अध्यक्षीय मनोगत


ऋतुगंध वाचकांना सप्रेम नमस्कार !

तुमच्यापैकी काही जण मला ओळखता. काही नाही. मी नलिनी थिटे. मी गेली १२ वर्षे मंडळाशी सभासद म्हणून संलग्न आहे. गेली ३ वर्षे कार्यकारिणीमध्ये होते. हे माझे चौथे वर्ष. या वर्षी मार्च पासून मी अध्यक्ष म्हणून सूत्रे हातात घेतली आहेत.

सिंगापूरच्या म्हणा किंवा बाकी कोणत्याही देशातल्या महाराष्ट्र मंडळात आपण येतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कुठेही महाराष्ट्र मंडळ हे नुसते एकत्र जमून कार्यक्रम बघायचे ठिकाण नसते. मंडळ हे नेहमी एक कुटुंब असते. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर (म मं सिं) कुटुंबापेक्षा ही जास्त खास आहे. खूप जास्त घनिष्ठ मैत्री इथे झालेल्या मी पाहिल्या आहेत. मंडळासाठी कुटुंब आणि कामाच्या जबाबदाऱ्या बाजूला टाकून, झोकून देऊन मदत करणारी कितीतरी माणसे इथे आहेत. एकत्र येण्याची आणि खांद्याला खांदा लावून काम करण्याची जी उर्मी इथे आहे ती क्वचितच दुसरीकडे कुठे असेल. याच बळावर वर्षोनुवर्षे म मं सिं च्या कार्यक्रमांचा, सभासद संख्येचा आणि सभासदांच्या सहभागाचा आलेख वरवर जात राहिला आहे. दर वर्षी कार्यकारिणी देखील गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी आपण काय नवीन आणि चांगले करू शकू याचा सतत विचार करत असते. जास्तीत जास्त व्यावसायिक कार्यक्षमता आणूनदेखील  त्यात व्यावसायिकतेचा कोरडेपणा न येऊ देता मंडळ चालवणे ही तशी तारेवरची कसरत. पण कार्यकारिणी ते हसत, आनंदाने करते. अशा सभासद, कार्यकर्ते आणि कार्यकारिणी बरोबर काम करणे हा अतिशय भारून टाकणारा आणि प्रेरणादायक अनुभव असतो. अजून अभिमानाची आणि तितक्याच जबाबदारीची गोष्ट म्हणजे म.मं.सिं.च्या रौप्यमहोत्सव पदार्पण वर्षात मंडळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे.

४ ऑगस्ट २०१८ रोजी मंडळ स्थापन होऊन २४ वर्षे पूर्ण होतील. मंडळ पंचविशीत म्हणजेच रौप्यमहोत्सवात पदार्पण करेल. १९९४ च्या आधीपासून ते आजपर्यंत, मंडळ अस्तित्वात यावे, ते नीट चालावे व त्याची पाळेमुळे भक्कम व्हावीत म्हणून अनंत लोकांनी काम केले आहे. हे आणि पुढचे वर्ष त्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. आणि अशा या दृढमूल संस्थेचे सभासद म्हणून आपल्यासाठी देखील ही खास संधी आहे. हा उत्सव अधिक सुंदर व्हावा, म्हणून आम्ही या वर्षी प्रयत्न करू. या वर्षीचा प्रत्येक कार्यक्रम वेगळा व अधिक चांगला करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपले या वर्षीचे बरेच कार्यक्रम हे अत्रे, पु ल, भीमसेन जोशी, बालगंधर्व, सई परांजपे ह्या मराठी भाषेच्या व कलांच्या अभिमानस्थळांशी निगडित असतील. त्यांनी आपल्याला त्यांच्या साहित्याच्या आणि कलेच्या स्वरूपात अपार धन दिले आहे. या खजिन्यावर आधारित कार्यक्रम हा आपल्यातर्फे त्यांना एक सलाम असे म्हणू या.

या वर्षी काही नवीन संस्थांशी करार करून आम्ही मंडळाला नवीन संधी व सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तसेच मंडळाचे काम सुरळीत व सोपे व्हावे या दृष्टीने काही बदल आणि सोयी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वर्षीपासून वाचनालय व अकाउंटिंग यांच्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर आम्ही सुरु करणार आहोत. तसेच सभासद संख्या वाढण्यासाठी सभासदांना काही विशेष फायदे मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. भारती विद्यापीठ, शंकर महादेवन अकादमी, ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल शाळा, एस. पी. जैन कॉलेज यांच्याशी आपले सामंजस्य करार झाले / होत आहेत. तसेच People's Association, SINDA इत्यादी संस्थांशी  निगडीत होऊन सिंगापूरसाठी जे महत्त्वाचे उपक्रम आहेत त्यामध्ये आपण जास्त हातभार लावू शकतो का याबाबत आम्ही प्रयत्नशील असू. सभासदांना आरोग्यदायी राहणीसाठी काही सवलती व सल्ले उपलब्ध करून देण्याकडेही आमचा कल राहील.

आपले सर्वांचे हे वर्ष आरोग्यदायी आणि समृद्ध होण्यामध्ये मंडळाचा असलेला खारीचा वाटा सालाबादप्रमाणे थोडा अधिक मोठा व्हावा असा मानस आहे. यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य आणि मदत लागेल. ती तुम्ही नेहमी करताच आणि या वर्षीही नक्की कराल असा मला विश्वास आहे. आपण सगळे मिळून हे वर्ष मंडळासाठी एक संस्मरणीय वर्ष करू या. can? :)

- नलिनी थिटे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा