ऋतुगंध वर्षा २०१८ - साहित्य आवाहन

नमस्कार!
ऐन उन्हाळ्याच्या दोन महिन्यांमध्ये सूर्य चराचरसृष्टीस भाजून काढत असताना; जमीन रखरखीत भेगाळ होऊ लागली असताना आणि प्राणी-पक्षी उन्हाच्या तलखीत संत्रस्त झालेले असताना एक दिवस गडगड डमरु वाजवत नैऋत्य क्षितिजावर काळे ढग अवतीर्ण होतात. वारा गिरक्या घेत पाचोळा उधळत नाचू लागतो. झाडं अंग घुसळून आनंदाने हसू लागतात. बघता बघता सगळे आकाश हे ढग पादाक्रांत करतात व आसुसलेल्या पृथ्वीवर अलगदपणे जलवर्षाव सुरु होतो. जमिनीचा इतक्या दिवसांचा ताप काही क्षणातच सुगंध होऊन उडून जातो; झाडांची धूळभरली अंगे स्वच्छ धुऊन निघतात आणि प्राणी-पक्ष्यांचा घामारोष फुंकर घातल्याप्रमाणे मावळतो.  
असा हा वर्षा ऋतुच्या आगमनाचा अनुभव आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या रुपात येऊन भिडत असतोच. संकटरुपी उन्हाळ्याच्या काहिलीत अथक प्रयत्नांनी सफलतेचा क्षण येतो तेव्हा; खूप मोठ्या कालखंडासाठी दुरावलेल्या जिवाभावाच्या माणसाशी पुनर्मीलन होतं तेव्हा; कोणत्यातरी परीक्षेसाठी वर्षभर मान मोडून अभ्यास केल्यानंतर निकालाच्या दिवशी श्रमसाफल्याची पावती मिळते तेव्हा किंवा अगदी पै-पै वाचवून घेतलेल्या स्वत:च्या घरात पहिलं पाऊल ठेवतो तेव्हा अंत:करणात ह्या वर्षा ऋतुचा अनुभव येतोच व कधीकधी डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या रुपाने प्रकटही होतो.
माणसांच्या आयुष्यात येणारे हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वर्षाऋतु हा ऋतुगंधच्या वर्षा विशेषांकाचा विषय असणार आहे.
पण अर्थातच विषयाची अशी कडक मर्यादा नाही व शब्दसंख्येवरही मर्यादा नाही. आपल्याला अन्य काही सुचले तर अवश्य पाठवा.
तसेच वर्षा ऋतु म्हणजे सणासुदीचा सुकाळ. आपल्या मूळ गावातल्या पावसाळी सणांच्या प्रथा, परंपरा, खाद्यजीवन, इतिहास व इतर उत्सवांबद्दलही लिहून पाठवू शकता.
आपल्या लेखनाची आम्हाला प्रतीक्षा राहील. कृपया १५ ऑगस्ट पर्यंत आपले लेखन rutugandha (at) mmsingapore (dot) org ह्या पत्त्यावर पाठवावे. लेखन देवनागरीत टाईप करुन वर्ड वा टेक्स्ट फॉरमॅटात पाठवावे.
आनंदाची गोष्ट म्हणजे मंडळाचे सभासद नसलेले कवी-लेखकही आता आपले लेखन ऋतुगंधसाठी पाठवू शकतात.

धन्यवाद!

आपली,
ऋतुगंध समिती

सूचना: पूर्वप्रकाशित लेखन ऋतुगंधमध्ये न स्विकारण्याचे संपादकीय धोरण आहे. त्यामुळे आपले लेखन ऋतुगंधमध्ये प्रकाशित झाल्यावरच आपल्या ब्लॉगवर वा अन्यत्र प्रकाशित करावे ही विनंती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा