कृष्ण-पेंद्या संवाद

(कृष्ण आणि पेंद्या प्रवेश करतात)

कृष्ण: काय रे पेंद्या, ह्या गवळणी दिसत नाहीत कुठे. कुठे गेल्या आहेत त्या?

पेंद्या: जिममध्ये गेल्या असतील भांडायला.

कृष्ण: जिममध्ये? आत्ता? भर दुपारी? आणि भांडायला? पूर्वी नदीवर भांडायच्या, आता जिममध्ये भांडतात?

पेंद्या: जिम म्हणजे व्यायामशाळा नाही काही, आजकाल जिम म्हणजे पोकेमॉनचं जिम. तिथे जाऊन त्या पोकेमॉनच्या मारामार्‍या खेळतात!

कृष्ण: म्हणजे? कोंबडे झुंजवतात तसं?

पेंद्या: अगदी तस्स!

कृष्ण: पण हे पोकेमॉन म्हणजे काय?

पेंद्या: पोकेमॉन म्हणजे खिशातले राक्षस!

कृष्ण: राक्षस! कुठे आहे राक्षस?

पेंद्या: देवा, तुम्ही अडाणी ते अडाणीच! आजकाल घटोत्कच म्हणजे रामायणातला का भारतीय युद्धातला ते माहिती नसलं तरी चालतं, पण सगळ्या पोकेमॉन्सबद्दल आणि जीओटी मधल्या वून-वून बद्दल साद्यंत माहिती असायला हवी! ते जाऊ दे, तुम्ही गवळणींचं काय म्हणत होता?

कृष्ण: तेच की, कुठे गेल्या आहेत त्या? आता मी (कालिंदीच्या तटी!) धुंद बासरी घुमवतो, म्हणजे मग सगळ्या त्या कृष्णविरहिणी गवळणी इथे येतील!

पेंद्या: प्फ्फ!

कृष्ण: काय झालं रे?

पेंद्या: अहो मुरलीधरा!

कृष्ण: काय?

पेंद्या: आता हातात गिटार धरा!

कृष्ण: म्हणजे?

पेंद्या: देवानंद आजोबांपासून (ये रात ये चांदनी फिर कहाँ!) ते हृतिककाकांपर्यंत सगळे जण तेच करतात! त्यामुळे हातात गिटार नाही तर मग कॅमेरा पाहिजे. तोसुद्धा साधासुधा नाही, किमान चाळीसेक हजारांचा पाहिजे. मग फोटो काढायचे, त्यावर कॉपिराईट आणि स्वतःच नाव टाकायचं, वॉटरमार्क म्हणून. तसं तुम्ही मोरपीस लावू शकता!

कृष्ण: आयडियाची कल्पना छान आहे! आता नवरात्रात रास गरबा खेळताना फोटो काढीन!

पेंद्या: आता त्या जुन्या गोष्टी नाही चालत देवा. तुमचे विटी-दांडू आणि लपाछपीचे खेळ आता कोणी खेळत नाही. व्हिडीओ गेम्स खेळता आले पाहिजेत, युरोपातल्या केस वाढवलेल्या फूटबॉल खेळाडूंच्या कुंडल्या माहिती पाहिजेत! साधा रास-गरबा नाही चालत आता! हिप-हॉप, लॅटिन अमेरिकन डान्स शिकायला पाहिजेत. तेसुद्धा गश्मीर महाजनी कडून!

कृष्ण: म्हणजे कोण? रवींद्र महाजनीचा मुलगा का?

पेंद्या: हो. आजकाल त्या सगळ्यांच्या मुला-मुलींचा जमाना आहे, पण सचिन मात्र अजूनही (पीळ मारत) टिकून आहे!

कृष्ण: चल आपण एखादीचं ताक आणि लोणी पळवू, मग तर समोर यावच लागेल ना...

पेंद्या: आजकाल ताक, लोण्यावर नाही भागात देवा. पिझ्झा, बर्गर खायला जावं लागतं, त्यांना सीसीडी किंवा स्टारबक्स मध्ये न्यावं लागतं आणि कॅरॅमल माक्कीआतो किंवा ग्रीन टी फ्र्यापचिनो मागवावी लागते!

कृष्ण: बाप रे! काय रे हे! कसला विचित्र उच्चार आहे! फेफरं येईल एखाद्याला!

पेंद्या: करावी लागते सवय अशा गोष्टींची! आजकाल गाणी पण साधी, सरळ, प्रासादिक नसतात, कॉफीच काय घेऊन बसलात!

कृष्ण: म्हणजे?

पेंद्या: आता गदिमा, खेबुडकर वगैरे फक्त आकाशवाणीवर पहाटे पहाटे असतात. एरवी सगळीकडे ‘शिट्टी वाजते’ आणि ‘झिंगाट’ ‘कोंबडी पळते’! इंग्लिश गाणी पण जोरात असतात. शब्द-बिब्द नाही कळले तरी चालतं, पण कानात श्रवणयंत्र टाकून डोकं हलवायचं असतं! वाटेत जाता येता समोरच्याच्या अंगात आलय असं वाटलं की समजायचं इंग्लिश गाणं चालू आहे म्हणून! आजकाल झिंग-झिंग ढयाण-ढयाण वाली गाणी ऐकायची असतात! ‘वेस्टर्न बँडस’ कसे भारी हे सगळ्यांना ऐकवायचं असतं! गाण्यांमध्ये कितीही तोडफोड करून, ओढओढ करून शब्द बसवलेले असले तरीही गदिमा-बाबूजींच्या गाण्यांपेक्षा हीच गाणी कशी भारी असं छाती ठोकून सांगता आलं पाहिजे, किंबहुना त्यांच्याबद्दल काहीही न बोलणं हीच पहिली पायरी! प्रत्यक्ष बोलण्यातल्या भावनांपेक्षा व्हाट्सअँपच्या इमोटीकोंन्सना जास्त भाव आहे देवा! कोणी संगीतकार मेला की ‘रिप (RIP)’ असं लिहायचं असतं फेसबुकवर! त्याला किमान चाळीसेक तरी लाईक्स आले पाहिजेत, नाहीतर काय उपयोग! ह्या अश्या प्रथम द्वितीया परीक्षा उत्तीर्ण होत तुम्हाला आधुनिक गवळणी पटवण्याचा अभ्यासक्रम पुरा करावा लागेल! आजच्यासाठी हि एवढी झलक पुरे झाली! आता उद्या येताना घरचा अभ्यास करून या!

कृष्ण: बाप रे, एवढं सगळं करावं लागेल! पूर्वी बरं होतं की!

पेंद्या: हे तरी करा देवा! बाकी तुम्हाला इतर काही जमत नाही! तुम्ही नुसते उनाडक्या करत फिरता! पूर्वी गुरं राखायची सोडून सारखे विटी-दांडू खेळायला पळायचात! मग डोनेशन देऊन सांदिपनींच्या आश्रमात पाठवावं लागलं होतं! गोकुळातून तडीपार केलं म्हणून मग गुजरातला जावं लागलं तुम्हाला!

कृष्ण: मग गुजरात काय उगाच डेव्हलप होतंय का?

पेंद्या: आहा! कसे लगेच श्रेय घ्यायला पुढे हो देवा! बाकी एक काम धड केलय का? पांडवांकडून चांगली वकिली करायची संधी मिळाली होती तेव्हा काही जमलं नाही, उलट युद्ध झालं. सगळे वकील तुमच्या नावाने खडे फोडतात!

कृष्ण: ते जाऊ दे रे! पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आता.

पेंद्या: पुलाखालून काय, पुलावरून पण. बाबा भिडे पूल बुडला होता की चांगले तीन दिवस. 

कृष्ण: मग नदीला भरपूर पाणी आलं असेल ना..

पेंद्या: कसलं पाणी! धरणात अडवून ठेवलंय ना. नंतर पाऊस नाही पडला म्हणजे? दादा येणारे काय मग .... !

कृष्ण: कोण दादा? कोंडके?

पेंद्या: कोंडके कुठले! ‘पाणी थेंब थेंब गळं’ म्हणणारे ते कोंडके आणि आकाशातून गळत नाही म्हणणारा तो दादा गवार! त्याचा काका बघा सगळी जमीन हडपून बसलाय. शकुनी तेव्हा मामा होता, आता काका आहे! जुन्या आणि आधुनिक धृतराष्ट्रामुळे (पक्षी: मातोश्री आणि कृष्णकुंज) तेव्हा उत्तर प्रदेशाचं आणि आता महाराष्ट्राचं नुकसान झालं! असो.. हे सगळं म्हणून तरी काय उपयोग! कोणाला इथे कशाचं काय पडलंय! मी जरा हिलरी आणि ट्रम्पचं काय झालं ते बघून येतो! पाकिस्तानने कितीही हल्ले केले तरी आजकाल काही वाटलं नाही पाहिजे, पण ट्रम्प आणि हिलरी एकमेकांना काय म्हणाले ते मात्र सगळं माहिती असलं म्हणजे झालं! बाकी ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी’ वगैरे सगळं कालबाह्य झालं आहे!

(एक दीर्घ उसासा टाकून पेंद्या निघून जातो आणि सुन्न झालेला कृष्ण हातातली बासरी डोक्यावर आपटत बसून राहतो!) 

- शेरलॉक फेणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा