संपादकीय

नमस्कार, मंडळी!

२०१६ चा दुसरा आणि २०१५ ऋतुगंध समितीचा शेवटचा अंक तुमच्या हाती सुपूर्द करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. "स्वयमेव मृगेन्द्रता" या लोकभाषेत रुजलेल्या सुभाषिताभोवती यावेळचा ऋतुगंध गुंफलेला आहे:

न अभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते वने।
विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता।।

ह्याचं स्वैर भाषांतर असं:

अभिषेक करते का कोणी वनी सिंहावरी?
विक्रमाने स्वत्त्व कमवून राज्य करी अरण्यावरी

अनेक लोकोत्तर व्यक्तींच्या आयुष्यकथांचं सार म्हणजे हे सुभाषित. पण त्याचबरोबर प्रसिद्धी न पावलेले पण आपल्या वकुबाप्रमाणे आपल्या मनगटाच्या जोरावर मृगेन्द्रता मिळवणारेही कैक लोक असतात. त्यांचंही आयुष्य अनवट आणि प्रेरणादायक असतं; फक्त त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशा लोकांच्या कहाण्यांचा उत्सव या अंकातून तुम्हांला अनुभवायला मिळेल.

सायुरी देवकर या दहावीतल्या मुलीनं परीक्षेदरम्यान वेळ काढून तिच्या बाबावर लिहिलेला लेख एक नवा नायक तुमच्या भेटीला आणेल, आणि त्याच बरोबर एक ताज्या दमाची आणि अपेक्षा निर्माण करणारी लेखिकाही! विश्वास वैद्य, नंदिनी धाकतोड - नागपूरकर यांच्या सामान्य माणसांच्या नितळ कथा जिद्द आणि आशावाद आयुष्य घडवण्याकरता कसे महत्त्वाचे असतात, हे दाखवतात. रुपाली पाठकांनी लिहिलेलं त्यांच्या आज्जेसासूबाईंचं चरित्र प्रतिकूल परिस्थितीत आत्मबळावर प्रवाहाविरुद्ध लढणाऱ्या स्त्रीची रोमांचकारी कहाणी आहे. तर मोहना कारखानीस त्याही पलीकडे जाऊन पाळीव प्राण्यांमध्ये दिसणारी जिद्द आणि आत्मसन्मान आपल्या समोर ठेवतात. "स्नेहालय" नावाच्या अहमदनगरमधल्या समाजसेवी संस्थेच्या संचालकांची मुलाखत तुम्हांला तुमचं ध्येय गाठण्यासाठी कार्यप्रवण करेल अशी आशा आहे.

त्याचबरोबर मुक्ता पाठक शर्मा हिनं भाषांतरित केलेली रवींद्रनाथ टागोरांची एक कथा हे या अंकाचं खास आकर्षण! समीर इनामदारांची भावकविता आणि विनया रायदुर्गांचा SG ५० लेख आवर्जून वाचा.

आणि ऋतुगंध वाचताना तुमच्या प्रतिक्रिया ब्लॉग वर न विसरता टाका. आपण आपल्या लेखकांना तेवढंच मानधन देतो - तुमच्या भरघोस प्रतिसादाचं! आणि तुम्ही त्यात काटकसर करणार नाही याची खात्री आहे.

आणि याचबरोबर आम्ही ऋतुगंधचा पलिता आता २०१६ समितीकडे देत आहोत. जुई चितळे या नव्या संपादिकेचं मन:पूर्वक अभिनंदन आणि २०१६ समितीला खूप खूप शुभेच्छा!

तुमची,
ऋतुगंध २०१५ समिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा