हरवले ते.........

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४

मनातल्या जिप्सीने परत डोके वर काढले, अन् आता निवांतपणा आहे तर कुठे बरं जावे असा विचार सुरु झाला. मैत्रिणींना फोन फिरवून झाले; पण प्रत्येकीचा पायगुंता कशात ना कशात झालेला होताच. खरं तर सगळ्यांनी आपापल्या जबाबदार्‍या पार पाडलेल्या होत्या; तरीही अजून अडकलेल्याच! मीच एकटी अशी रिकामी कशी? अगदी लेक अन सून म्हणते तशी स्वत:ची भरपूर space असणारी, जुन्यात जुनी, नव्यात नवी, म्ह्णून बर्‍यापैकी आवडती, typical काकू, मावशीपण ओलांडून सर्वसंमत आंटी असलेली मी! स्वत:कडे इतक्या त्रयस्थपणे कशी पाहू शकते? नक्की कसला परिणाम आहे हा? तो चांगला की वाईट?", ह्या आणि अशा विचारात गुरफटलेली सौदमिनी, सजवलेल्या, सुन्दर रोषणाईने चमकत्या बंगल्याच्या गच्चीवर तिच्या आवडत्या झुल्यावर विेसावली होती. नवरात्रीचा मुहूर्त साधून ह्या प्रशस्त बंगल्याची वस्तुशांत केली. हेच औचित्य साधून लग्नाचा ५०वा वाढदिवस म्हणून सगळे कुटुंब एकत्र करण्याची हौसही पुरवून घेतली. सगळं कसं योजल्याप्रमाणे झाले. नियोजन करण्यात हिचा हात कोणी धरणार नाही हे कौतुक खूपदा वाट्याला आले होते आजवर आणि सुखावायलाही झाले होते. सगळे मनासारखे होवूनही काही तरी निसटलंय असे मात्र वाटत राहिलेय.

बंगल्याच्या दुसर्‍या एका खोलीतूनही दरवाजाची सीमा पार करून प्रकाश बाहेर सांडत होता. आवडत्या रॉकिंग चेअरवर बसलेल्या श्रीकांतनाही झोप येत नव्ह्ती. कसं काय बुवा एव्हढे अचूक प्लॅनिंग करते कोण जाणे असे अर्धांगीबद्दलचे विचार चालले होते, चेहर्‍यावरून कौतुक ओसंडून जात होते! आणि तेंव्हाच त्यांच्या मनात आले, की "अरेच्चा! आपल्याला वाटतात त्या भावना तिच्याजवळ कधी बोललोच नाही की! एक नावाजलेला वकील म्हणून सतत बोलत असतो आणि तिच्यासमोर का कधी मनातले सांगत नाही? जग कौतुकाची फुले उधळताना तिची नजर मला शोधत असते पण आपण कधी दखलच घेतली नाही. इतकी साधी अपेक्षा का नाही कळली मला? इतकी आर्किटेक्ट झालेली बाई पण निमूटपणे सगळे काही काटेकोरपणे सांभाळते. अगदी कुठलेही काम असो, जणु फक्त त्यासाठीच जन्म झालाय इतक्या कुशलतेने ती हाताळते. दोन्ही मुलांना घरी राहूनच शिकू द्यावे असे मत तिने वारंवार बोलून दाखवले पण स्टेटसच्या भ्रामक कल्पना, पैशाची गुर्मी आणि नवरेशाहीही असेल; पण मुलांना बोर्डिंग मध्ये पाठवलेच. मुलेही घरी नाहीत, मी कामात व्यग्र आणि ती मग मिटूनच गेली. ती स्वभावाने समजुतदार, एकाग्रचित्त आहे, वक्तशीर आहे. साहजिकच माझा हट्ट बघून तिने तिचे जीवन तिच्या पद्धतीने आखून घेतले. घरी होती तोवर मुलांना वळण चांगले लावले, स्वयंपूर्णही बनवले; पण तिच्या स्वभावात कोरडेपणा येत गेला. म्हणजे कर्तव्यात कुठेच कसूर नाही पण कुठेच गुंतत नाहीशी झाली. भांडली असती तर विषय संपला असता; पण तिने नाराजी दाखवलीच नाही. की मला ती कळली नाही? रिटायर झाल्यावर मला दुर्लक्षित वाटायचे मग ही तर कायमच बाजूला पडली होती. सगळ्यात असून ती त्यात नसायची. आता कळलेय माझी झोप कशाने उडली ते..."

सौदमिनीचा स्वत:चा शोध चालूच होता. तिला आठवली कॉलेजमधली अवखळ, स्वत:च्या नावाला जागणारी तल्लख बुद्धीची, हुशारीची चुणूक हसर्‍या डोळ्यातून दिसणारी, आयुष्य आनंदाने जगणारी मिनी. मनाशी कितीतरी इमले बांधले होते. स्वत:ची फर्म काढायची, जगभर भटकून वेगवेगळ्या वास्तू बघायच्या; पण जेमतेम तिचा रिझल्ट लागतोय तोच तिचे पप्पा या जगातून अचानकच एक्झिट घेत झाले. नवरा आणि मुले इतकेच विश्व असणारी आई दुभंगून गेली. भाऊ आधीच नौसेनेत गेला होता. तो कसे लक्ष देऊ शकेल आईकडे? पर्यायाने आईला सांभाळणे हेच तिचे पहिले कर्तव्य ठरले. फर्म काढायचे स्वप्न बासनात बांधले, स्वप्नातच जगभर फिरायला शिकली आणि एका फर्ममध्ये जॉब करू लागली.

ती खूप creative होती म्हणूनच तिने हा अभ्यासक्रम निवडला, मनासारखे काम करता यावे म्हणून. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. नोकरीचे रहाटगाडगे चालू ठेवायचे तर बॉसच्या मनातील विचार प्रत्यक्षात उतरवायची गधा मेहनतच! अशा वेळी फर्मचा कायदेशीर सल्लागार श्रीकांत तिच्या संपर्कात आला. देखणा, रुबाबदार, तल्लख आणि आकर्षक. रुक्ष वकिलीपेशात असूनही हसत काम उरकायचा. त्याचे खुमासदार बोलणे ती ऐकत राही. मुळातली अवखळ मिनी परिस्थितीने गंभीर, थोडी अलिप्त बनली होती. बाबांनी बर्‍यापैकी माया मागे सोडली होती; पण साठवणीचे पाणी जपून वापरायचे ही हुशारी तिच्यात होती. आपले काम बरे नि आपण बरे अशी रहायची. हळूहळू श्रीकांतच्या सहवासात ती मोकळी झाली. त्यालाही ही हुशार, चुणचुणीत, गंभीर मुलगी इतरांपेक्षा निराळी वाटायची आणि आवडायची देखील. त्यावेळी प्रेमात असणार्‍या व्यक्ती शब्दांनी कमी आणि डोळयांनी जास्त बोलायच्या. यांचेही तसेच होते. योग्य वेळ पाहून दोघांनी शुभमंगल केले. तिला खरे म्हणजे खूप माणसे असलेले घर आवडले असते पण तो आणि त्याची आई हेच त्याचे विश्व. संसार सुरु झाला. सासू-सुनेचे अगदी गूळपीठ होते. नव्या नवलाईचे दिवस संपून दोघे आपापल्या व्यवसायात रुजू झाले आणि हळूहळू तिच्या लक्षात आले की बाहेर दिसणारा व्यावसायिक श्रीकांत आणि घरचा श्रीकांत अगदी वेगळे आहेत. आईने अनेकदा सुचवून सुद्धा तो स्वत:तच गुंग असायचा. मिनीला काय हवे आहे हे त्याच्या गावीच नसायचे. सौदामिनीचे उघड कौतुक करायचा नाही, शब्दांनी नाही आणि कृतीने तर नाहीच नाही. आधीच तिच्या आईला त्याच्या घरी आणून उपकार केल्यासारखा वागायचा, त्यामुळे असतो एकेकाचा स्वभाव समजून गप्प बसायची. पाठोपाठ संसारवेलीवर दोन गोड फ़ुले उमलली.

अनया आणि अनिकेतचे कोडकौतुक आणि जबाबदार्‍या सांभाळून, ऑफिसचे काम करताना निवांतपणा कधी वाट्यालाच नाही आला. श्रीकांत पद्धतशीरपणे व सोईस्करपणे मुले ही आईचीच जबाबदारी समजायचा आणि वेळ नाही हे कारण व्यवस्थितपणे वापरायचा. मुलांना वाढवताना शिस्त लावण्यासाठी ती जरा जास्तच काटेकोरपणे आणि काहीशी अलिप्तपणे वागायची. मुले हुशार होतीच, लवकर स्वावलंबीही झाली खरी; पण आईच्या प्रेमापेक्षा तिचा कठोरपणा खटकू लागला. मुलांच्या बाबतीत पप्पांचा हात सढळ,आणि सतत कौतुक यामुळे पप्पा लाडके आणि तिच्याशी मात्र मुले तसे चार हात दूरच राहिली. मुलांचे मित्र-मैत्रिणी मात्र तिचे क्षण आनंदी करायचे.

फर्ममधे तिचे प्रमोशन होऊन ती आता सल्लागार झाली होती. वेळेचे बंधन कमी झाले. यथावकाश पिकली पाने गळून पडली. सासूबाई कायमच तिच्यासाठी श्रीकांतला समजावत रहिल्या पण त्याच्या डोळ्यांवर यशाची झापडे चढली होती. तो त्याच्या क्षेत्रात अग्रणी होता. त्याला कशाचीच पर्वा वाटेनाशी झाली. सौदामिनीने आता तिचा बराचसा वेळ वेगळ्याच कामाला वाहून घेतला. जुन्या वास्तूंचे मूळ सौंदर्य टिकवून नूतनीकरण करून द्यायचे अगदी अल्प खर्चात, विनामूल्य सल्ले देऊन तिने अनेकांचे कल्याण केले. तिचे क्लायंट्स असत खेडोपाडी. खूप पायपीट करायची, निरपेक्ष बुद्धीने मुलांचे संस्कारवर्ग घ्यायची. सगळे लागी लाऊन तितक्याच तटस्थपणे बाजूला व्हायची. कर्तव्य चुकवत नव्हती; पण श्रीकांत आणि मुलांच्या बाबतीत ती आपणहून कशातच नसायची.

म्हणूनच आता निवांतपणा मिळाल्यावर तिच्या पुस्तकांमध्ये पाहिलेल्या वास्तू तिला खुणावू लागल्या. ती त्यांच्याजवळ जणू संवाद साधू लागली. त्यांचे नाव पत्ते टिपू लागली."लौकरच येते तुम्हाला भेटायला" म्हणू लागली. हा माझा मार्ग एकला म्हणत आखणीही करू लागली.

इकडे श्रीकांतने ठरवले, इतके दिवस झाले ते झाले. आता सौदामिनीच्या मनासारखे जगायाचे. दोघांनी मिळून ठरवायचे आणि ते बेत पारही पाडायचे मिळूनच; पण आज सुरुवात सरप्राइज देऊन करतो. तिला दिखाऊ आणि महागड्या वस्तूंचे अजिबात आकर्षण नाही हे तर माहीत आहे; पण मग दुसरे काय करावे हे बराच विचार केल्यावर त्याला आठवले की तिला प्रवास खूप आवडतो; पण रोजच्या रहाटगाडग्यातून तिला कधी स्वत:साठी वेळच मिळाला नसेल असे आज जाणवतेय.

दुस-या दिवशी त्याने फर्मान काढले आज मला कोणीही त्रास देऊ नका अगदी दसरा आहे मला माहीत आहे. मला हवे तेव्हा मी येतो. आणि घरात मुलगी, सून, नोकर सगळे असतानाही सौदामिनीलाच चहा घेऊन खोलीत बोलावले. सगळ्यांनी काहीतरी विक्षिप्तपणा म्हणून दुर्लक्ष केले. सौदामिनी स्वत:चे सगळे आवरून चहाचा सरंजाम घेऊन खोलीत आली आणि मनाला काहीतरी कसलीशी सुखद जाणीव झाली. तिचे लाडके निशिगंध आणि लाल गुलाब सामोरे आले. कितीतरी दिवसांनी छान वाटले तिला. श्रीकांतही नेहेमींपेक्षा जरा वेगळेच दिसले. चेहेरा शांत आणि प्रेमळ दिसला. अगदी नवलाईच्या काळात दिसायचा तसाच; पण लगेच तिने धावणा-या मनाला आवर घातला. संवयच झाली होती. तिने दिलेला चहा घेण्याऐवजी त्यांनी तिला एक पाकीट दिले आणि म्हणाले,"उघड ना". तो प्रेमळ,आश्वासक आवाज ऐकून तिने आपोआपच पाकीट उघडले. तिच्या मनात आले हे आज काय नवीनच? पण समोर दिसले ते तिच्यातल्या जिप्सीला मिळालेले उत्तर! वीणा वर्ल्डच्या लेडीज स्पेशल टूरची बुकिंग्ज. तिच्या डोळ्यात पाणीच आले. कित्येक वर्षांनी तिच्या आवडीचा विचार करून अनपेक्षितपणे सुखद धक्का दिला तिला तिच्या श्रीकांतनी. किती काळ तिने अशा आपुलकीची वाट पाहिली होती! परत एकदा दोघांचे डोळे बोलले एकमेकांशी, त्या शांततेलाही शब्द फुटले अन दोघांमधल्या अदृश्य भिंती कोसळल्या. श्रीकांत न राहवून म्हणाले,"सौदामिनी, तू मला मिळालीस हे माझे भाग्य होते, आई म्हणायची तशी सोन्यासारखी आहेस गं; पण मीच करंटा तुझी कदर केली नाही. आज, अगदी आत्तापासून तुझा आवडता श्रीकांत तुझ्याकडे परत आलाय. चल आज दस-याच्या मुहूर्तावर आपापल्या कक्षा ओलांडून आपण आता एकमेकांच्या साथीने,सोबतीने चालूया" आणि नंतर दोघेही उत्स्फूर्तपणे बोलले, आजच ही टेलिपथी दोघांनाही एकदमच झाली हा किती छान योगायोग आहे. जहांसे जागे वहीं सवेरा! हेच आजचे आपले खरे सीमोल्लंघन!

- जयश्री भावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा