शारदा

ग्रीष्माच्या दुपारी रस्ताही ओस पडलेला होता. चिटपाखरुही दूरदूर पर्यंत दिसत नव्हते. यशोदा आणि देवकी शांतपणे रवंथ करीत गोठ्यात बसल्या होत्या. मनी आपले अस्तित्व जाणवून देण्यासाठी विनाकारण 'म्याव म्याव' करीत पायापाशी रेंगाळत होती. वाघ्या मात्र माझ्याकडेच एकटक बघत होता. बोलू न शकणाऱ्या या प्राण्याच्या डोळ्यात पाहिले की नेहमीच वाटते याला माझ्या मनाच्या गहिऱ्या डोहाच्या तळाशी चाललेल्या उलथापालथीचा थांग लागलेला आहे. नकळत मग त्या डोहाचे पाणी पापण्यांच्या काठावर येते. पण आजपर्यंत ते किनारा ओलांडू शकले नव्हते. विचारांची दिशा बदलत परत मी खिडकीतून बाहेर रस्त्याकडे पाहू लागले. या भल्या मोठ्या खिडकीच्या सज्जात बसून, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना पहात रहाणे हा माझा छंदच होता. कोणाशीही न बोलता, मनुष्याच्या हालचालीवरून, त्याच्या देहबोलीवरून मनाचा ठाव घ्यायचा निष्फळ प्रयत्न मी नियमित करायचे. कधी कधी इथेच बसून क्लिष्ट विचारांना सुंदर भरतकामाच्या नक्षीत गुंफत राहायचे. आज मात्र वाट पाहत होते, वाटेकडे डोळे लावून, त्या अपरिचित जोग्याच्या परिचित आवाजाची. त्या आवाजात एक विलक्षण धार आहे … काळ्या कातळाला भेदून जाणारी … काळजात शिरणारी … मेंदूत भिनणारी ……. 

दूरून येणारे स्वर साऱ्या वातावरणात भिनू लागले:

"आशा और निराशा ये जीवनका है खेला
आते जाते सुख और दुख का है वो मेला
ए मूरख नादान भूल न जाना इस सच को
उजालाही मिटाता है रात के अंधेरे को"

स्वर जसे जवळ आले तसेच दूर अस्पष्ट होत गेले … 

******

चंडीपूर छोटेसे नदीतीरावर वसलेले गाव! तसे या गावात विशेष असे काहीच नव्हते. गावात यायचे झाले तरी नदीपार करून यावे लागायचे. पावसाळ्यात तर ती उधाणलेलीच असायची. त्यामुळे तिच्या दुसऱ्या किनाऱ्याला पाहाण्यासाठी एकाच किनाऱ्यावर पावसाळा संपेपर्यंत वाट पाहावी लागायची. नदीकिनाऱ्यावरचे आकर्षण होते वाणिचन्दांची भव्य हवेली. तिने किती पिढ्यांचा वावर पाहिला आहे हे सांगणे जरा कठीणच! खास कारागिरांकडून घडवून घेतलेली संगेमरमर मधली कलाकुसर होती त्या हवेलीत. हवेलीभोवती असलेल्या बगीचात नानविध प्रकारची फुलं आणि फळझाडे होती. नदी किनाऱ्यावर फिरायला आलेला परत परत मागे वळून पहायचाच. अगदी नदीपार करणारा नाविकही काही क्षणांसाठी आपली नाव थांबवायचा! या हवेलीत कशाचीच कमी नव्हती. कोणताही याचक आनंदानेच हवेलीतून बाहेर पडायचा. 

******

आज जरा जास्तच गडबड आणि धावपळ सुरू होती. मिठाईची ताटे हवेलीच्या आवारात मांडली जात होती. वाणिचन्दाच्या पत्नीच्या प्रसववेदना सुरु झाल्या होत्या. दाई थाळ वाजवतच आली, "सरकार, तिसरे कन्यारत्न आले." वाणिचन्द एकदम खुश झाले आणि म्हणाले "लक्ष्मी आणि दुर्गे नंतर आता शारदा आली माझ्या घरी!"

"शारदा सगळ्यात वेगळी आहे," असेच वाणिचन्द म्हणत. तिच्या बोलक्या डोळ्यात पाहिल्यावर शब्दांची गरजच नाही, असे भाव असायचे. तिच्या डोळ्यातल्या बाहुल्या जितक्या बोलू लागल्या तसे तसे तिच्या शाब्दिक मौनाचे गुपित साऱ्याना कळून चुकले. आधीच तिसरीही मुलगी म्हणून मनात राग असलेली शारदेची आई तिच्यापासून दूर होत गेली आणि तिच्याशी कायमचाच अबोला धरला. मोठया बहिणींनीही आईचेच अनुकरण केले. तिच्या डोळ्यातली चंचलता, विजेसारखी लख्ख चमकणारी चमक कधी कोणाला दिसली नाही. तिचे कौतुक फक्त वाणिचन्दांनाच होते. अशी एकाकी झालेली शारदा जशी जशी मोठी होऊ लागली तशी ती स्वत:ला गाईच्या गोठ्यात, घरकामात, कलाकुसरीत तर कधी नदीकिनारी पसरलेल्या बागेत रमवू लागली. खिडकीच्या सज्जात नाहीतर नदीकिनारी मनाच्या आंदोलनात मग्न ती तासनतास बसायची.

ती जेव्हा कधी नदीकिनारी असायची तेव्हा तिथे रायबहादूरांचा धाकटा मुलगा प्रकाशबाबू पाण्यात गळ टाकून आरामात बसलेला असायचा. अतिशय कामचुकार, आळशी, बिनकामाचा अशीच त्याची ख्याती होती. पण जेव्हा केव्हा ती बागेत यायची तेव्हा तो हमखास तिच्याशी बोलायचाच. त्याच्या बोलण्यातून तिला बाहेरच्या जगाची ओळख व्हायची आणि कुतूहलही वाटायचे. तो तिच्यासमोर त्याच्या मनातली सारी गुपिते उघड करायचा. ती ही डोळ्यातून आश्वासक भाव दाखवायची. त्याला ते कितपत कळायचे हे कोडेच होते!

वाणिचन्दांच्या थोरल्या मुलींचे विवाह यथायोग्य ठिकाणी झाले. आता शारदाही लग्नायोग्य होत आली होती. त्यांच्या पत्नीला सदैव एकच चिंता होती की अशा बोलू न शकणाऱ्या मुलीला कोण आपलेसे करेल? तोच विषय सदैव तिच्या बोलण्यात येऊ लागला. दिवसामागून दिवस जात होते आणि वाणिचन्द पत्नीच्या रोजच्या बोलण्याने हैराण होत होते. त्यांना तिची काळजी नव्हती असे नाही पण तिच्या निष्पाप डोळ्यात पाहिल्यावर ती आपल्याकडेच सुखात राहील असे त्यांना जाणवायचे.

******

नेहमीप्रमाणे शारदा नदीकिनारी गेली. मात्र आज प्रकाशबाबू तिथे नव्हता. बराच वेळ ती त्याची वाट पहात थांबली, तेव्हा आपल्या लवाजम्यासह येताना तो दिसला. आज तो गळ टाकायला नदीकडे गेलाच नाही. तो तिच्याजवळ आला आणि प्रश्नार्थक नजरेने तिला विचारले, " उद्या तुझ्यासाठी स्थळ बघायला तुम्ही कलकत्याला जाणार आहात?" तिच्यासाठीही हा प्रश्न अनपेक्षितच होता. या एका प्रश्नामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचे भुंगे तिच्या कोवळ्या मनाला डसू लागले. त्याचा निरोप न घेताच ती तडक हवेलीत आली. 

दुसऱ्या दिवशी पहाटेच वाणिचन्दांचा परिवार कलकत्त्याला रवाना झाला. तिथे एक छोटीशी हवेली भाड्याने घेतली. एक दोन महिने झाले तरी शारदेला तिच्या लग्नाबद्दल कोणीच बोलले नाही. त्यामुळे प्रकाशाबाबूने तिची मजा केली असेच तिला वाटू लागले. 

एक दिवस अचानक वाणिचन्द घाईगडबडीत आले आणि शारदेला तयार करण्यास पत्नीला सांगितले. आईनेही कधी नव्हे ते लाडाने तिला सजवले. दिवाणखान्यात ८-१० जण बसले होते. त्यांच्यासमोर जाऊन तिला उभे केले. साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या. तिची गत भेदरलेल्या कोकरासारखी झाली होती.

एका आठवड्यातच इभ्रतीला शोभेल अशा थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. इतक्या अचानक सारे काही घडले की शारदेच्या मनाचा थांग घ्यायची कोणाला गरजच वाटली नाही. सासर तिच्या माहेरासारखे श्रीमंत नव्हते. ना इथे नदी होती, ना मोठ्या खिडक्या, ना बाग ना बगीचा, ना गोठ्यात गायी. तिची खोलीही अंधुक, खिडकीतून जेमतेम प्रकाशाची तिरीप येईल इतकीच उघडलेली. सासरी आल्यावर तिच्या गौर रूपाचे, मोठ्या डोळ्यांचे कौतुक होऊ लागले. शांत, न बोलता सांगितलेली काम करते म्हणून सासरच्यांना अजूनच कौतुक वाटू लागले. पण तिच्या न बोलण्याचे गुपित जसे कळाले, तशी प्रत्येकाचीच नजर बदलली आणि बोलण्यातून विखार उमटू लागले. 

काही दिवस गेले आणि एक दिवस अचानक तिचा नवरा दुसरे लग्न करून घरी आला. तेव्हापासून शारदा त्या खोलीत एकटीच वाट पहाते खिडकीतून येणाऱ्या तिरीपेची … तेव्हा तिच्या मनात शब्द निनादत रहातात …


"आशा और निराशा ये जीवनका है खेला
आते जाते सुख और दुख का है वो मेला
ए मूरख नादान भूल ना जाना इस सच को
उजालाही मिटाता है रातके अंधेरे को


मुक्ता पाठक शर्मा 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा