ऋतुगंध वर्षा - वर्ष १२ अंक ३
त्रास देणाऱ्या सूर्यावर
गोड शब्दांचा वर्षाव करताना,
सूर्याच्या रणरणत्या तांडवापुढे
पाण्याचे थंड स्वर जिंकताना.
प्रदुषलेल्या हवेच्या वासाला
त्याच्या शुद्ध हृदयाने धुताना,
ओल्या मातीच्या सुगंधामुळे
निसर्गाची आठवण होताना.
खिडकीत माझे प्रतिबिंब बघता-बघता
घसरणाऱ्या थेंबांना पकडताना,
हातावर आलेल्या त्या पाण्याच्या थेंबाने
अश्रुंचे महत्त्व कळताना.
लहान मुलांना चिखलात खेळताना पाहुन
आनंदाचा अर्थ समजताना,
चेहऱ्यावर बसलेल्या पाण्यामुळे
खरा स्वर्ग अनुभवताना.
पडणाऱ्या पाण्याच्या वेगामुळे
वेळेची गती कमी होताना,
आकाशाच्या सांडणाऱ्या प्राणामुळे
आयुष्याची जाणीव होताना.
ह्याच पाण्याने मला भेट दिली
सहजच एकदा चालताना,
मी प्रेमात पडले पावसाच्या
अशीच नकळत जगताना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा