सहस्त्ररश्मी

ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
तांबडं फुटताच दिसते सहस्त्ररश्मीची जादू विलक्षण
विविध रंगछटांची अक्षरशः होत असते उधळण
मनसागरी उठती अपुल्याच भावनांचे तरंग
मनासारख्या आकृती चितारून आपण होतो कल्पनेत दंग
आहे का ही प्रचंड ऊर्जा अवघ्या विश्वातली,
क्षणोक्षणी जी करीत असते उलथापालथ इथली।

की भानूचे तेजोवलयच आहे भंवताली,
घेरुन घेई अवघ्या विश्वा आणिक कवटाळी।
कधि वाटे हे कमलच आहे तेही सहस्त्रदली
स्वामी आहे ज्यांचा तो ही सप्त चक्रे अंतरातली।

ध्यानमग्न हा ऋषी बैसला शांत आसनावरी,
कुंडलिनी आहे का जागृत त्याच्या कायेतली
कदाचित अशी पाण्याखालिल अजायबघरे खुलती नयनापुढती,
सहस्त्र जीव हे वसती जगती येथे या जगती।

भास असो की सत्य असो हे मायाजालच की आहे
जे आहे ते नयनमनोहर अपुले अंतर सुखावते
श्रेष्ठ शक्तिने निर्मिलेले आहे गूढच हे इतुके
मनुजा इतुके ज्ञान कुठे की समजे काय कुठे घडते




- सौ जयश्री भावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा