आपलं स्वतःशी नातं

आपलं स्वतःशी नातं, हा ऋतुगंधचा विषय मला फारच आवडला आणि मनापासून वाटलं ह्यावर काहीतरी लिहावं. स्वतःशी संवाद साधणंसुद्धा किती छान वाटतं ना? त्याकरता लागणारा मोकळा वेळ पण मी आता देऊ शकते.

माणूस नाती घेऊनच जन्माला येतो. जन्म झाल्या झाल्या कुणाची तरी मुलगी, बहीण, भाची, पुतणी, नात आपण झालेलोच असतो. मोठं होताना छोटे छोटे शब्द, मग वाक्य आणि मग मातृभाषा आपण घरात शिकतो. त्यातून आई, बाबा, बहीण, भावंडे ह्यांच्याशी हळू हळू संवाद साधतो. मग शाळेत हिंदी, इंग्रजी इत्यादी दुसऱ्या भाषा पण शिकतो. शाळेत आपलं विश्व आणखी मोठं होतं. खूप नवे मित्र, मैत्रिणी, आपले ग्रुप हे सगळं सुरु होतं. Man is a social animal. जास्त करून लोक समूहामध्ये राहणं पसंत करतात. कॉलेजमध्ये सुद्धा माझा मोठ्ठा मित्रपरिवार होता. (आम्ही अजूनही सगळे संपर्कात आहोत.) तेव्हा आपण बाहेरच्या जगाशी नातं जोडण्यात, नवीन गोष्टी शिकण्यात इतके गर्क असतो, की स्वतःशी संवाद साधायला वेळही मिळत नाही. दिवसाचे २४ ताससुद्धा कमीच वाटतात. मी एका मोठ्या एकत्र कुटुंबात वाढले. घरात आज्जी, आजोबा, काका, काकू, आई, बाबा, बहिण, भाऊ, चुलत भावंडं अशी भरपूर मंडळी असायची. शिवाय सतत जाणं- येणं, पाहुणे रावळे असायचे. आमच्या पिढीला ह्या सगळ्या वातावरणाचा फायदा म्हणजे communication skills कधी क्लासला जाऊन शिकावी लागली नाहीत. घरात दिवस रात्र वेगवेगळ्या वयाच्या लोकांशी संवाद साधणं ही रोजचीच बाब होती. शिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहुणे आले की रात्री उशिरापर्यंत पत्ते, गप्पा, भेंड्या खूप चालायचं. एकाच वेळेस इतकी सगळी नाती आम्ही इतक्या लीलेने सांभाळायचो की तेव्हा त्याचं महत्त्व कधी उमगलंही नाही. माझ्या आज्जीची तब्येत बरी नसायची. त्या काळी फोन नव्हते त्यामुळे ती बरेचदा तिच्या मैत्रिणींकडे मला निरोप द्यायला पाठवत असे. तिथे मग काहीतरी छानसा खाऊ पण मिळायचा. अजूनही हे सगळं आठवलं कि खूप गंमत वाटते. Life was really simple!

मला शाळा, कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व, निबंध स्पर्धा, लिखाण, वाचन ह्या सगळ्याची खूप आवड होती. ह्या सर्व स्पर्धा असल्या की मला खूप आनंद होत असे. कारण स्वतःला व्यक्त करणं मला सुरुवातीपासून आवडतं. ते वक्तृत्वाच्या माध्यमातून असो वा लिखाणामधून असो. उत्स्फूर्त बोलणं मला विशेष आवडायचं. मी आजही ते खूप एन्जॉय करते. शिवाय बक्षीस मिळालं तर मग अर्थातच तो आनंद द्विगुणित होत असे.

अशीच वर्षं भराभर सरत गेली. शिक्षण संपलं, लग्न झालं, संसार सुरु झाला. संसार व करिअर सांभाळताना, मुलांना वाढवताना बाकी गोष्टींकरता तितका वेळ देता येत नाही. आयुष्याची ती बरीच वर्ष अक्षरशः fast forward मध्ये निघून जातात. मग मुलं मोठी झाल्यावर व त्यांची लग्नं होऊन ती स्थिरावल्यावर पुन्हा एक काळ असा येतो की आपल्या आवडीचं सगळं करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. जो आत्ता माझ्याकडे आहे. मी सध्या जे काही लिहिते, कविता करते त्याचं खूपसं श्रेय मी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरला देते. कारण आपल्याकडे ऋतुगंध, मंथन, शब्दगंध असे इतके सुंदर उपक्रम आहेत जिथे भरपूर प्रोत्साहन मिळतं व चांगलं काही लिहिलं तर त्याची दाद पण मिळते.

मुलगी, बहीण, बायको, सून, आई, सासू, आज्जी अशी अनेक नाती माझ्या आयुष्यात आहेत. जी मला अर्थातच अतिशय प्रिय आहेत. पण स्वतःशी नातं असा विचार करताना, एक चांगलं माणूस असणं हे मला फार महत्वाचं वाटतं व मी स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न पण करते. त्याशिवाय माझ्या लिखाणातून किंवा संवादातून मी जे नातं स्वतःशी व इतरांशी साधते, ते मला अतिशय प्रिय आहे. एक प्रकारे ती आपली ओळख किंवा identity असते. कारण जेव्हा आपण काही लिहितो किंवा बोलतो, तेव्हा अर्थातच विचार करतो, स्वतःशी आधी संवाद साधतो, मगच ते कागदावर उतरवतो. आपण बोलताना किंवा लिहिताना स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे त्यातून आपलं खरं व्यक्तिमत्व प्रदर्शित होतं. सध्या 'ईवान' ची आज्जी ही ओळख मला सगळ्यात जास्त प्रिय आहे, पण त्याच बरोबर सतत नवीन लिखाण करणं, वाचणं, कविता करणं, नव्या विषयांवर आपले विचार मांडणं, हे सुद्धा मी खूप एन्जॉय करते. स्वतःशी आपलं नातं आपण जितकं उत्तम आणि पक्कं ठेवू, तितकं आपलं मन ताजं आणि सर्जनशील राहील.

अशा लेखांमधून तुमचं आणि माझं नातंसुद्धा कायम असंच मैत्रीपूर्ण राहील अशी आशा करते.


- मेघना असेरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा