग पाहणे हा सुद्धा एक अनुभव आहे.
कांगारू, कोआला, आणि wombats, वलाबी ह्या प्राण्यांकरता, तसंच एमू, कुकाबुरा सारख्या पक्ष्यांकरता प्रसिध्द असलेला ऑस्ट्रेलिया आता चांगल्या राहणीमाना करता आणि करिअर करता लोकांना आकर्षित करतो आहे. अडचणींना तोंड देत, कधी चुका करत, पण कष्ट करत आज भक्कम उभा असलेला हा देश मला तर खूप आवडला. आता तुम्हाला माझा लेख किती आवडला ते सांगा.

मेघना असेरकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा