अफलातून

सहजच सोसायटीत खाली जाऊन बसले होते . समोर एक तरुण जोडपे नि त्यांचा मुलगा, नुकताच उभा राहू लागला असावा.लुटुलूटुते छोटे पाय, मधेच झोकजातोय, खिदळतोय , आणि ते आई-बाबा टाळ्या वाजवित काहीतरी म्हणताहेत. मँड्रेनमध्ये. शब्द समजले नाहीत पण भाव कळला. आपलं, "शोनु उभा राहिला, आम्ही नाही पाहिला.”....... असंच काहीतरी. मग आणखी दोन आजीबाई त्यांच्यात सामील झाल्या. पोरगं अधिकच खिदळू लागलं .एक सुंदर दृश्य पाहताना मनात आलं, जगात कुठेही जा, काहीही खा ,परिधाना , कुठलीही भाषा असो ,भावना समान. कितीही शिकलो वा न शिकलो तरी आपलं मूल पहिल्यांदा उभ राहतंय हा आई-बाबांचा परमानंद , कारण हेच दृश्य मी ठाण्याला कचरा वेचणारं जोडपं एका झाडाखाली चाय -बिस्कुट खातांना पोराचं कौतुक करताना पाहिलं होतं. विचारांच्या तंद्रीत घरी आले तर ऋतुगंधाची मेल पाहिली. व्वा ! काय योगायोग! त्यांनीही नवे अनुभव, रोमहर्षक आठवणी लिहिण्यास सांगितले होते . 

विचारांना अधिकच गती आली नि मग पार भूतकाळात गेले. अगदी दोन वर्षाची असताना दादाने छोट्या तिचाकी सायकलवरून डबल सीट घेऊन घराला मारलेल्या वेगवान फेऱ्या आणि दगडावरून जाताना सायकलसकट सॉलिड पडलेले दोघं ,बालवाडीतील पहिला दिवस, शाळेतल्या तर आठवणी खूप ..... पहिला दिवस, पहिली मॅच, पहिलं बक्षिस ,विहिरीच्या काठावरुन सरांनी ढकलून दिलेलं नि वर येण्याची धडपड.... एक ना दोन. बैलगाडी पासून प्रत्येक वाहनातील पहिलाअनुभव, एकेक प्रसंग अथपासून डोळ्यासमोर येऊ लागले, कॉलेज, शिक्षण, नोकरी, लग्न ,बाळाचा जन्म ,त्याची प्रगती,आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील किती अनुभव नि प्रसंग ! सारे आठवत दीड-दोन तास सहज निघून गेले. आमची पिढीच वेगळी, यासाठी या काळात जागतिकरण प्रचंड वेगाने झाले . लहानपणी संगणक, टेलिव्हिजन याबद्दल प्राथमिक ज्ञान,दूरदेशी येऊ लागलेल्या या गोष्टीं बद्द्दलच्या बातम्या इतकेच आणि नोकरीत सारे manually करीत असतांना कॉम्प्युटर ज्ञान आत्मसात करायला लागले . बरोबरच्या कित्येकांनी हे जमणार नाही म्हणून VRS ही घेतली. आज मूल आईच्या पोटातून हे ज्ञान घेऊन जन्माला येतं पण आमच्या पिढीला त्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली इतकंच नव्हे तर त्यातील पुष्कळ बाबी आम्हाला अजूनही अज्ञात आहेत. मुलाने हाती ठेवलेला पहिला मोबाईल काय काय‘कारवाया' करू शकतो हे समजावून घेणे हेही प्रचंड मोठे रोमहर्षक अनुभवच! इतक्या आठवणींमधून कोणता प्रसंग सांगावा याचा संभ्रम पडला. पुन्हा एकदा आठवणींचे मोती वेचायला घेतले नि एक टप्पोरा मोती डोळ्यात भरला . 

नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये कामाची धांदल चालू आणि अचानक मुलाचा फोन आला ,"आई पुढच्या  रजा घे. मी येतोय."

मी अत्यानंदित . आठ नऊ महिन्यांनी मुलगा घरी येणार! पुढच्या क्षणी चेहरा पडला. पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी! अरे बापरे!

“ कधी येतोस रे ?”

“फेब्रुवारी ,last week” 

“ कामानिमित्त की "…..

“ हो ,खास कामच आहे.”

“ छान रे तू येतोस ते ,मी ट्राय करते पण शक्यता कमी रजा मिळण्याची. मार्च एंडिंग आहे ना रे..”

“ तुला कधीच रजा मिळत नाही. यावेळी घ्यायलाच हवी ,प्लीज गं !’’

हा कधीच असा हट्ट करीत नाही.या ऑफिस मध्ये आल्यापासून शनिवार हाफ डे कधी पाहिला नाही मी . गेले कित्येक रविवारही येतेय. मिळेल का रजा? विचारात पडलेली पाहून रणजितने काळजीने विचारले, ‘ओ ,काय झाले?’ सांगितल्यावर म्हणाला , “राहुल येतोय ना ? जा बिनधास , मी सांभाळीन सर्व !” किती हायसे वाटले. रजेचा अर्ज आणि त्यालाही घेऊन गेले AGM कडे . आधी डोळे मोठ्ठे . 

मार्च अखेर , how dare you ???? 

नाराजी , हुज्जत, गेल्या सात महिन्यात फक्त एक दिवस गणपतीसाठी घेतलेली रजा ,सगळे रविवारी इथेच. इ. इ. शेवटी रणजितला दम ,"बाकी कोणी त्याकाळात रजा घ्यायची नाही ही जबाबदारी त्याची" मोठ्या मुश्किलीने आठ दिवस मिळाले . 

रजेवर जाताना त्याने सांगितले, काळजी न करता मुलाबरोबर एन्जॉय कर. त्याला कारणही तसेच होते. आठ महिन्यापूर्वी आईसारखी फोन करत होती, जरा येऊन जा ,काही बोलायचे आहे नि नेमके ऑडिटमुळे घरी अकरा बारा वाजता जात होते, सकाळी परत साडेसातला निघायला लागत होते. “ चार-पाच दिवस फक्त आई , मग दोन दिवस राहायला येते" अशी विनवणी केली. पण आई नाही थांबली. गेली हार्टएटॅकने. अग्नी देतानाही एकटक बघत होते तिच्याकडे, काय बोलायचे असेल हिला ?

ठरल्याप्रमाणे 19 फेब्रुवारीला राहुल आला. कित्ती आनंद ! घर भरले की ! रोज काय करायचे खायला याचे बेत करून ठेवले होते पण आल्याआल्याच त्याने जाहीर करून टाकले ,”आपण 21 तारखेला ५/६ दिवसांसाठी बाहेर जाणार आहोत. बाबांना वेळ नाही तेव्हा आपण दोघेच" ‘’

“ अरे पण कुठे ?’’

“ कळेल . सरप्राईज आहे. तू तयारी कर नेहमीसारखे फिरायला जायची.''

दोन दिवस सिंगापूरच्या गमती जमती ऐकण्यात, फोटो पाहण्यात ,त्याच्या आवडीचे पदार्थ करण्यात गेले नि 21 तारखेला आम्ही निघालो. कामशेतला उतरलो तर एक जीप आम्हाला घ्यायला आली होती. काही किलोमीटर प्रवास केल्यावर एका सुंदर रिसॉर्ट समोर जीप उभी राहिली. निसर्गरम्य परिसरात सुबक रिसॉर्ट , मंद दिवे लागलेले, सुरेख स्वागत आणि चक्क तंबूमध्ये रहायला ! परिसर खूप मोठा असावा . सकाळी दिसेल पण फुलांचे संमिश्र सुगंध , झाडांची सळसळ, मंद झुळुका ! काही वेळातच शहरी वातावरण विसरले. शांत वाटले खूप नि सहज उद्गारले ,किती सुंदर !

“ हो ना ,26 तारखेपर्यंत आहोत आपण येथे.’’..... इति राहुल . 

चमकून मी पाहिले. ओह , माझा वाढदिवस साजरा करायला आला हा सिंगापूरहून आणि मला निसर्ग आवडतो म्हणून थेट इथे ? आईची खूप आठवण येईल हे जाणवून!! डोळे भरून आले. 

“राहुल ,माझ्या birthday साठी’’........ 

“ मग खास आहे की नाही? अगं पन्नासावा वाढदिवस तुझा! तुला तंबूत राहायला आवडते ना?”

संमिश्र भावनांनी त्यादिवशी उशिराच झोप लागली तरीही पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. मी तंबूतून बाहेर येऊन पाहू लागले . ओहो ! फारच सुंदर परिसर !चार-पाचच तंबू होते पण रिसॉर्ट बरेच प्रशस्त होते. दूरपर्यंत झाडे वेली मधेच छोटेसे पार ,वेलींचे मंडप !प्रसन्न वातावरण . 

"आई नऊ वाजता नाश्ता करून निघायचे आहे.”

" कुठे?”

"कळेल"

अजून सरप्राईज संपले नाही तर? पुन्हा जीपने निघालो. बराच खडबडीत रस्ता . मग अर्ध्या तासाने एका मोठ्या पठारावर आलो. एका बाजूला डोंगर.  टेकडी म्हणावी हेच बरे. काही जण आधीच आले होते . एकाशी बोलून म्हणाला, चल . समोर पॅराग्लाइडिंग चे wings किंवा canopy पसरलेले. वाटलं, तो करणार असेल. पुढे एकाशी हस्तोदलन करून म्हणाला ,

“ ही माझी आई’’

“ नमस्कार’’

फॉर्मवर सही करताना म्हणाला, हे आपल्याला पॅराग्लायडिंग शिकवणार आहेत. 

“ आपल्याला म्हणजे ?”

“ Yes आई , you likes adventures a lot , म्हणून तुला ही birthday gift आहे,पन्नासाव्या वाढदिवसाची. तीन दिवसाचा कोर्स आहे. मी बुकिंग तिकडूनच केले होते सारे. बुकिंग कोर्सचे ,तंबूचे थोडे वेगळे पॅकेज आहे पण कोर्सच्या बुकिंगमध्ये सर्व आले !’’

“ अरे काय ग्रेट आहेस रे’’

“ एवढ्याशा गोष्टीला ग्रेट नाही म्हणत . great माणसे खूप वेगळी असतात,किती वेळा सांगू ?’’

“ मग काय म्हणू ? मला ग्रेटच वाटतंय सारं"

“ व्वा , छान ,इतकंच म्हण. एन्जॉय कर, बस्स !’’

प्रथम प्राथमिक माहिती, पॅराग्लायडिंगची रचना, कार्य ,सुरक्षितता, प्राथमिक टेकनिक्स सांगितले गेले. नंतर ते wings चे मोठ्ठे धूड घेऊन धावायचं ट्रेनिंग सुरु झालं. प्रथम छान वाटलं, मग काही वेळाने दमायला होऊ लागलं. जरा थांबून पुन्हा धावणे. काही तास हेच . मग समोरच्या टेकडीवर हे wings घेऊन चढून जायचे . गेलो दोघेजण. आमच्यासारखे इतरही बरेचजण होते. वरती गेल्यावर काही वेळ थांबून इतर कसे जातात ते पहायचे. मग पुन्हा सर्व सूचना.स्टार्ट कसा घ्यायचा, उडी मारतांना घ्यायची काळजी, दोऱ्याचे कार्य, वर कसे जायचे, खाली कसे यायचे वगैरे वगैरे. सर्वात महत्वाचे लँडिंग, त्यावेळी पायांची पोझिशन कशी हवी तर आपटणार नाही, दुखापत होणार नाही. सारे काही ऐकून उडी मारली तेव्हा प्रथम भितीच वाटली. मग थ्रिल आणि लँडिंग करताना टेन्शन. पण जमले. लँडिंग केल्यावर वेगात काही फूट धावत जातो तिथे मात्र थोडीशी अडखळले. राहुल आलाच मागोमाग.

“ काय मस्त ना ? ‘’

त्याने एकदम छान लँडिंग केले होते. सर आलेच मागोमाग नि डोळे वटारले त्याच्यावर,

“आईचे वजन किती ?’’

“ ---- --- --- ---”

" कमीतकमी 50 किलो हवे सांगितले होते ना ?”

" सॉरी, पण मला आईला ही gift द्यायची होती .”

सर विचारात पडले.

“ प्लीज सर …’’

“ तू एक वेगळाच मुलगा आहेस .बरं का आई , याच्यासाठी तुम्हाला special permission .नाहीतर 45 वजनाला आम्ही परवानगी देत नाही ‘’.राहुल समाधानाने हसला. .मी तर काय नवे नवे अनुभव घेत होते.

पुन्हा ट्रेनिंग सुरु. पुन्हा टेकडी चढणे, उडी मारणे नंतर मला ग्राउंडवरच सराव करण्यास सांगितले. संध्याकाळी परत रिसॉर्टवर .रात्री लक्षात आले आज पूर्ण दिवसभरात ऑफिसची आठवण आली नाही. फोनला तर रेंजच नव्हती. गेल्या कित्येक वर्षातला असा हा पहिलाच दिवस ! उशिरापर्यंत आम्ही खूप गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी उजळणी.विंग्स घेऊन धावणे.दोन तासांनी सुरु झाले, डोंगर चढा wings घेऊन नि उडी मारा. उडी मारल्यावर तेच. लँडिंग ची काळजी घ्या. दोन मिनिटात खाली येत होतो पण चढायला पंचवीस-तीस मिनिटे लागत होती .तीन वेळा चढून झाल्यावर थोडे दमायला झाले तर राहुल स्वस्थ बसून देणार ? स्वतः दोन्ही wings (एकच किती जड असते )घेऊन चढू लागला . “तू नुसती चढ.’’ हा पोरगा किती वेळा माझे डोळे भरून आणणार आहे ?

संध्याकाळी परतीची वाट . प्रचंड दमलेलो पण मनाने उत्साही. रस्त्याचा खडबडीतपणा मात्र खूपच जाणवला. इथे कार चालूच शकणार नाही म्हणून जीप !

रात्रीचे जेवण मस्तच. तंबूत छान झोप लागणार तर मॅनेजर बोलवायला आले .गेलो तर राहुल बघतो मिश्कीलपणे माझ्याकडे. टेबलावर केक कापायची तयारी ! रात्रीचे बारा वाजलेले आणि तेथील सर्व स्टाफ हसत मुखाने माझ्याकडे बघत होता! फुले, मेणबत्त्या..सारंकाही साग्रसंगीत ! अगदी 50 टाळ्या सुद्धा वाजविल्या त्यांनी ! सगळं काही मला अनपेक्षित असंच चाललं होतं. तंबूत परतल्यावर गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळलेच नाही.

तिसरा दिवस. पुन्हा दिवसभर तेच ट्रेनिंग. मात्र आता आत्मविश्वास पूर्णपणे आला होता. त्यामुळे स्टार्ट घेऊन उडी मारायची नि सेफ लँडिंग करायचे हे सहज जमत होते. म्हणूनच एन्जॉयही करत होतो आणि मग last jump असे राहुलला सांगून उडी मारायला सांगितले गेले. यावेळी तो आकाशात खूप वर गेला .अगदी ठिपक्याएवढा दिसेपर्यंत ! अर्धा तास तरी आकाशात स्वैर संचार करीत हळूहळू खाली येऊन सुरेख पैकी लँडिंग केले. वरती माझ्याबरोबर असलेल्या सरांनी त्याचे कौतुक केले. नि आता माझी टर्न !!

ओहो ,उडी मारल्यावर आता खालती न जाता खूप खूप वर गेले . मघाचची टेकडी आता दिसतही नव्हती. खुले आकाश, भन्नाट वारा, सूर्य मावळतीला आलेला.तोही खूप खाली दिसू लागला. शेंदरी, सोनेरी आकाश ! मी फक्त तरंगतेय, इकडे तिकडे मनसोक्त फिरतेय आकाशात आणि अचानक इयरफोन मधून "हॅप्पी बर्थडे, आई ,हॅपी बर्थडे... ऐकू येऊ लागले. अनेकांचे आवाज ? अरे हो !! तिकडे बरेच सैनिक ट्रेनिंगसाठी आले होते , त्यांना काहीतरी सांगताना पाहिले होते राहुलला मघाशी. माझे भाग्य इतके सैनिक राहुल बरोबर मला शुभेच्छा देत होते, तेही आई म्हणत !! सारे काही कानात साठवत , खाली दिसणार्‍या मावळतीच्या लोभस सूर्याकडे, सोनेरी आकाशाकडे डोळे भरून पहात, मी नुसती संचारत राहिले कित्ती वेळ! पक्ष्याप्रमाणे उडायचे स्वप्नच पुरे झाले की ! अखेर खाली यायची सूचना आल्यावर, अजून पाच मिनिटे, पाच मिनिटे करत आणखी थोड्या भंरार्‍या मारल्या नि खाली येऊ लागले. इतक्या उंचीवरून खाली येतानाचा अनुभवही अविस्मरणीय ! हळूहळू मुंग्यांसारखी दिसणारी माणसे दृष्टिपथास येऊ लागली .जवळ ,आणखी खाली ,आणखी खाली आणि वाह ! सेफ लँडिंग. सर्वांनी टाळ्या वाजविल्या .लैंडिंग नंतर वेगामुळे आपण काही अंतर धावतो. तशी मी जी धावत राहिले ती थेट राहुलच्या हातातच. “राहुल, Fantastic, अफलातून!! Thanks a lot dear. You are really great ‘’ 

“ आई, great……..

“ तू आत्ता काही म्हणूच नकोस. तू ग्रेटच आहेस!”.

त्या रात्री तंबूतून पौर्णिमेचा चंद्रही आमच्यावर चांदण्यांची शाल पांघरत होता.

परतीच्या प्रवासात रेंज आल्यावर मोबाईल खणखणू लागला आणि सारे विचारू लागले ,

“अगं वाढदिवसाला कुठे गुल झालीस? फोन करून थकलो.कुठे होतीस ?’’

….."हवेत’’............

- नीला बर्वे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा