कुक्कुरजन्म

ऋतुगंध ग्रीष्म - वर्ष १२ अंक २

खापरखेड्याच्या फाट्यावरुन हमीदभाईचा टेम्पो वळला तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. उन्हाने कोरड्याठाक पडलेल्या माळरानावर उगीचच वरखाली हेलकावे घेत चाललेल्या रस्त्यावरुन जमेल तितक्या वेगात हमीद टेम्पो हाणत होता. रस्त्याच्या कडेला धुळकटलेली भणंग झाडं पर्णरहित फांद्यांच्या जटा वागवत भकासपणे बघत उभी होती. टेम्पोचा टर्रर्रर्र आवाज आणि टेम्पोच्या ताडपत्रीची वार्‍याने होणारी फडफड ह्याशिवाय दुसरा कसलाही आवाज आसमंतात उमटत नव्हता. असला कंटाळवाणा प्रवास गेले दोन-तीन आठवडे हमीद रोज करत होता. तशी त्याला कंटाळवाण्या रस्त्यांवरुन टेम्पो टरकावत टुकूटुकू जाण्याची सवय होती; पण खापरखेड्याच्या ह्या चकरा त्याला नको वाटत होत्या. आत्ताही त्याच्या चेहर्‍यावर नकोसेपणा साकळला होता. खडबडीत रस्त्यावर गदागदा हलणार्‍या टेम्पोत डुगडुगणार्‍या मानेवर अगदी कंटाळलेला चेहरा घेऊन तो बसला होता. थोड्यावेळाने दूरवर लाल-निळ्या प्लॅस्टिकची फडफड आणि पत्र्यांची लखलख दिसायला लागल्यावर मात्र तो सावरुन बसला. 

टेम्पो गावात शिरायला लागला तसं गावाचं विस्कटलेलं रुप त्याला अस्वस्थ करु लागलं. गावकुसाबाहेरच्या वस्तीतल्या लोकांच्या झोपड्या चक्रीवादळ येऊन गेल्यासारख्या उध्वस्त दिसत होत्या. कोणी अजूनही उरलेल्या झोपड्यांची लाल-निळ्या रंगाची प्लॅस्टिकची छपरं उतरवत होतं; कोणी जमिनीत उभ्या रोवलेल्या लाकडी ओबडधोबड खांबाला सुतळीने बांधलेले आडवे वासे सोडवत होतं; कोणी झोपडीतली इनमीन चार-पाच अ‍ॅल्युमिनियमची भांडी-कुंडी एकात एक घालून उगीच एका कोपर्‍यात व्यवस्थित मांडल्यासारखं करत होतं; तर कोणी नुसतंच विस्कटून टाकलेल्या झोपडीशेजारी डोक्याला हात लावून उकिडवं बसून होतं. कोणी काहीही करत असलं तरी कोणाच्याही हालचालींमध्ये उत्साहाचा मागमूसही नव्हता. आयुष्य गुंडाळून परलोकात निघाल्यासारख्या लोकांच्या हालचाली मरगळलेल्या होत्या.

हमीदने टेम्पो तसाच पुढे दामटला आणि तो गावात शिरला. गावातही फार वेगळी परिस्थिती नव्हती. काही ठिकाणी विटांनी बांधलेल्या भिंती तशाच सोडून दारं-खिडक्या काढून नेलेली रिकामी भकास घरं, काही ठिकाणी सामानाची बांधाबांध केलेली घरं आणि काही ठिकाणी नुसतं कुलूप लावून सोडून दिलेली नीटनेटकी घरं दिसत होती. ज्या घरांमध्ये माणसं अजून उरली होती तिथेही भकासपणाशिवाय काही दिसत नव्हते. काही माणसं घराच्या उंबरठ्यावर उगीचच बसली होती; काही गावातल्या रस्त्यांवरुन कुठेच पोचायची घाई नसल्यासारखी चालली होती आणि काही घरात टीव्हीच्या पडद्यासमोर बसून मन रिझवायचा प्रयत्न करत होती.

बुधन प्रजापतिच्या घरासमोर टेम्पो आल्यावर हमीदने ब्रेक मारला आणि चावी फिरवून टरटरणारं इंजिन बंद केलं. घराच्या ओट्यावर बुधन हातात घण घेऊन उभा होता. पुढच्या भिंतीत बसवलेली लोखंडी जाळी काढायचं काम चाललं होतं त्याचं. त्याची बायको घरातली तांब्या-पितळाची व स्टीलची भांडी गोणीत भरत होती. अंगणात टाकलेल्या खाटेवर बुधनची म्हातारी त्याच्या दोन-तीन वर्षांच्या पोरीला जवळ घेऊन ओट्याजवळच्या स्टुलावर ठेवलेला छोटासा टीव्ही बघत बसली होती. टेम्पो थांबलेला पाहून बुधनने हातातला घण खाली टेकवला; त्याच्या बायकोने हातातली गोणी सोडली व कमरेवर हात ठेवून उभी राहिली; म्हातारीने टीव्हीच्या पडद्यावर “जुम्मे की रात है” म्हणत नाचणारा सलमान खान सोडून एकदा वळून पाहिलं; आणि पोरीने कळकट बाहुलीशी चाललेला खेळ थांबवून वर बघून नाकातून बाहेर येऊ पाहणारा शेंबूड फर्रकन वर ओढला. टेम्पोतून उतरून हमीद बुधनकडे चालू लागल्यावर बुधनची बायको डोक्यावरचा पदर सावरत आत गेली. हमीद ओट्याजवळ जाऊन थांबला आणि कमरेवर हात ठेवून सगळ्या पसाऱ्याकडे पाहू लागला. बुधनने डोक्याचं मुंडासं काढलं आणि त्याने तोंडावरचा घाम पुसायला लागला. बुधनची बायको आतून पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तो ओट्यावर ठेवून गेली. हमीदने घटाघटा निम्मा तांब्या संपवला आणि नंतर थोडं पाणी हातावर घेऊन तोंडावर मारू लागला. 

“हो गया काम जमीन का?”, हातानेच चेहर्‍यावरचं पाणी निपटत हमीदने विचारलं.

“अभी कहॉं? पटवाऱ्याकडे मारतोय चकरा.”, बुधन भडाभडा बोलायला लागला, “सरकारने दिलेली तारीख आता पंधरा दिवसावर आली तरी अजून काही होईना. पहिला अडीच लाखाचा मिळालेला हप्ता दिलाय जमिनीसाठी. बॅंकवाले म्हणतात दुसरा हप्ता डायरेक्ट आधीच्या मालकाला देतील व्यवहार पूर्ण करताना. आधी द्या म्हटलं तर वीस हजार रुपये मागितले. पटवारी सातबारा बदलायला पस्तीस हजार मागतोय. एवढं करुन मग जमीन ताब्यात येणार. मग तिच्यात भराव घालायचा.” 

“भराव घालायचा?”

“हा.. फार सखल जमीन आहे ती. पावसाळ्यात सगळं पाणी साठंल तिथं. आता पैसे ह्यांच्या घशात घातल्यावर कुठून भराव घालणार?”

“घर कसंय तिकडचं? जाऊन आलास का तू?”, हमीदने विचारलं. 

“हा. आलो जाऊन. बरंय घर. पक्कं विटांचं आहे. वस्तीत सगळी सारखी घरं बनवलीत सरकारनं. शाळापण बनवलीय. पण आजूबाजूला काही नाही.”

“हं.. वसंल हळूहळू गाव तिकडं.”

“दुसरा पर्यायच नाही. पंधरा दिवसात धरणाचे दरवाजे बंद झाले की इथं पाणीच पाणी होणार. न वसवून सांगता कोणाला? पिढ्यानपिढ्या गेल्या ह्या गावात; आता तिकडं जाऊन राहायचं”, तडकून बुधन म्हणाला.

त्यावर काय बोलायचं हे न कळून हमीद गप्पच राहिला. प्रत्येक फेरीत वेगवेगळी गोष्ट ऐकायला मिळत होती त्याला. कोणी हातावर पोट घेऊन देशोधडीला लागलेले, कोणी पैसे चारुन भरपूर जमिनी पदरात पाडून गब्बर झालेले आणि कोणी बुधनसारखे त्रिशंकू अवस्थेत लटकलेले. हमीदचा धंदा जोरात होता पण त्याला व्हावा तसा आनंद त्यात होत नव्हता.

टीव्हीवर आता गाणी संपून फिल्मी न्यूज लागल्या होत्या. “हृतिक रोशन और उनकी वाईफ सुझन खान का डिव्होर्स होने के बाद की उनकी पहली फिल्म मोहंदोजरो की लॉंच पार्टी हाल ही में हुई. आईये एक नजर डालते हैं किन-किन सितारों ने पार्टी की रौनक़ बढ़ाई.”, निवेदिका उत्साहाने सांगत होती.

“मग आज सगळं सामान न्यायचं का तिकडं?”, हमीदने घसा खाकरुन विचारलं.

“नाही. आज सगळं नाही झालंय काढून. त्या गोण्यांत भरलंय ते घेऊन जायचं आणि झालंच तर दोन खिडक्यांच्या जाळ्या आणि चौकटी काढून झाल्यात त्या, दोन खाटा आणि औजारं घेऊन जायची.”, बुधन म्हणाला. “आता शेतीच्या औजारांचा काही उपयोग नाही सहा महिने-वर्षभर तरी. भराव घालायचा म्हणजे तीस हजार तरी लागतील. त्याचा बंदोबस्त करावा लागेल.”

“काय ठरवलंय मग?”

“काय ठरवणार? हे लोक राहतील चिखलद्याला. रोजंदारीची कामं मिळतील बहुतेक तिथं. मी जाईन मुंबईला सहा महिने-वर्षभर. तिथं काही तरी काम मिळूनच जाईल. पैसे साठले की मग परत येईन.”

“कोणी आहे का मुंबईला ओळखीपाळखीचं?”

“डायरेक्ट ओळखीचं कोणी नाही. पण गावातला शंकर यादव आहे ना, तो होता मुंबईला दोन वर्षं. त्याच्या ओळखीचे लोक आहेत मुंबईत. तो करेल म्हणाला काही कामाची सोय.”

“आणि राहाण्या-खाण्याची सोय?”

“ते बघू तिकडं गेल्यावर. सगळं इथं बसल्या जागेवरून थोडीच होणार आहे?”

“हां.. तेही खरंच.”, हमीद म्हणाला. एक सुस्कारा सोडून त्याने ओट्यावर एका बाजूला भरून ठेवलेल्या गोण्यांपैकी एका गोणीला हात घातला आणि ती उचलून खांद्यावर टाकून टेम्पोकडे चालू लागला. बुधनने पाण्याचा तांब्या उचलला आणि उरलेलं पाणी तो घटाघटा पिऊ लागला.

“सुपरस्टार सलमान खान को कोर्ट ने पाच साल की सजा सुनाने के बाद सिंगर अभिजित भट्टाचार्य के ट्वीट ने आज काफ़ी हल्लागुल्ला मचा दिया. ‘फुटपाथ सोने की जगह नहीं है. कुत्ता फुटपाथ पे सोएगा तो कुत्ते की मौत मरेगा ही’ ऐसा उन्हो ने ट्वीट किया था.”, टीव्हीवरची निवेदका त्याच उत्साही आवाजात बोलत होती.

तांब्या खाली ठेवून बुधन उठला, डोक्याला मुंडासं बांधलं आणि घणाने स्वत:च्या घराच्या भिंतीवर घाव घालायला लागला.

- निरंजन नगरकर





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा