मुलाखत - कॅप्टन जोगळेकर

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २


(कॅप्टन श्रीरंग जोगळेकर हे आयएनएस शक्ती ह्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे निर्देशक अधिकारी आहेत. ते नेव्हल अकादमीचे माजी विद्यार्थी असून एक सागरी वैमानिकही आहेत. त्यांच्याकडे ४००० तासांपेक्षाही अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी नवी दिल्लीतल्या नौदल विमानचालन मुख्यालयाचे संचालकपदही भूषविले आहे.आयएनएस शक्तीची जबाबदारी घेण्यापूर्वी ते विशाखापट्टणम येथे आयएनएस देगाचे कॅप्टन होते.)


प्रश्नः भारतीय नौसेनेतल्या नौकेचा कॅप्टन होणे ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आपला इथपर्यंतचा प्रवास कसा झाला ते सांगू शकाल का? म्हणजे लहानपणापासूनच आपले सैन्यात, विशेषतः नौसेनेत, जाण्याचे स्वप्न होते का?

कॅप्टन जोगळेकरः लहानपणापासून म्हणण्यापेक्षा साधारण अकरावी-बारावीत असताना ह्याची सुरुवात झाली असे म्हणता येईल. पुण्यात एन.डी.ए. होतीच आणि त्यांचे सैनिक विद्यार्थी पाहून मला वाटायचं की आपणही जावं. शिवाय माझा डॉक्टर होण्याकडेही ओढा होता आणि पुण्यात आर्म्स फोर्सेस मेडिकल कॉलेजही होते; त्यामुळे मला आर्मीत डॉक्टर व्हावे असेही वाटायचे. पुढे काही कारणाने आर्म्स फोर्सेस मेडिकल कॉलेजला जाणे झाले नाही आणि माझे मित्रही म्हणाले की "सैन्यात जायचेच आहे तर डॉक्टर म्हणून जाण्यापेक्षा एक फौजी म्हणूनच जा". म्हणून मग मी युपीएससीची (केंद्रीय सार्वजनिक सेवा मंडळ) प्रवेश परीक्षा दिली. त्याचवेळी गोव्यात एनडीएच्याच धर्तीवर नौदल अकादमी सुरु करण्यात आली. त्यांचाही तीन वर्षाचा प्रशिक्षणक्रम होता. मग मी विचार केला की पुण्यातच राहण्यापेक्षा गोव्यात जाऊन राहू. अशा प्रकारे माझ्या नौसेनेतल्या कारकीर्दीची सुरुवात झाली.


प्रश्नः ही नौदल अकादमी भारतीय नौसेनेनेच सुरु केली होती का?

कॅप्टन जोगळेकरः होय. ती संस्था भारतीय नौसेनेचीच आहे. एनडीए आणि त्यात फरक असा की एनडीएमधे अडीच वर्षे सगळ्याना समान प्रशिक्षण दिले जाते आणि फक्त शेवटचे सहा महिने आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्यांचे वेगळे प्रशिक्षण असते. नौदल अकादमीत मात्र पहिल्यापासून नौदलासंबंधीचेच प्रशिक्षण दिले जाते. तर तिथून ही सगळी सुरुवात झाली.


प्रश्नः आयएनएस शक्तीचे कॅप्टन म्हणून आपल्या जबाबदार्‍या काय आहेत?

कॅप्टन जोगळेकरः एक कॅप्टन म्हणून ह्या नौकेवर होणार्‍या प्रत्येक घटनेची माहिती मला असणे आवश्यक आहे. ह्या नौकेवर वेगवेगळी कामे करण्यासाठी इतर अधिकारी वर्ग व खलाशी आहेत पण कोणतीही कृती करण्याआधी ती माझ्या नजरेखालून जाणे, माझ्या संमतीने होणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे नौकेची व नौकेवर काम करणार्‍या कर्मचारीदलाची सगळी जबाबदारी माझ्यावर असते. नौका बंदरातून बाहेर निघून समुद्रात जाऊन कारवाई करुन पुन्हा सुखरुप बंदरात येईपर्यंत आणि बंदरात असतानासुद्धा नौकेची, त्यावर चालणार्‍या कामकाजाची व सर्व कर्मचारी दलाची जबाबदारी कॅप्टन म्हणून माझ्यावर असते. 


प्रश्नः आपली ही नौका सिंगापूरमध्ये कशासाठी आली आहे?

कॅप्टन जोगळेकरः नौदलाचा परराष्ट्रविषयक बाबींमध्ये एक वेगळा दर्जा असतो. म्हणजे आम्ही इथे परदेशी नागरिक म्हणून पासपोर्टच्या आधारे येत नाही, तर भारताचाच विस्तारीत भाग ह्या दर्जाने येतो. लष्करातल्या फक्त नौदल ह्या शाखेलाच असा विशेष परराष्ट्रीय दर्जा असतो. भारतीय नौदल आणि सिंगापूरचे नौदल गेली बरीच वर्षे एकत्र काम करत आहेत. ह्यावर्षी त्याला पंचवीस वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे नौदलाच्या नौका अशा भेटींना जात असतात. ह्या भेटींना "फ्लॅग शोईंग" (ध्वजदर्शन) असे म्हणतात. शिवाय आम्ही ह्यानंतर जाणार आहोत प्रशांत महासागरात. तिथे अमेरिकन नौदल, जपानी नौदल आणि भारतीय नौदल ह्यांचा संयुक्त सराव होणार आहे. हा सराव दरवर्षी होत असतो. कधी तो हिंदी महासागरात होतो, कधी प्रशांत महासागरात जातो तर कधी आणखी कुठेतरी होतो. तर ह्या तीन नौका घेऊन आम्ही जाताना वाटेत अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतो आणि "फ्लॅग शोईंग" करतो. शिवाय नौदलाच्या दृष्टीने ह्या बंदरांची माहिती असणे आवश्यक असते. जिथे आपल्याला काम करायचे आहे, वावरायचे आहे त्या बंदरांची, मार्गांची माहिती असणे आवश्यक असते म्हणूनही ह्या भेटी होतात. ह्याशिवाय आपल्या नौदला बद्दल इथल्या लोकांना माहिती देणे, आपल्या क्षमतेचं प्रदर्शन करणे, आपल्या नौदलाची प्रतिमाबांधणी करणे वगैरेही इतर कारणे असतात. आता आम्ही जवळजवळ एक हजार भारतीय घेऊन सिंगापुरात आलो आहोत आणि इथे आम्ही चार दिवसात अनेक भेटीगाठी व कार्यक्रम करणार आहोत. तसंच पुढे थायलंड, व्हिएतनाम वगैरे देशांनाही भेटी देणार आहोत व त्यांच्याबरोबर युद्धसराव करणार आहोत. सिंगापूरच्या नौदलासोबत युद्धसराव आत्ता करणार नाही कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पंचवीस वर्षांच्या सहकाराच्या वर्धापनानिमित्त मोठा युद्ध सराव आयोजित केला आहे आणि सिंगापूरच्या युद्धनौका तेव्हा भारताच्या किनार्‍यावर येणार आहेत.


प्रश्नः सैन्यात अधिकारी होण्यासाठी बरेच खडतर परिश्रम घ्यावे लागत असणार व व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठीही प्रयत्न करावे लागत असणार. आपल्या प्रशिक्षणाबद्दल काही सांगू शकाल का?

कॅप्टन जोगळेकरः अकादमीमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम असतो आणि त्यानंतर सहा महिने प्रशिक्षणार्थींना एका प्रशिक्षण नौकेवर घेऊन जातात व समुद्रात करण्याच्या कामांबद्दल प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. ते सगळं प्रशिक्षण झाल्यावर मी वैमानिक होण्याचेही प्रशिक्षण घेतले. वैमानिक होण्याचे प्रशिक्षण वायुसेनेतर्फे दिले जाते. एक वर्ष नौदलासंबंधी प्रशिक्षण घेतल्यावर मी वायुसेनेकडे दोन वर्षे वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतले. शिवाय त्यानंतरही एक वर्ष मी ज्या प्रकारची विमाने मी उडवणार होतो त्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतले. मी जी विमाने उडवतो ती नौकेवर उतरत नाहीत. ती टेहळणीसाठी वापरली जातात. त्या विमानांवर रडारसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात आणि त्या उपकरणांची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक असते. शिवाय प्रत्येक नौकेवर कामासाठी रुजु होताना त्या नौकेसंबंधीही प्रशिक्षण घ्यावे लागते. म्हणजे तसं म्हटलं तर प्रशिक्षण कधी संपतच नाही. सतत नवीन गोष्टी शिकत राहावे लागते. अकादमीतली पहिली तीन वर्षे तर पूर्णपणे व्यक्तिमत्व विकासाला वाहिलेली असतात. प्रशिक्षणार्थ्यांमधून अधिकारी घडवण्यावर सगळे लक्ष केंद्रित केलेले असते. संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम त्यानुसार आखलेला असतो. सकाळी सहाला उठल्यापासून रात्री दहाला झोपेपर्यंत प्रत्येक मिनिटाची बांधणी आधीच झालेली असते. सकाळी उठल्यावर व्यायाम, मग साडेसहाला परेडचे प्रशिक्षण मग आंघोळ, नाष्टा झाला की सर्व्हिस ट्रेनिंग. मग दुपारी जेवण झालं की अकादमी ट्रेनिंग. अकादमी गोव्यात असल्यामुळे गोव्यातच मी बी.एस.सी. चे शिक्षण घेतले. त्यात लष्करास उपयुक्त ठरेल अशा प्रकारे बेतलेला भौतिकशास्त्र व गणिताचा अभ्यासक्रम होता. परेड ट्रेनिंगमध्ये माणसांच्या एखाद्या गटाला कसे हाताळायचे त्याचे प्रशिक्षण मिळते. शिवाय बाहेरुन अनेक मोठे-मोठे अधिकारी येऊन व्याख्याने देतात. एकावेळी अकादमीत सहा बॅचेस असतात. तर तिसर्‍या सहामाहीनंतर नवीन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करायचीही जबाबदारी दिली जाते. लष्करात सगळ्या बाबतीत शिस्तीला फार महत्त्व असते. अगदी काट्या-चमच्याने कसे खायचे इथपासून तर कोणते कपडे घालायचे, हात कसे ठेवायचे, कसे बसायचे, कोणत्या हातात काय हवे हे सगळे शिकवले जाते. 


प्रश्नः लष्करातल्या करिअरसंबंधी उत्सुक असलेल्या तरुणांना काय संदेश द्याल? नौकेवर आल्यानंतर अनेक लहान मुलांना असं वाटायला लागलं की नेव्हीतच जावं म्हणून. शिवाय इथे पीआर असलेल्या मंडळींच्या मुलांपैकी काहींनी सिंगापूरच्या नॅशनल सर्व्हिसमध्ये भाग घेतला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

कॅप्टन जोगळेकरः सिंगापूरची ही योजना मला आवडते; पण आपल्याकडे लोकसंख्या प्रचंड असल्याने ते करणे शक्य नाही. परंतु नौदलात चांगल्या अधिकार्‍यांची गरज वाढते आहे. शिवाय आता कामाचे स्वरुपही बदलते आहे. ते जास्त तांत्रिकतेकडे झुकते आहे. मी अकादमीत असताना मी बी.एस.सी. केले पण आता अकादमीत असलेले प्रशिक्षणार्थी बी.टेक. करतात. त्यामुळे तंत्रज्ञानासंबंधी आवड असलेल्या लोकांची बरीच गरज आता आहे. आजकाल बोटींच्या इंजिन सिस्टीम्स, प्रॉपल्शन सिस्टीम्स ह्या सगळ्या स्वयंचलित असतात आणि त्यासाठी सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स असतात. त्या संबंधी ज्ञान असलेलेही तंत्रज्ञ नौदलाला हवे असतात. कारण युद्धामध्ये तंत्रज्ञान हे आता पायाभूत आहे. ते जर तुमच्या ताब्यात असेल तर मग तुम्ही पुढे स्वसंरक्षणाच्या योजना आखू शकता. तंत्रज्ञान नसेल तर ते शक्य नाही. त्यादृष्टीने अतिशय आव्हानात्मक आणि रोमहर्षक असे हे काम असते. दुसर्‍या कोणत्याही व्यवसायात तुम्हाला जे लष्कराच्या कारकीर्दीत मिळतात त्या साहस, आदर वगैरे गोष्टी मिळणार नाहीत.


प्रश्नः सगळ्यांना नौदलात अकादमीमार्फतच येता येतं की इतरही काही मार्ग आहेत?

कॅप्टन जोगळेकरः पदवी मिळवल्यानंतरही नौदलात वा लष्कराच्या इतर शाखांमधे जाता येतं. पण सगळ्यांसाठी कमीत कमी बी.टेक. पदवी असण्याची अट आहे. पदवीनंतर तुम्ही अधिकारी म्हणून काम करु शकता. आता तर कितीतरी मुलीही नौदलात सामील होत आहेत. त्या सिस्टीम्स ऑपरेटर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहेत आणि लवकरच वेमानिक होऊन विमानेही उडवू लागतील.


प्रश्नः हेरखात्याचेही बरेच काम तुम्हाला शिकावे लागत असेल ना?

कॅप्टन जोगळेकरः हेरखात्याचे काम अगदी पहिल्यापासून शिकवले जात नाही. काही वर्षं नौदलात काढल्यावर मग लोकांना बाहेर प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.


प्रश्नः आपल्या कारकीर्दीत तंत्रज्ञानामुळे वगैरे आपल्याला कोणकोणते बदल पाहायला मिळाले?

कॅप्टन जोगळेकरः मी आधी म्हणालो तसं पूर्वी बी.एस.सी. करणे पुरेसे असायचे पण आता बी.टेक. असणे आवश्यक आहे. आता माझ्या २७ वर्षांच्या कारकीर्दीमुळे मी समजू शकतो. म्हणजे माझ्या टेक्निकल ऑफिसरने येऊन मला एखादी अडचण सांगितली तर मला त्यात नक्की तांत्रिकदृष्ट्या काय घडलंय ते कळलं नाही तरी त्याचे परिणाम काय होतील आणि त्यामुळे कोणत्या मर्यादा येतील ते कळते. ते ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. आता सिंगापूरच्या नौदलाचे उदाहरण द्यायचे झाले तर, त्यांची एक १२०० टनाची एक नौका आहे. यापूर्वी अशा नौका व त्यावरील यंत्रणा सांभाळायला कमीत कमी ७०-८० लोक असणे आवश्यक असायचे; पण सिंगापूर नौदलाच्या ह्या नौकेवर केवळ २१ लोक सगळ्या यंत्रणा सांभाळतात. हे केवळ तंत्रज्ञानामुळेच शक्य आहे. आम्हालाही ते पाहायचंच होतं की ते कसं त्याचं व्यवस्थापन करतात.


प्रश्नः तंत्रज्ञानातल्या प्रगतीबाबत भारतीय नौदलाची व इतर नौदलांची तुलना केल्यास आपल्याला काय दिसतं? भारतीय नौदलाची तंत्रप्रगती इतर नौदलांच्या बरोबरीची आहे?

कॅप्टन जोगळेकरः आपण तंत्रदृष्ट्या पुष्कळ प्रगत आहोत पण आपण आघाडीवर आहोत असे मात्र नाही. ह्याचं एक कारण म्हणजे सिंगापूरसारख्या देशाच्या नौदलास काही तंत्रज्ञान हवे असल्यास अमेरिकन किंवा युरोपियन देश लगेचच ते पुरवतात. भारताला मात्र ते सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे आपल्याला ते सगळं तंत्रज्ञान स्वतःच विकसित करावं लागतं. एकप्रकारे ते आपल्यासाठी फायद्याचंच आहे. आपल्याला माहित असतं आपण काय करतोय ते. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण काही वर्षे मागं असलो तरी आपण यथावकाश ते साध्य करुच. गेल्या सत्तर वर्षात आपल्याकडे विमानवाहू नौका निर्माण झाल्या आहेत, आण्विक पाणबुड्या निर्माण झाल्या आहेत, दूरवरचा पल्ला असलेली विमाने आहेत. ज्या देशाची विस्तारवादी धोरणे नाहीत, जो देश आक्रमक नाही आणि युद्धसामग्रीवर फारसा खर्च करत नाही असा देश म्हणून भारतासाठी हे सगळं करणे ही अभिमानाची बाब आहे. आपण फक्त आपल्या हिताचे रक्षण करु इच्छितो, तरीही आपले नौदल जगातल्या बलाढ्य नौदलांमध्ये गणले जाते.


प्रश्नः आपल्या नौकेला आपल्या युद्धसरावांमध्ये अनेकवेळा सर्वोत्तम नौकेचा पुरस्कार मिळाला आहे. 

कॅप्टन जोगळेकरः होय, नौदलात आमचा प्रयत्न असतो की आपल्यात रोज काही ना काही सुधारणा झाली पाहिजे. कारण युद्धप्रसंगी कशाशी सामना करावा लागेल ते आधी माहित नसतं. म्हणून प्रत्येक नौकेचे असे परीक्षण केले जाते. शिवाय अपघात वगैरेही आमच्या रोजच्या जगण्याचा भाग असतात. ते सगळं टाळणे किंवा नीट हाताळणे ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


प्रश्नः तुम्हाला कधी युद्धाचा किंवा युद्धसदृश परिस्थितीचा अनुभव आला आहे का?

कॅप्टन जोगळेकरः तसं पाहिलं तर १९६५ नंतर युद्धाची फारशी वेळ आलेली नाही; पण कारगिलच्या वेळी मी वैमानिक म्हणून दुसर्‍या प्रदेशात एका मोहिमेत भाग घेतला होता. त्याव्यतिरिक्त नैसर्गिक आपतींमध्ये मदत म्हणून अनेक मोहिमा नौदलाला कराव्या लागतात. म्हणजे श्रीलंकेत किंवा मालेमध्ये त्सुनामीच्या वेळी नौदलाने अनेक नौका पठवल्या होत्या. मी सुद्धा मदतकार्यात माझ्या नौकेसह सामील झालो होतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा